बुधवार, २१ ऑगस्ट, २०१९

या वळणावर...

" कोणाला उशीर झाला, तर हल्ली खुप धास्ती वाटते. पण हाच थोडा उशीर हा, थोडा करता-करता थोडा जास्तच व्हायला लागला की वाटतं, एवढा उशीर पण होऊ नये, की आयुष्याची संध्याकाळ समोर येऊन ठेपलेली असेल.
जस नकार पचवण कठीण असतं, तसच उशीर पचवण थोडं कठीण झालं आहे हल्ली. तरीही मी खुप भाग्यवान आहे. कारण त्या एका संध्याकाळी भेटलेला तो, आयुष्याची संध्याकाळ येई पर्यंत वाट बघण्याच बळ देऊन गेला. आणि हे वाट बघणं कस सुसह्य होऊन गेलं. अशी मी नेहमीच त्याची वाट बघत बसते. कधी मनातचं, तर कधी प्रत्यक्षात. आणि मला ते आवडत ही."
एक आगळ वेगळ तेज राधाच्या चेहर्यावर झळकत होत. गुलाबी छटा होती ती. तिच्या प्रेमाची....पहील्या प्रेमाची म्हणा ना.
" पण हा अजुन का आला नाही "? तिचा तिलाच प्रश्न.
राधा या विचारात असताना, अचानक तिच्या पाठीवर हलकीशी थाप पडली....अपेक्षित होत त्या प्रमाणे माधव क्षणमात्र तिच्याकडे पहात, जवळ उभा होता.
राधा : आलास तु ? पण काय रे हे ! नेहमी प्रमाणे उशीर केलास !
माधव : तुला भेटायच तर टकाटक तयार होऊन याव लागतं. तुझा आवडता व्हाईट शर्ट घातला आहे बघ.
कसा हॅन्डसम दिसतोय ना ?
राधा : हो. अजुन ही तुला आवरायला वेळ लागतो म्हणजे काय म्हणायच ! पण खर हा...अगदी टकाटक दिसतोस.
नेहमी प्रमाणे !
माधव : अरे तु तर खानदानी मधुबाला आहेस. झोपेतुन उठून आलीस तरीही कोणी नाव ठेवणार नाही.
आणि ही, मी दिलेली साडी आहे ना गं? ( तिच्या साडीकडे निरखून पाहत) छान शोभून दिसते तुला.
राधा : हो माझ्या गेल्या वाढदिवसाच्या वेळी दिली होतीस ना ही साडी. विसरलास का ?
माधव : नाही ग, कसा विसरेन! तुझा आवडता कलर फिकट गुलाबी, आणि बारीक विणकाम केलेली जरी.... केवढी शोधा- शोध करुन मला ही साडी सापडली. तुला जशी पाहिजे होती तशी आहे. फिकट गुलाबी आणि बारीक जरी वाली.
राधा : माधव तुला आठवतो का रे तो दिवस ? आपली पहिली भेट....याच निंबोनीच्या बागेमध्ये....तेव्हा हे लोखंडी झोपाळे नव्हते . झुले होते ते पण वेलींचे . बाजूचा चाफा पण बहरलेला असायचा. मधुमालतीचा वेल अशोकालगत आभाळा पर्यंत जायचा. जणु त्याने नभीच्या चांदोबाला आपली गुलाबी-पांढरी फुले अर्पण केली असावी. ती फुलझाड जाऊन आता बघ कसे सगळे चिनी आणि जर्मन रोझ फुलले आहेत. आणि तुला आठवतय का ? त्या-त्या कोपर्‍यात एक पांगारा होता, तो काट्यांमध्ये पण मनसोक्त फुलायचा.
'एका संध्याकाळी वळणाची एक वाट चुकले होते मी. मग मिळेल त्या वाटेने पुढे आले... इथे. आणि तु तर आधीच चुकार पक्ष्याप्रमाने, इथे मृगजळ शोधत बसला होतास. मग इथेच भेटत राहीलो आपण. आणि इथेच प्रेमाच्या आणा-भाका झाल्या.'
आणि ते बघ ! तिथे एक निशिगंध फुलायचा. सोबत जाई-जुई ला घेऊन...तिथे ना छोटस तळं होत वाटतं !...हो ना रे ? आणि तु मला भेटायला सायकल वरुन यायचास ना? एक शायरी पण म्हणायचास...आठवते का ती शायरी ?
माधव : आठवतय गं सगळं. अगदी काल पर्वा घडल्या सारख!
' नहीं कर सकता है कोई वैज्ञानीक मेरी बराबरी, मैं चॉन्द देखने सायकल से जाता था.'
हिच ना ती शायरी ?
राधा : होय. 'चॉन्द' म्हणायचास मला. आणि....आणि ते..... !
' शांतपणे माधव च्या खांद्यावर डोके ठेऊन राधा आठवणी ताज्या करत होती. मधेच डोळ्यातुन ओघळणारा अश्रु त्याच आवडत्या गुलाबी साडीने पुसत होती.
त्या फिकट गुलाबी साडी प्रमाणे वातावरण ही काहीसे गुलाबीसर झाले होते. आनंदघनाच्या येण्याची चाहुल होती ती....या वळणावरील त्या दोघांच्या आयुष्याची संध्याकाळ होती ती. '
०००००
आपली कवितेची वही सांभाळत बागेच्या दुसर्‍या टोकाला बसलेली मी हे सार पाहत होते...ऐकत होते....आयुष्याचे एक सुंदर काव्य.
खरच कोणी तरी अस भेटाव एखाद्या वळणावर. मग अपेक्षित ठिकाणी पोहोचायला उशीर झाला तरी चालेल, ते वळणा-वळणाच आयुष्य एक अपेक्षित अस सुंदर वळण घेतं. आणि मग आपण हून आपणच वळतो या वळणावर.
कसे कोठुनी येतो आपण
कसे नकळता जातो गुंतून
उगाच हसतो, उगाच रुसतो
क्षणात आतुर, क्षणात कातर
जरा विसावू या वळणावर
."
बाजूच्या पारावर बसलेला एक तरुण, शेजारच्या तरुणीला सांगत होता... "ते बघ माधव काका....माझ्या शेजारी राहतात. आणि त्या राधा काकु, त्याच प्रेम होत एकमेकांवर, पण घरचे आणि परिस्थिती पुढे हताश. त्यांना लग्न करता आले नाही. घरच्यांच्या आवडी प्रमाने लग्न करुन, आप-आपले संसार त्यानी प्रेमाने संभाळले, जोडीदारा बरोबर ही प्रामाणिक राहीले. या दोघांचं एकमेकावरील प्रेम मात्र न कोमेजणार होत. एवढ निस्सीम प्रेम की, या साठीच्या वयात नियतीने देखील माघार घेत त्यांच्या प्रेमाला अजुन एक संधी दिली आहे. आता दोघांचेही जोडीदार हयात नाहीत."
       

बुधवार, १४ ऑगस्ट, २०१९

गुळा-नारळाच्या पुर्‍या/वडे/घारे-नारळी पौर्णिमा स्पेशल



साहित्य
२ वाटी तांदळाचे पीठ (साधारण पाव किलो), 1 मोठया नारळाचा (संपूर्ण) चव/ किस, 1 वाटी गूळ(आवडी प्रमाणे कमी /जास्त घेऊ शकता).
किंचीतसे मीठ, पाव चमचा जायफळ पूड आणी वेलची पूड, तळण्यासाठी तेल. २ टिस्पून तूप.

कृती-
पराती मध्ये थोडेसे पाणी घालून बारीक मिक्सर केलेला नारळाचा कीस घालून घ्या.त्यामध्ये बारीक केलेला गूळ घ्यावा.
आता यात जायफळ पूड, वेलची पूड आणी किंचीतसे मीठ मिक्स करून घ्या. या तयार मिश्रणा मध्ये जेवढे मावेल तेवढेच तांदळाचे पीठ थोडे-थोडे मिक्स करायचे. नारळाचा कीस हा तांदळाच्या पीठा पेक्षा थोडा जास्त असला पाहीजे, तरच याला छान टेस्ट येते. हे मिश्रण अजिबात पाणी न वापरता तयार करायचे आहे. शेवटी तयार मिश्रण थोडे तूप हाताला लावून मऊसर मळून घ्यावे. तयार मिश्रणाचा गोळा झाकून अर्धा तास तसाच बाजूला ठेवून द्यावा. यामुळे ते व्यवस्थित मिळून येते. तसेच गुळाचे थोडे मोठे असलेले तुकडे देखील विरघळून जातात.
तयार पिठाला तुपाचा हात लावून लहान-लहान गोळे बनवून त्याच्या छोटया-छोटया पुर्‍या करून घ्याव्या.(श्रीखंड पुरी करतो त्या मधील पुरी प्रमाणे) थोडी जाडसर, पण आकाराने छोट्या अश्या पुर्‍या थापाव्यात. तेल कडकडीत तापवून घ्यावे. आपण वडे तळतो त्या प्रमाणे या पुर्‍या तेला मध्ये मध्यम गॅसवर दोन्ही साईडने मस्त खुसखुशीत, लालसर रंगावर तळून घ्यावे. नारळी पौर्णिमेला दाखवल्या जाणाऱ्या नैवेद्यासाठी आम्ही अश्या पुर्‍या/ वडे करतो. नारळी भाताला पर्याय म्हणून. फार तर २० मिनिटांत या तयार होतात. दुधा बरोबर,चहा बरोबर किंवा सकाळचा नाष्टा म्हणून खायला हरकत नाही. चविष्ट लागतातच आणि पौष्टिक ही आहेत.


*या पाककृती मध्ये तांदळाचे पीठ वापरत असल्याने काही ठिकाणी याच रेसिपी ला ‘गुळा- नारळाचे वडे' असे देखील म्हणतात. 'घारे' असे ही म्हणतात. साहित्य वगैरे विषेश काही लागत नाही. अगदी सहज-सोपी पाककृती आहे. ओभड-धोबड पणे घाई-घाई मध्ये करण्याजोगी रेसीपी आहे.
* उकडीच्या मोदकाचे सारण उरले असेल तर त्याच्या देखील सेम अश्याच तांदळाच्या पिठा मध्ये मिक्स करून पुर्‍या बनवता येतात.
* मैदा आणि गव्हाचे पिठ एकत्र करुन ‘नारळाच्या पोळ्या किंवा सांजोर्या/ साटोर्‍या' बनवल्या जातात. ती रेसिपी वेगळी आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते.
"आमच्याकडे कणीक वेगळे मळुण घेतले जाते. त्यामध्ये घातले जाणारे सारण हे उकडीच्या मोदकाच्या सारणा प्रमाणे असते. हे सारण पुरणपोळी च्या, पुरणा प्रमाने कणकेच्या गोळ्यामध्ये आत भरले जाते. आणि पोळी प्रमाणे लाटुन केल्या जातात."

सोमवार, १२ ऑगस्ट, २०१९

बहकीसी बारीश ने फीर...

हिरवाई चा शालू लेउनी ही धरा उभी आहे स्वागतासाठी. झाडा, फुला-पानां वरती, घरावरती, छपरावरती अन मनावरती येणारी मभळ बाजुला सारुन सैरभैर पळणार्या ढगांचा लपंडाव सुरु झाला आहे. कडक उन्हाचा दाह शमवण्यासाठी कातर वेळेस नभ उतरु लागले आहेत. अशा वेळी रातकिड्यांची किर्र आणि काजव्यांची सोनेरी रांगोळी सळसळणार्या गवताच्या पात्यामध्ये नवलाईचे स्मित घेउन आली आहे. मदनाचे चाप जणू असे ईन्द्रधणू नभी उमटले आहे. चींब भीजूनही चमचमणारे ऊन म्हणजेच नव चैतन्याचा जन्म झाला आहे. कारण ऋतुचे सोहळे घेऊन आता माझा श्रावण आला आहे . सौदामीनीचा लखलकाट, मेघांचा कडकडाट, तृप्तीचे घन, मातीचा सुगंध आणि वार्याची मंजूळ शीळ अशा मंगलमय आणि आनंदी वातावरणात श्रावणाचे आगमन झाले आहे.
"जागुनि ज्याची वाट पाहिली, ते सुख आले दारी
जिथे तिथे राधेला भेटे, आता श्याम मुरारी
माझ्याही ओठांवर आले नाव तुझेच उदारा !
श्रावणात घन निळा बरसला."
कुठे या नर्तक मोराने आपला स्वाभीमानी पिसारा फुलवला आहे. तर कुठे माझ्या कृष्णाने त्याच्या मुरलीचा सुर लावला आहे. कारण आता श्रावण आला आहे. त्या चातकाला जाउनी सांगा कुणीतरी आखेरीस तुझा श्रावण आला आहे.
हा ऋतु असा आहे की कोणाला तरी चींब भीजावस वाटते. तर कोणाला तरी छत्रीतुन भीजताना पहावस वाटत. तर कधी इंद्रधणू च्या रंगा मध्ये रंगुन जाव अस वाटत. पाऊसात वार्यावर फड-फडणारा विहंग होऊन कधी उंच झाडाच्या फांदीवर बसुन ऐटीत  झुलावस वाटत. त्या  नभीचे चुंबन घेउन कधी खळाळणारर्या सरीते मध्ये थेट बुडाव अस देखील वाटत.
"अशाच पावसात कधी मनसोक्त भीजलो सोबतीस घेऊन कोणा"..... अशा आठवणी सुद्धा या श्रावणातच बहरतात.

बहकीसी बारीशने फीर

यादोंकी गठरी खुलवाई,
मीले चन्द लम्हे घायल
और ढेर सी रुसवाई !!

कुछ सुनेसे सन्नाटे थे
और ख्वाहीशें दबी दबी
यूँ रखें थे कुछ अरमान
छोड़ा हो जैसे अभी अभी
चद्दर सी उम्मीद मीली
कई जगह थी सील्वाई 
मीले चन्द लम्हे घायल
और ढेर सी रुसवाई !!

हर सीलवट मे ग्ठरीके
बुनेबुनाये ख्वाब मीले
भीगी चांदनी रातोंके
महकेसे महताब मीले
सीमटीसी खुदहीमे और
इक तहजीब नजर आयी,
मीले चन्द लम्हे घायल
और ढेर सी रुसवाई !!
                 बहकीसी बारीशने फीर अशा कितीतरी नव्या-जुन्या,चांगल्या-वाईट आठवणींना जागे केलेले असते.
" लहानपणी ओढा ओलांडताना बाबांनी पकडलेला हात असो, किवा लपुनछपुन पावसात भीजुन, घरी आल्यावर पाठीवर पडलेला आईचा हात असो. कुण्या जीवलगाचा हातात हात धरुन तासनतास भीजने असो, कधी अशाच पावसात सवंगड्यांच्या हाताची साखळी करुन केलेली मज्जा असो. " प्रत्येकाच्या मनाच्या कोपर्यात पावसाची अशी एक तरी वेगळी आठवण असते.
" नवी नाती, नव्या रिती याच पावसाच्या साक्षीने जुळतात. वाट हरवलेली पाखरे याच पावसात पुन्हा मिळतात, रुसलेले-फसलेले क्षण आपसुकच बहरतात, बहराची धुंदी घेऊन तरुवरा प्रमाने लहरतात. कधीही न जुळलेले बंध याच पावसात सलत राहतात, कुण्यातरी वेड्याच्या गालावर आठवणींचे थेंब ढळत असतात."
               कधीतरी... अश्याच पावसाच्या अगणीत थेंबाना आपल्या हाताच्या ओंजळीत धरु पाहणार माझ मन दुरवर कुठे तरी  पोहोचलेल असत. आणि अश्याच कधी काळच्या भीजलेल्या आठवणींना शोधुन-शोधुन मोजत बसलेल असत. मग वेळ कसा नीघुन जातो काहीच कळत नाही. पाऊस मात्र परतीच्या प्रवासाला निघाला आहे हे मन मानत नाही. मध्येच केव्हा लक्षात येत ! "अरे पावसात भीजायच होत, राना-वनांत भटकायच होत, वाफाळता चहा आणि गरमा-गरम भजीचा स्वाद घेत गप्पा गोष्टींत रमायच होत. हे जमल नाही तरी अजुन थोड नहायच बाकी आहे, थोडस बागडायच बाकी आहे, थोड अजुन उंदडायच बाकी आहे, थोडसच धडपडुन मग थोडसच रडायच बाकी आहे पाऊस असताना."

यातल काही जमल नाही तर गुरू ठाकूर म्हणतात तस, 
"झरे मेघ आभाळी तेव्हा, क्षणभर आपुले वय विसरावे.
नाव कागदी घेउन हाती, खुशाल डबक्यात रमावे."

आणि हे सुद्धा नाहीच जमले तर, "व्याकुळ अशी नक्षत्रे कोरडीच जाती,भीजण्याच्या आशेवरती कोमेजुन गेल्या राती" अस म्हणण्याची वेळ येईल एवढ मात्र नक्की.



शनिवार, १० ऑगस्ट, २०१९

स्कॉलरशिप-एक योगा-योग

हदय विकाराच्या झटक्याने मंत्री लोहिया यांचे रुग्णालयात निधन.
वृत्तपत्र खाली ठेवून मी चहाचा कप हातात घेतला. "माणूस आणि मंत्री म्हणून दोन्ही बाबतीत ते वाईटच होते. पण त्यांना माझ्या हाताने मरण आले नाही. हे माझ्यावर त्या परमेश्वरालचे फार उपकार आहेत. एखाद्याच्या मृत्यूस आपण जबाबदार असने हे फार वाईट. फार म्हणजे फारच वाईट. अपराधीपणाची भावना जगू देत नाही आणि पोलिस शोधात पकडले गेले तर जन्मठेपेची शिक्षा. यापासून कोणी ही वाचवू शकत नाही."


०००
४ मार्च २००० ची गोष्ट. मिसेस माने आणि त्यांची मुलगी रेवा केबिन मध्ये बसल्या होत्या. भल्या मोठ्या लाईन मध्ये ४ तास उभे.
गेले चार महिने रोज येऊन ही काही उपयोग झाला न्हवता, पण आज विशेष शिफारस मिळाली होती, म्हणून त्यांचा नंबर आज लवकर आला होता.
खुप महत्वाची गोष्ट . रेवा उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणार होती. शासनाची तशी स्कॉलरशिप मिळाली होती. मात्र शासनाने मंजूर केलेली आर्थिक मदत प्रत्यक्षात न मिळाल्याने घरचे सारे चिंतेत होते. सार्या ठिकाणी विचारपूस करून त्या ईथवर पोहोचल्या होत्या.
०००
रेवा: आई काहीही झालं तरी तू त्या फॉर्म वरती सह्या करू नकोस. आपण काहीतरी दुसरा ऑप्शन पाहुया. मला परदेशी शिक्षणासाठी जायची संधी मिळणार नाही ना? हरकत नाही. पण तू माघार घेऊ नकोस.
मीसेस माने: रेवा मला कळत गं सगळं. प्रत्येक्षात ६ लाखाचीच मदत आपल्यालाह मिळणार असली, तरीही ते आपल्यासाठी महत्वाचे आहे. कारण ही मदत १ महिन्याच्या आत मिळाली नाही तर तुझं जे नुकसान होईल, आणि ते मी पुढे कधीही भरून काढू शकणार नाही.
रेवा: अगं आई पण ६ लाख आपल्याला आणि ६ लाख तो मंत्री स्वतःच्या खिशात घालणार ना ! त्याला फुकटचे पैसे का द्यायचे.
मी.माने: हे बघ रेवा , आपल्या सारखे गरजू लोकांना खूप आहेत ग ! बहुतेकांच्या बाबतीत असंच होतं असतं. त्या मंत्राने सही नाही केली, तर मिळणारा निधी सुद्धा कॅन्सल होईल. आपल्याला मदत हवी आहे. आणि त्या बदल्यात त्याला मोबदला.
आता अजून प्रश्न विचारू नको. निघ झटपट. आजच सगळ्या फॉरम्यालीटीज पुर्ण करुन येऊया. मनाला पटत नसेल तरीही काही गोष्टी कराव्या लागतात.
शहरा पासून थोड दूर असणाऱ्या एका शासकीय कचेरीत मी.माने आणि रेवा बसल्या होत्या. तिथे तुरळकच लोक होते. कोणी आपले अडकलेले व्यवहार मार्गी लावण्यासाठी तर कोणी आपले खिसे भरण्यासाठी आले असावे, बाकी एवढ्या निर्जन ठिकाणी सहज कोण येणार. २-४ स्टाफ आणि २ शिपाई एवढाच काय तो लावाजमा.
सगळे कागदपत्रे रेडी होते, रेवा अन् माझ्या सह्या झाल्या होत्या. मंत्र्यांच्या सही साठी आम्ही वाट बघत होतो. आणि शिपायाने 'मी. माने' म्हणून आवाज दिला. एका वेळी फक्त एकाला केबीन मध्ये जाण्याची परवानगी होती. म्हणून मी आत गेले. माझी कागदपत्रे बघून लोहिया यांनी लगोलग सगळ्या सह्या केल्या. जणू काही माझ्यापेक्षा त्याला याची जास्त गरज असावी. मला तो एक नंबर हलकट माणूस वाटला. अगदी ऐकलेली किर्ती बरोबरच आहे अशी त्यांची मुर्ती होती.
"हा तुमचा फॉर्म घ्या. पैसे मंजूर झाले आहेत". एका छोटुने आणून दिलेला चहा संपवत त्यांनी माझ्यापुढे एक कागद सरकवला. कुण्या मीसेस कानेंचा कागद होता तो. तीच्या शासकीय सेवेतील निवृत्त आईच्या मोठ्या मेडिकल सर्जरी साठी निधी मंजूर झालेला होता. काहीतरी गफलत होते म्हणून मी फॉर्म परत केला. " सर हा माझा फॉर्म नाही. मी मिसेस माने. आणि हा फॉर्म कनेंचा आहे. नाव आहे मिसेस मेधा काने." हे वाक्य माझ्या तोंडून बाहेर पडत नाही पडत तोच एक झुपकेदार दाढीवाला, उंचपुरा इसम लगबगीने दार उघडून तडक आत आला होता. मी त्याच्याकडे पाहते न पाहते तोच मिस्टर लोहिया बसल्या जागी खुर्ची वर कलंडले, त्यांचे डोळे अर्धवट उघडे पण मान थोडी वाकडी झाली होती. मला काय करावे तेच सुचेना. लोहियांच्या हाताला चेक करत असताना मी पाहिले, त्या इसमाने चहाचा कप उचलून आपल्या जवळच्या प्लास्टिक पिशवी मध्ये टाकला. " म्हणजे तो चहा पिऊन मंत्री डेड झाले किंवा काय ?" माझ्या तोंडून शब्द निघाले. आणि त्या इसमाने लगोलग छोटी गण काढून माझ्या डोक्याला लावली. छोटी गण प्रत्येक भाग सुटा होतो ती. सेप्रेट केले तर तीचे ७-८ भाग होतात आणि ते गण चेच तुकडे आहेत हे देखील कोणालाही सहज लक्षात येत नाही. सहज कॅरी करता येण्यासारखी गण होती ती. सिआयडी मध्ये अशी गण पाहिल्याने मला हे माहीत होत. ती प्रत्यक्षात असते हे आज समजल. मला आता घाम फुटला होता, तरीही "कोण तू ? का मारलं यांना? मी सगळ पोलीसांना सांगेन." म्हणत मी आरडा ओरडा चालू केला. त्यांने गण अजून जवळ आणत दरडावले, " मिसेस काने ! न बोलता गुमान बसून र्हा. हा मंत्री अजून जित्ता हाय, चहा मंदी गुंगी आणणार औषध टाकल व्हतं. पण जर म्या सांगतो तसं तुमी केले न्हाई ना, तर आमच्या ताब्यात असलेली तुमची माय जित्ती र्हायची न्हाई.
"माझी आई तर केव्हाच देवा घरी गेली होती. हा काय बोलतो ते मला कळेना ". कानशिला जवळ लावलेल्या बंदूकी च्या भीतीने मी शांत बसले होते. त्याने त्याच्या मोबाईल मधून एक व्हिडिओ दाखवला खरंच कोणी म्हातारी लागले दोराने बांधून ठेवले होते. आईच्या वयाची. अगदी माझी आई आता हयात असती तर अशीच दिसली असती. मला फार वाईट वाटले.
आता मला परिस्थितीचा अंदाज येऊ लागला. "माझ्या आईला काही करूं नका प्लीज. मी तुम्ही सांगाल ते करते" प्रसंगावधानाने मी सावरत म्हणाले. तर ऐका हा मंत्र बेसुद्ध हाये, पण भायर समदयांना सांगायचा की ह्याला ताबडतोब हास्पीटलात न्ह्यावा लागलं अन् ह्दयाच आप्रेशन करावं लागलं , अन् हो आपरेशना दरम्यान हा ढगात गेला पाहिजे. कस काय करायच ते तुमी बघून घेयाच. आलं का ध्यानात." तो दात विकत म्हणाला. "डायरेक्ट ढगात, पण मी असं नाही करु शकत. बाकी तुम्ही सांगाल ते करण्यासाठी मी तयार आहे " मी विनवणी केली. पण व्यर्थ त्यांने आधी पासून सगळं व्यवस्थित प्लानिंग केलं होतं. कोणी डॉक्टर काने बाई इथे मंत्र्यांच्या भेटीला येणार आहेत हे या लोकांना आधी पासून माहित होते. तिच्या आईला ओलीस ठेवुन सगळं काही मॅनेज केलं गेलं होत. मिस्टर लोहिया यांचा काटा काढण्यासाठी पद्धतशीर पणे रचलेला केलेला कट होता हा. 'मा' चा 'का' झाला होता. आणि मी यात डॉक्टर काने बाई म्हणुन नाहक अडकले होते. माझा मोबाईल वगैरे सर्व त्यांने काढून घेतले होते. तो इसम आधी पासुनच मिस्टर लोहियांच्या सिक्युरिटी मधे सामील असल्यानल, सर्व माहीती त्याने आधीच मिळवीली होती. मला दुसरा कोणताही पर्याय राहिला नाही. काही सुतालाही खबर न लागता, 'हु' का 'चू' न करता माझ्या संकट मंत्रांची रवानगी दवाखान्या मध्ये झाली. कोणीही काही संशय देखील घेतला नाही आणि लोहियांचा एक फॅमिली डोक्टर, म्हणजे मी, ऑपरेशन थेटर मध्ये गेले. डोक्टर काने म्हणून.
ऑपरेशन थेटर च्या बाहेर तो माणूस फोन वर बोलताना मी गुपचूप ऐकत होते. " आरररर गावली की लका ती काने बाई, सकाळ पासन लाईन मंदी लक्ष ठवून हूतो, पर कोण बी काने गावली न्हाई. मंग केबीन भाईर उभं र्हायलो, अन् आतन आवाज आला मिसेस मेधा काने. समद येळेवर झालं, च्या बी येळेवर आला आणि सायेब बी इतक्यात आडवा झालता. काय काळजी नगं . समद निटच व्हईल रं".
"म्हणजे काने बाई इथे आल्याचं न्हवत्या तर "..... माझा मलाच प्रश्न.
लोहिया यांचे हितचिंतक आणि नातेवाईक हॉस्पिटल च्या बाहेर जमा व्हायला लागले होते. गर्दी वाढत होती. सगळी ओपचारीकता झाल्यावर, मी अर्ध्या एक तासाने बाहेर येऊन सगळ्यांना सांगितले की मिस्टर लोहिया इज नो मोअर.
०००
आज मी स्वस्थ बसले....अगदी निवांत. जवळपास महिना उलटला. या घटनेनंतर रोज मी ४ मार्च चा पेपर उघडुन बसते.... तिचं ती पानं चाळत.....काही विशेष मिळत का ते शोधते.
काय योगा-योग असतो ना !
" त्या दिवशी नावात गडबड झाली.... 'का' चां 'मा' झाला आणि मी केबीन मध्ये गेले.... फॉर्म पाहिल्यावर, तो 'काने' चां आहे म्हणून परत केला. माझ्या तोंडून बाहेर पडलेले 'मिसेस मेधा काने' एवढेच शेवटचे शब्द ऐकून, मलाच काने समजून, तो इसम लगबगीने आत आला.... चहा पिऊन लोहिया बेशुद्ध झाले.... हे बघून पुढच्या घटना घडल्या. रेवा त्याच वेळेस फोन वर बोलत त्या सरकारी कचेरी पासुन थोड लांब बाहेर गेली होती, आणि मी लोहियांच्या सिक्युरिटी स्टाफ बरोबर दवाखान्यात रवाना झाले. तिने मला पाहिले असतें, तर कदाचित काही तरी वेगळाच प्रसंग उद्भवला असता. देव जाणे पण हा निव्वळ योगायोग जुळून आला.
त्यानंतर ४ दिवस मी कुठेही बाहेर पडले नाही, घडल्या प्रकाराचा मला जाम धक्का बसला होता. त्याच दरम्यान मला 'तुमच्या आईला सुखरुप घरी सोडले आहे' म्हणून एक निनावी फोन येऊन गेला.
मी रेवाला ही त्या दिवशी काय झालं? मी कुठे गायब झाले होते ? हे वरवर काहीतरी सांगून शांत केले.
मुख्य म्हणजे पाचव्याच दिवशी शासना कडून रेवासाठी पुर्ण रकमेच्या स्कॉलरशिप मंजुरी चा फोर्म आला होता. आणि सोबत पहिली चेक ही होता. उशीरा का होईना पण आम्हाला हवी असणारी गोष्ट घडली होती. म्हणजे स्कॉलरशिप ठरल्या प्रमाणे मिळणार होती पण थोडा उशीर झाला होता एवढंच. तो लोहिया आम्हाला विनाकारण फसवणार होता, हे आता उघड झाले होते.
या सगळ्या मध्ये एक गोष्ट महत्वाची की लोहियांच्या मृत्यू साठी मी अजीबात जबाबदार न्हवते. जबाबदार न्हवते ? अस मी म्हणते कारण 'लोहिया खुर्ची मध्ये कलंडले तेव्हाच डेड झाले होते'.
खरंच त्यांना ॲटाक आला होता. हि गोष्ट मला क्षणार्धात समजली कारण मी ही एक नर्स आहे. मी त्या इसमाला हि गोष्ट ओरडून ओरडून सांगितली पण त्यांने ऐकलं नाही. उलट मी खोटं बोलते असं समजून अजुन दरडवायला सुरूवात केली. यात काही अघटीत घडू नये म्हणून मी शांत बसले. दवाखान्यात ईतर डॉक्टर आणि नर्स सोबत अर्धा एक तास असाच वाया घालवून, मी जेव्हा पद्धतशीरपणे सगळ्यांच्या समोर येउन लोहिया गेल्याच जाहीर केल, तेव्हा तो इसम पसार झाला होता. पुढच काहीही त्याने ऐकुण घेतल नाही. लोहियाचा मृत्यु हार्ट अ‍ॅटॉकने आधीच झाला होता, ह्रदय शस्त्रक्रियेने नाही.
त्या कानें बाईंच्या आईला वाचवण्यासाठी मला हे नाटक करावे लागले. आणि त्याने माझं काहीच नुकसान न होता फायदाच झाला. माझ्या लेकिला तिच्या हक्काची स्कॉलरशिप मीळाली होती. आणि त्या लोहियाला त्यांच्या नशिबाची जागा.

( काही गोष्टी गृहीत धरून रचलेली, पुर्णपणे काल्पनिक अशी ही कथा आहे. कोणतीही व्यक्ती, ठिकाण, वस्तू यांच्याशी काहीही संबंध नाही. याची कृपया नोंद घ्यावी.)

गुरुवार, ८ ऑगस्ट, २०१९

मच्छी कढी - (pomfret curry) / fish curry


साहित्य:- माशांना मॅरिनेट करण्यासाठी.
माशाचे चार-पाच तुकडे करून स्वच्छ धुवून घ्यावेत. ४-५ कोकमाच्या तुकड्यांना भिजत घालून केलेला रस,  मीठ अर्धा चमचा, पाव चमचा हळद, लाल तिखट अर्धा चमचा.
- माशांना कोकम, मीठ , तिखट,  हळद लावुन १५ मिनिट फ्रिझ मध्ये  ठेवा.

ओला मसाला-
साहित्य:- छोटा कांदा १, लसणीच्या ५-६ पाकळ्या, टोमॅटो १, दोन चमचे धने, अर्धा ओला नारळ खवून,
अर्धी वाटी स्वच्छ धुवून कोथींबीर, आल्याचे छोल्या एवढे २ तुकडे,लाल तिखट अर्धा चमचा चविला+रंगाला, ओली हिरवी मिरची २ ,शंकासुरी मिरची २, बेडगी मिरची २ , मीठ अर्धा चमचा .

ओला मसाल्यासाठी कृती- वरिल सर्व साहीत्य एकत्र करुन घ्यावा, मिक्सरच्या भांड्यात अगदी नावाला पाणी घालुन सगळा मसाला बारीक गंधा सारख वाटुन घ्यावा.



फोडणीसाठी
तेल ४ चमचे, लाल तिखट अर्धा चमचा, लसणीच्या २  पाकळ्या, कढीपत्ता ४ पाने,२ त्रिफळे.



कृती- वरिल दिलेल्या साहीत्याच्या क्रमाने कढई  मध्ये फोडणी करावी. आता या फोडणी मध्ये ओला मसाला घालुन चांगला परतावा , बर्यापैकी तेल सुटु लागल्या वर मॅरिनेट केलेले माशांचे तुकडे  घालावे.

थोडे  कोमट/ गरम पाणी घालुन मंद
गॅसवर उकळी काढावी. उकळी मध्ये २ त्रिफळे टाका. थोडी कोथींबीर वरुन भुरभुरा. मच्छी कढी तयार आहे.


  टिप-
1) मॅरिनेट केल्याने- कोकम,मीठ,तिखट, हळद हे माशांमध्ये आत पर्यंत व्यवस्थित मुरते.
2) कोकमाच्या ऐवजी चिंच वापरु शकता.
3) ओला मसाला करताना पाणी जास्त वापरले तर तो फोडणी मध्ये टाकल्यावर वरती-वरती उडतो त्यामुळे पाणी थोडेच घालावे.   
4) लाल तिखट फोडणी मध्ये टाकल्याने चांगला रंग येतो.
5) थोडे  कोमट पाणी या साठी की थंड पाणी वरुन घातल्याने चव कमी होते (आईचा उपदेश).
6) पाणी स्वतःच्या अंदाजाने घाला  किती पातळ किवा जाडसर रस्सा हवा आहे त्या नुसार,जाडसर रस्सा चवदार लागतो.
7) फोडणी जास्त उकळू नये नाहीतर माशांचा खिमा होइल.
8) त्रिफळे टाकल्या वरती मस्त चव येते, पण २ च त्रिफळे टाका, जास्त टाकल्याने थोडी तुरट चव येते.(माझा अनुभव- मागे एकदा अजुन छान चव येईल म्हणुन २-४  त्रिफळे जास्त घातली होती, आणि  सगळा बेत बिघडला होता)
9) वरुन कोथींबीर ऐछीक, पाहीजे तेवढी घाला.


पुडिंग- साधे सोपे आणि झटपट.



साहित्य :-

गरम केलेले घट्ट दूध- पाउण लीटर
साखर - ३/४ वाटी( साधारण १० टिस्पुन पुरे होते).
अंडी - ३ (पाव लिटर दुधासाठी १ अंड हे  माझ प्रमाण)
वेनिला एसेंस - १ टिस्पुन.
आवडत असेल तर केसर 2-3 काडी
किंवा वेलची पावडर 1 चमचा.



सजावट साहीत्य (ऐच्छिक) :-
काजू, बदाम, पिस्ते, स्ट्रॉबेरीस, काळ्या मनुका ई.



कृती :-

कोमट दूधमध्ये साखर मिक्स करा, व्यवस्थित मिक्स झाली पाहीजे. आता ३ अंडी व्यवस्थित फेटुन मध्ये मिक्स करा. वेनिला एसेंस आणि केसर धालुन मिश्रण ढवळुन घ्या. वरुन वेलची पावड भुरभुरुन घ्यावी. हलक्या पिवळसर रंगाचे मिश्रण तयार होईल.
सर्वात शेवटी केक करण्यासाठी तुम्ही जो पसरट गोलाकार डब्बा वापरत असाल त्यात हे मिश्रण घालुन. हा डब्बा कुकर मध्ये ठेवा. मोदक उकडताना आपण जसे पाणी घालतो त्या प्रमाने तळाशी पाणी घालुन १५ मिनिट गॅस वरती वाफवुन घ्यावे,  हे करताना प्रेशर कुकर ची शिट्टि काढुन ठेवावी. जमा झालेली वाफ त्यामधुन निघुन जाउदे. पुडिंग घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करा.







आता तयार  पुडिंग सेट होण्यासाठी १-२ तास फ्रीज मध्ये ठेवा.
यानंतर सजावट करुन पुडिंग खाण्यासाठी तयार आहे.
* दूध कोमट झाल्यावर वापरास घ्यावे, गरम दूधामध्ये अंडी फोडुन घातल्यास शिजुन अंड्याच्या गुठळ्या होऊ शकतात आणि अस्तित्वात नसलेली काहितरी भयंकर रेसिपी तयार होईल (स्व-अनुभवावरुन).
* साखर ६-७ टिस्पुन म्हणजे कमी गोड डायबेटीस चा पेशन्ट देखिल खाउ शकतो असे प्रमान. १० म्हणजे मिडियम गोड. यानुसार प्रमान ठरवता येते.
* वेनिला एसेंस १०० मिली ची बाटली ५०रु च्या आसपास मिळते, पुन्हा ७-१० वेळा वापरु शकता. त्यामुळे जास्त खर्च नाही.






* मिश्रण पातळ असताना (केसर किंवा वेलची पावडर लावून पर्याय म्हणून) कोको पावडर सुद्धा घालु शकता. चोकोलेट ची टेस्ट आणि मस्त कलर येतो. लहान मुल आवडीने खातात.


* या मधुन शरिराला भरपुर कॅल्शियम आणि प्रोटीन मिळते.
* हि निश्चितच झटपट रेसिपी आहे, फक्त सेट होण्यासाठी जास्त वेळ लागतो .

गुरुवार, १ ऑगस्ट, २०१९

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय."
पण ते शक्य नाही!
किती काही मागे सोडलेले आहे आपण ! आणि किती काही जोडलय ?
' ती खटारा गाडी आणि नदिवरील उडी,
तिखट मीठाची कैरी आणि आजीच्या गोष्टी ऐकण्यात जागलेल्या रात्री,
खळयातील लंगडी, लपाछपी आणि पकडा-पकडी,
शाळेत न जाण्यासाठी केलेले बहाने आणि आईकडून मार खाने,
भातुकलीचा खेळ आणि शुभंकरोती ची वेळ'.

सारं काही निसटून गेल, गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी.
"प्लुटो कक्षा ओलांडून पुढे निघुन गेला ना तशाच काही गोष्टी आपल्या स्मृतीच्या दुनियेतून बाहेर निघाल्या आहेत! त्यांना उजाळा देउन, स्मृतीत ठेवण्यासाठीच हा पहीला प्रयत्न."
हा भाग कोकणी व इतर महाराष्ट्रातील अश्याच काही साधनां वरती आहे. हि साधने पूर्वी गावोगावी प्रत्येक कुटुंबाकडे वापरात असायची. आता क्वचितच कुठे पहायला मिळतात. अजुन काही वर्षांनंतर समुळ नष्ट होतील असं वाटतं. कालौघात या वस्तू केवळ स्मरणस्मृतीं मध्ये राहिल्या तरी फार झाल. चला तर सुरवातीला करते जात्या पासून.
१) जाते-
धान्य दळून त्याचे बारीक पीठ करण्यासाठी जात्याचा वापर केला जातो (जायचा) . जाते वर्तुळाकार गोल दगडाचे असते. त्यामध्ये दोन तळ्या असतात. खालची तळी ही स्थिर आणि जड असते. वरच्या तळ्याला कडेला एक उंच लाकडी खुंटी असते. ही खुंटी हाती धरून वरची तळी घडाळ्याच्या विरुद्ध दिशेने फिरवतात. या तळ्याच्या मध्ये एक छिद्र असते त्यांतून थोडे थोडे धान्य टाकतात. आणि दोन्ही तळ्या एकमेकांनवर घासून धान्याचे पीठ होऊन तळ्याच्या कडाच्या फटीतून बाहेर येते.
जात -
जात .jpg
स्त्रिया या जात्यावर धान्य दळत-दळत असताना काल्पनिक गाणी रचतं, त्याला जात्यावरची ओवी असे म्हणतात.
"कल्पनांचच बघा ना कल्पना ही हवेसारखी असते. जिथे वाट मिळेल तिथे-तिथे जागा व्यापून टाकते."
जसं की या काही काल्पनिक ओव्या....
सरला माझा दळप
सती भरली गंगा
कापुराची आरती
मींया ओवाळी पांडुरंगा ||
सरला माझा दळप
सुप सारीता पलीकडे
सासरी नि माहेरी
राज्य मागते दोनीकडॆ ||
सरला माझा दळप
पीठ काढी मी परातीत
माझ्या त्या गुरुजीचा
नाव घेई मी आरतीत ||
सुंदर माझे जाते ग फिरते बहुत |
ओव्या गाऊ कौतुक तु येरे बा विठ्ठला ||
जीव शीव दोन्ही सुंडे ग प्रपंचाच्या नेटे ग |
लावूनी पाची बोटे तु येरे बा विठ्ठला ||
बारा सोळा घडणी औघ्या त्या कामिणी |
ओव्या गावू बैसूनी येरे बा विठ्ठला ||
सासु आिण सासरा दिर तो तिसरा |
ओव्या गावू भर्तरा तु येरे बा विठ्ठला ||
या ओव्या कित्ती सहजपणे रचल्या गेलेल्या आहेत . जात्या वर दळन करायचं काम फारच कठीण असत. गाण्याने काम करताना थकवा जाणवत नाही, म्हणून जात्यावर दळण दळताना स्त्रिया ओव्या म्हणत. त्यांत स्त्रीयांच्या मनातील अनेक भावभावनां व्यक्त झालेले आहेत. बर्याचदा देवांची नावे घेऊन ओवी रचल्या गेलेल्या आहेत, जणु स्त्रीया आपल्या भावभावना देवा समोर व्यक्त करतात. मला वाटतं आज बिझी माणसांच्या युगात भावना व्यक्त करण्याच काम त्या smiley बाईच चांगल करतात ! आणि ओवी चा म्हणाल तर सद्धयातरी 'वापर फक्त मुलींच नाव ठेवण्यासाठीच होतो' (ओवी शिंदे, ओवी देशमुख वैगरे वैगरे).
दुसर म्हणजे बहिणाबाईंच नाव आल की ओवी आठवते.
बहिणाबाईचे जतन केलेले 'जाते'-
बहिणाबाईचे जतन केलेले 'जाते'.jpg
तसं पण तो मिक्सर चालु केल्यावर त्याचाच आवाज नुकता, ओवी काय डोंबलाची सुचणार ?
" जात्यावर बसल्यावर ओवी सुचते ’ अशी म्हण मराठीत प्रचलीत होती, एखादी जबाबदारी स्वीकारली, कि ती पार पडण्यासाठी क्षमता आपोआप येते, या अर्थाने ही म्हण असावी."

२) पाटा वरवंटा-

पुरणपोळीसाठी डाळीचे पुरण, ओला किंवा सुखा नारळ घालून केलेली चटणी किंवा वाटली डाळ, आंबे डाळ, किंवा इडली-वडय़ासारखे दक्षिणी पदार्थ, मांसाहार किंवा मत्स्याहार करण्यासाठी जो ओला मसाला करावा लागतो आणि देशावर खर्डा वगैरे मसालेदार पदार्थ वाटून तयार करण्यासाठी पाटा-वरवंटा उपयोगी पडतो.
पाटा वरवंटा-
varvanta-pata_0.jpg
"आमच्या कोकणात नारळ विपुल प्रमाणात असल्यामुळे ओल् खोबऱ जणू स्वयंपाचा राजा" जेवणात नारळ नसेल तर जेवणाची सभा रुचकर असुनही आमच्यासाठी व्यर्थच. मग घरी नारळ वाटायला पाटा नसेल तर कसं चालणार??
माझ्या आठवणीप्रमाने पुर्वी दुपारच्या वामकुक्षी वर टाकी ( टाकी घालने म्हणजे घाव/घाला घालने अशी म्हण आहे ना) घालायला काही बायका यायच्या....'मध घ्याव मध, टिकली..य, बांगडी..य,फणी..य,पाटय़ाला.. टाकीय'.असं काही-बाई बोलायच्या. ज्यांच्या घरातील पाट्याला टाकी लावून घ्यायची असेल त्या बायका त्यांच्याकडे घरातील पाटा-वरवंटयाला टाकी लावुन घेत असत.
आणि हो पाट्या वरिल वाटपाच जेवण एकदा तरी खाव, त्याची चव आयुष्यात विसरणार नाही.

३) खलबत्ता-
खलबत्ता हा साधारण दगडी किवा अनेकदा धातुचाही असतो. यात एक दगडाचे उभट आकाराचे भांडे असते. आणि एक दगडी दंडगोलाकार काठी असते.
लोखंडी खलबत्ता -
लोखंडी खलबत्ता .jpg
सरण बारीक करण्यासाठी तुम्ब्याचा वापर केला जातो. एखादे मिश्रण तयार करण्यासाठी याचा वापर होतो. खलबत्ता हा पदार्थ बारीक कुटण्यासाठी वापरला जात होता. प्राचीन काळी औषधी-वनस्पती वाटण्यासाठी वापर होत असे. अजूनही गावामध्ये खलबत्ता वापरला जातो. आसडणे, भाजणे, परतणे, पीठ करणे, कुटणे किंवा वाटणे इत्यादी. त्यातील कुटणे ह्य संस्कारासाठी खलबत्त्याचा वापर स्वयंपाकघरात, मिक्सर येण्यापूर्वी बहुतेक ठिकाणी केला जात होता.
दगडी खलबत्ता-
दगडी खलबत्ता.jpg
खलबत्त्यातील खल म्हणजे लोखंडाचे कडा नसलेले एक लहान आकाराचे पातेले. आणि त्यासोबत एक चांगला वजनदार आपल्या मुठीत पकडता येईल असा साधारण फूटभर लांब असा दंडगोलाकृती लोखंडी दस्ता म्हणजे बत्ता. थोडक्यात बत्ता म्हणजे पितळीच जड दोडा ज्याने वस्तू कुटता येईल. त्याची एक बाजू पहारीच्या टोकासारखी पण अणकुचीदार नव्हे, अशी दोन्ही बाजूंनी निमुळती पण बोथट केलेली असते. खलबत्ता लोखंडी, दगडी तर काही प्रमाणात लाकडाच्या पाहूनही बनवला जातो, हे सगळ मजबूतीवर अवलंबून असतं.
अगदी छोट्या प्रमाणावर म्हणजे चहासाठी आलं किंवा फोडणीसाठी मिरच्या कुटणे वगैरे अशा कामापुरते हे यंत्र वापरले जायचे.
विशेषतः कोकणात कोणाच भांडणं वैगरे झाल तर 'खलबत्त्यात घालून ठेसू' असा वाक्यप्रयोग केला जातो. शब्दशः अर्थ नाही घ्यायचा, पण मरेपर्यंत मारू असा काहीसा अर्थ आहे. म्हणजेच मरेपर्यंत (चिजा/ धाण्य आपल्याला पाहिजे तेवढ बारीक होई पर्यंत) कुंटण्याच काम हे खलबत्त्याच. (कधिही न ऐकणार्याला शब्द थोडे विचित्र वाटतील ) 
नारायण पुरी, ता.लोहा, जि. नान्देड यानच एक छानस गाण आहे खलबत्त्यावर. एक-एक शब्द अफलतुन. मज्ज्या येते ऐकायला.
youtube Link https://www.youtube.com/watch?v=qoKLcEecVvU
"प्रेमाचा झांगडगुत्ता गं , जीव झाला हा खलबत्ता गं .
उखळात खुपसले तोंड प्रिये, मुसळाचा तुंबळ रट्टा गं " 


४) उखळ- मुसळ-
उखळ ही विविध प्रकारचे धान्य व शेतीमालावर प्रक्रिया करण्यासाठी बनविलेली वस्तू आहे. ही कठीण दगडापासून बनवली जाते. दगडाला खोलगट आकार दिला जातो. धान्य कुटण्यासाठी लाकडी मुसळ किंवा अखंड खोडाचा वापर केला जातो. उखळ या शब्दावरून अनेक वाकप्रचार व म्हणीही निर्माण झाल्या आहेत.
खळ-मुसळ पासुन प्रचलीत काही वाक्यप्रचार –
उखळ पांढरं झालं-खूप पैसा मिळणे, अवघें मुसळ केरांत- अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष होणें .
धान्य कांडले/सडणे तांदूळ ,तीळ ई. कुटणे यासाठी मजघरात दणकट लाकडाचे एक उखळ असे.
पूर्वी घरातील बायका दुपारच्यावेळी बेगमीची कामे करत असत. चटण्या, पापड, पापड्या, कुरडया इत्यादी गोष्टी घरीच केल्या जात. उखळ, धान्य सडण्यासाठी वापरले जात असे. गहू यात सडले जात. चटणीसाठी दाणे दगडी उखळात कुटत असत. त्या कुटलेल्या दण्याच्या चटणीची चव व मिक्सरमधल्या चटणीची चव यात फरक आहे. उखळातली चटणी चविष्ट लागते. उखळाचे बरेच प्रकार आहेत. जमिनीत पुरलेले उखळ, आणि एक जमिनीच्या वर उभे उखळ असे. त्याला उखळी म्हणत. जमिनीत पुरलेले उखळ तांदूळ सडण्यासाठी वापरले जात असे. एकत्र कुटुंबामुळे जे काय करायचे ते जास्तप्रमाणात करावे लागे. त्यामुळे उखळ मुसळ पण ब-यापैकी मोठे असे.
हे यंत्र मोठे असून दगडी किंवा लाकडी असायचं. मोठे कमरेच्या उंचीचे उखळ हे खोलगट बादलीप्रमाणे असून त्यात कुटण्यासाठी एक लांब दांडा म्हणजेच मुसळ वापरले जात असे. यात लाल मिरची कुटून मसाला करणे, पोहे कांडणे वा भात कांडणे अशा क्रिया केल्या जात.
उखळ- मुसळ-
लाकडी उखळ-मुसळ.jpg

५) व्हाईन / वायन -
हे ट्विटरने काढलेले व्हाईन हे लूप व्हिडीओ शेअरिंग अॅप नाही हा किवा जॉर्जियात सापडलेली 8000 वर्षं जुनी वाईन सुद्धा नाही. ही वेगळी आहे. विशेषत: कोकणात घरातच जमिनीत एक गोलाकार खड्डा करून त्यात घराच्या वापरापुरत्या थोड्या गोष्टी कुटण्यासाठी याचा वापर केला जाई . पुर्वी कोकणातील प्रत्येक घरामध्ये लाकडी किंवा दगडी व्हाईन असायची. व्हाईन किवा वायन असाही उच्चार करतात.
व्हायनात कुटण्यासाठी मुसळीचा उपयोग केला जायचा आणि त्याची माहिती वरती आलेली आहे.
व्हाईन / वायन-
व्हाईन-वायन .jpg

६) कणवा/ कणगी/डालगे-
पुर्वी भात ठेवण्यासाठी पिशव्यांचा उपयोग न करता बांबूच्या बेळांपासून तयार करण्यात आलेल्या कणगीचा वापर केला जात असे. ही कणग टोपलीप्रमाणे परंतु पाच ते सहा फूट उंच असते. पश्चिम महाराष्ट्रात याच कणवाला डालगे म्हटले जाते. आता प्लास्टिकच्या पिशव्या स्वस्त मिळतात. तसेच या कणगी तयार करणे आता बंद झाले आणि त्यांची किंमत सुद्धा प्लास्टिकच्या व गोणपटांपेक्षा जास्त असल्यामुळे या कणगीचा वापर करणे बंद झाले. आता कणवाची जागा प्लास्टिकच्या बॅरलने घेतली आहे.
धान्य साठवायच्या मोठ्या म्हणजे जवळपास पुरुषभर आकाराच्या वेताच्या पिंपाला कणगी म्हटलं जातं. एखादा माणुस नक्कीच मावेल एवढा आकार असतो. कणगी हा तर कोकणात हमखास आढळणारा प्रकार .
कोकणात दूध-दुभतं खूप असल्यामुळे अर्थातच शेणाला तोटा नाही. शेणाने सारवलेल्या जमिनीत ही कणगी शेणाच्याच साहायाने पक्की बसवली जाते. आणि तिला बाहेरून शेणाचा लेप दिला जातो. त्यामुळे कणगीची छिद्रे बंद होतात व थराच्या वासामुळे बाहेरून येणाऱ्या किडय़ांपासून धान्याचे संरक्षण होते. कणगीच्या तळाशी गवताचा थर दिलेला असतो. यामुळे आर्द्रता शोषून घेतली जाते आणि धान्य खराब होत नाही.
कणगी-
कणगी.jpg

७) डवली/डाव -
नारळाच्या करवंटीला वरून आडवी दोन भोके पाडून त्यामध्ये काठी घालून डवली तयार केली जायची. या डवलीचा उपयोग पूर्वी आमटी वाढण्यासाठी तसेच भात उकडल्यानंतर तो भात टोपलीत टाकण्यासाठी केला जात असे. आता स्टीलच्या विविध आकाराच्या चमच्यांमुळे या डवलीचा उपयोग आता केला जात नाही.
(दुर्दैवाने मला याचा एकही फोटो सापडला नाही, असेल तर क्रुपया पाठवा)
61SYz8_2BOZFL._SL1200_large.jpg
मोडर्ण डवली-





८) रोवळी/दुरडी अथवा लहान टोपली -

कडधान्यांना मोड येण्यासाठी ,तांदूळ ,भाजी धुणे इ साठी रोवळी वापरतात.
रोवळी म्हणजे वरती गोल पण तळाशी चौकोनी आकारात विणलेली छोट्या आकाराची उभट बांबूची करंडी.
रोवळी ही लग्नकार्यात सुद्धा वापरली जाते.
रोवळीत धान्य किंवा भाजी धुतली की पाणी जाळीतून आपोआप निथळून जातं आणि आतला पदार्थ सांडतही नाही.
रोवळी-
रोवळी.jpg
बांबू तासून त्याच्या पट्ट्या करून त्या पासून गोलाकार टोपली/ दुरडी तयार करतात. काही भागात टोपलीमध्ये जेवण ठेवण्याची पद्धत होती भाकरी सुद्धा ठेवली जाते .
टोपली-
दुरडी अथवा लहान टोपली.png
उस्मानाबादच्या आठवडी बाजारात दुरड्या विकणारी बुरुड समाजाची अनेक दुकाने आजही आहेत, तशी ती कोकणात ही काही प्रमानात सापडतात .

९) सुप-
सुप हा रोवळीची चा जोडीदार आहे. सुपाचा वापर धान्य निवडाण्यासाठी,पाखडण्यासाठी करतात.
सुफ आजही वापरात आहे पण पण थोड मोडर्न झालय, बांबूची जागा आता प्लास्टिक, स्टिल ई ने घेतली आहे.
सुप-
download.jpeg


चिकन कटलेट्स

साहित्य-
बोनलेस चिकन पाव किलो (खीमा बनवन्यासाठी)

हिरव्या मिरच्या 2, आल्याचा छोटा तुकडा, लसूण पाकळ्या 3-4 (आलं-लसूण-मिरची पेस्ट करुन घ्यावी)

1 छोटा बटाटा उकडुन, १ छोटा कांदा, शिमला मिरची १/४ वाटी, कोबी १/४ वाटी, कोथिंबीर १/४  वाटी, अर्धा लिंबाचा रस
1 चमचा लाल तिखट, मीठ 1 चमचा, गरम मसाला 1 लहान चमचा, तेल तळण्यासाठी.

आवरणासाठी- कॉर्नफ्लॉवर आणि पोह्याचा चुरा (जास्त ऑईली होत नाही, म्हणुन मी पोह्याचा चुरा घेते. त्या ऐवजी ब्रेडक्रम्स वापरले जाते)


कृती:
स्वच्छ केलेल्या बोनलेस चिकन ला आलं-लसूण-मिरची पेस्ट लावुन घ्यावी. यामध्ये २ पेले पाणी घालुन हवा बंद कढई मध्ये शिजण्यासाठी टेवावे. पाणी पुर्णपणे निघुन गेल्यावर एखाद्या चमच्याने चिकन शिजले आहे का ते चेक करुन पहा. शिजले चिकन बाहेर काढुन त्याचे छोटे तुकडे करुन त्याचा व्यवस्थित खीमा बनवुन घ्यावा.
खीमा तयार आहे.
कांदा, शिमला मिरची,कोबी,कोथिंबीर हे सर्व बारिक चिरुन घ्यावे. बटाटा कुस्करुन घावा.
सर्वप्रथम तयार खीमा एका बोलमध्ये घेउन लिंबाचा रस व्यवस्थित लावुन घ्यावा. आता यामध्ये कांदा, शिमला मिरची,कोबी,कोथिंबीर,बटाटा हे सर्व  साहित्य मिक्स करुन घ्यावे. आता यामध्ये लाल तिखट ( कलर साठी) ,मीठ, गरम मसाला हे देखिल व्यवस्थित मिक्स करुन घ्यावे.
चिकन कटलेटस मिश्रण तयार झाले आहे. याचे आपल्याला हवे त्या आकाराचे गोळे करुन घ्यावे.
कॉर्नफ्लॉवर मध्ये अंदाजाने थोडे पाणी घालुन पातळ मिश्रण करुन घ्या. या मिश्रणा मध्ये चिकन कटलेटस मिश्रणा चे तयार गोळे बुडवुन हेच गोळे शेवटी पोह्याचा चुरा किवा ब्रेडक्रम्स मध्ये घोळुन घावे. या नतर पॅन मध्ये तेल गरम करुन त्या मध्ये घेउन मंद आचेवर तळुन घ्या.
तळल्या नंतर व्हाईट टीशू पेपर वर ठेवा (जास्तीचे तेल निघुन जाण्यासाठी).
तयार कटलेट सॉस, चटणी सोबत खायला चांगले लागते.

टिप-
कॉर्नफ्लॉवर ऐवजी अंड्याचा ही वापर केला जातो.

कोकण म्हणजे स्वर्ग

गावच्या आठवणी शब्दांत उतरवणं मला जमल नाही.
एक एक ओळ म्हणजे एक सुंदर कविता जणू.
जन्माला यावं तर कोकणात अन् खेळावं ते माडाच्या,केळीच्या बनात. स्वर्ग म्हणजे दुसरं काय असणार. हा माझ्या गावचा स्वर्ग, असंख्य आठवणींना उजाळा देत वाहणारी छोटीशी नदी. अख्खं बालपण इथे हरवलं आहे. इथेच कुठेतरी सारिपाठाचा खेळ सुरू असायचा, याच फणसामागे लपंडाव  खेळ रंगायचा, याच जास्वंदी अन तगरी च्या माळा विठ्ठलाच्या चरणी वाहिल्या जायच्या. रम्य ते बालपण आणि ते कोकणात असेल तर अतिरम्य.

गावची नदी




                                   दुरच्या रानात....

                                  केळीच्या बनात

माड

                              अंगणी झरती धारा गं...

                              भिरभिर-भिनला वारा गं

  ऋतु हिरवा ऋतु बरवा

                               भिजुनी उन्हे थरथरती

माळ्याच्या मळ्यामंदी









वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय." पण ते शक्य न...