रविवार, २७ ऑक्टोबर, २०१९

चिरोटे




दिवाळीच्या फराळासाठी तयार केला  जाणारा एक पारंपरिक महाराष्ट्रीयन गोडाचा पदार्थ म्हणजे चिरोटे. खुसखुशीत चिरोटे त्यावर मस्त साजूक तुप आणि वरुन भुरभुरलेली पीठी साखर असा याचा थाट. बिनसाखरेचा चिरोटा देखील चवदार लागतो . खारी प्रमाने चहा बरोबर किवा नुसताच खाऊ शकता. पण खारीपेखा नक्कीच पौष्टिक आहे. गोड न खाणाऱ्यांसाठी किंवा कमी गोड खाणाऱ्यांसाठी साखरेचे प्रमाण कमी-जास्त करून करता येतो. कोणी फक्त मैद्याच्या करतात तर कोणी मैदा आणि रवा मिक्स करून करतात अशा चिरोटे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती  आहेत .
लाटण्याच्या ही दोन पद्धती आहेत गोल आणि उभी.  मी गोल  चिरोटे  बनवते. पण जरा वेगळी पद्धत आहे. गुलाब पाकळ्यांचा  पाक म्हणजे इथे आपण मेप्रोचा तयार गुलाब सिरप वापरु शकता. यामध्ये केलेले गुलाबी चिरोटे हे माझ स्पेसीफीकेशन आहे .  
तर मी ज्या पद्धतीत चिरोटे बनवते त्याची ही आगळीवेगळी कृती.

साहित्य:

२ वाटी मैदा ( दोन भागात विभागुन घ्यावे.)
१ वाटी पिठी साखर  ( दोन भागात विभागुन घ्यावे.)
२ चमचे कडाडीत गरम तूप  ( दोन भागात विभागुन घ्यावे.)
२ छोटा चमचा मीठ  ( दोन भागात विभागुन घ्यावे.)
१/२ चमचा बेकिंग पावडर  ( दोन भागात विभागुन घ्यावे.)
३ चमचा गुलाब सिरप 
१/२ वाटी तांदळाची पिठी (साट्यासाठी)
३ चमचे पातळ तूप (साट्यासाठी)
पीठ भिजवण्यासाठी थोडे दूध
तळण्यासाठी तूप.

कृती:

१)  विभागलेल्या दोन भागापैकी प्रत्येक साहीत्याचा फक्त एक भाग येथे घावा. 
मैदा, पिठी साखर, गरम तूप, मीठ, बेकिंग पावडर एका भांड्यात घ्यावा. या मधले तूप आधीच कडक तापवावे मग वापरावे,  जर मोहनासाठी तूप कमी गरम असेल तर चिरोटे नरम पडतात. दूध घालून सर्व साहीत्य घट्ट भिजवावे. 

२) विभागलेल्या दोन भागापैकी प्रत्येक साहीत्याचा दुसरा भाग येथे घावा.

मैदा, पिठी साखर, गरम तूप, मीठ, बेकिंग पावडर , गुलाब सिरप हे सर्व एका भांड्यात घ्यावा.  वरील कृती प्रमानेच दूध घालून घट्ट भीजवावे. 
दोन्ही तयार पीठाचे गोळे ( १ व २) थोडा वेळ वेगवेगळे झाकून ठेवावे.

३) भिजवलेला दोन्ही पीठान्चे वेगवेगळे मध्यम असे पोळी करताना जसे गोळे करतो त्या आकाराचे गोळे करून घ्यावे.   त्याच्या एकदम पातळ पोळ्या लाटून घ्याव्यात. यामध्ये  साधारण ३  पोळ्या सफेद पीठाच्या आणि ३  पोळ्या गुलाब सिरप घातलेल्या गुलाबी पीठाच्या होतील. जितक्या पातळ पोळया तितके चिरोटे हलके होतील आणि चिरोट्यांना छान पदर सुटतील.


३) एक सफेद पीठाची लाटलेली पोळी घ्यावी. त्या पोळीवर पातळ केलेले साजूक तूप आणि तांदूळ पिठ याची मध्यमसर घट्ट पेस्ट लावावी. त्यावर एक  गुलाबी पीठाची पोळी ठेवावी परत त्यावर तूप आणि तांदूळ पिठाची पेस्ट लावावी. 


४) नंतर दोन बाजूंनी गुंडाळी करत मध्यापर्यंत यावे. एका बाजूची गुंडाळी दुसर्या गुंडाळीवर ठेवून थोडे चेपावे. आणि हि तयार गुंडाळी त्यातील तूप सुकेस्तोवर ठेवून द्यावी. अशाच प्रकारे उरलेल्या २-२ पोळ्यांची गुंडाळी बनवून घ्यावी.


५) या गुंडाळ्यांचे १ इंचाचे तुकडे करून घ्यावे. गुंडाळीचे तुकडे वरील बाजूने न लाटता जिथून कापले आहे त्या बाजूला हलके दाबून एकदा उभे आणि आडवे असे लाटणे फिरवावे. या चिरोट्यांचा आकार गोल येतो. आणि दिसायला ही आकर्षक दिसतात. 


७) तळण्यासाठी तेल तापत ठेवावे. तेल गरम झाले कि आच मध्यम करावी. आणि चिरोटे गोल्डन ब्राउनतळून काढावे. पेपरवर काढून लगेच त्यावर २-३ चिमटी पिठीसाखर पेरावी.


८) मस्त सफेद गुलाबी रंगाचे चिरोटे तयार होतील. फार आकर्षक दिसतात आणि चवीलाही खुसखुशीत लागतात.


स्पंदन २०१९

स्पंदन २०१९ आमचा पहिलाच दिवाळी अंक तुमच्या हातात देताना खुप आनंद होत आहे . साहित्याच्या विविध पुष्पांनी भरलेली ओंजळ भरून आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्याकरता तुमची दिवाळी सुगंधित करण्यासाठी !
खुसखुशीत फराळाच्या आठवणींसह , दिवाळी सणाच्या तुम्हा सगळ्यांना थोड्याशा तिखट , जराशा आंबट पण खुप सार्‍या गोड-गोड शुभेच्छा !


" स्पंदनाने गुंतीयले शब्द जणू
असंख्य हृदयाची गुंफने !
गद्य, पद्य आणि लेखमाला
लेऊनीया आलो आवडीने !
झगमगते लक्ष लक्ष दिवे इथे
अन सुग्रास जाहली पक्वाने !
चुक-भुल द्यावी घ्यावी
अन स्विकारावी आमंत्रणे !! "


वाचा, वाचायला द्या, आणि प्रतिक्रिया कळवा आमच्या email id वर!
Email ID: facebookalwayson@gmail.com

https://drive.google.com/file/d/1mSPhu94-6z5SdcQpU6IvcaGOCG_us94b/view?usp=drivesdk


स्पंदन दिवाळी अंक आता www.esahity.com वर उपलब्ध.ई साहित्य प्रतिष्ठानचे आभार. Happy
- एक प्रसन्न अनुभव

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

" गोष्टी फ़राळाच्या "




प्रत्यक्ष दिवाळीला १५-२० दिवस शिल्लक असतात, पण दसरा होतोन-होतो तोच दिवाळी जवळ आली की, काय काय करायचे याची चर्चा घरोघरी सुरु होते. याबाबतीत घरातील वडीलधारी मंडळी जरा जास्तच संवेदनशील असतात. " अरे आरामात काय बसलाय ? साफसफाई कधी करणार ? भांडी घासायची आहेत. रंगरंगोटी करायची आहे. बापरे फराळाच काय ? "  असे म्हणत एखादी आजी फराळ या मुद्द्यावर येऊन एक मोठा पॉस घेते. आणि रमून जाते ती,  गेल्या वर्षीच्या फराळाच्या आठवणीत. घरी काकु , आत्याबाई , मावशी अश्या कोणकोण सगळ्याच मग तीच्या शेजारी येऊन बसतात... आणि चालू होते फ़राळाच्या गोष्टीची ऊकळ-बेर !

" वन्स गेल्या वर्षी त्या पिंट्याचे आईने लाडू दिले होते काय म्हणून सांगू ....तोंडात टाकल्या-टाकल्या विरघळले की. "

आणि हो , त्या आक्काच्या नव्या सुनेने अनारसे केलेले , आठवतंय का हो ? काय चविष्ट होते सांगू...  आज कालच्या मुलीच हुशार बाई. नाहीतर त्या मामाच्या सुनेला काही धड करता येत नव्हते. " असे म्हणत आजी विषयाला हात घाली . ' मग शेजारच्या कोणाकोणाच्या चकल्या फसल्या , कोणाचे लाडू बसले, शेवेचा तर चुराच झाला , शंकरपाळे फसफसले आणि अनारसे कुस्करले . गेल्या वर्षीच नव्याने शिकुन तयार केलेला पदार्थ,   ते कळीचे लाडू खाऊन पोटात कळ यायला लागली, असे म्हणत मग सगळ्या खो-खो हसत. '

यात अगदी ५० वर्षापुर्वी आजीचं लग्न झाल होत तेव्हाची दिवाळी कशी साजरी केली जायची याचीही चर्चा होई . अशी तिखट-गोड पण खुसखुशीत चर्चा चविचविने चघळली जायची . मग यामध्ये काही असे विषय निघत जे दरवर्षी ऐकुन-ऐकुन कंटाळलेली कोणी काकु यामध्ये विषयांतर म्हणून आठवण करुन देत असे, " अहो सासुबाई ,  या वर्षीची काहीच तयारी झाली नाही. साफसफाईला सुरुवात करु म्हणते ! आणि माळ्यावर ची भांडी-कुंडी घासून-पुसुन ठेवू म्हणते. " अशी आठवण करुन दिल्याबरोबर सगळे महिला मंडळ तात्पुरती बरखास्त होई . आणि साफसफाई पासून सुरुवात होऊन त्याचा शेवट होई तो फराळानेच !


बहुतेक घरी आजही फराळ बनवण्याचा श्री गणेशा होतो तो चिवड्यापासुन ! सहज सोपा पदार्थ म्हणजे चिवडा.  चिवड्यासाठी पोहे पातळच हवेत , यामध्ये खोबर्‍याच्या चक्त्या सुद्धा पातळ असु देत, शेंगदाणे खरपुस तळावे, नाहीतर चिवडा खवट लागतो.  पुढे शंकरपाळे.... ते प्रमाणबद्ध हवेत , उगाच वाकडा-तिकडा, छोटा-मोठा आकार करु नये.  चणा डाळ चांगली भाजुन घ्या कच्ची रहायला नको... लाडू जास्त मोठा नको, तसेच नीट गोल गरगरीत बांधावा. चकलीची भाजणी व्यवस्थीत करावी, उडिद डाळ कमी घ्यावी , यात जुना जाडा तांदूळ वापरावा यामुळे भाजणी फुलते व चिकट होते चकल्या फुटत नाहीत आणि खुसखुशीतही होतात. करंजी नंतर ही खुसखुशीत राहायला पाहीजे.  मऊ पडता कामा नये यासाठी मैदा मळताना यात थोडे तेलाचे मोहन घालावे.

हुश्श्श  ! किती त्या सुचना.  यामध्ये घरी कोणाला डायबेटीस आहे हे पाहुन गोडाचे प्रमाण कमी जास्त केले जाते. तसेच म्हान-म्हातारी माणसे लहान मुलांचा विचार करुन तिकटाचे प्रमाण ही विचारात घेतले जाते. मागील फराळाच्या गप्पा, कडू-गोड आठवणी आणि त्यातून शिकलेले धडे, याचे मोजमाप समोर ठेऊनच प्रत्येक पदार्थ केला जातो.  यात अजीबात कोणतेही प्रमाण न लावता ओतपोत घेतला जाणार एक त्रुप्त घटक म्हणजे त्या गृहिणीचे प्रेम ! रात्र-रात्र जागुन हे पदार्थ बनवताना येणारा थकवा, आपली पाठदुखी , कंबरदुखी, जागरण हे सगळ सहन करुन आपल्या कुटुंबाच्या दिवाळीमध्ये खर्‍या अर्थाने आनंद भरण्याचा महत्वाचा वाटा कोणाचा असेल तर त्या गृहिणीचा !

अजूनही बऱ्याच ठिकाणी शेजारीपाजारी आणि नातेवाईकांना फराळाची ताटं किवा डब्बे पाठवण्याचा रिवाज आहे. कोणाकडे किती फराळ पाठवायचा ,  यामध्ये ते शेजारचे आपल्याला फराळ देतात की नाही . (खोखो स्माईली) गेल्या वर्षी बाजुवाल्या ताईने तीच्या फराळातून आपलेच लाडू आपल्याला परत दिले होते . समोरच्या काकुने तर उरलेला फराळ दिला होता. तीचे सगळे लाडू फुटलेले, करंजे तुटलेले आणि चिवडा पण चिवट  होता.  या वर्षी त्या दोघींना फराळ द्यायचा नाही असाही पवित्रा घेतला जातो.

तर बाबुच्या मम्मीने छान खुसखुशीत फराळ दिला होता. आणि अनारसे तर फारच चविष्ट करतात त्या,  असे म्हणत त्यांच्या डब्यात दोन एक्स्ट्राचे लाडू भरले जातात. (स्माईली)

प्रभात समई उटण्याची आंघोळ , नविन कपडे, घराची रंगरंगोटी झाली, दिव्याची आरास सजली, दाराला तोरणे आणि फुलापानांची माळा गुंफल्या, की शेवटी अंगणात रांगोळीचा सडा पडतो आणि मग  एकत्र बसून फराळाचा फन्ना उडवला जातो.

डायबेटीस असुनही एखादा मुगाचा लाडू गपकन तोंडात टाकला जातो, ' जरासे शंकरपाळे बघते ' म्हणत डिशभर शंकरपाळे आणि वर दोन करंजा रिचवुनही अजुन काहीतरी खावे असे सारखे वाटत रहाते.
दिवाळी आणि फराळ याचे गणितच वेगळे. फराळाशिवाय दिवाळी हे समीकरण जुळतच नाही. थोडा गोड, थोडासा तिखट व बराचसा खुसखुशीत चवदार असा ठेवा म्हणजे दिवाळीचा फराळ !

तर अशा खुसखुशीत फराळाच्या आठवणीनसह , दिवाळी सणाच्या तुम्हा सगळ्यांना थोड्याशा तिखट , जराशा आंबट पण खुपसार्‍या गोड-गोड शुभेच्छा !


( सिद्धि चव्हाण- ९८३३३२६६०९ )

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१९

तांदळाची बोर विथ सम गपशप



' आजकाल धावपळीच्या युगात दिवाळीचा फराळ घरी करणे म्हणजे फारच अवघड काम. बाजारात वेगवेगळ्या दरांमध्ये हेच पदार्थ सहज उपलब्ध आहेत, त्यामुळे सध्या विकतचेच गोड मानुन दिवाळी साजरी करण्याचा ट्रेंड आहे . पुर्वी घरच्याघरीच ४-५ पदार्थ तरी सहज बनवले जायचे आणि एवढ करुन देखिल ' यंदा जास्त काही करता आल नाही हो.. ' अशी खंत मनात बाळगणार्‍या गृहीनी अश्या फराळाच्या रंगतदार गोष्टी चविचविने सांगत. आजकालच्या स्त्रिया घर आणि ऑफीस दोन्ही सांभाळताना तारेवरच्या कसरती प्रमाने जीवनाची कसरत करत जगतात, तर हे सगळे पदार्थ करण्यासाठी आपल्याकडे किती वेळ असणार म्हणा .... काही घरात मात्र अजुनही काही पदार्थ केले जातात. खुप सारे दिवाळीचे पदार्थ तर आजकालच्या मुलांना माहीतच नाहीत . असाच एक हरवलेला पदार्थ म्हणजे तांदळाची बोर.'
एक आठवण - ' सगळा फराळ केला तरीही आजीने बोर केली नाहीत तर आजोबा खट्टु होऊन बसायचे. " यंदा दिवाळीला काय मजा नाही बुवा " हे त्यांचं ठरलेल वाक्य. " म्हातार्‍याना बोर पाहीजेत ना.... करते मग... माझ्या मागे कोण करणार आहे हे सगळ. हयात आहे तोपर्यंत करते." अस म्हणत मग आजी दिवाळी संपता-संपता तरी बोर करायचीच.
' आता आजी पण राहीली नाही....आजोबाही गेले.... बोर ही कालवष झाली असच म्हणव लागेल. पण दरवेळेस दिवाळी आली की आजीची आठवण येते. आणि त्या आठवणीमध्ये बोराच स्थान अढळ .... मग मी एखादा शनीवार-रवीवार सगळ आवरुन बसते. आजीच्या आठवणी आणि बोर दोन्हीचा प्रपंच मांडून.... तर चला आज आठवणींची बोर करुया.
***
बोरासाठी तांदळाचं पीठ बनवण्यासाठीची कृती - इथे भाकरीसाठी वापरलेले पीठ न वापरता थोडे वेगळ्या प्रकारे बनवलेले पीठ वापरले जाते. स्वच्छ धुतलेले तांदुळा ४ तास भिजत घालायचे, मग व्यवस्थित निथळून घायचे . २-३ तास कडक उन्हामध्ये वाळवुन, जाड बुडाच्या पातेली मध्ये हलकेच खरपुस भाजायचे आहे. अजीबात काळे वगैरे करायचे नाहीत . थोडा दुधाळ रंग होई पर्यंत भाजावे. मगच दळणासाठी द्यायचे . आणि दळणार्‍याला द्यावयाच्या सुचनाही भारी असायच्या . " भाऊ जास्त बाईक करु नका हो. जास्त जाड ही नको. दुसरे कोणते धाण्य या दळणामध्ये मिक्स करु नका.... सेपरेटच दळा हो .... " काय आणि काय. बिचारा दळणारा... ' नक्की दळायच कस ' त्याच्या मनात प्रश्न येत असावा. एखादातर चटकन म्हणे , " वैनी तुम्हीच हे दळण करता का ? " Lol Lol Lol
***
साहित्य- चार वाटी तांदळाचं पीठ, चार चमचे (टीस्पून) बारीक रवा , थोडे पांढरे तीळ , थोडी खसखस , २५० ग्रॅम गूळ , १ कप सुख \ओलं खोबरं , मीठ चवीपुरतं , तेल तळण्यासाठी , एक कप दुध.
WhatsApp Image 2019-10-14 at 2.09.29 PM.jpeg
.
कृती- एक पातेलं गॅसवर ठेवा आणि ते थोडं तापलं की २-३ पेला पाणी घाला. त्या पाण्यात गूळ घालून तो पातळ करुन घ्या. यामध्ये तांदळाचं पीठ, रवा, तीळ, खसखस, खोबरं, मीठ , दुध हे सगळे घटक एकत्र करुन घ्या. हे मिश्रण थोड थंड झालं की मग हलक्या हाताने मळुन घ्यायचे . भाकरीच्या पीठाप्रमाने घट्टसर असेच मळून घावे . पातल करु नये.
आता याचे लहान-लहान बोराच्या आकाराची गोळे करावे आणि मंद आचेवर तळावे . एका वेळेस आपण कढई मध्ये १०-१५ बोरे टाकुन तळू शकतो. त्यामूळे जास्त वेळ लागत नाही. जास्त करपू देऊ नयेत.
WhatsApp Image 2019-10-14 at 9.17.33 PM.jpeg
.
टिप-
* बोरं तळताना त्यांना थोडे तडे गेले पाहिजे तरच ते कुरकुरीत लागतात. म्हणजेच बोर थोडीशी फुटली पाहीजेत.
* प्रत्येक पदार्थ करताना त्याच्या शी निगडीत कटू-गोड आठवणी मध्ये रमुन जा.... मग त्यामध्ये काही काही कमी-जास्त झाले तरी चालेल. त्याला जी चव येते ती पर्फेक्ट मेजरमेन्ट वापरुन केलेल्या पदार्थालाही येणार नाही. Bw
सिद्धि चव्हाण

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१९

बंदिश


" निघालास ? " ..... गेटच्या दिशेने चालत जाणार्‍या अविनाशला विभा विचारत होती.
" हो ! " .... त्याने मागे वळून न पाहताच उत्तर दिले.
ती पुन्हा... " का ? आणि मला न भेटताच ? "
" तो येतोय ना ! " परत त्याने मागे न पाहताच उत्तर दिले.
" जसा तू यायचास तो नसताना , तसाच तो येतोय पण तू असताना ! "... विभा हसत म्हणाली.
" विभा हे शक्य नाही. '
" अरे पण का ? "
" वेड्यासारखी वागू नकोस. दोन्ही समतुल्य नाती संभाळणे तुला जमेल का ? "
" म्हणुन तू जाणार आहेस का रे ? " ..... विभा काकुळतीला येऊन म्हणाली.
" हो. तो आता परत येतोय तर मी इथे थांबने योग्य नाही वाटत. "
" मग तो गेला तेव्हा त्याने विचार केला का माझा ? "...तीने परत प्रश्न केला.
" त्याच्याकडे पर्याय नव्हता ग, आणि तुच त्याला तुझ्या पासून दुर ठेवलेल ना. स्वतःहून . "
"तेव्हा माझ्याकडेही पर्याय नव्हता, पण आता आहे. ".... विभाने एका झटक्यात उत्तर दिले.
" म्हणजे ? "... अविनाश ने विचारले.
" अवी, तू कुठेही जात नाहीयेस. "... विभा त्याचा जवळ येत म्हणाली.
" तुला जमेल का ग अशी दोन नाती जपायला ? कात्रीत सापडशील. आणि मला ते पहावणार नाही. निघतो मी "
काहीतरी धडपडण्याचा आवाजाने तो सरकन मागे वळतो....
" तुझी व्हिलचेअर कुठे आहे ? आणि हे काय , तू आता आधाराने उभी राहू शकते . " (तो आश्चर्य आणि आंनदाने)
ती धडपडत... " हो . गेले काही दिवस काठीच्या आधाराने चालते मी . मग धाप लागली की अशीच कोसळते . मग स्वत:ची स्वत:च उठून बसते. '
" आधी का सांगीतले नाहीस ? "... अविने तीला आधार देत परत प्रश्न केला.
" गेले काही दिवस तू आलाच नाहीस . कस सांगणार ? एक सांगू .... तुझी बंदिश मनात एवढी रेंगाळत रहाते की , तू नसतानाही असल्याचा आभास होतो. सवय झाली आहे मला आता याची. बरेच दिवस तू आला नाहीस. मी वाट बघुन-बघुन तुझीच कॅसेट टाकुन म्युझीक प्लेअर ऑन केला . पण त्याची वायर माझ्या व्हिलचेअरला अडकली आणि खाली पडला तो . कॅसेट आतल्याआत अडकली. आतडी पिळवटावी तस वाटल मला.... क्षाणात बंद पडला होता तो म्युझीक प्लेअर ..... आणि जणु माझा श्वास कुणी बंद करत आहे अस वाटल . " ..... बोलता बोलता तिला धाप लागली.
" शांत हो "...दोन्ही हातानी उचलून आपल्या जवळ घेत तो तीला घेऊन समोरच्या बाकडावर बसवत तो म्हणाला.
एकटक त्याचाकडे बघत ती परत बोलायला सुरुवात केली..... " त्या दिवशी मला माझ्या व्हिलचेअरचा खुप राग आला होता . होती नव्हती तेवढी शक्ती एकवटून उठले. सरकत जमीनीवर कोसळले आणि भिरकावून दिली ती चेअर.... खुप दुर.... कायमचीच.... मग उठवा येईना की हलता येईना, बसल्या जागी कळा यायला लागल्या, खुप त्रास झाला. पण मी तीला परत हातच लागला नाही . आता अशीच चालते ... कधी लहान मुला सारखी रांगत तर कधी फरपटत . पण ज्या तुझ्या बंदिशीचा मी राग-राग करायची, तीच एखादी बंदिश ऐकल्या शिवाय आता मला झोप येत नाही. सार कस क्षाणात बदलत ना रे ! "
" तुला आरामाची गरज आहे. तू आतमध्ये चल. मला निघायला हव "... अविनाशने तीला उठवण्याचा प्रयन्त केला.
" नको थांब अवि , ही बघ ? " .... ती एक छोटीशी खड्याची अंगठी त्याच्यासमोर धरत ती .
" ही ही अंगठी अजुन तुझ्याकडे आहे . "
" हो "
" पण अमु परत येतोय . दोन नाती संभाळण सोप नाही आहे. जमेल तुला ? "
" नाही जमनार. म्हणुन एक नात मी कायमचच पुसून टाकणार आहे."
तो चमकून... " कोणत ?"
" आपल केवळ दिखाव्याच्या मैत्रीच नात संपणार. आणि अमुला सांगून टाकणार आहे मी की, तुच त्याचा बाप आहेस.... आपणच त्याचे आई वडील आहोत. पण
बीना लग्नाचे . "
तो बॅग उचलत ... " आज इतक्या वर्षानंतर तू स्विकारते..... हे नात जर त्याने स्विकारलच नाही तर ? नकोच ते प्रश्न... मला निघावच लागेल. तेच योग्य आहे "
" खुप मोठा झालाय आता तो. समजुदार ही.... त्याला याचा स्विकार करावाच लागेल. न स्विकारुन सत्य बदलनार आहे का?
अजुन एक.... आपल हे मैत्रीच नात संपल आता... मग या नविन नात्याला नविन नाव द्याव लागेल ना ? काय म्हणतोस ? "... तीने अनपेक्षित प्रश्न केला.
तो परत चमकुन.... " तुझी कोडी संपत नाहीत. विभा तुला नक्की काय म्हणायच आहे ? "
तीने हात पुढे केला.... " घालतोस ना अंगठी ? "
थोडस हसु आणि साठलेले आसु सावरत तो बाकावर बसला तिच्या शेजारी.... बोटामध्ये अंगठी सरकवत त्याने तीला ह्रदयाशी धरल. डोक्यावरील कुंदीची चार शिळी फुले टपटप गळून त्याच्या अंगावर पडली....जशी अल्हाददायक वार्‍याच्या एका झुळूकी सरशी वर्षानुवर्षाची बंधने गळून पडावी.
ती त्याच्या छातीवर डोक ठेवत... " तुझ्या बंदिशने या बंदिस्त जिवनातुन मला मुक्ती दिली. जरी अमूच्या वेळेस माझ्या कठीण काळात मला तू सोडुन गेला असलास तरी या कठीण काळात जेव्हा माझ्या जवळ कोणीही नव्हत. तेव्हा तू होतास. म्हणुन मी त्या जुन्या कटू आठवणी पुन्हा उगाळत बसायच नाही अस ठरवलय. नव्याने सुरुवात करु. "
त्याने दोन्ही हातांचा वेढा घालत तीला अजूनच जवळ घेतल . ज्या बंदिशीचा प्रेमापोटी त्याने विभाला दुर लोटल होत. तीच त्याची एक अव्यक्त बंदिश आज पुन्हा एकदा बंदिस्त झाली होती . अगदी अविभाज्य..... त्याच्यापासून पुन्हा कधीही विलग न होण्यासाठी.

बुधवार, ९ ऑक्टोबर, २०१९

लव्ह इन क्युबेक

( ऑनलाईन चॅट, डेट , प्रेम आणि यातुन निर्माण होणारे प्रॉब्लेम्स यावर आधारीत, पण अगदी हलक्या-फुलक्या शब्दात मांडलेली ही एक छोटेखानी प्रेम कथा आहे. वाचकांना वाचनास सोयीस्कर जावे आणि सरमीसळ होऊ नये यासाठी कथा एकदाच सरसकट न टाकता , ४ भागांमध्ये विभागली आहे. चौथा भाग अंतिम असेल.
तुमच्या सुचनांचे नेहमीप्रमाने स्वागत आहे. )
                                                            *****



ट्रिंग...ट्रिंग...ट्रिंग...
फोन ची बेल वाजत होती.
" एवढ्या सकाळी कोण असावे ? जाऊदे फोन बंद करून ठेवतो. आज तरी कोणाचा डिस्टर्ब नको.
ऐन डिसेंबर, बाहेर मस्त पाऊस, आहाहा ! सोने को और क्या चाहिए ? तसा पण विकेंड आहे. मस्त ताणून देण्याचा मूड...."
पण फोन हातात घेऊन Switch off करण्याच्या आतच डिस्प्ले वरती आलेला आयराचा फोटो पाहुन माझी इच्छा होईना. मी क्षणाचाही विलंब न करता फोन उचलून कानाला लावला.
" हैलो ब्युटी. हाय "

" सिद . meet me, it's urgent ! "

" ए हैलो ! काय urgent ? आणि गुड मॉर्निंग वगैरे काही म्हणण्याची पद्धत आहे की नाही?"

" तू झोपलेला आहेस, म्हणजे मॉर्निंग झाली का ? It's afternoon dear. आणि हो , काहितरी सिरीअस आहे. एवढ समजू शकतो ना ? ये लवकर ! "
कुणच काय..... तर तिचा आवाज थोडा चिडका वाटत होता. आणि लवकर ये ही माझ्यासाठी आज्ञाच होती. चार शब्द ऐकून घेण्यापेक्षा मी ही, 'हो येतो' म्हणालो. 'आज तसही विकेंड असल्याने मेड येणार नाही. चला स्पॉन्सर मिळाली. पोटा-पाण्याचा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. मस्त इंडियन रेस्टॉरंट मध्ये जाऊन इंडियन फुड enjoy करायला मिळेल. बाकी urgent काय असेल ते बघू नंतर '. या विचारात मी ही झटपट तयार होऊन निघलो देखील.
०००००
ल्ड क्यूबेक मधील Spice of India नुसत नाव ऐकून तोंडाला पाणी (?) भजा सारखा नुसता आकार बाकी टेस्टचे काही गन नाही, चपट गोल आकाराचे वडे.... बेसनामध्ये बटाटा की बटाटया मध्ये बेसन काही थांगपत्ता लागायचा नाही. दिसायला पांढराशुभ्र रंग, म्हणून डोसे. आम्ही ते डोसे ढोसायचो. बाकी तांदळामध्ये उडदाची डाळ घालतात की मूगाची, हे ज्ञान पाजळवत बसण्यात कोणाला वेळ नसायचा. तेवढच जरा नावात इंडियन म्हणून आम्ही बापडे उठ-सुठ पळायचो. दिसायला तरी इंडियन पदार्थांची रेलचेल होती. म्हणून तेवढ नेत्रसुख त्यामुळे माझेही आवडते हॉटेल (?) म्हणायला हरकत नाही.
' आईचा नेहमीचा उपदेश.... कुठेही हात हलवत (रिकाम्या हाती) जाऊ नये , म्हणुन सोबत ऑर्किडची पांढरीशुभ्र फुलं घेऊन मी हॉटेल मध्ये एन्ट्री केली. पण आज माझा अंदाज मात्र सपशेल चुकला होता. मला आयरा एकटीच अपेक्षित होती, पण तीच्या बरोबर माझी जाई,जुई,चाफा म्हणजेच माझं क्रश जाई होती. माझ्या वाढलेल्या दाढी वरून हात फिरवत मी स्वतःच्याच डोक्यात एक टपली मारली. काय वेंधळेट आहे मी ! ना परफ्यूम, ना प्रॉपर शेवींग, आलो तसाच उठून . काश ! जाई येणार आहे, हे मला आधीच माहित झालं असतं तर ? शिटटट , स्वतःला कोसत, बळेच स्माईल देत मी टेबलाजवळ पोहोचलो. पण मी दिलेल्या स्माईल ला कोणाची काहीच रिॲक्शन आली नाही. खरंच काही तरी गंभीर प्रकरण आहे तर ! मी स्वतःच्याच विचारात....
फुलांचा गुच्छ टेबलवर ठेवून मी बसणार तेवढ्यात जाई च्या हुंदक्यांची सुरुवात झाली. काय झालं ते कळेना ! ती एकसारखी फुलांचा गुच्छ बघून रडत होती. आणि आयरा तिचं सांत्वन करत होती, " जाई कुल डाऊन, काम डाऊन " वगैरे वगैरे वगैरे.... काय झालं विचारुन मी ही formality केली. पण काही समजेना... ही फुलं तर जाईला आवडतात, तीला आवडतात म्हणून मलाही आवडला लागली आहेत. मग ही फुलांकडे बघुन का बर रडत असावी ? माझे मलाच प्रश्न चालू होते. बिच्चारी फुलं, मला त्यांची दया येत होती. ही आपली गळा काढून-काढून एका सुरात रडत होती. एका क्षणासाठी तर मला असं वाटायला लागलं होतं की, जणू काय मी शोकसभेला आलो आहे.
दोन वर्षांपूर्वी भारतात असतानाचा एक प्रसंग मला आठवला. एक दुरचे मामा वारले होते. मी आई बरोबर मामींना भेटायला गेलो होतो. आईचाच आग्रह. तेव्हा मामी मामांच्या फोटोकडे बघुन जसं रडत होती, तसं आता जाई या फुलांकडे बघुन रडतं होती'. काय बोलावं सुचेना. बाकी आजूबाजूने दरवळणारे खमंग वास स्वस्थ बसू देत नव्हते. ही रडारड संपल्यावर काय काय ओर्डर करावी हाही विचार मनात येऊन गेला. तरीही जाई बद्दल माझ्या मनात आधी पासून सॉफ्टकॉर्नर होताच. नक्की काय झालं असावं हे जाणून घेण देखील तेवढेच गरजेचे होत. शेवटी कसनुसं जाईच्या जवळ सरकत (तेवढीच जवळीक) मी प्रश्न केला. काय झालं जाई ? मी काही मदत करु का?
पण व्यर्थ ची माझी बडबड. काही उत्तर नाही.
मी आयराकडे बघत नजरेनेच प्रश्न केला. ती देखील काही बोलायला तयार नाही.
" फुलं आवडली नाही ना तुला ? वेटरला सांगतो घेऊन जायला ! " म्हणत मी वेटरला हात केला. आता मात्र माझा पारा चढला होता, आणि हे माझ्या चेहऱ्यावरील हावभाव स्पष्ट दाखवत होते. वेटर आमच्या दिशेने येत होता.
ईतक्यात जाईने, " नाही सिद्ध्या, राहुदे ती फुलं, मला आवडतात . " म्हणत ती फुलं उचलुन स्वतःजवळ ठेवली. आणि कसेबसे स्वत:ला सावरुन तीने डोळे पुसले.
' मी परत प्रश्नार्थक नजरेने एकदा जाई, एकदा आयरा दोघींकडे पाहु लागलो. '
आता काही खाण्याचा मूड तर अजीबात नाही . " अरे मला काहीच सांगायचे नाही तर बोलावल का ? " म्हणत मी उठणार एवढ्यात ऑर्डर आली. आयराने मला खुनेनेच बसायला सांगतले . आणि जाईने घडला प्रकार सांगायला सुरुवात केली.
*****
रात्री बेडवर पडून मी विचार करत होतो . ' जाई आणि मी कॉलेज फ्रेंड. ३ वर्षा पुर्वी जॉबसाठी कॅनडाला आलो . खुपदा भेटत असतो आणि इन्डियन म्हणुन आपुलकीही आहे . माझं मात्र तीच्यावर एकतर्फी प्रेम आहे . गम्मत अशी की, तीला हे कधी समजल नाही . आणि मी केव्हा सांगण्याचा प्रयत्नही केला नाही. मी फक्त वाट बघत राहीलो , for right  time आणि आता इकडे माझी वाट लागायची वेळ आली आहे .  तीने सकाळी हॉटेल मध्ये असताना जे काही सांगीतले त्याने माझी झोपच उडाली . मागच्या एका वर्षांपासून ती कोणाच्या तरी प्रेमात आहे . ते पण कॅनडीयन ऑनलाईन डेटिंग साईडवर....तीच्या मते हे अगदी सिरियस मॅटर. हिने तर अगदी लग्नाची स्वप्न बघीतली होती.... मेसेजेस, चॅट वगैरे सगळेच ऑनलाईन... प्रत्यक्षात कधी भेट नाही. पण हे मॅटर एवढ पुढे गेल की, आता तीला त्या मुलाची सवय झाली आहे.... तो मुलगा ही सिरिअस होता म्हणे.... तो जर्मनीला असतो म्हणुन भेटायचा योग आला नाही. पण दोघांनी आधीच आपापल्या प्रेमाची कबुली दिली होती. 

पण खरा सीन तर वेगळाच झाला. आता जेव्हा जाईने एक स्टेप पुढे घेत भेटण्याची गळ घातली तर तो तीचा ऑनलाईन बिएफ वेळ नसल्याचे कारण देत तो चक्क तीला ईग्नोर करायला लागला. मेसेज , कॉलला रिप्लाय करत नाही . म्हणुन ही बाई रडुन-रडुन लाल झाली होती . वरती म्हणते , रडुन मन हलक झाल म्हणुन . मॅटर एवढ पुढे गेल , तेव्हा कुठे मॅडमना आमची आठवण झाली . माझ्या तर स्वप्नात सुद्धा तीच्याबद्दल असा काहीही विचार केव्हा आला नाही . किती साधी भोळी ती....अगदी नावाप्रमाने होती. तीच्याबद्दल वाईट वाटाव, की स्वतःबद्दल हेच मला कळेना . एक मात्र खर की , माझ्या आजच्या हॅपी संन्डेची तीने अगदी पद्धतशीरपणे वाट लावली होती . तरीही डोक्यातील विचार स्वस्थ बसु देईनात आणि जाईला अश्या अवस्थेमध्ये पहावत न्हवत. 

शेवटी न रहावुन मी तीचा नंबर डाईल केला .

" हॅलो !  how are you जाई ? "

" i'm ok सिद्धु ... सध्यातरी ठीक आहे."

" take care " 

" नाही रे सिद्धु , माझच चुकल ना ? मी अस कोणत्याही ऑनलाईन साईडवर कोणावर विश्वास ठेवायला नको होता. माझ्या चुकीमुळे मी फसले."  तीचा आवाज अगदी कापरा झाला होता .

" जाई ऐक ना ! नाव किवा त्याचा पत्ता असेल तर मला शेअर करु शकतेस का ? मी कॉन्टाक्ट करतो आणि ...." 

माझ वाक्य पुर्ण व्हायच्या आतच तीने सुरुवात केली.

" सिद्धु तुला काय वाटत ? मी काही शोधण्याचा प्रयत्न केला नाही का ? आयरा आणि मी गेल्या काही दिवसात खुप शोधाशोध केली . त्याने दिलेली सगळी माहिती खोटी निघाली , तो काम करत असलेल्या कंपनीच नाव देखिल कुणी ऐकलेल नाहीय. त्याच्या स्वत:च्या नावा पलिकडे मला काहीही माहीत नाही. कदाचित तेही खोट असाव. पुढे काय शोधणार आपण ? पण.... पण तो खुप छान बोलायचा रे .... आमचे बरेचसे विचार जुळायचेही . माझ्या साधेपणाचा फायदा घेतला, त्यामुळेच त्याने मला सहज चीट केल. काल तर शेवटी त्याने मला ब्लॉक केल रे  !....आणि... आणि... "

जाईला पुढे बोलवेना . ईतका वेळ अडवून ठेवलेले तीचे अनावर हुंदके शेवटी बाहेर आले.

' २१ व शतक आहे . जग एवढ पुढे गेलय . पण हे लोक .... असे ऑनलाईन प्रेमात पडतात आणि लग्नाचे डिसिजन्स ही घेऊन मोकळे होतात. ते पण प्रत्यक्ष एकदाही न भेटता.... प्रगती म्हणावी , की अधोगती ?  इकडे साला आपण आत्तापर्यंत मुलींच्या मागे-पुढे करत राहीलो. ४ -५ वर्षात एकदाही सांगण्याची हिम्मत नाही, की माझ तुझ्यावर प्रेम आहे. आयला हे लोक पोहोचले चंद्रावर आणि आम्ही अजुन बंदरावर आहोत तर ! ऑनलाईन चॅट वगैरे आपण पण करतो.  पण यामध्ये सिरिअसनेस अजिबात नाही. नुसताच टाइमपास.... ' मी स्वतःच्याच विचारात मग्न होतो , आणि पलिकडून जाई राहुन-राहून सारखी रडत होती .

" जाई प्लिज शांत हो . मी काही मदत करु शकतो का ? तु लवकरात लवकर या सगळ्यातुन बाहेर निघ.  हव तर त्याला ब्लॉक कर . म्हणजे तुला याचा त्रास होणार नाही . जर तो मुलगा खरच तुझ्या बाबतीत सिरीअस असेल, तर तो स्वत:हुन तुला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल ."  

बास्स ! मी एवढच बोललो आणि कल्याण झालं . आता तिच्या मुसुमुसु रडण्याचा भोंगा झाला होता. "अ‍ॅ....ह्या ..... मॅडी ने काल रात्री मला ब्लॉक केल, सिद्धु .... आणि मी सुद्धा त्याला माझ खर नाव सांगीतले नाही आहे . मी सुद्धा खोट्याच नावाने चॅट करायची . but i am so serious about him... त्याला सगळ खर सांगायच होत म्हणुन भेटायला बोलावत होते . पण त्याने मला ब्कॉक केल रे !" (परत भोंगा चालू)  मला त्याच नाव ऐकुन ४४० चा करंट लागला.

" व्काय्य ! काय नाव म्हणालीस ? मॅडी ? पुढे काय ? "  मी जवळ-जवळ ओरडलोच.

" मॅडी बिच. पण इट्स ओके सिद्धु... मी यातुन बाहेर पडायच ठरवलय... तू नको टेन्शन घेऊ .... माझा निर्णय झाला आहे. "

मॅडी बिच नाव ऐकुन मला एक क्षण वाटल, माझ्या मेंदूचा भुगा होतो का काय. ती पुढे काय बोलली ते मी ऐकलच नाही.... मी पुन्हा तीला प्रश्न केला.

" आणि तु मघाशी म्हणालीस की, तु सुद्ध्या त्याला फेक नावाने डेट करत होतीस, आय मीन चॅट करत होतीस (मी माझ सेंटेंस करेक्ट केल). ते नाव कोणत ?
" मी पॉला नावाने.पॉला फर्टीन.  बट दॉट्स इनफ....नो मोअर डिस्कशन प्लिज....मी माझा डिसीजन घेतला आहे बघ....."

' पुढे ती काय बोलते ते मी ऐकलच नाही.  माझ्या हातातून फोन गळून पडला....उभ्या-उभाच सरळ खाली कोसळलो . भोगा आता आपल्या कर्माची फळे ! '

*****
' माझ ब्लडप्रेशर वाढत चालल होत, आणि डोक्याला मुंग्या यायला लागल्या. गेले काही दिवस डोक्यात चक्राप्रमाने विचार चालू होते.'
का मित्राची गाडी घेऊन मी १२० च्या स्पीडने Spice of India कडे निघालो होतो. आठवडा झाला कामात लक्ष लागेना. आज काहीही करुन जाईशी बोलायच होत, एवढ्यात तिचा फोन आला. आणि मी थेट निघालो.
तिला सगळ काही खर सांगणार होतो. की मीच तो मॅडी बीच या नावाचा कॅनडीयन वेबसाईटवरचा फेक आयडी.... आणि मीच तिच्याशी त्या डेटिंग वेबसाईटवरती चॅट करत होतो. आयरा आणि तिला भेटलो त्याच्या आदल्या दिवशी जाईने म्हणजेच पॉलाने मला भेटण्यासाठी बोलावल होत. ती जास्तच हट्ट करत होती. खरतर मला पण तिच्याशी चॅट करायची सवय लागली होती. पण अश्या कॅनडियन, क्युबेक मधील कोणा मुलीशी प्रत्यक्ष भेटून रिलेशनशिप वाढवावी अशी माझी अजीबात इच्छा न्हवती. मी एक फेक आयडी आहे, हे कळल्यावर ती कशी रिएक्ट होईल हा तर एक मुद्दा होता. डोक्याला जास्त ताप नको म्हणुन मी (तिच्यामते मॅडीने) तिला ब्लॉक केल. आणि ती ( माझ्यामते पॉला) हे ऑनलाईन चाललेल चॅट वेगरे एवढ मनावर घेईल याचा मी एकदाही विचार केला नाही. माझा मुर्खपणा आणि निष्काळजीपणा याचा एवढा मोठा फटका बसला होता. त्या दिवशी पासुन ऑनलाईन गोष्टीचा तर मी धसकाच घेतला.
बास ! आज काहीही होवो. तिला सगळं खर सांगणार आहे. शिवाय गेली काही वर्षे माझ तिच्यावर एक तर्फी प्रेम आहे हे सुद्धा सांगणार. त्यावर तिची जी काही प्रतिक्रिया असेल ती ऐकण्याची तयारी होती.
सगळ मनाशी अगदी पक्क ठरवून मी हॉटेल मध्ये एन्ट्री केली. आणि नेहमी प्रमानेच या वेळेस देखिल माझा अंदाज चुकला होता. ' काय चाललय काय च्या मारी ? ही आयरा इथे कशी काय. आणि जाई बरोबर बसलेले हे अनोळखी महाशय कोण बर ? '
" अरे सिद्ध ! ये... तुझीच वाट बघत होतो आम्ही. " आयराने अगदी हसत माझे स्वागत केले.
मी अजुनच बुचकाळ्यात पडलो. त्या दिवशी ढसाढसा रडणारी जाई आज चक्क हसते, आणि आयरा पण हॉपी मुड मध्ये आहे. मी स्वप्नात तर नाही ना ? या मुलींचा काही नेम नाही हेच खर.
" नक्की प्रकार काय आहे ? " मी सरळसरळ प्रश्न केला.
" तुझ्यासाठी एक गुडन्युज आहे. बर आणि... " हलकेसे स्मित करत जाईने माझ्या कानात हळूच कुजबुज केली.
" आधी काय गुडन्युज ते सांग." म्हणत उसन हसु चेहर्‍यावर दाखवत मी बळेच ओढून-ताणून स्माईल दिली. खरतर मी सरप्राईज द्यायला इथे आलो होतो आणि आत्ता सरप्राईज होण्याची वेळ माझी होती.
" meet my fiancee किवी. डॅड नी माझ्यासाठी पसंत केलेला मुलगा. घरी सुद्ध्या सगळ्यांना आवडलाय. मुख्य म्हणजे आमचे विचारही जुळतात. आम्ही लग्न करतोय. नेक्ट विक मध्ये एन्गेजमेन्ट आहे. तुला यायच आहे ह. " जाईने एका दमात सगळ काही सांगून टाकल होत.
' मी फक्त आवासुन बघत राहीलो. त्या किवीच तोंड बघुन त्याची कीव येईल एवढा कडवट चेहरा.... कडवट कसला ? आंबट, तुरट, खारट (अस मला एकट्यालाच वाटत असाव बहुतेक Lol ). आणि माझी जाई, अगदी फुला सारखी. जणू नाजुक परी. पण या सगळ्यात माझा झालेला पोपट पाहून मला माझीच कीव आली. किवीचा हेवा आणि माझी कीव करत मी congratulations म्हणत तिथून अक्षरशा पळ काढला. नेहमीच्या सवयी प्रमाने निघताना एक तिरका कटाक्ष जाईवर टाकला.... तिच्या चेहर्‍यावर दिखाऊपणाच हसू अगदी स्पष्ट जाणवत होत. तेच ते घारे डोळे वरती करुन, बळेच गोरे-गोबरे गुलाबी गाल फुगवत, तीने बाS बाय करत मान डोलावली. माझ्या दिवा स्वप्नातली परी ती. लव्हेंडर कलरचा बटरफ्लाय टॉप आणि व्हाईट चुनिदार बारीक फुलांचा पायघोळ असा स्कर्ट...... अशी तिची छबी मी डोळ्यात साठवून घेतली. कदाचीत शेवटची ?'
०००००
जाईने डॅडच्या सांगण्यावरुन लग्नाला होकार दिला तर ! "
' माझ्या मॉम-डॅडने तर केव्हाच सांगून टाकल आहे. " तुला आवडेल त्या मुलीशी लग्न कर. पण या वर्षी तरी सुनबाई घरी घेऊन ये. " आणि इथे मी गेली काही वर्षे एक प्रपोज केव्हा करायच, आणि कस करायच याची प्रॅक्टीस करतोय. अब तो, वो भी नसीब मे नही. यार माझ्या बरोबरच अस का होत ? कदाचीत या आधी तीला हे सगळ सांगितल असत तर ? तीचा नकार एकवेळ मला पचवता आला असता. पण यामुळे तीने जर आमची मैत्री तोडली असती. तर मला ते पचवण अवघड गेल असत. याला घाबरुन कधी हिम्मत केली नाही, कारण नाती टीकवण्यावर भर देणारी आमची संस्कृती आहे. मला खरच आवडते ती... अगदी मनापासून. नाही विसरु शकत मी तिला.'
' जाई मला खुप आधी पासुन आवडते. saveur de l'inde ला आयरा ला भेटण्याच्या निमीत्ताने आम्ही तिघे खुप सार्‍या गप्पा-ठपा करायचो. त्या दोघी तासनतास बडबड करत बसायच्या. आणि मी आपला हेड फोन्स लावून गाणी ऐकत त्यांच्या गपा बघायचो. त्यांच्या हेअरस्टाईल वरुन , शॉपिंग वरुन आणि फॅशन अ‍ॅक्सेसरीज या सारख्या चर्चेमध्ये मला काही कळायच नाही.... खर तर जाईला बघण्यासाठी मी तिथे थांबलेला असे , ती बोलायची आणि मी ते ऐकतोय अस दाखवत तासनतास तिचे हावभाव, तिच हसन आणि रुसन, बोलण्याची पद्धत हे सार काही फक्त बघत बसायचो. त्या दोघीना वाटायच, मी मन देऊन ऐकतोय, पण ते फक्त वाटण्यापुरतच मर्यादीत होत. Lol '
' एकदा अश्याच त्यांच्या गप्पा रंगात आल्या होत्या, मी आपला हेडफोन्स कानात घालून मोबाईल ची गाणी ऐकत होतो. बोलता-बोलता आयराने मला टाळी दिली. मी सुद्ध्या ऐकतोय अस दाखवत तिला टाळी दिली. खरतर टॉपीक काय हे मला माहीत नव्हत.... वर मी ' वॉव अमेझिंग ! ' अशी टिपणी पण केली. त्यावर जाई एवढी चिडली की, तिची आवडती नागा चिकनची डिश तशीच टाकून तरातरा निघूनही गेली.
नंतर आयराकडून समजले की, जाई सांगत होती... ' ती एकदा क्युबेकच्या स्ट्रिटवरती पडली होती आणि तिचा ड्रेसही थोडा फाटला होता. तेव्हा पासुन ती त्या स्ट्रिटवरती जात नाही. तिला खुप वाईट वाटल.' आणि तू या टॉपीक वरती वॉव अमेझिंग म्हणालास, तर ती निघून जाणार नाहीतर काय करणार !
यावर आम्ही दोघे तेव्हा खुप हसलो होतो. अगदी पोट दुखेपर्यंत.
बर्‍याचदा " करी खुप हॉट आहे." अस काहीतरी ती बोलून जायची, आणि मी " सो स्विट ना. " अशी टिपणी करायचो. हेडफोन्सचा परिणाम दुसर काय ! पण हळूहळू तिला कल्पना येऊ लागली की, मी त्यांच्या टॉपीक मध्ये इंटरेस्टेड नसतो. '
खुप सार्‍या आठवणी होत्या. खुपसारे किस्से. तिला Eris चे फुल आवडते म्हणुन मला आवडायला लागले. तिला त्रास व्हायचा म्हणुन मी स्मोकिंग सोडून दिल. तिच आवडत रेस्टो म्हणुन आम्ही तिघे इथे भेटायचो.. खरतर मला हे हॉटेल केव्हाच आवडल नाही. या सार्‍या गोष्टी तिला केव्हा जाणवल्या नाहीत, आणि मी सांगण्याचा प्रयत्नही केला नाही.
सार काही संपल होत, मी खरच हरलोय का ? की अजुन काही आशा आहे ?
०००००
" प्याल दिवाना तोता हे,
मत्ताना तोता हे,
हल खुशिशे हल गमशे बेदाना तोता हे !
ला ssलालाss लाs, लाs ला sलाs, ललss लाला ssलालाss लाs."

ज कितीतरी दिवस मी नशेतच आहे. उतरली रे उतरली, की परत एक पेग...ना ऑफिस...ना मित्र... दिवसातले ८-१० तास तर मोबाईल बंद असायचा. हल्ली मी कोणाचा कॉल घेत नाही. सगळ्याना सांगून टाकल आहे की, मी सिडनीला ट्रिपला जातोय. वेळ मिळणार नाही, कॉल करु नका. आणि सिडनीची ट्रिप एक पेग, दोन पेग, करत इथेच चालू ठेवली होती. पॉला म्हणजे जाईचा कॉन्टॉक्ट परत अ‍ॅड केल. पण आत्ता तिने मला स्वत:हुन ब्लॉक केल होत. आत्तापर्यंत तर तिने लग्न सुद्धा केले असेल. डोक्यात हजार विचार येत होते. आणि आज जरा जास्त चढली होती. मधेच जाईचा राग येत होता. त्या किवीला सांगू का ? ' मला जाई आवडते म्हणुन , ' या विचारात मी त्याचा नंबर डाईल केला. हात थरथरत होते. पुढे
हिम्मत होईना. रिंग वाजली की नाही, माहीत नाही. मी लगेच कॉल कट केला. मी एवढी प्यायलो आहे हे त्याला समजले तर ? नको ! कॉल नको. मेसेज करतो. काहितरी टाईप करत होतो, पण डोक गरगरल्या सारख झाल आणि मी बसल्याजागी खुर्चीत आडवा.'
*****



ला उठा... तयारीला लागा, फॉर्मल शर्ट, विथ टाय अ‍ॅन्ड ब्लेझर.
आज ऑफिसला नाही गेलो तर टर्मिनेशन लेटर घरी येईल, सुट्टी संपली. मी रेडी झालो, एवढ्यात नजर मोबाईलवर पडली, ' किवीचे १२ मीस्डकॉल, ते पण मला ? का ? हा मला कॉल का करतोय ? रात्री काही गडबड झाली नाही ना ! डोक्याला थोडा ताण दिला तेव्हा आठवल, अरे आपण याला भेटायला बोलावल होत ! कालरात्री नशेत असताना कॉल केला करत होतो, मग नंतर मेसेज केला असावा . आज ०१ जानेवरी त्यांच्या एन्गेजमेंटची डेट म्हणुन कदाचित कॉल करत असेल. शिट्ट ! काहीही झाल तरी मला जायच नाहीये. ' काय करु ? या विचारात मी होतो, आणि परत एकदा रिंग वाजली . शेवटी मी फोन उचलून कानाला लावला. बघुया तरी काय म्हणतो ते !
" hello... "
" hello siddh , i need your help. you know what, our engagement is canceled."
" What ? but why ? "
" I don't know.... i really don't know. even i don't know what to do now & how to convince her.... please help me. "
दोन मिनिटांसाठी तर मी सुन्न झालो....काय बोलावं कळेना, तसाच कॉल कट करुन मी जाईचा नंबर डाईल केला.
" गुड मॉर्निंग सिद्धु. ट्रिपवरुन केव्हा आलास ? "
" गुड मॉर्निंग ? जाई, are you ok ? आज तुझी एन्गेजमेंट होती, ती तू कॅन्सल केली. का ? आणि मला कळवलही नाहीस."
आता ऑनलाईन नविन कोण सापडल की काय ? की डॅडनी दुसरा एखादा मुलगा पसंत केला ? मी पुन्हा प्रश्नार्थक.
" अरे हो ! तुला सांगणारच होते. बट यु आर बिझी. फोन स्विच ऑफ होता. यु नो...? मॅडीने मला परत अ‍ॅड केल आहे. तू म्हणलास ते खरं झालं. मी त्याला ईग्नोर केल ते त्याला अपेक्षित नसावं. त्याला ब्लॉक केल होत, आणि काल सहज परत चॅट बॉक्स ओपन केला तर पाहिल की, त्याने मला पुन्हा अ‍ॅड केलय, चक्क मेसेज ही पाठवला आहे. ' i want to meet you, whenever you see my message please reply ' म्हणुन. i'm so happy सिद्धु. तो जसा असेल...जसा दिसेल... fake or real...i have to meet him at least once."
" ओके... ओके.... बट किवीच काय ? "
" त्याला मी याची आधीच कल्पना दिली होती. ' जर लग्नाच्या आधी मॅडी तुझ्या आयुष्यात परत आला तर मी तुमच्यामधे येणार नाही. हे किवीने मला दिलेल प्रॉमीस आहे. ' आणि या एका प्रॉमीसमुळे मी त्याला माझा होकार कळवला होता. मी माझी एन्गेजमेंट फक्त पुढे ढकलली आहे, कॅन्सल केलेली नाही. आज मी काय तो फायनल डिसीजन घेणार आहे. let see. and thanks. "
" एक... एक मिनीट जाई.... कॅन आय कॉल यु लेटर.... एक महत्वाचा कॉल आहे. "
" ओके, बाs बाय. अरे मला ऑल द बेस्ट वीश तरी कर ना !
" ऑल द बेस्ट ! " म्हणत मी पुन्हा कॉल कट केला.
दुसर्‍याच क्षणी माझा मेसेज बोक्स ओपन... पाहतो तर काय मी (म्हणजे मॅडीने) खरच तिला मेसेज केला होता. ' i want to meet you, whenever you see my message please reply ' म्हणुन... पण केव्हा ? आणि या चुकून केलेल्या मेसेज मुळे तिने स्वतःची एन्गेजमेनंट पुढे ढकलली. ' खुदा मेहरबान तो गधा पहलवान, ' अशी माझी अवस्था झाली होती.
म्हणजे काल मला थोडी जास्त चढली होती. आणि मी चक्कर येऊन खाली पडलो, तेव्हा किवीला पाठवत असलेला मेसेज चुकून त्या डेटींग साईटवर जाईला गेला होता. काल जरा जास्तच झाली होती. नंतर मला शुद्ध राहीली नाही. उठलो ते डायरेक्ट आत्ता... सकाळी.
जो भी होता है अच्छे केलिये होता है. लेट्स गो... ऑफिसच काय करायच ते नंतर बघू, म्हणत मी उठलो... जाईला भेटण्याचे ठिकाण मेसेज केल.
परफ्यूम, प्रॉपर शेवींग, ब्रॅन्डेड वॉच यापैकी आज कशाचीही गरज नव्हती. गरज होती ती, आत्मविश्वास आणि प्रबळ इच्छाशक्ती याची. होईल ते अ‍ॅक्सेप्ट करण्याची तयारी ठेऊन मी Battlefields Park चा रस्ता धरला.
००००००
" हाय ! "
" सिद्धु, तू आणि इथे ! कसा काय ? जाई फार आश्चर्याने बघत म्हणाली.
" इथे कोणालातरी भेटायचं ठरल होतं, म्हणून आलोय. बाय द वे, तू सुद्धा इथे ? " मी खुर्चीवर बसत विचारले.
" मी सुद्धा भेटायलाच आले, ते जाऊ दे, तुझ आधी सांग. न्यू इयरच्या सकाळी-सकाळी कोण येणार आहे , ते पण तुला भेटायला. समथिंग स्पेशल ?
" या... एव्हरिथिंग ईज स्पेशल." माझी नजर अगदी तिच्यावर रोखलेलीच होती. फ्लोरल व्हाईट, लेअर-लेअरचा नी-लेन्थ फ्रॉक आणि लाईट मेकअप ... कसली दिसते यार ही.
" वॉव एव्हरिथिंग ईज स्पेशल...हाऊ क्युट, बायद वे पहिल्यांदा तुला फॉरमलमध्ये बघते... लुकींग हॅंन्डसम ह ! "
" ओ रिअली ? थॅंक्स. सोड, तुझ्याकडे थोडा वेळ असेल तर एक सजेशन पाहीजे होत." मी हातातला Eris च्या फुलांचा गुच्छ तिच्या हातात देत म्हणालो.
गुच्छ हातात घेऊन ती माझ्याकडे पहायला लागली. तिच्या चेहर्‍यावरचे आश्चर्य अगदी स्पष्ट दिसत होते.
" सिद्ध्यु, तू अस का बोलतोयस आज ? काही प्रॉब्लेम झालाय का ? हेल्प पाहीजे का ? बोल ना ! "
" एक मुलगी आहे . मी तिला ओळखतो , ती सुद्धा मला चांगलंच ओळखते. आम्ही चांगले मीत्र आहोत अस समज. आम्हा दोघांच्या आवडी-निवडी, विचात, थोडेसे ड्रेसिंग सेन्स, खाण्या-पिण्याच्या गोष्टी वैगेरे अगदी बर्‍याच गोष्टी मिळत्या-जुळत्या आहेत. खुप आधीपासून मला आवडते ती... आज तिला प्रपोज करायच ठरवलंय .....काय होईल ? ती मला होकार देईल ? " मी अगदी श्वास रोखुन तिचाकडे बघत होतो.
" का नाही हो म्हणणार ? तू वेल सेटल आहेस, हॅंन्डसम आहेस, चांगली पर्सनॅलिटी आहे . महत्वाच म्हणजे तू अ‍ॅॅॅॅज अ पर्सन खुप चांगला आहेस.... आणि तुझ प्रेमं, ते तुझ्या डोळ्यात स्पष्ट दिसतंय. या आधी मी तुला एवढा सिरिअस केव्हाच पाहिला नाहिये सिद्ध्यु. ती मुलगी नक्की हो म्हणेल बघ." ती एका क्षणात सार काही बोलुन गेली.
" नक्की ?" मी मोबाईल वर मेसेज सेन्ट करत पुन्हा प्रश्न केला.
" हो रे ! का नाही...एका परफेक्ट लाईफ पार्टनर म्हणुन मुलींना अजुन काय हवं असत. चला निदान तुझ मिशन लव्ह इन क्युबेक तरी सक्सेसफुल होणार...ऑल द बेस्ट. "
दोन मिनिटात तिच्या मोबाइलवर मेसेज अलर्ट वाजला होता. तिच्या मॅडीने म्हणजेच मी पाठवलेला मेसेज तिला मीळाला होता.
' लेट्स फॉल इन लव्ह अगेन, बट इन रियल ...
तुझाच मॅडी / सिद्धान्त / सिद्ध्यु. '
एक क्षणभर ती शांत झाली. आणि माझ्याकडे एकटक बघत राहिली.
" कान्ट बिलीव्ह सिद्ध्यु ! म्हणजे तू... तुच मॅडी आहेस तर ? माझा विश्वासच बसत नाहिये."
जाई विस्फारलेल्या डोळ्यांनी बघत होती. ती कन्फ्युज झाली होती.... काय बोलावते तिला सुचेना.
मी मोबाईल तिच्या समोर दाखवत म्हणालो, " हो मीच तो. मग तुझा होकार पक्का समजु ना ? "
" नाही... मला थोडा वेळ पाहीजे, मी काहिही ठरवलेल नाहिये. आणि तू चिटीन्ग केलीस ? "
" चिटीन्ग तू पण केलीस ना . तू पण फेक आयडी, मी पण फेक . आता रियल बनायला काही हरकत नाही." मी मात्र मिश्कीलपणे हसत तिला विचारल. ती अजुनही शॉक मध्येच होती.
" नाही सिद्ध्यु . मला थोडा वेळ पाहीजे. असा अचानक कोणताही निर्णय नाही घेऊ शकत मी. "
" कशासाठी वेळ ? फक्त विचार करायला ? यामध्ये विचार करण्यासारख खरच काही आहे का जाई ? तुच म्हणालीस ना मला, ' तू वेल सेटल आहेस , हॅंन्डसम आहेस , चांगली पर्सनॅलिटी आहे . महत्चाच म्हणजे तू अ‍ॅॅॅॅज अ पर्सन खुप चांगला आहेस.... आणि तुझ प्रेमं, ते तुझ्या डोळ्यात स्पष्ट दिसतंय. या आधी मी तुला एवढा सिरिअस केव्हाच पाहिला नाहिये. ती मुलगी नक्की हो म्हणेल बघ.' मग आता काय झालं ?
दातओढ खात जाईने तो फुलगुच्छ सरळ माझ्या अंगावर फेकुन मारला. " तू .... तू ना... एक नंबर चालू आहेस. माझ्याच शब्दांत मला पकडतोस."
" बरं, मग मी होकार समजु का ? तसही इथे तुला भेटायला मॅडी आता केव्हाच येणार नाही . आणि तो किवी तर तुझ्यासाठी ऑप्शनल होता. त्या डेटिंग अ‍ॅपवर परत कोणी फेक आयडी भेटण्याच्या आधी, आपण आपली रियल रिलेशनशीप कन्फर्म करुयात. काय ? मिशन लव्ह इन क्युबेक इज सक्सेसफुल. " मी भिवया उडवत तिला प्रश्न केला. ती बाकी मस्त लाले-लाल गाल फुगवुन, नजर चोरुन कधी माझ्याकडे, कधी उगाचच इकडे-तिकडे बघत होती.
" नाही. तुझा फोन दे इकडे .... पासवर्ड काढुन ! " एवढा वेळ शांत राहिलेल्या मॅमनी शेवटी ऑर्डर सोडली.
मी आज्ञाधारक मुलासारखा मोबाईल तिच्याकडे दिला.
टिक...टिक...टिक... सगळे डेटिंग अ‍ॅप क्षणात डिलीट केले होते तिने. तिरपा कटाक्ष टाकुन तिने मोबाईल माझ्याकडे सरकवला.
" सिद्ध्यु, तू परत ते अ‍ॅप डाउनलोड केलेसना तर बघचं." तिच्याकडून परत एक चेतावनी आली होती.
" हो , मी नाही करत डाउनलोड . आणि तुमच काय  मॅम ? आधी मॅडी, मग किवी आणि आता तू काय सिताफळ वगैरे शोधत बसु नको तिथे म्हणजे झाल." मी उगाचच तिला चिडवण्याच्या स्वरात म्हणालो.
" मला....मला नाही बोलायच तुझ्याशी. जा !" जाई थोडी रागवली होती.
" ऐक ना ! एक सजेशन पाहीजे होत.... त्या मुलीला प्रपोज करायच होत, पण ती माझ्याशी बोलत नाही....मग मेसेज करु का ? त्या डेटिंग अ‍ॅपवर. "
" नाही. ती मुलीने डेटिंग अ‍ॅप डीलीट केल आहे." हाताने मोबाईल नाचवत, जाई गालातल्या-गालात हसली.
मी सरळ उभा राहीलो. छोट्याशा लालसर डबीतील एक छोटीशी हिर्‍याची अंगठी जाईसमोर धरत, एक हलकीशी स्माईल दिली. " जाई, अगदी कॉलेज पासुन तू मला आवडतेस, माझ प्रेम आहे तुझ्यावर. will you marry me ? "
तिने क्षणाचाही विलंब न करता हात पुढे करत, नजरेनेच होकार दिला.
बाहेर मस्त भुरभुरणारा बर्फ, रस्त्याच्या दुतर्फा पसरलेली परपल अलीयुम्स ची जांभळी-गुलाबीसर फुले,
पांढ-याशुभ्र घरांच्या खिडकीतून डोकावणारे लव्हेंडर फुलांचे बॉक्सेस, सगळ्यांवर ऋतुराजाने शिंपडलेले शुभ्र हिमबिंदू. आणि यावर चार चांद लावलेली ती घराघरांवर आणि चोहीकडे सोडलेली सोनेरी-चंदेरी लाईटींग..... दृष्ट लागावी असे ते क्युबेकचे सौंदर्य.
कोणी Pouding Chômeur , तर कोणी Grands-Peres a L’erable याचा आस्वाद घेत होते.
घराबाहेर रस्त्यावर येऊन लोक एकमेकांना शुभेच्छा देत होते.
' happy new year ! happy new year ! ' Bw

समाप्त                      
तुम्हाला सगळ्यांना  happy new year !
या कथेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार. Happy

बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

राहिल्या त्या काही आठवणी (कोकण ) - २

(मागील भागात आपण वाचले की, मजल-दरमजल करत आपण घरापर्यंत पोहोचलोय. गावच्या वेशीपासुन ते घराच्या दारापर्यंतचा प्रवास  आपण वाचला. आणि त्याला भरभरुन प्रतिसादही दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार. या भागामध्ये आपण या सगळ्या आठवणींना असाच उजाळा देत सैर करुया कोकणातील माझ्या घराची. हाच प्रवास पुढे नेण्यापुर्वी मी या भागात  माझ्या कोकणातील टुमदार जुन्या घराच्या काही निवडक आठवणी मांडत आहे. खरतर कोकणातील  घराची वर्णन खुप ठिकाणी वाचायला मिळतात. पण तरीही माझ्या लेखमालीकेचा एक भाग म्हणून, मी इथे थोडक्यात घराचे वर्णन करत आहे. कारण पुढील भागातील पुष्कळशा आठवणी या घराच्याच आवती-भोवती फिरणार्‍या आहेत. )

कोकणातील घर म्हणजे एक टुमदार आयताकृती कलाकुसरीचा देखावाच. संपूर्ण घराच्या भिंती या मातीच्या किवा विटांच्या मापानी बनवलेल्या. त्यांना मस्त शेणामातीने सारवून गुळगुळीत केलेले असते. वरती कौलारु छत . वलई करुन पायाखालची जमीन देखील मस्त शेणामातीने सारवली जाते. सारवणे ही सुद्धा एक कलाच आहे . आता लादी-प्लास्टरच्या युगात सारवणे म्हणजे काय ? हे देखील खुप जाणना माहीत नसावे. मस्त रबरबीत शेणामध्ये थोडे पाणी घालुन दहीकाला प्रमाणे काला केला जातो. यातील थोडे-थोडे मिश्रण हातामध्ये घेऊन हातानेच जमीनीवर फिरवले जाते. खोलीच्या एका कोपर्यापासुन दुसर्या कोपऱ्यापर्यंत हेच शेणाचे मिश्रण हाताने फिरवत खाली-खाली आणले जाते. जमीनीमध्ये एखादा खाच-खड्डा पडला असेल, एखादी चिर पडली असेल, तर यावर मिश्रणाचा हात मायेने गोंजारला जातो,  तिची मरम्मत केली जाते . मग जमीन अगदी नव्यासारखी गुळगुळीत होते. आणि बैठक मारुन खाली बसणार्यालाही याचा आनंद मिळतो.
कधी झरझरत्या हातानी यावर राखुंडीची नक्षी , तर कधी नुसत्याचा थोड्या सागरलाट ओढुन ही जमीन सुशोभीत केली जाई.  उंबर्यावर याच रांगोळीने फुलवेलीची नक्षी काढली जाते . देवासमोर स्वस्तिक काढले जाते . या सगळ्यावर हळद-कुंकू वाहिल्या शिवाय या  सजावटीस पुर्णत्व  प्राप्त होत नाही. दार-खिडकीवर पान-फुलांच्या माळा गुंफल्या की  मग ते घर कोणत्याही सणा-समारंभासाठी सज्ज असे..... अगदी दिमाखात .  तो  शेणामातीचा दरवळ घरामध्ये एक विशिष्ट प्रकारची प्रसन्नता पसरवत असे.

कोकणात सर्वसाधारण घर आणि आजुबाजुचा परिसर याची रचना सारखीच असते.  सुरुवातीलाच एक बेडा लागतो. त्यानंतर दगड ,चिरे , विटा ,  यांच्या पासुन बनवलेल्या २-४ पायर्या . पायर्या चढुन वरती आल्यावर खळ लागत, तेही मस्त वलई करुन तयार केलेल.  वलई करणे म्हणजे जमीन करणे.  हे देखिल एक कौशल्ल्याचे काम. खळ्यातील, परसातील  आणि अगदी घरातील जमीनीची वलई केली जाते. या मध्ये त्या भागातील जमीन कुदळाने किवा खनतीने खणुन घेतली जाते.  खनलेली मोठीमोठी ढेकळे फोडुन सारखी करुन बारीक माती तयार होते.  यासाठी या ढेकळावर चोपण्याने जोराचा चोप दिला जातो.  ही बारीक झालेली माती काहीही चढउतार न ठेवता सरळ एकसमान अशी पसरवुन यावर पाण्याचा फवारा केला जातो. माती अगदी आतपर्यंत ओली होऊन मऊशार होई पर्यंत पाणी मारले जाते. अगदी यावर पाय ठेवला तर पायही आतमध्ये रुतेल एवढ्या प्रमानात पाणी मारुन या जमीनीवर हलकेच दाब दिला जातो.  ६-७ तासांमध्ये ही जमीन वाळली की मग परत २-३ वेळा यावर चोपन्याने दाब दिला जातो. यावेळी मात्र ही जमीन कुठेही उंचसखल राहणार नाही, याची काळजी घेतली जाते.  समांतर अशी जमीन तयार झाल्यावर यावर शेणामातीचे सारवण करुन दुसर्या दिवशी ही वलई केलेली जमीन वावरास योग्य अशी तयार होते. खळ्यातील वलई केलेल्या जमीनीवर भात वगैरे झोडले जाले,  अश्या वेळी या थोड्याशा ओलसर जमीनीत एखादा भातदाणा रुजुन वरती येई. आपली ईवलीशी पाने फडफडवत ताठ मानेने तो खळ्यामध्ये झोकात उभा ठाके. जणू येणार्या जाणाऱ्यांच्या स्वागतासाठीच त्याला नेमले असावे.
' डोंगर का पाणी' खेळण्यासाठी खळ प्रसिद्ध असे . खळ्याच्या कडेला अर्धगोलाकारपणे लावलेल्या दगडाला डोंगर आणि खळ्यामधील जमीनीला पाणी समजुन खळ्यामध्ये मस्त खेळ रंगायचा . आता कोणी असे खेळ खेळताना पाहील्याच अजीबात आठवत नाही.


दितील रंगीत गारगोटे ,फरश्यांचे वेगवेगळ्या रंगानचे तुकचे ईत्यादी पासुन बनवलेली तुळस घराच्या समोर पुर्वेकडील दिशेस उभी असे.  तिच्या समोर एखादे स्वस्तिक त्यावर थोडे हळदी-कुंकू, समोर एक दोन तगरीची फूले असत.  बाजुला एक तेवते निरांजन ही असे. तुळशीमध्ये एक-दोन अगरबत्ती रोवलेल्या असत. पुजेच्या वेळेस तुळशीला वाहीलेल्या दुर्वा ,  झेंडूची फुले तेथेच रुजुन तुळशी लगतच वृंदावनामध्ये दाटीवाटीने वरती पसरत.  घरासमोर खळ्याच्या दोन्ही बाजुला मस्त जासवंदि वाढत ... कर्दळीची बेटेच्या बेटे फुलून येत... अबोलीचे ताटवे बहरत.... सोनचाफा, निशिगंध , रातराणी ही फुलझाडे मात्र थोडी दुर कुंपणालगत लावलेली असत. त्याच्या वासाला जनावरे येत , म्हणुन अशी झाडे घरापासुन योग्य अंतर राखुनच लावली जात..

ग पुढे लागे, ते घरचे मुख्य प्रवेशद्वार ! घराचे दरवाजे... 'हो दरवाजा नाही.... दोन दरवाजे. ' , कारण तोही एकटा नसे.  एकमेकांच्या हातात-हात आणि गळ्यात-गळे घालुन मधोमध दोन दरवाजे अगदी दत्त म्हणून उभे असत.  कुंडी बाजुला सारली की हे दोन्ही दरवाजे कुरबुर करत एकमेकांन पासुन विलग होत. आजकाल एकटा-दुकटाच दरवाजा पहायला मिळतो....अगदी निराश आणि एकलकोंडा....त्यावर ही छोटस टाळ, जणु त्याची कुरबुर कुलूपबंद करण्यासाठी. पुर्वी मात्र ते दोघे सताड उघडे असत... एकमेकांच्या साथीने.

दारातुन प्रवेश झाला की आपण पडवी मध्ये पोहोचतो.  लाकडी गजाच्या मोठाल्या उभ्या-आडव्या बार्या असणारी पडवी. एका बाजुला दणकट लाकडाचा झुलता झोपाळा आणि  दुसर्या  बाजुला एक जुनाट लाकडाची पण पॉलिश केलेली आरामखुर्ची... बुजुर्गांच्या आठवणीची  निशाणी म्हणुन... त्यावर नायलॉनच्या ताठ धाग्यानी विनलेली झालर असे . उजव्या बाजुला अगदी कोपर्‍या सरशी एक भलामोठा लाकडी पेटारा दिमाखात बसवलेला असे.  घरातील जुन्यापुराण्या अवजड वस्तु , शेतीची हत्यारे-अवजारे अश्या सगळ्या प्रकारच्या अडगळीचा भार अत्यंत प्रेमाने यात सामावलेला असे. या सगळ्या लावाजम्यावरुन तुम्ही मनसुबे बांधू शकता की, या समोरच्या पडवीचा आकार किती मोठा असावा .

पुढे तीन बाजुनी भिंती आणि  समोरची बाजु उघडीच अशी ओटी पडवी ओटी लागे.  छोटीशी हवेशीर रुम म्हणजे ओटी. आमचा देवाराही ओटीवर असायचा. सोनं-नाणं सांभाळून ठेवण्याची जागाही माजघरातच असे. ' कोकणात घरोघरी गणपती येतात. तसेच शिमगोत्सावाच्या वेळी, देवाची पालखी किवा डोलारा ही घरी येतो. अश्या वेळी देवाला बसवण्यासाठी या ओटीची रचना केली, असे माझे अजोबा सांगायचे.'  हल्लीच्या  नविन घरानमध्ये ओटी असल्याचे जास्त पाहावयास मिळत नाही .

पुढे पडवी , त्या मागे ओटी आणि स्वयंपाकघराच्या मधोमध तयार होणार्या कोपर्‍यात माजघर असे. यालाच काही ठिकाणी  मजघर असेही म्हणतात.  ही अगदी ठेवणुकीची रुम.  पुजे पासुन ते  छोट्यामोठ्या  सण-सोहळ्यासाठी माजघर वापरले जाई.  आजीच्या चंची पासुन ते काकुच्या बटव्या पर्यंत चे सगळे सामान  इथे असे.  इथे मुख्यता: स्त्रियांचे राज्य. पुरुष मंडळीचा ओटी-पडवीमध्येच जास्त  वावर . इथे एखादी लाकडी  अलमारी...त्यामध्ये एखादा कृष्णधवल फोटो , बंद पडलेला एखादा जुनाट रेडीओ असे. याची गम्मत अशी की,  आजोबा  '' हात्तीच्या मारी बन्द कसा पडला ररर हा ? " असे म्हणत त्यावर दोन फटके मारत , हे धपाटे पडल्यावरती तो आपोआप चालु होत असे .
जेवनाचा-खाण्याचा कार्यक्रमही माजघरातच होत असे. यावरुन वेगवेगळ्या प्रसंगावरुन वेगवेगळी अशी माजघरातील गाणीही प्रसिद्ध होती.

 जेवनावरुन रचलेल गाण.

* सांगा  प्रभुला  सैयपाक झाला । विठुजी जेवायला चला ॥०॥
रांगोया काढुनया लावील्या समया । लावया उदबया सुगनधीया ।
चांदीचा हा मांडूनी पाट । कनकाचशोभतबघा ताट । 
पेला घेतिला पांचुचा कांठ ।
सर्व थाट घडवुनीं  सुन्दर केला ।  विठुजी जेवायला चला ॥१॥
शोभेपान केळी ची लिमबलवणी  । डाळीची नारळाची वाटल चटणी ।
कोशबीर पेरु केळीची फणी । रायतीं रुचिर झालंलीसाजणी । 
भरत वांडा दोडयाचे भोपळ्याचे।
आवडीने देवा केलेमी  तुजला  । वठुजी जेवायला चला ॥२॥


कोणाला मुलगा बघायला आला, म्हणजे स्थळ आल तर त्यावरुन रचलेल गाण.
* आलं गंगाला मागनं पावना घ्यावा पारकून
बसायला टाका  पिनढपाट . पसायाचे जातगोत 
याची जात धनगराची आमची गंगा बामनाची ॥०॥
याची आमची सोयरक हाई आमची गंगा याची हाई
जागा पाहूंजागाईत मळा पाहूं बागाईत
नवरां पाहूं रुपशाई तथं देऊं गंगाबाई ॥१॥


भाऊ बिजेला ओवाळनीच्या वेळेस चलेल गाण.
* भाऊबीज माझे सदनीं मनीं हर्ष झाला
दिन बंधु करुणा सिन्धू ओवाळीन त्याला ॥०॥
नवलपरचीं नव पक्वाने करीन स्वये आजी
श्रवणाचे शंकरपाळे,  किर्तन करंजी
हरी स्मरण केल कैसी जिलेबी ताजी
चरण सेवनाचे लाडू वळूनी वाढूंया याला ॥१॥

नवा कोरा कपडा-लत्ता, सनासुदीला घालायचे दाग-दागीनेही याच माजघरात ठेवलेले असत त्यावरुन रचलेल गाण. 

* धन संपतीला काय उणं , सख्या वो आपल्या वो घरी जाऊनी या
पिवळी  शेलारी यावी घेऊनी अवघ्या नगीं लव भरजरची
घडी  रुमालांत घालनी  आणावी चौकशी करोनी
एवढं वरचेवरी ऐकुनी पिवळी शलारी यावी घेऊनी  ॥०॥
श्रावण शुद्ध आला महना नागर पंचीम आली साजणा
मन पुजा  करीन गौरीची आवड मला पिवळ्या  शेलारीची
राधा नेसनी रुपसुनदर लोळे पतीच्या ग चरणावर  ॥१॥



कडे स्वयंपाकघराची तर्‍हा मात्र न्यारीच... अन्नपूर्णेचा भरभरुन मिळालेला वरदहस्त आणि घर मालकीनीचे ओतपोत भरलेले प्रेम याने स्वयंपाकघर  नेहमीच समृद्ध असे .  आग्नेयेला तांब्या-पितळेची भांडी, एखादे  मातीचे माठ , गरम पाण्याचा बंब असे सर्व ठेवलेले असे .  तर पुर्वेला चुल्हा मांडलेला असे . त्या शेजारी वैल ही असे .  चुल आणि वैल याच्या वरती मोकळी जागा राहते तिथे लोखंडाचा चिमटा , चावी माचिसचा बॉक्स , घासलेटची चिमणी  हे साहित्य नेहमीच पहायला मिळे . चुलीच्या बाजुला फाटयाचा छोटासा ढिगही सदैव रचुन ठेवला जाई .  एखादे काळे पडलेले तपेले ही पाणी भरुन बाराही महिने चुलीवरतीच ठेवलेले पहायला मिळे. दिवसभर केव्हाही पाणी लागले तर यातील पाणी काढुन, यामध्ये पुन्हा भर घातली जाई. भांडी ठेवण्यासाठी लाकडी मांडणी , स्वयंपाकास लागणारे साहीत्य ठेवण्यासाठी  लाकडी आयताकृती  पेटी  अशी या खोलीमध्ये दाटीवाटी एकंदरीत असे.  पुर्वी मिक्सर नसायचे तेव्हा पाटा-वरवंटा याचे राज्य ही याच खोलीत .... पाट्यावरील वाटपाच्या जेवनास कशाचीही तोड नाही. लसुन खोबर्याची चटणी , दाण्याचे कुट , शेंगदाण्याची चटणी , धाण्याची भरड ईत्यादीसाठी व्हायन, उखळ-मुसळ तसेच खलबत्ता वापरला जाई  तोही याच खोलीत असे.
(अधीक माहीतीसाठी पहा - https://siddhic.blogspot.com/2019/05/blog-post_2.html )  या सगळ्या वस्तु स्वयंपाकघरात पहावयास मिळत . याच स्वयंपाकाच्या खोलीत साठवणुकीच्या धाण्याच्या कणग्या, हारा, टोपल्या वरती कढीलिंबाचा पाला लावून किडमुंगी लागु नये म्हणुन बंद करुन ठेवलेल्या असत.

न्हाणीघर आणि शौचालय मात्र  शेवटी एका बाजूला कोपर्‍यात असते .
पण लहान मुलाना न्हाऊ घालण्यासाठी बाहेर परसात पोफळी किवा वेळूचे बांबू आणि नारळाच्या झावळ्या या पासून छोटेखानी न्हाणीघर बनवलेले पहावयाला मिळे. पातेलीमध्ये गरम-गरम पाणी घेऊन तांब्याने लहानग्यांना कडेवर घेऊन प्रेमाने न्हाऊ घातले जाई . याची एक गम्मत अशी की , माझ्या लहानपणी आजी आम्हा सक्ख्या-चुलत भावंडांना एकत्र न्हाऊ घालत असे. तेव्हा आम्ही एकत्र रांगेत अंघोळीला बसायचो, गरम पाण्यात थोडा कढीलिंबाचा पाला टाकुन एक-एक तांब्या प्रत्येकाच्या डोक्यावर ओतुन, लालेलाल लाईफबॉय साबणाची प्रसन्न अंघोळ असे . अगदी दिवाळीच्या पहिल्या अंघोळीप्रमाने वर भिजलेल्या चणाडाळ आणि सहानेवर उगाळलेल्या चंदनाचे एकत्रीत असे तयार केलेके मिश्रण अंगाला लावले जाई .... त्याचा मस्त सुहास पसरायचा.  " आजी तु ताईला थोडे अधीक चंदन लावले,  मला कमी , मला छान वास येत नाही  " असे म्हणत आम्ही थोडे जास्त डाळ-चंदनाचे मिश्रण अंगाला लावुन घेण्यासाठी भांडायचो.... रुसूनही बसायचो.  Mysore Sandal Gold Soap चा टॉप ब्रॅन्ड वापरला तरीही त्या आजीच्या हातच्या अभ्यंगस्नानाची सर यायची नाही.


काही ग्रामीण शब्द-
बेडा - अंगणाचे प्रवेशद्वार
माप - मातीच्या घरगुती विटा
पडवी- ओसरी
राखुंडी - राख
जनावर - साप
चोपने - धुणी बडवायच्याला धोका
फाटी - चुलीत जाळण्यासाठी घालायची लाकडं 
हारा-बांबूची मोठी टोपली
वलई  करणे - उठण्या-बसण्या योग्य नविन जमीन  तयार  करणे
कुदळा/खनती - जमीन खनतन्याचे साधन
बार्या - खिडक्या
डोलारा - मोठ्या आकाराची पालखी 
अलमारी - मोठे लकडी कपाट
वैल - चुलीच्या बाजूला असणारा गोलाकार वईल चार खुर असलेला त्यावर स्वयंपाकासाठी पातेले वगैरे ठेवले जाते.
घासलेट - रॉकेल

(डकवलेले फोटो फक्त रेफरन्ससाठी घेतलेले आहेत.) (क्रमश)

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय." पण ते शक्य न...