साहित्य:- माशांना मॅरिनेट करण्यासाठी.
माशाचे चार-पाच तुकडे करून स्वच्छ धुवून घ्यावेत. ४-५ कोकमाच्या तुकड्यांना भिजत घालून केलेला रस, मीठ अर्धा चमचा, पाव चमचा हळद, लाल तिखट अर्धा चमचा.
- माशांना कोकम, मीठ , तिखट, हळद लावुन १५ मिनिट फ्रिझ मध्ये ठेवा.
साहित्य:- छोटा कांदा १, लसणीच्या ५-६ पाकळ्या, टोमॅटो १, दोन चमचे धने, अर्धा ओला नारळ खवून,
अर्धी वाटी स्वच्छ धुवून कोथींबीर, आल्याचे छोल्या एवढे २ तुकडे,लाल तिखट अर्धा चमचा चविला+रंगाला, ओली हिरवी मिरची २ ,शंकासुरी मिरची २, बेडगी मिरची २ , मीठ अर्धा चमचा .
ओला मसाल्यासाठी कृती- वरिल सर्व साहीत्य एकत्र करुन घ्यावा, मिक्सरच्या भांड्यात अगदी नावाला पाणी घालुन सगळा मसाला बारीक गंधा सारख वाटुन घ्यावा.
फोडणीसाठी –
तेल ४ चमचे, लाल तिखट अर्धा चमचा, लसणीच्या २ पाकळ्या, कढीपत्ता ४ पाने,२ त्रिफळे.
कृती- वरिल दिलेल्या साहीत्याच्या क्रमाने कढई मध्ये फोडणी करावी. आता या फोडणी मध्ये ओला मसाला घालुन चांगला परतावा , बर्यापैकी तेल सुटु लागल्या वर मॅरिनेट केलेले माशांचे तुकडे घालावे.
थोडे कोमट/ गरम पाणी घालुन मंद
गॅसवर उकळी काढावी. उकळी मध्ये २ त्रिफळे टाका. थोडी कोथींबीर वरुन भुरभुरा. मच्छी कढी तयार आहे.
टिप-
1) मॅरिनेट केल्याने- कोकम,मीठ,तिखट, हळद हे माशांमध्ये आत पर्यंत व्यवस्थित मुरते.
2) कोकमाच्या ऐवजी चिंच वापरु शकता.
3) ओला मसाला करताना पाणी जास्त वापरले तर तो फोडणी मध्ये टाकल्यावर वरती-वरती उडतो त्यामुळे पाणी थोडेच घालावे.
4) लाल तिखट फोडणी मध्ये टाकल्याने चांगला रंग येतो.
5) थोडे कोमट पाणी या साठी की थंड पाणी वरुन घातल्याने चव कमी होते (आईचा उपदेश).
6) पाणी स्वतःच्या अंदाजाने घाला किती पातळ किवा जाडसर रस्सा हवा आहे त्या नुसार,जाडसर रस्सा चवदार लागतो.
7) फोडणी जास्त उकळू नये नाहीतर माशांचा खिमा होइल.
8) त्रिफळे टाकल्या वरती मस्त चव येते, पण २ च त्रिफळे टाका, जास्त टाकल्याने थोडी तुरट चव येते.(माझा अनुभव- मागे एकदा अजुन छान चव येईल म्हणुन २-४ त्रिफळे जास्त घातली होती, आणि सगळा बेत बिघडला होता)
9) वरुन कोथींबीर ऐछीक, पाहीजे तेवढी घाला.