बुधवार, २१ ऑगस्ट, २०१९

या वळणावर...

" कोणाला उशीर झाला, तर हल्ली खुप धास्ती वाटते. पण हाच थोडा उशीर हा, थोडा करता-करता थोडा जास्तच व्हायला लागला की वाटतं, एवढा उशीर पण होऊ नये, की आयुष्याची संध्याकाळ समोर येऊन ठेपलेली असेल.
जस नकार पचवण कठीण असतं, तसच उशीर पचवण थोडं कठीण झालं आहे हल्ली. तरीही मी खुप भाग्यवान आहे. कारण त्या एका संध्याकाळी भेटलेला तो, आयुष्याची संध्याकाळ येई पर्यंत वाट बघण्याच बळ देऊन गेला. आणि हे वाट बघणं कस सुसह्य होऊन गेलं. अशी मी नेहमीच त्याची वाट बघत बसते. कधी मनातचं, तर कधी प्रत्यक्षात. आणि मला ते आवडत ही."
एक आगळ वेगळ तेज राधाच्या चेहर्यावर झळकत होत. गुलाबी छटा होती ती. तिच्या प्रेमाची....पहील्या प्रेमाची म्हणा ना.
" पण हा अजुन का आला नाही "? तिचा तिलाच प्रश्न.
राधा या विचारात असताना, अचानक तिच्या पाठीवर हलकीशी थाप पडली....अपेक्षित होत त्या प्रमाणे माधव क्षणमात्र तिच्याकडे पहात, जवळ उभा होता.
राधा : आलास तु ? पण काय रे हे ! नेहमी प्रमाणे उशीर केलास !
माधव : तुला भेटायच तर टकाटक तयार होऊन याव लागतं. तुझा आवडता व्हाईट शर्ट घातला आहे बघ.
कसा हॅन्डसम दिसतोय ना ?
राधा : हो. अजुन ही तुला आवरायला वेळ लागतो म्हणजे काय म्हणायच ! पण खर हा...अगदी टकाटक दिसतोस.
नेहमी प्रमाणे !
माधव : अरे तु तर खानदानी मधुबाला आहेस. झोपेतुन उठून आलीस तरीही कोणी नाव ठेवणार नाही.
आणि ही, मी दिलेली साडी आहे ना गं? ( तिच्या साडीकडे निरखून पाहत) छान शोभून दिसते तुला.
राधा : हो माझ्या गेल्या वाढदिवसाच्या वेळी दिली होतीस ना ही साडी. विसरलास का ?
माधव : नाही ग, कसा विसरेन! तुझा आवडता कलर फिकट गुलाबी, आणि बारीक विणकाम केलेली जरी.... केवढी शोधा- शोध करुन मला ही साडी सापडली. तुला जशी पाहिजे होती तशी आहे. फिकट गुलाबी आणि बारीक जरी वाली.
राधा : माधव तुला आठवतो का रे तो दिवस ? आपली पहिली भेट....याच निंबोनीच्या बागेमध्ये....तेव्हा हे लोखंडी झोपाळे नव्हते . झुले होते ते पण वेलींचे . बाजूचा चाफा पण बहरलेला असायचा. मधुमालतीचा वेल अशोकालगत आभाळा पर्यंत जायचा. जणु त्याने नभीच्या चांदोबाला आपली गुलाबी-पांढरी फुले अर्पण केली असावी. ती फुलझाड जाऊन आता बघ कसे सगळे चिनी आणि जर्मन रोझ फुलले आहेत. आणि तुला आठवतय का ? त्या-त्या कोपर्‍यात एक पांगारा होता, तो काट्यांमध्ये पण मनसोक्त फुलायचा.
'एका संध्याकाळी वळणाची एक वाट चुकले होते मी. मग मिळेल त्या वाटेने पुढे आले... इथे. आणि तु तर आधीच चुकार पक्ष्याप्रमाने, इथे मृगजळ शोधत बसला होतास. मग इथेच भेटत राहीलो आपण. आणि इथेच प्रेमाच्या आणा-भाका झाल्या.'
आणि ते बघ ! तिथे एक निशिगंध फुलायचा. सोबत जाई-जुई ला घेऊन...तिथे ना छोटस तळं होत वाटतं !...हो ना रे ? आणि तु मला भेटायला सायकल वरुन यायचास ना? एक शायरी पण म्हणायचास...आठवते का ती शायरी ?
माधव : आठवतय गं सगळं. अगदी काल पर्वा घडल्या सारख!
' नहीं कर सकता है कोई वैज्ञानीक मेरी बराबरी, मैं चॉन्द देखने सायकल से जाता था.'
हिच ना ती शायरी ?
राधा : होय. 'चॉन्द' म्हणायचास मला. आणि....आणि ते..... !
' शांतपणे माधव च्या खांद्यावर डोके ठेऊन राधा आठवणी ताज्या करत होती. मधेच डोळ्यातुन ओघळणारा अश्रु त्याच आवडत्या गुलाबी साडीने पुसत होती.
त्या फिकट गुलाबी साडी प्रमाणे वातावरण ही काहीसे गुलाबीसर झाले होते. आनंदघनाच्या येण्याची चाहुल होती ती....या वळणावरील त्या दोघांच्या आयुष्याची संध्याकाळ होती ती. '
०००००
आपली कवितेची वही सांभाळत बागेच्या दुसर्‍या टोकाला बसलेली मी हे सार पाहत होते...ऐकत होते....आयुष्याचे एक सुंदर काव्य.
खरच कोणी तरी अस भेटाव एखाद्या वळणावर. मग अपेक्षित ठिकाणी पोहोचायला उशीर झाला तरी चालेल, ते वळणा-वळणाच आयुष्य एक अपेक्षित अस सुंदर वळण घेतं. आणि मग आपण हून आपणच वळतो या वळणावर.
कसे कोठुनी येतो आपण
कसे नकळता जातो गुंतून
उगाच हसतो, उगाच रुसतो
क्षणात आतुर, क्षणात कातर
जरा विसावू या वळणावर
."
बाजूच्या पारावर बसलेला एक तरुण, शेजारच्या तरुणीला सांगत होता... "ते बघ माधव काका....माझ्या शेजारी राहतात. आणि त्या राधा काकु, त्याच प्रेम होत एकमेकांवर, पण घरचे आणि परिस्थिती पुढे हताश. त्यांना लग्न करता आले नाही. घरच्यांच्या आवडी प्रमाने लग्न करुन, आप-आपले संसार त्यानी प्रेमाने संभाळले, जोडीदारा बरोबर ही प्रामाणिक राहीले. या दोघांचं एकमेकावरील प्रेम मात्र न कोमेजणार होत. एवढ निस्सीम प्रेम की, या साठीच्या वयात नियतीने देखील माघार घेत त्यांच्या प्रेमाला अजुन एक संधी दिली आहे. आता दोघांचेही जोडीदार हयात नाहीत."
       

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय." पण ते शक्य न...