पाककृती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पाककृती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ३० जुलै, २०२१

ओल्या काजूची भाजी

 

हे कोकणातील अगदी सुप्रसिद्ध काजू गर, त्याची रस्सा भाजी किंवा सुखी भाजी अगदी चमचमीत होते. बहुतेक सगळ्यांची आवडती अशी ही भाजी, करताना मात्र थोडी क्लीष्ट वाटते, कारण काजूगर सालीपासून वेगळे करण्यासाठी फार वेळ लागतो. तसेच त्यांचा चीक हाताला लागून खाज वगैरे येऊ शकते. पण इथे आपण हे काजू गरम पाण्यात टाकून ५ मिनिटे वाफवून घेतोय. त्यामुळे वेळ सुद्धा वाचतो आणि चीक सुद्धा निघून जातो. काजू अगदी सहज हाताने सालीपासून वेगळे करता येतात.

kaju.jpgसाहित्य-
पाव किलो ओले काजू गर, २ छोटे कांदे, २ छोटे टोमॅटो, अर्धी वाटी ओलं खोबरं किसून, ४ लसूण पाकळ्या, आलं लसूण पेस्ट १ मोठा चमचा, ५-६ कढीपत्त्याची पाने, गरम मसाला पावडर २ चमचे, लाल तिखट २ चमचे, हळद पाव चमचा, २-३ मोठे चमचे भरुन तेल, १ चमचा किंवा चवीनुसार मिठ, मुठभर स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती-
मंद आचेवर कढई मध्ये एक चमचा तेल गरम करून घ्या. यात कांदा आणि टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. नंतर त्यामध्ये किसलेले ओलं खोबरं घालून ते तेलावर व्यवस्थित भाजून घ्या. गॅस बंद करताना यामध्ये लसूण पाकळ्या मिक्स करून मग हे सर्व साहित्य थंड करून घ्यायच आहे. मिक्सर मधून बारीक वाटून घ्यायचे आहे. या वाटणामध्ये पाण्याचा वापर अगदी नावापुरता करायचा आहे.

एक साईट ला वाटण तयार आहे. वरती वापरलेल्या कढईमध्ये २ चमचे तेल गरम करून यात आलं-लसूण पेस्ट घालून मिनिटभर परतावे. त्यावर वरती केलेले कांदा खोबर्याचे वाटप घालून ते व्यवस्थित एकजीव करून घ्यावे. मसाल्याला तेल सुटू लागले, की मग लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला पावडर, आणि चवीनुसार मीठ घालावे. पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून मग यामध्ये ओले काजू गर घालावे. वरुन दोन वाटी गरम किंवा कोमट पाणी घालून चांगले शिजवून घ्या. १०-१५ मिनिटांत मध्यम आचेवर भाजी शिजून तयार होते. वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरावी, गरमागरम भाकरी किंवा पोळी बरोबर खायला घ्यावे.

kaju 2.jpg


टिप -

* रस्सा भाजी साठी पाण्याचे प्रमाण आवश्यकतेनुसार वाढवावे.
* काजू बरोबर एखादा बटाटा घालून भाजी वाढवता येते आणि चवीला देखील छान लागते.
* घरी आधीच बनवुन ठेवलेले ओले वाटप घालून ही भाजी करु शकता. वेळ वाचतो. वाटप सोडले तर बाकी कृती सारखीच आहे.
* काही वेळा काजू लवकर शिजतो. तर काही वेळा जास्त वेळ लागतो. हे हाताने दाबून पहावे. शिजवून अगदी खिमा करू नये.

{https://siddhic.blogspot.com}

सोमवार, २७ जुलै, २०२०

बेसन झुणका

पावसाळा सुरु झाला की, गरम-गरम बेसन झुणका आणि भाकरीचा बेत एकदातरी झालाच पाहिजे. आहा... स्वर्गसुखच म्हणा ना.

 

साहित्य - १ वाटी बेसन पिठ, तीन वाट्या पाणी, वाटीभर कोथिंबीर.

फोडणीसाठी साहित्य - ३-४ टेबलस्पून तेल, एक टिस्पून मोहोरी, चिमूटभर हिंग.

५-६ लसूण पाकळ्या, ५-६ पाने कढीपत्ता, १ कांदा, १ टोमॅटो, २ हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आद्रक सर्व साहित्य जमेल तेवढे अगदी बारीक चिरून घ्या. एक टिस्पून हळद, दोन टिस्पून लाल तिखट, एक टिस्पून मीठ.

कृती- १ वाटी बेसन पिठामध्ये तीन वाट्या पाणी घालून पातळ मिश्रण तयार करा.यात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. यामध्ये मूठभर चिरलेली कोथिंबीर मिक्स करून बाजूला ठेवून द्या.

              एका कढईमध्ये तेल घेऊन ते कडकडीत गरम झाले की, मोहोरी घालावी ती तडतडल्या नंतर यात हिंग,लसूण,कढीपत्ता,कांदा,टोमॅटो,मिरची,आद्रक  हे साहित्य लालसर परतून घावे. मिश्रणाला तेल सुटू लागले की मग यात हळद,निखत,मीठ घालून दोन मिनिट एकसारखे परतावे. सर्व साहित्य शिजून व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर यात वरून बेसन-पाणी-कोथिंबीर मिश्रण घालावे  व एकसारखे मिक्स करून घ्यावे. आता मोठा चमचा घेऊन पाच मिनिट सतत हे मिश्रण ढवळत रहावे.अन्यथा ते खाली चिकटून राहण्याची शक्यता असते. कढईवर झाकण ठेवून बेसन मंद आचेवर शिजू द्यावे. पातळ मिश्रण अगदी घट्ट होईपर्यंत मध्येमध्ये ढवळावे म्हणजे करपणार नाही. साधारण ५-१० मिनिटात झुणका तयार होतो.

असा साधासुधा पण लज्जतदार बेत या पावसाळ्यात एकदातरी होऊन जायदया.

'गरमा-गरम झुणका भाकरी सोबत एखादा पापड आणि बारीक चिरलेला कांदा.'


पॉम्फ्रेट तिखलं (ऑइल फ्री)

 तिखलं हा एक मालवणी पदार्थ. पण पावसाळ्यात मिळणाऱ्या ताज्या-ताज्या माश्याच तिखलं कोकणात अगदी घरोघरी केल जात. प्रत्येकाची करण्याची पद्धत थोडी वेगळी असू शकते. आंबट, तिखट असा हा अगदी चमचमीत मासळीचा प्रकार... नुसत्या नावानेच जिभेला पाणी सुटल्याशिवाय रहात नाही.‘


मॅरिनेट करण्यासाठी लागणारी सामुग्री -
हाताच्या आकाराचे १ पॉम्फ्रेट स्वच्छ धुवून साफ करून घावे, त्यावर सुरीने आडवे दोन कट द्यावे. यावर प्रत्येकी अर्धा छोटा चमचा हळद, लाल तिखट, कोकम रस/ आगळ आणि १ चमचा मीठ हे सर्व व्यवस्थित लावून झाकून १५-२० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवावे. (छोटा चमचा घ्यावा, त्याचा आकार साहित्य चित्रामध्ये दाखवला आहे.)
1592378080490.jpg

तिखलं मसाला साहित्य- लसणीच्या २-३ पाकळ्या बारीक चिरून, मूठभर स्वच्छ धुतलेली कोथींबीर, १-२ हिरवी मिरच्या (कमी तिखटाच्या), १ कोकम साल. लाल तिखट चविला+रंगाला प्रत्येकी १-१ चमचा, गरम मसाला १ चमचा, कांदा-लसूण मसाला असेल तर १ मोठा चमचा. थोडेसे पाणी.


कृती- मॅरिनेट केलेल्या पॉम्फ्रेटला एका कढईमध्ये घ्या. त्यावर वरील सर्व साहित्य लावा. थोडे शिजण्यापुरते पाणी घालून वरती एक झाकण ठेवून पलटी न करता तसेच ५ मिनिटे तसेच दुसर्या बाजुनेही ५ मिनिटे शिजवुन गॅस बंद करावा. थोडी कोथींबीर वरुन भुरभुरवी व चमचमित पॉम्फ्रेट तिखलं भाकरी बरोबर सर्व करा.

थोडे पाणी घातल्याने पॉम्फ्रेट दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शिजते, जास्त शिजवण्याची गरज लागत नाही. या प्रकारे ओला बांगडा आणि हलवा वगेरे मासे छान होतात.
WhatsApp Image 2020-06-21 at 12.24.34 (1).jpeg

विशेष - या प्रकारामध्ये आपण अजिबात तेल वापरले नाही. माश्याला स्वतःचे तेल असतेच तेवढे पुरे आहे. ज्यांना डॉक्टरने जेवणातील तेल कमी करण्याचा सल्ला दिला असेल तर त्यांच्यासाठी हा उत्तम प्रकार.
WhatsApp Image 2020-06-21 at 12.24.34.jpeg

{https://siddhic.blogspot.com}

शनिवार, ११ एप्रिल, २०२०

वेज मोमोज आणि चटणी


चटणीसाठी साहित्य व कृती :
२ टोमॅटो आणि ४ सुक्या लाल मिरच्या हे दोन्ही थोडे पाणी घालुन कुकरला १ शिट्टी काढुन शिजवुन घ्या.  टोमॅटो वरची साल काढुन, टोमॅटोमिरची, २-३ लसुन पाकळ्या आणि तेवढेच आद्रक एकत्र मिस्करला वाटुन घा. 
१ टिस्पुन साखर, थोडे मिठ, १ टिस्पुन लिंबूरस, २ टिस्पुन तेल.

-  गरम तेलामध्ये आद्रक-लसुन, टोमॅटो-मिरची मिश्रण, साखर, मिठ, लिंबूरस सर्व पाच मिनिट शिजवा.
चटणी तयार आहे.


कव्हरसाठी साहित्य व कृती :
१ कप मैदाचे किवा गव्हाचे पीठ घ्यावे. त्यात थोडे मिठ आणि दोन चमचे तेल टाकुन पाण्याने घट्ट भिजवुन घ्यावे.
अर्धा तास झाकुन ठेवा. आपण पोळ्या करण्यासाठी जे कणिक मळुन फ्रिजला ठेवतो ते देखिल इथे वापरता येते.


सारणासाठी साहित्य व कृती: 
शिमला मिरची, गाजर , पत्ताकोबी , कांदा हिरवी पात व सफेद भाग या प्रत्येकी भाज्या १ छोटी वाटी धुवून घ्याव्या. यामध्ये तुम्ही पनीर, स्विटकॉर्न  यासारख्या बर्‍याच भाज्या वापरु शकता.
अदरक-लसुन व हिरवी मिरची याची १ मोठा चमचा पेस्ट किवा हे सर्व थोडे जाडसर कुटुन घेतले तरिही चालेल.
२ टी स्पून तेल, सोया सॉस १ चमचा, १/२ चमचा मिरेपूड व मीठ चवीनुसार.
- गरम तेलामध्ये अदरक-लसुन व हिरवी मिरची याची पेस्ट घालुन, वरिल सर्व भाज्या घालुन पाचच मिनिट शिजवा. मग यात मिरेपूड व मिठ घालुन दोनच मिनिटे शिजवुन भाजी थंड करायला ठेवा. याला जास्त शिजवुन खिमा करायचा नाही.

आता आपण भिजवलेल्या कणकेची लहान पुरी लाटा त्यात १ चमचा किवा अंदाजे तयार भाजी भरून मोदकाचा आकार द्या. भाजी जेवढी जास्त भरणार तेवढे छान रुचकर लागतात. आता या मोमोजना, उकडीच्या मोदकाप्रमाणे कुकरमध्ये १०-१५ मिनिट वाफवुन घ्या.
 (कुकरची शिट्टी बाजुला काढुन ठेवा.) 


चमचमीत मोमोज खायला तयार आहेत.




शनिवार, ४ एप्रिल, २०२०

बटाटा वडा


साहित्य:
पाव किलो बटाटे.
बेसन १ छोटा कप.
४-५ हिरव्या मिरच्या, ५ लसूण पाकळ्या, एक इंच आल्याचा तुकडा, मुठभर कोथिंबीर धुवून बारिक चिरुन,  ४-५ कढीपत्ता पाने धुवून,
चिमुटभर मोहरी आणि चिमुटभर हळद , थोड हींग, १ चमचा मिठ.

कृती:
पाव किलो बटाटे स्वच्छ धुवून, उकडुन घ्यावे.  हाताने थोडे हलकेच कुस्करुन घ्यावे. अतिशय बारिक करु नये. (चित्रात दाखवल्या प्रमाणे घ्यावे.)
बेसनामध्ये चिमुटभर मिठ, अगदी थोडी हळद टाकुन पाणी मिक्स करावे. बॅटर जास्ती पात्तळ किंवा खूप जाड नको. 
मिरच्या, लसूण, आल हे एकत्र सहित्य करुन मिक्सर मधुन किवा खलबत्त्यामध्ये जाडसर ओबडधोबड वाटुन घ्या.


फोडणीसाठी कढईत  तेल गरम करा. तेल कडकडीत तापले कि त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली कि, कढीपत्ता पाने, हळद आणि हिंग घालून मग मिरची, आल, लसुन पेस्ट घाला. वरुन कुस्करलेल्या बटाट्याला फोडणी द्या. मिठ, कोथिंबीर घालुन पाचचं मिनिटात गॅस वरुन उतरुन ही भाजी थोडावेळ थंड करायला ठेवा. आता याचे लहान लहान गोळे करुन, बेसनाच्या बॅटर मधुन गोळा बुडवून तेलात सोडा. कडकडीत तेलामध्ये मस्त छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत मध्यम आचेवर वडे तळून घ्या.


एखादी खरपुस तळलेली मिठातील मिरची आणि तिखट खोबर-लसनाची चटणी जोडीला घेऊन, चविष्ट वडे खायला तयार आहेत.


मंगळवार, ३१ मार्च, २०२०

एग फ्राइड राइस रेसिपी



साहित्य-
बासमती किवा कोणताही तांदुळ १ वाटी धुवून अर्धा चमचा मिठ घालुन व्यवस्थित शिजवुन घ्यावा,
शिमला मिरची, गाजर , पत्ताकोबी , कांदा हिरवी पात व सफेद भाग वेगवेगळा या धुवून बारिक चिरलेल्या भाज्या प्रत्येकी १/ ४ वाटी.
अदरक-लसुन का पेस्ट - १ चमचा,  हिरवी तिखट मिरची ४,  काळीमीरी पावडर १ चमचा.
अंडी २, मीठ १ चमचा , तेल ४ चमचे. 
चिली सॉस , टोमैटो सॉस , सोया सॉस , प्रत्येकी  १/२ छोटा चमचा.
मुठभर कोथिंबीर.


कृती - 
शिजवुन घेतलेला राईस थोडा सुटा मोकळा करुन हवेवर ठेवा.
कढईमध्ये तेल गरम करुन यात अदरक-लसुन पेस्ट, हिरवी मिरची, शिमला मिरची, गाजर, पत्ताकोबी, कांदा फक्त सफेद भाग, काळीमीरी पावडर मीठ हे सर्व क्रमाने घाला. पाच मिनिट वरिल साहित्य व्यवस्थित शिजु द्या. 
मग हे मिश्रण कढईच्या एका बाजुला घेऊन, दुसर्‍या बाजुला राहिलेल्या तेलामध्ये दोन अंडी फोडुन घाला त्यावर थोडे मिठ घालुन ते फेटुन व्यवस्थित शिजवुन घ्यावे (चित्रात दाखवल्या प्रमाणे अजुन एखादी कढई लागु नये म्हणुन एकाच कढईमध्ये दोन्ही करा).

आता कढईमधील सर्व साहित्य एकत्र करा (अंडी मिश्रण व भाज्या मिश्रण).
यामध्ये शिजवुन घेतलेला राईस व कांदा हिरवी पात घालुन वरुन चिली सॉस, सोया सॉस, टोमॅटो सॉस हे सगळे सॉस मिक्स करा. 
५-१० मिनिट एक वाफ काढुन गॅस बंद करा.  
एग फ्राइड राइस तयार आहे. वरुन कोथिंबीर भुरभुरुन गरमागरम सर्व करा.




रविवार, २९ मार्च, २०२०

रिक्वेस्टेड रेसिपीज

" मागिल आठवड्यापासून WFH चालू आहे. या वेळात करायचं तरी काय ? हा सध्या भेडसावणारा महा गहन प्रश्न ! झोपा तरी किती काढणार ? गप्पा तरी किती मारणार ? लिहिणार तरी किती आणि काय ?
कंटाळ्याचा पण आता कंटाळा आला आहे.
घरात करण्यासारखे काय-काय उद्योग आहेत. यांची उजळणी करुन, मी नेहमीप्रमाणे शेवटी वळते ती स्वयंपाकघराकडेच. आणि सुरु होतात रेसिपीज बनवण्याचे नवनवे प्रयोग. 😋  याआधी आणि या आठवड्यात केलेल्या रेसिपीज ची लिंक मी इथे देत आहे.... काही मैत्रिणींना उपयुक्त आणि रिक्वेस्टेड रेसिपीज पुढील प्रमाणे."



वेज मोमोज आणि चटणी

बटाटा वडा रेसिपी
एग फ्राइड राइस रेसिपी

श्रीखंड 

अंडा बिर्याणी

अळूची पातळ भाजी/फदफदं/फतफत 

नारळीभात

चिकन कटलेट्स

पुडिंग- साधे सोपे आणि झटपट

मच्छी कढी / fish curry

गुळा-नारळाच्या पुर्‍या/वडे/घारे

तांदळाची बोर

एगलेस पॅनकेक (pancake) झटपट आणि चविष्ट

मिश्र डाळीचा झटपट आणि पौष्टीक ढोकळा

घरगुती साजूक तूपाची खास रेसिपी !

चिरोटे

मोड आलेल्या मेथीदाण्याची भाजी

गोडा मसाला-ऐनवेळी कराव्या लागणाऱ्या स्वयंपाकासाठी.

कुडाच्या शेंगांची भाजी

सोमवार, २३ मार्च, २०२०

एगलेस पॅनकेक (pancake) झटपट आणि चविष्ट

एगलेस पॅन केकेची रेसिपी




साहित्य -
२ वाटी मैदा किवा गव्हाचे पीठ, ३ चमचे पिठीसाखर, १ चमचा बेकिँग पावडर, अर्धा चमचा बेकिँग सोडा, ३ चमचे तूप, १ ते दिड वाटी दूध. १ चमचा vanilla essence.

कृती-
मैदा, पिठीसाखर, बेकिँग पावडर आणि बेकिँग सोडा, vanilla, मेल्टेड तुप हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करुन घ्यावे. यानंतर यामध्ये थोडे-थोडे दुध घालून मिश्रण थोडे सैलसर करावे. इडलीच्या मिश्रणाप्रमाणे हे मिश्रण तयार झाले पाहीजे. जास्त पातळ करु नये.
आता हे मिश्रण पाच मिनिटासाठी झाकून ठेवावे. यानंतर (अगदी बारीक आचेवर) नॉनस्टीक पॅन वरती थोडेसे तुप लावून घ्यावे, व त्यावर पळी ने थोडेसे मिश्रण घालावे (फुलक्या एवढेच लहानसे पसरावे). एका बाजुने भाजून दुसया बाजूनेही सोनेरी सर भाजून घ्यावे.
ही अगदी साधीसोपी एगलेस पॅन केकेची रेसिपी आहे.

* बेकिँग सोडा आणि बेकिँग पावडर या दोघांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. त्यामुळे हे दोन्ही वापरले जाते.
* जर या मिश्रणामध्ये बेकिँग सोडा ऐवजी एक अंडे फेटून घातले तर तो ही केक चविष्ट लागतो.






रविवार, २२ मार्च, २०२०

मिश्र डाळीचा ढोकळा

साधारणपणे तिघांसाठी.
साहित्य: * तांदुळ, चना डाळ, मुग गळ, उडीद डाळ प्रत्येकी अर्धी वाटी. * हळद, हिरवी मिरची व आले व लसुन पेस्ट २ मोठे चमचे, १ चमचा साखर, मीठ चवीपुरते. * फोडणीसाठी तेल ४ चमचे, १ मोठा चमचा मोहरी ,कढिपत्ता ८-१० पाने, ३ हिरवी मिर्ची. * सजावटीसाठी थोडी कोथींबीर. कृती: तांदुळ, चना डाळ, मुग डाळ, उडीद डाळ प्रत्येकी अर्धी वाटी स्वच्छ धुवून ४ तास भिजत ठेवा. त्यानतर हे सर्व ईडलीच्या मिश्रणाप्रमाणे मिक्सरमध्ये वाटून घ्या. आणि ६-७ तास हे मिश्रण झाकुन ठेवा. {साधारणता दुपारी डाळी व तांदुळ भिजत घातले तर रात्रीते मिक्सर करुन घ्या. व रात्रभर आंबवण्यासाठी झाकुन ठेवा. या मध्ये पिठ छान फुलून येते व खायचा सोडा घालण्याची अजीबात गरज नसते. }
ह्या मिश्रणात हळद, हिरवी मिरची व आले व लसुन पेस्ट, अर्धा चमचा साखर, मीठ घाला व चांगले ढवळुन एकजीव करावे. मिश्रणाची कन्सीस्टन्सी भजी करण्यासाठी ज्या प्रमाने बेसन पिठ तयार केले जाते त्याप्रमाने ठेवावी. ढोकळ्याच्या स्टण्ड् किवा एक पसरट पातळ स्टिल यांच्या डब्याला आतुन तेलाचा हात लावुन घ्या. आता हे मिश्रण त्या डब्यामध्ये ओतून व्यवस्थित टॅप करा. एकसारखे पसरु द्या. मग हा डब्बा कुकरमधे ठेवा. शिटी न लावता १५ मिनिटे वाफवून घ्या. कुकरमधे पाणी जरा जास्त ठेवावे. डबा थोडा पाण्यावरतीच रहाण्यासाठी कुकरमधे आतमध्ये डब्याखाली एखादी उंच प्लेट ठेवून द्यावी. तेल, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिर्ची, अर्धा चमचा साखर याची फोडणी करून घ्यावी. या फोडणी मध्ये अर्धा पेला पाणी ओतून मग हे सर्व गरमागरम मिश्रण वाफवलेल्या ढोकळ्यावर ओतावे शेवटी त्याचे आवडत्या आकाराप्रमाने तुकडे करावे.



ढोकळा खायला तयार आहे.

सोमवार, ४ नोव्हेंबर, २०१९

घरगुती साजूक तूपाची खास रेसिपी !




तूप हे लोणी कढवून बनविले जाणारे एक पाकमाध्यम आहे. त्याचा उपयोग पाककलेत तसेच धार्मिक क्रियांमध्ये केला जातो.
तुपाचे आरोग्यदायी फायदे
1.  शरीराला उष्णता मिळते.
2.  इन्स्टंट एनर्जी मिळते
3.   स्मरणशक्ती वाढते
4.   मुळव्याधीचा त्रास कमी होतो
5.   सांधेदुखीतून आराम मिळतो
6.   लहान मुलांच्या वाढीसाठी उत्तम
7.   वजन नियंत्रित राहते
8.   तूप कॅन्सर पेंशटसाठी उपयुक्त
9.   हातापायाची जळजळ कमी होते
10.  डोळ्यांचे विकार कमी  होतात
11.  मुत्रविकार कमी होतात


घरगुती साजूक तूपाची खास रेसिपी !
साहित्य
·         मलईसाठी एक डब्बा
·         गाळणी
·         तूप गरम करण्यासाठी पातेले
·         लोणी घुसळण्यासाठी पातेलं
·         तूप साठवण्यासाठी भांड


कृती:

तूप बनवणे हे सोपे आहे. पण त्यासाठी पुरेशी पुर्वतयारी करणे आवश्यक आहे. त्यामुळे तूप बनवण्यासाठी दूधावरची मलई नियमित काढून हवाबंद डब्ब्यात साठवून ठेवा. तो डबा नेहमी फ्रीजमध्ये ठेवा. अन्यथा मलई खराब होईल.
  • पुरेशी मलाई साठल्यानंतर ( मलईच्या निम्मे तूप बनते) ते मोठ्या भांडयात काढूब ठेवा.मलई रवीने घुसळा. हळूहळू त्यावर लोणी साठायला सुरवात होईल. लोणी चमच्याने बाजूला काढा.
  • लोणी काढलेले पातेले गॅसवर ठेवा. त्यातील फॅट हळू हळू वितळेल.  त्याचा रंग़ गोल्डन ब्राऊन होईपर्यंत गॅस मंद आचेवर ठेवावा. दरम्यान चमच्याच्या सहाय्याने मिश्रण हलवत रहा.
  •  त्यानंतर तूप गाळून घ्या. ते तूप स्टीलच्या भांड्यात साठवा.



रविवार, २७ ऑक्टोबर, २०१९

चिरोटे




दिवाळीच्या फराळासाठी तयार केला  जाणारा एक पारंपरिक महाराष्ट्रीयन गोडाचा पदार्थ म्हणजे चिरोटे. खुसखुशीत चिरोटे त्यावर मस्त साजूक तुप आणि वरुन भुरभुरलेली पीठी साखर असा याचा थाट. बिनसाखरेचा चिरोटा देखील चवदार लागतो . खारी प्रमाने चहा बरोबर किवा नुसताच खाऊ शकता. पण खारीपेखा नक्कीच पौष्टिक आहे. गोड न खाणाऱ्यांसाठी किंवा कमी गोड खाणाऱ्यांसाठी साखरेचे प्रमाण कमी-जास्त करून करता येतो. कोणी फक्त मैद्याच्या करतात तर कोणी मैदा आणि रवा मिक्स करून करतात अशा चिरोटे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती  आहेत .
लाटण्याच्या ही दोन पद्धती आहेत गोल आणि उभी.  मी गोल  चिरोटे  बनवते. पण जरा वेगळी पद्धत आहे. गुलाब पाकळ्यांचा  पाक म्हणजे इथे आपण मेप्रोचा तयार गुलाब सिरप वापरु शकता. यामध्ये केलेले गुलाबी चिरोटे हे माझ स्पेसीफीकेशन आहे .  
तर मी ज्या पद्धतीत चिरोटे बनवते त्याची ही आगळीवेगळी कृती.

साहित्य:

२ वाटी मैदा ( दोन भागात विभागुन घ्यावे.)
१ वाटी पिठी साखर  ( दोन भागात विभागुन घ्यावे.)
२ चमचे कडाडीत गरम तूप  ( दोन भागात विभागुन घ्यावे.)
२ छोटा चमचा मीठ  ( दोन भागात विभागुन घ्यावे.)
१/२ चमचा बेकिंग पावडर  ( दोन भागात विभागुन घ्यावे.)
३ चमचा गुलाब सिरप 
१/२ वाटी तांदळाची पिठी (साट्यासाठी)
३ चमचे पातळ तूप (साट्यासाठी)
पीठ भिजवण्यासाठी थोडे दूध
तळण्यासाठी तूप.

कृती:

१)  विभागलेल्या दोन भागापैकी प्रत्येक साहीत्याचा फक्त एक भाग येथे घावा. 
मैदा, पिठी साखर, गरम तूप, मीठ, बेकिंग पावडर एका भांड्यात घ्यावा. या मधले तूप आधीच कडक तापवावे मग वापरावे,  जर मोहनासाठी तूप कमी गरम असेल तर चिरोटे नरम पडतात. दूध घालून सर्व साहीत्य घट्ट भिजवावे. 

२) विभागलेल्या दोन भागापैकी प्रत्येक साहीत्याचा दुसरा भाग येथे घावा.

मैदा, पिठी साखर, गरम तूप, मीठ, बेकिंग पावडर , गुलाब सिरप हे सर्व एका भांड्यात घ्यावा.  वरील कृती प्रमानेच दूध घालून घट्ट भीजवावे. 
दोन्ही तयार पीठाचे गोळे ( १ व २) थोडा वेळ वेगवेगळे झाकून ठेवावे.

३) भिजवलेला दोन्ही पीठान्चे वेगवेगळे मध्यम असे पोळी करताना जसे गोळे करतो त्या आकाराचे गोळे करून घ्यावे.   त्याच्या एकदम पातळ पोळ्या लाटून घ्याव्यात. यामध्ये  साधारण ३  पोळ्या सफेद पीठाच्या आणि ३  पोळ्या गुलाब सिरप घातलेल्या गुलाबी पीठाच्या होतील. जितक्या पातळ पोळया तितके चिरोटे हलके होतील आणि चिरोट्यांना छान पदर सुटतील.


३) एक सफेद पीठाची लाटलेली पोळी घ्यावी. त्या पोळीवर पातळ केलेले साजूक तूप आणि तांदूळ पिठ याची मध्यमसर घट्ट पेस्ट लावावी. त्यावर एक  गुलाबी पीठाची पोळी ठेवावी परत त्यावर तूप आणि तांदूळ पिठाची पेस्ट लावावी. 


४) नंतर दोन बाजूंनी गुंडाळी करत मध्यापर्यंत यावे. एका बाजूची गुंडाळी दुसर्या गुंडाळीवर ठेवून थोडे चेपावे. आणि हि तयार गुंडाळी त्यातील तूप सुकेस्तोवर ठेवून द्यावी. अशाच प्रकारे उरलेल्या २-२ पोळ्यांची गुंडाळी बनवून घ्यावी.


५) या गुंडाळ्यांचे १ इंचाचे तुकडे करून घ्यावे. गुंडाळीचे तुकडे वरील बाजूने न लाटता जिथून कापले आहे त्या बाजूला हलके दाबून एकदा उभे आणि आडवे असे लाटणे फिरवावे. या चिरोट्यांचा आकार गोल येतो. आणि दिसायला ही आकर्षक दिसतात. 


७) तळण्यासाठी तेल तापत ठेवावे. तेल गरम झाले कि आच मध्यम करावी. आणि चिरोटे गोल्डन ब्राउनतळून काढावे. पेपरवर काढून लगेच त्यावर २-३ चिमटी पिठीसाखर पेरावी.


८) मस्त सफेद गुलाबी रंगाचे चिरोटे तयार होतील. फार आकर्षक दिसतात आणि चवीलाही खुसखुशीत लागतात.


सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१९

तांदळाची बोर विथ सम गपशप



' आजकाल धावपळीच्या युगात दिवाळीचा फराळ घरी करणे म्हणजे फारच अवघड काम. बाजारात वेगवेगळ्या दरांमध्ये हेच पदार्थ सहज उपलब्ध आहेत, त्यामुळे सध्या विकतचेच गोड मानुन दिवाळी साजरी करण्याचा ट्रेंड आहे . पुर्वी घरच्याघरीच ४-५ पदार्थ तरी सहज बनवले जायचे आणि एवढ करुन देखिल ' यंदा जास्त काही करता आल नाही हो.. ' अशी खंत मनात बाळगणार्‍या गृहीनी अश्या फराळाच्या रंगतदार गोष्टी चविचविने सांगत. आजकालच्या स्त्रिया घर आणि ऑफीस दोन्ही सांभाळताना तारेवरच्या कसरती प्रमाने जीवनाची कसरत करत जगतात, तर हे सगळे पदार्थ करण्यासाठी आपल्याकडे किती वेळ असणार म्हणा .... काही घरात मात्र अजुनही काही पदार्थ केले जातात. खुप सारे दिवाळीचे पदार्थ तर आजकालच्या मुलांना माहीतच नाहीत . असाच एक हरवलेला पदार्थ म्हणजे तांदळाची बोर.'
एक आठवण - ' सगळा फराळ केला तरीही आजीने बोर केली नाहीत तर आजोबा खट्टु होऊन बसायचे. " यंदा दिवाळीला काय मजा नाही बुवा " हे त्यांचं ठरलेल वाक्य. " म्हातार्‍याना बोर पाहीजेत ना.... करते मग... माझ्या मागे कोण करणार आहे हे सगळ. हयात आहे तोपर्यंत करते." अस म्हणत मग आजी दिवाळी संपता-संपता तरी बोर करायचीच.
' आता आजी पण राहीली नाही....आजोबाही गेले.... बोर ही कालवष झाली असच म्हणव लागेल. पण दरवेळेस दिवाळी आली की आजीची आठवण येते. आणि त्या आठवणीमध्ये बोराच स्थान अढळ .... मग मी एखादा शनीवार-रवीवार सगळ आवरुन बसते. आजीच्या आठवणी आणि बोर दोन्हीचा प्रपंच मांडून.... तर चला आज आठवणींची बोर करुया.
***
बोरासाठी तांदळाचं पीठ बनवण्यासाठीची कृती - इथे भाकरीसाठी वापरलेले पीठ न वापरता थोडे वेगळ्या प्रकारे बनवलेले पीठ वापरले जाते. स्वच्छ धुतलेले तांदुळा ४ तास भिजत घालायचे, मग व्यवस्थित निथळून घायचे . २-३ तास कडक उन्हामध्ये वाळवुन, जाड बुडाच्या पातेली मध्ये हलकेच खरपुस भाजायचे आहे. अजीबात काळे वगैरे करायचे नाहीत . थोडा दुधाळ रंग होई पर्यंत भाजावे. मगच दळणासाठी द्यायचे . आणि दळणार्‍याला द्यावयाच्या सुचनाही भारी असायच्या . " भाऊ जास्त बाईक करु नका हो. जास्त जाड ही नको. दुसरे कोणते धाण्य या दळणामध्ये मिक्स करु नका.... सेपरेटच दळा हो .... " काय आणि काय. बिचारा दळणारा... ' नक्की दळायच कस ' त्याच्या मनात प्रश्न येत असावा. एखादातर चटकन म्हणे , " वैनी तुम्हीच हे दळण करता का ? " Lol Lol Lol
***
साहित्य- चार वाटी तांदळाचं पीठ, चार चमचे (टीस्पून) बारीक रवा , थोडे पांढरे तीळ , थोडी खसखस , २५० ग्रॅम गूळ , १ कप सुख \ओलं खोबरं , मीठ चवीपुरतं , तेल तळण्यासाठी , एक कप दुध.
WhatsApp Image 2019-10-14 at 2.09.29 PM.jpeg
.
कृती- एक पातेलं गॅसवर ठेवा आणि ते थोडं तापलं की २-३ पेला पाणी घाला. त्या पाण्यात गूळ घालून तो पातळ करुन घ्या. यामध्ये तांदळाचं पीठ, रवा, तीळ, खसखस, खोबरं, मीठ , दुध हे सगळे घटक एकत्र करुन घ्या. हे मिश्रण थोड थंड झालं की मग हलक्या हाताने मळुन घ्यायचे . भाकरीच्या पीठाप्रमाने घट्टसर असेच मळून घावे . पातल करु नये.
आता याचे लहान-लहान बोराच्या आकाराची गोळे करावे आणि मंद आचेवर तळावे . एका वेळेस आपण कढई मध्ये १०-१५ बोरे टाकुन तळू शकतो. त्यामूळे जास्त वेळ लागत नाही. जास्त करपू देऊ नयेत.
WhatsApp Image 2019-10-14 at 9.17.33 PM.jpeg
.
टिप-
* बोरं तळताना त्यांना थोडे तडे गेले पाहिजे तरच ते कुरकुरीत लागतात. म्हणजेच बोर थोडीशी फुटली पाहीजेत.
* प्रत्येक पदार्थ करताना त्याच्या शी निगडीत कटू-गोड आठवणी मध्ये रमुन जा.... मग त्यामध्ये काही काही कमी-जास्त झाले तरी चालेल. त्याला जी चव येते ती पर्फेक्ट मेजरमेन्ट वापरुन केलेल्या पदार्थालाही येणार नाही. Bw
सिद्धि चव्हाण

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय." पण ते शक्य न...