शनिवार, २१ सप्टेंबर, २०१९

गोंदण

" कमुला पाहील का हो तुम्ही ? माझी कमु हरवली आहे, कमु.... तुम्ही पाहील का तीला ?" 
कोणीतरी माझा हात धरुन मला विचारत होते.
" च्या आयला मी तर स्वतःच हरवलो आहे. केव्हा पासून स्वत:चा पत्ता शोधतोय...पण सापडत नाही आहे. दुसर्यांना काय खाक शोधणार"  - मी स्वत:शीच.  तरीही न रहावून मी मागे पाहीले, एक आजोबा माझा हात धरुन विचारत होते.
" माझ्या कमुला शोधायच आहे हो,  आम्ही प्रभादेवीला जायला निघालो होतो.  हाच प्लॅटफॉर्म ....खुप पाऊस आला आणि सगळीकडे गडबड  झाली. गर्दीत चुकुन तीचा हात सुटला हो, आणि... आणि सगळीकडे गडबड झाली. तीला प्रवासाच काही समजत नाही.  आता कुठे सापडत नाही ती."  मला त्यांची दया आली. " आजोबा थांबा मी काऊंटर वरती चौकशी करतो. कॅमेरा वेगैरे असेल मी बघतो. " म्हणत मी काऊंटरकडे निघालो.

ते तिथुन ओरडुन म्हणाले " कमळाबाई विठ्ठल परब' सापडल्या का विचारा हं ! असेलच ती इथे कुठेतरी ! असेलच ती, माझी वाट बघत ! "


काऊंटर वरती चौकशी दरम्यान काही वेगळेच समजले.  ' त्या आजोबांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे म्हणे, रोज इथे येऊन येणार्‍या-जाणार्‍या जवळ अशीच चौकशी करत असतात . मग त्यांची मुल येऊन त्यांना घरी घेऊन जातात.'


मी चौकशी करुन मागे वळलो, खरच त्या आजोबांना हाताला धरुन कोणीतरी घेऊन जाताना दिसले.  मी खीन्न मनाने ट्रेन पकडली. कधी नाही ते , कोणाला तरी मदत करायला निघलो होतो. आणि काहीतरी वेगळेच समोर यावे.

" मी सुद्धा असाच हरवलो आहे, कोणीतरी शोधून दया रे "
माझ्या मनात विचार येऊन गेला.

*****


" जयु तु तयार आहेस का?  निघायचं ?"

" आई मला खरंच काही इंटरेस्ट नाही गं.  तुम्ही दोघे जातात का ?  तस ही तुम्ही आधीच पसंती दिली आहे. "
"  जयु please मला आता काही नाटकं नको. तुम्ही पसंती दिली आहे ! म्हणजे काय?  अरे,  आम्ही फक्त मुलगी छान आहे एवढेच सांगीतल.
४ वर्षे झाली आम्ही मुली बघतोय, पसंत करतो, पण तु प्रत्येक वेळी कारण देऊन विषय टाळतोस. तुला लग्न करायचंय नाही का, तसं सांग.  म्हणजे मी शोधा-शोध करणे धांबवते. "
" आई...... तु आता लेक्चर चालू करू नको. रोज रोज तेच-ते ऐकून कंटाळा आला आहे."
" अरे मी एकटी थकली आहे रे.  तुझे बाबा तर काही लक्ष देत नाहीत. अजुन किती दिवस मी सांभाळणार आहे सगळं ? तुला सांभाळणार कोणी तरी पाहिजे ना ?  तुझ लग्न झाल की, घोडं गंगेत न्हाल समजाचं."

'आईच्या तोंडाचा पट्टा चालू होता. आणि मी ही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले.... नेहमी प्रमाणे. आता तीला कसं समजावणार की, एखादी व्यक्ती आयुष्यातून निघून गेली की तीची जागा दुसरं कोणी घेऊ शकत नाही. स्वरा मला सोडून गेली.... किती आना-भाका घेतल्या होत्या दोघांनी. मी वेळोवेळी सगळी promise जपायचो, पण तीला तो गडगंज पैसेवाला मुलगा मिळाला, आणि ती खुशाल लग्न करून निघून गेली.  College पासून सुरू असलेल आमचं नातं...तीने क्षणात झिडकारल. आता विश्वास ठेवणं कठीण झालं आहे. नात्यांवर आणि माणसांवरही.'

या माझ्याच विचारात मी गाडी स्टार्ट केली.  आई केव्हाची बाजूला येऊन बसली होती.

*****


निती माझ्या समोर बसली होती.  दिसायला ही बर्‍या पैकी. ती किती रूचकर स्वयंपाक बनवते.  सगळ्यांना संभाळून घेते.  वगैरे वगैरे ऐकुन मी जाम पकलो होतो.  इकडच्या तिकडच्या गप्पा, रहाण्या, खाण्या-पिण्याच्या गोष्टी चालू  होत्या.  माझं मन मात्र कुठेही लागेना.  नेहमी प्रमाणे हे न जुळलेलं लग्नं सुद्धा मोडण्यासाठी मला फक्त एक क्ल्यू पाहीले होता.  पण मनासारखे पक्कड काही मिळेना.  प्रोब्लेम असा होता की, याआधी पाहिलेल्या मुली मुंबई किंवा आसपासच्या परिसरातील होत्या.  तेव्हा बघण्याचे कार्यक्रम झाले तरीही मी, नंतर त्यांच्या ऑफिस मधून किंवा सोशल मीडिया वरुन काही ना काही माहिती शोधून काढायचो.  काही अगदीच शुल्लक कारणावरून देखील, मला ही मुलगी पसंत नाही.  असं सरळ सांगून टाकायचो.  काही कारणं तर मजेशीर असायची.


' जर स्थळ आमच्या नातेवाईक मंडळींच्या नात्यातील असेल. तर मग नात्यातील मुलगी नको नात्यामध्ये भांडणं होतात हे ठरलेले कारण.... केव्हा केव्हा तर मुलगी सारखी व्हाट्सअप वर असते म्हणून नको.... तिच्या ऑफिस मध्ये माहिती काढली तर समजल की ती भांडखोर आहे म्हणून नको..... 'स्वयंपाक अजून एवढा जमत नाही,' असे जर मुलीच्या घरातूनच समजले तर मग काय विचारता, तीला लांबूनच दंडवत असे.  गंमत म्हणजे, खूप सा-या मुली तर मलाच रिजेक्ट करायच्या. कारण माझा चेहरा बघून त्यांना एकंदरीत अंदाज यायचा, की हा किती इंटरेस्ट ने इथे आला आहे ते.  मग तर माझ्यासाठी सोन्याहून पिवळे.'


पण इथे गोष्ट वेगळीच होती.  निती नाशिक ची होती. मग परत मुंबईहून एवढ्या लांब येऊन तीची माहिती काढणे,  म्हणजे अवघड काम होते.  दुसर म्हणजे ती कोणत्याही नातेवाईकांची नातलग लागत नव्हती,  त्यामुळे ती आशा पण मावळली.  बाई सोशल मीडिया वर सुद्धा अमावस्या पौर्णिमेला दिसे, मग तो ही चान्स गेला.  आईच्या मते तर  निती म्हणजे, सद्गुण आणि सुंदरतेचा पुतळा जणू. मला शंका तोंडावर आली रे आली... की त्यावर आई कडुन शंका निरसन असायचेच.


खाणपाण झाल्यावर मला अस्वस्थ वाटू लागल... अगदी शेवटच्या क्षणाला आम्ही घरी जायला निघालो.  आणि मला एक परफेक्ट क्ल्यू सापडला. त्या बरोबरच संधी देखिल चालून आली. ' निघता निघता आम्हाला दोघांनाच बसून बोलण्यासाठी म्हणून थोडी स्पेस म्हणून सगळे बाहेर गेले. आणि इकडचे तिकडचे काही न बोलता मी डायरेक्ट विषयाला हात घातला...


" तुमच्या प्रोफाईल मध्ये सांगितले की इथे तुम्ही एकट्याच  राहता,  आणि बाकी तुमचे सगळे नातेवाईक बाहेर गावी असतात."

बहुतेक तीला हा प्रश्न अपेक्षित नसावा.  ती थोडी कावरीबावरी झाली. हे माझ्या लक्षात आले.  तरीही ती म्हणाली.
" हो बरोबर ! "
" पण मग तुम्ही सारख आजी-आजी करताय. आणि त्या ज्या आतमध्ये आहेत त्या कोण ?"  मी लगेचच पुन्हा प्रश्न केला.
'माझ्या प्रश्नासरशी ती दोन मिनिट शांत बसली.'
'इकडे मला जिंकल्याचा फिलींग येत होत.'
चला हिने तीच्या प्रोफाईल मध्ये दिलेली माहिती खोटी आहे तर.  आईला सांगतो,  एवढ्या छोट्याशा गोष्टी साठी ही आत्ताच खोटं बोलते. मग नंतर किती खोटं बोलेल.  आणि लग्नानंतर तिच्या आजीला सुद्धा सोबत घेऊन येईल.  कारण तसही तीला सांभाळणार इथे कोणीही नाही.
आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, हे कारण कितीही शुल्लक असल तरीही मला क्ल्यू सापडला होता, आणि त्याचा वापर इथे कसा करायचा हे मला खुप चान्गल माहीत होत. राईचा पर्वत बनवण्यासाठी मला तेवढ कारण पुरेसं होतं.

मी परत खुळचटपणा सारखा प्रश्न केला.

" तुम्ही उत्तर दिले नाही?"

 आतमध्ये डोकावून पाहिले आणि ती म्हणाली.


" २००५ साली माझ्या ऑफिस च्या कामानिमित्त मी मुंबईला होते.  त्याच कालावधी मध्ये तिथे महापुर आला होता. तुम्हाला माहीत असेलच. या आजी मला CST ला जखमी अवस्थेत सापडल्या.  मी त्यांना डाक्टर कडे घेऊन गेले,  तर असं समजलं की डोक्याला मार लागल्याने  त्यांची स्मरणशक्ती गेली आहे.  मी स्वतः एक दोन पेपर अँड दिल्या,  CST ला एक आजी सापड्ल्या आहेत म्हणुन. त्या सोबत फोटो ही होता. पण काही चौकशी आली नाही.  त्यांना काहीच आठवत नव्हते.  एकतर यांना कोणीही नातेवाईक नसावे किंवा त्या पुरामध्ये त्यांचे काही बरेवाईट झाले असावे.  मुख्य म्हणजे हल्ली अशा  म्हातार्‍या आई-बाबंची जबाबदारी घेण्यासाठी मुलंही तयार नसतात.  अजुनही बर्याच शक्यता असू शकतात...


शेवटी माझ्याकडे पर्याय राहिला नाही, आणि माझे मुंबई मधील कामही संपले होते.   म्हणून मी त्यांना माझ्या सोबत इकडे घेऊन आले. "


ती बोलत होती आणि मी एकटक तीच्याकडे बघत होतो.  काय बोलावं मला सुचेना. "साल्या इथे तर सपशेल हरलास तु...."  मी एवढेच, पण मनातल्या मनात म्हणालो.

ती तर बोलता बोलता फार सिरीयस झाली होती. मग उगाचच काहीतरी विचारायचे म्हणून परत प्रश्न केला.
" तुम्ही पोलिसांना का कळवले नाही ? त्यांची नक्कीच मदत झाली असती."
" त्यांना काहीच आठवत नाही हो !  अँड तर मी ही दिली होती. पोलीस काय करणार ?  फार तर त्यांनी या आज्जीना एखाद्या वृद्धाश्रमात नेऊन ठेवले असते. आणि हे पाप माझ्याने पहावणारे नाही."
नितीच्या या वाक्याने मी खजील झालो. आणि निरुत्तर ही.

*****


आईच्या मांडीवर डोक ठेवून मी झोपलो होतो.  लग्नाला एका दमात होकार दिला. आईला केवढा आनंद झाला. आणि आश्चर्य ही. ती मला राहून राहून सारखे एकच प्रश्न विचारत होती.  " जयु... मुलगी नक्की पसंत आहे ना ? की मी सारखी सारखी मागे लागत असते म्हणून होकार दिला आहेस."


मी हो म्हंटले.

" आई मला तीला भेटायचं आहे ! "
" बर मग कुठे भेटायच म्हणतोस. तु नाशिक ला जाणार आहेस, का नितीला इकडे बोलवून घेऊ?"
" तीला बोलाव CST ला.  सोबत आजींना घेऊन यायला सांग."
" CST ला का रे ? डायरेक्ट घरी येऊ दे ना !"
" आई तु पण ना.... CST ला मी जाईन आणि त्यांना घरी घेऊन येईन."

आईचा आंनद गगनात मावेनासा झाला.  तीने लगोलग कॉल करून निती ला बोलावणं पाठवलं सुद्धा.

' खरच.... निती पेक्षा चांगली मुलगी मला मिळाली नसती.  आपण रक्ताच्या नात्याला तेवढे महत्व देत नाही.  कुठच्या कोण, त्या आजींचा संभाळ करणारी निती म्हणजे खरच आई म्हणते तशी, नात्याना महत्च देणारी आणि मानुसकी जपनारी अशीच होती.

काही वेळा गोष्टी आपल्या नजरेसमोर असुनही आपण दुर्लक्ष करतो. आपण आपल्या भावनांना एवढे कवटाळून बसतो की, आपल्या नजरेसमोरील कित्येक चांगल्या गोष्टींचा आपल्याला विसर पडतो. आपण जे शोधत आहोत, ते हेच आहे हे समजायला हवे.'


माझ्या बाबतीतही असेच झाले.

त्या दिवशी नितीच्या घरातुन निघता- निघता मी त्या आजींच्या पाया पडलो.  डोक्यावर त्यांचा आशीर्वादाचा हात होता.  सहजच उठता उठता त्यांच्या हाताकडे लक्ष गेले, त्यांच्या उजव्या हातावर एक गोंदण कोरलेले होते.  आणि त्यावर नाव होते. 'कमळाबाई विठ्ठल परब'....जुनी गोंधणाची संस्कृत इथे कामाला आली आणि मला कमळाबाई परब सापडल्या.

मागे स्टेशन वरती भेटलेले आजोबा आठवले.  "माझी कमु हरवली आहे हो! "...म्हणत ते एवढी वर्षे त्यांच्या कमुचा शोध घेत आहेत.  त्या ७० पार आजोबांच्या आशेला एक कारण होते. ते म्हणजे त्या आजी.  म्हणूनच तर त्या दिवशी स्टेशन वरती त्यांची आणि माझी भेट झाली असावी.


आता एक गोंदण मी माझ्या मनावर कायमचे कोरुन ठेवले.  ते म्हणजे जे तुमच्या नशिबात आहे ते तुमच्या पासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि जे नशिबात नाही,  त्याचा विचार करून शोक करण्यात काहीही अर्थ नाही.



समाप्त.

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय." पण ते शक्य न...