शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१९

राहिल्या त्या काही आठवणी (कोकण) - १

कोकण म्हणजे ओल्या मतीचा गंध,
कोकण म्हणजे हळुवार मनाचा बंध,
कोकण म्हणजे कोवळी पहाट स्वच्छंद,
माझ्या मनातील कोकण म्हणजे... एक लहर बेधुंद ॥
हिरव्यागार रान पसार्‍याच्या मधुन कुठुन तरी सुर्य नारायणाचा चोरटा कटाक्ष पडत होता. त्याच्या उदयाची चाहूल होती ती. त्या कटाक्षाने वातावरणात पसरलेले धुके किंचीतसे दूर पळू लागले होते. सळसळत्या गवतपात्यावरील दवबिंदू चमचम करत होते.
कुणीतरी विस्तवावर फुंकनीने फुऊsssss, फुऊsss,,,, फुऊss,,,, अशी फुंकर घाली त्याचा आवाज, आणि त्यातच भर म्हणुन, मधुन येणारा जळक्या कोर्‍या चहाचा गोडूस वास.... चालत असताना बाजूला रस्त्यालगत असणार्या, एका घरासमोरील खळ्यात माझी नजर गेली. मस्त शेणाच्या सारवणावर, राखेच्या करड्या भुकटीने झरझरती रांगोळी आकारली होती. कोण्या साठीपार आजीचे थरथरते हात या मागे असावे. (लाकुड जळाल्या नतर जी सफेद, करडी भुकटी मागे शील्लक राहते, त्याचा पुर्वी रांगोळी म्हणुन वापर करत असत.) पाय वाटेचा रस्ता अगदीच कच्चा होता. गावच्या लोकांच्या जीवनात जे खाचखळगे असतात आणि एवढ्या खाच-खळग्यातही ते आनंदी रहातात याच जणू प्रतिक म्हणजे हे रस्ते. मातीची नुसतीच भरणी, कधी ओभड-धोबड दगडांची चादर, तर कधी अर्ध्यातच पसरवलेले खडी आणि डांबर. या रस्त्यांची कहानीच वेगळी.

'गाव म्हणजे गावच । शब्दात मांडणे कठीण. दुसरे, तीसरे काही शब्द याला लागू होत नाहीत.'
सकाळचा प्रवास, छे... सकाळ कुठली पहाट, पहाटेचा पाच साडेपाचचा प्रहर. नुकताच बसचा प्रवास करुन, शेवटी आजुबाजुच्या वातावरणाचा कानोसा घेत, आम्ही आमच्या गावच्या मुख्य रस्त्याला लागलो होतो. दुर शेतीबांधा पलीकडे, झरझर वाहणारी आमची थोरली नदी मंजुळ गाणे ऐकवत होती.
तर दुर डोंगर कपारीतुन म्याओssss,,,, म्याओ sss,,,, म्याओss,,,, असा मोराचा आवाज कानी पडत होता.
खडबडीचा मेन रस्ता संपवून, आम्ही चिखल मातीच्या पाऊलवाटेला लागलो. पाऊलवाट असली तरी गावातील लोकांनी मोठाले दगड वगैरे रचुन ही वाट चालण्यायोग्य केली होती हे एक बरी झाले. मध्येच एखादे बेडकाचे पिटुकले पिल्लू टुनकन उडी मारुन इकडुन तिकडे जाइ. ईथुन चालताना आपला झगा संभाळण्यासाठी मला मात्र कसरत करावी लागत होती. गुडघाभर वाढलेल्या गवताने, लवलव करत माझ्या पायात मस्त फेर धरला होता. आणि त्यावर भरभरुन पसरलेले दवाचे थेंब, माझा पायघोळ झगा कधी भिजवून गेले मला समजले देखिल नाही. बाबांची पॅन्ट् देखिल पायालगत थोडी भिजून गेली होती. केव्हा एकदा घरी पोहोचू असे झाले होते.
आता रस्त्याचा दुतर्फा घरे दिसू लागली, आणि मला हायसे वाटले. येणार्‍या जाणार्‍याच्या स्वागता साठी जणू ही घरे प्रथमदर्शनास सज्ज झाली होती. बाजुच्या वेणू काकुच्या कौलारू घरावर धुराची वलय चढत होती. वाटे पळत - पळत जाऊन एक घोट कोरा चहा मागावा..... थोडीशी चहापावडर, साखरेचा किवा गुळाचा नुसता पाक, मापक प्रमानातच पाणी आणि चहाची हिरवी पात, अद्रक असेलच तर फक्त नावाला.... असा कोकणी मानसाच्या गोड स्वभावाप्रमाने गोड चहा... आहा । पहाटेची सुंदर सुरुवात अजुन वेगळी ती काय असणार ? आणि लाल तांदळाचे दोन मऊ-लुसलुशीत घावणे या चहा बरोबर न मागता मिळत, त्याचा आनंद आगळा-वेगळाच.
पण अशा गोड विचारा मध्ये ही, मी पाय ईकडचा तिकडे करायला तयार नव्हते. कारण मला जास्त ओढ होती ती माझ्या स्वतःच्या घरी पोहोचण्याची.


थोड पुढे गेल्यावर बाजुच्या भात शेतातुन बुजगावणी लावलेले दिसत होती. हिरव्या पिवळ्या शेतामध्ये साधारण आठ-दहा हाताच्या अंतरावर एक- एक असे बुजगावणे लावलेले असत. त्याचे पाय म्हणून दोन जाड बांबू रोवले जात, वरती सुक्या गवताच्या पेंढीवर स्त्री किवा पुरुषाचे रंगीत- संगीत कपडे चढवून देत, आणि त्याचे तोंड म्हणुन त्यावरती घरचाच एखादा फुटका माठ पालथा घातला जाई. त्या माठावर जळके लाकुड विझुवन तयार झालेल्या काळ्या कोळश्याने मस्त दोन डोळे, मधोमध नाक, तोंड .... तसेच तो पुरुष असेल तर जाडजूड मिश्या.... असा एकंदरीत त्या बुजगावण्याचा अवतार असे.
तेवढ्यात पाठीमागे कुठेतरी घुंगूरांचा आवाज ऐकु आला म्हणुन मी त्या दिशेने वळले. बाजुने गजुकाकाची बैलगाडी दिमाखात निघुन गेली. वर जाता-जाता " चाकरमाण्यानूssssss , आलाव काय ? मग किती दिसाचा मुकाम ? " अशी जुजबी विचारपुसही त्याच्याकडून झाली. त्याच्या गाडीची बैलजोडी ' सोन्या आणि मोत्या' मला फार आवडे. गळ्यातील सुपारी एवढ्या घुंगूरमाळचा रुणझुण आवाज करत, आणि ती लाल रंगवलेली टोकदार शिंगे दाखवत ते मस्त ऐटीत चालत. विषेश म्हणजे एवढ्या पहाटेच्या धुक्यातही दुरुन सुद्धा उठून दिसत, एवढे पांढरेशुभ्र बैल.
उठा उठा हो साधुसंत । साधा आपुले हित ।
गेला गेला हा नरदेह । मग कैचा भगवंत ॥ १ ॥
'उठोनि वेगेंसी । चला जाऊं राऊळासी ॥
जळती पातकाच्या राशी । काकड आरती देखलिया ॥ २ ॥

घंटानादाच्या तालावर असा अभंगाचा आवाज गाव मंदिरातुन येत होता. मंदिरामध्ये सोनार मामांनी काकड आरतीची तयारी केली होती. म्हणजे आम्ही आमच्या वाडीच्या अगदी जवळ आलो होतो तर...
मला आठवले.....आषाढ शुद्ध एकदशी च्या दरम्यान काकड आरतीची सुरुवात होते. जेव्हा आजोबा मंदीराचे पुजारी होते. तेव्हा काही वेळा, मी ही आजोबांच्या बरोबर भल्या पहाटे काकड आरतीसाठी जायचे. ‘ ‘त्रिगुण काकडा द्वैतघृते तिंबिला ।’ काठीला चिरगूट गुंडाळून त्यावर तेल ओतून पेटवलेली मशाल म्हणजे काकड. पाहाटे स्नान वगैरे करुन, हा काकडा हाती घेऊन कुडकुडत आम्ही मंदीराची वाट धरायचो. हरिनामाचा गजर करत त्या सावळया माऊलीस ऊठवले जाते. दही-दुध-तुप-लोण्याने अभिषेक करुन विठ्ठल- रखुमाईस अंघोळ घातली जाते. याच दही, दुध, तुपामध्ये मध घालुन पंचामृत केले जाते. विठ्ठल- रखुमाईस तलम रेशमी वस्त्रे आणि अलंकार घातले जातात. हळद, कंकू, गंध, फुले, तुळशी, ऊद, बेल, उदबत्ती, निरांजन, कापुर वगैरे वापरुन मस्त प्रसन्न अशी सांग्रसंगीत पुजा असे.

मला काकड आरती आवडण्याचे अजुन एक कारण म्हणजे, देवाला दाखवण्यासाठी बनवला जाणारा नैवेद्य. गावठी मऊसर शिजवलेला तांदूळ त्याच उभा-आडवा चिरलेला गुळ, असेलच तर एखादीच अखंड वेलशी..... अशी भरपुर प्रमाणात दुध घालुन खीर केली जाते. खीर तयार झाल्यानंतर शेवटी त्या मध्ये हलक्या हातानेच, एक छोटासा लोण्याचा गोळा वरुन टाकला जातो. पंचामृत आणि त्या बरोबर ही खीर खाण्यासाठी आम्ही सगळेच उतावीळ असायचो. घरी आईने केव्हा अशी खीर बनवली तरी नैवेद्याच्या खीरीची चव काही औरच.... त्यास कशाची ही सर नाही.
भक्तीचिया पोटीं बोध काकडा ज्योती ।
पंचप्राण जीवें भावे ओवाळू आरती ॥

माझ्या मनात काकडा आरतीच्या कितीतरी आठवणी तरळत होत्या, आणि या आठवणीच्या साथीने चालत-चालत मी आमच्या घराच्या खळ्यापुढील पायरीवर पाऊल ठेवले. आम्ही इथवर केव्हा पोहोचलो हे समजले देखिल नाही.
----------
काही ग्रामीण शब्द-
शेण - गोबर
गवताच्या पेंढीवर- वाळलेला गवताचा छोटा भारा
खळ -अंगण

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय." पण ते शक्य न...