कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१

कातरवेळ


1633087768_057519300.jpg

 

 'तांबूस तपकिरी सुर्यकिरणे काचेच्या तावदानावरती पसरली होती. झिरपून गेलेल्या जलसरींचे थेंब त्यावर पाझरू लागले. त्याबरोबर आतल्या गडद निळ्या पडद्याची लवलवं सुरू झाली. एखादा चुकार कवडसा आत डोकावू पहात होता. त्याचा एक तिरकस कटाक्ष पडताच तो पडदा स्वतःच्या जागी निश्चल झाला आणि किरणांनी आपली दिशा बदलली. कोणीही आतमध्ये डोकावून पाहणे त्याला मान्य  नव्हते, ‌ अगदी वार्यानेही...

कारण त्याची तीती त्याच्या बाजूला उजव्या कुशीवर पडून शांत निवांत साखर झोपेत होती. हो त्याचीच 'ती' आणि तिचा 'तो'. कालच तर त्यांनी पळून जाऊन लग्न केले. परत तिच्याभोवती आपले तुटके दोन हात गुंफून तो ही निद्रेच्या अधीन झाला. ना कोणाची भीती, ना जगाची तमा.'

थोड्याच वेळात काहीतरी तुटण्या-फुटण्याचा मोठा आवाज झाला आणि त्या दोघांचीही झोप उडाली.
'धडामsss दाराचे कुलूप तोडून पोलिस इन्स्पेक्टर आत शिरले. अर्थातच त्यांचा लावाजमा सोबतीला होता. नाकाशी रुमाल बांधून कोनस्टेबलने दोन्ही बॉडीज ताब्यात घेतल्या.'

" गळफास लावून आत्महत्या केली आहे, आत्महत्या की खून झाले  म्हणायचं? हे लवकरचं समजेल."
वेटर आपापसात कुजबुज करत होते.
 
" बाजुच्या गावातल्या सावकाराचा पोरंगा आहे साहेब, आणि ही त्या कलावंतांनीची पोरगी. नुकतच लग्न झालेलं दिसतं होत, त्यात कातरवेळी आले, नाही म्हणणं बरं दिसत नाही, म्हणून मी त्यांना इथे राहू दिल, नाहीतर अशा लोकांना मी नाही ठेवून घेत." 
होटेलचे मालक गयावया करतं पोलिसांना माहिती देत होते.

                         ‘जास्त वेळ खर्च करण्याची गरज नाही, त्यामुळे ठरल्याप्रमाणे पोलिस त्या रुमची पहाणी करुन, काही जुजबी चोकशी करून तेथील निरुपद्रवी टाकाऊ सामान सोबत घेऊन निघून गेले,  निघताना एक पोलिस फोनवर बोलत होता, " हो साहेब. आत्महत्या केली त्यांनी. आत्महत्याच ती. तुम्ही अगदी निर्धास्त रहा. उद्या येईल रिपोर्ट,  तेवढ आमच्यावर कृपा दृष्टी ठेवा, म्हणजे झालं."

'तो' छद्मीपणाने हसला आणि त्याची 'ती' ही. " या साल्याने फक्त एका रात्री इथे राहण्याचे चांगले ५००० घेऊन लपायला परवानगी दिली, गद्दारी केली ती गोष्ट वेगळीच. आणि आता दाखवण्यापुरती गयावया करतोय."   तो पलंगावरून उठत म्हणाला.

" या जगात सगळेच स्वार्थी. तो पोलिसपण लाचट. मग कशाला उगाच हा शोधाशोधीचा खेळ? जगाला दाखवण्यापुरता? "  ती देखील उठून तयारीला लागली.

" असो, कुठून सुरुवात करायची म्हणतेस?"   उभ्या जागेवरून कपाटाखाली हात घालून त्याने एक अंगठी बाहेर काढली. त्याच्या वडिलांची,  पोलीस डेडबॉडी घेऊन गेले तेव्हा घरंगळत जाऊन खाली पडलेली.  एवढा मोठा पुरावा सोबत घेऊन जाण्याची त्यांना तरी काय गरज म्हणा.

" माझ्या माय पासून सुरुवात. म्हणजे एक पार्टी संपते. मंग तुझं खानदान उडवून लावू! "  ती अंगठी डस्टबिन मध्ये टाकत उद्गारली.

" तुझ्या म्हणण्याप्रमाणे."  तो ही तिच्यामागे  बंद दारातून आरपार बाहेर पडला.

*****

" काय रे! कष्ट्मर आहे का?" 

"सायेब, ते आपले नेहीचं जोडपं, बाजुच्या गावातल्या सावकाराचा पोरं हाय, आणि ती त्या कलावंतांनीची पोरगी. तेच हायत."
वेटर गुपचुप येऊन होटेल मालकांच्या कानात पुटपुटला.

" सदा काय वेडा झाला काय? ते दोघं काल गेले ना ढगात. माहित नाही का रे?
मालक दुसऱ्या वेटरला विचारु लागले.

" सायेब, हा चार दिस गावाला गेला होता, सकाळी माझ्या आधी हित हाजर झालाय, आणि आल्यापासून सारखं तेच बडबडतोय."  चावीचा गुच्छ घेऊन गडबडीत वरच्या रुमकडे वळत तो वेटर उद्गारला.

" तू का पळतो, काय झालं?" मालकही त्याच्या मागून निघाले.

" तो रुम नंबर ५ उघडत नाय सकाळ पासन." तो मागून मोठमोठ्याने बोलत होता.

" भावा ५ नंबर मध्येच ते दोघं हायत ना."  वेटर सदा ओरडून सांगत होता. पण मालक चावी घेऊन त्या रूमकडे एकटेच निघाले. चालताना हातात वाजलेला फोन त्यानी कानाशी लावला.
 
"दादा काय बोलता काय? सावकारासकट सगळ खानदान गळफास लावून गेलं. कोणीही शिल्लक नाही. त्याला पर्वा रात्री मदत केली होती, पोराला उडवायला, आता माझे पैसे कोण देणार? " बोलत बोलत दरवाजा उघडून ते रुम नंबर ५ मध्ये शिरले.

"आणि कलावंतीण बी गायब झाली हाय."  पलिकडून कोणीतरी माहिती देत होते, पण या बाजूने ऐकणारे कोणीही शिल्लक नव्हते. हॉटेल मालकाला कैद करुन रुम नंबर ५ चा दरवाजा कायमचा बंद झाला, पुन्हा कधीही न उघडण्यासाठी. दिवस मावळतीकडे झुकला होता. सरता-सरता न सरणारी वेळ म्हणजेच कातरवेळ सुरु झाली होती. ती वेळ, जी उगीच अधांतरी लटकावून ठेवते ती कातरवेळ सुरु झाली होती. संधीकालच्या सूर्यास्ताची पिंगट-केशरी किरणे खिडकीतून आत डोकावू पहात होती,  त्याने एक कोरडा कटाक्ष टाकला आणि किरणांनी आपली दिशा बदलली. कोणीही आतमध्ये डोकावून पाहणे त्याला मान्य नाही, ‌अगदी वार्यानेही.

-------------------------------

समाप्त.
©सर्व हक्क लेखिकेस्वाधिन
'' मनाचिये गुंती ''

[पूर्वप्रकाशित - स्पंदन दिवाळी अंक २०२१ ] 

मंगळवार, १७ ऑगस्ट, २०२१

आईपण आणि आई पण .






 " आई! माझे केस बांध ना ग."  तिने अस्ताव्यस्त पसरलेले आपले केस बेजुला करून, आपल्या डोळ्यावरचा चष्मा नीट करत विजूकडे पहिले.


"हो." सदा चा डब्बा भरून विजू त्याचा नाश्त्याची तयारी करू लागली.


"आई, भावे काकांना सांग ना, 'मला गार्डन मध्ये घेऊन जायला.' "
कपाटातली लाल बाहुली, थोडी तुटकी-मुटकी खेळणी आणि आपल्या मेकपचा छोटा किट  घेऊन, ती आता भातुकली खेळायला बसली होती.

विजू वरती न पाहताच "हो " म्हणाली .

"सदा ! तू नाश्ता करून घे, आठवणीने डबा देखील बॅग मध्ये भर रे . मी तिला भरवून घेते. "
पोह्यांच्या दोन प्लेट्स भरून विजूने त्यावर कोथिंबीर आणि ओल्या खोबऱ्याचा यथेच्छ शिडकारा केला. थोडीशी बारीक शेव आणि खारे शेंगदाणे  पसरून प्लेट्स घेऊन ती भातुकलीच्या खेळात सामील झाली.

" चला नाश्ता करा, नंतर खेळ हा दिवसभर."

"नाही आई. मला पोहे नकोत. दूध बिस्कीट पाहिजे. दूध बिस्कीट... "   ती नाक ओढत विजूशी हट्ट करू लागली होती.

"माऊ, रोज दूध-बिस्कीट नाही खायचं, पोहे खाऊन घे, मग ग्लासभर दूध घे."

"नाही. मी नाही, जा!  पाय आपटत ती जाऊन भिंतीला टेकून बसून राहिली."

" माऊ, डॉक्टरांनी काय सांगितल, ' रोज बोस्कीट चालणार नाही. नाहीतर तू मोठी कशी होणार? आणि परत आजारी पडलीस तर, ते पुन्हा तुला मोठ्ठ इंजक्शन देणार. "

"डॉक्टर, नको ना ग आई. मी खाते हे पोहे."

इंजक्शनच्या भीतीने ती पटकन येऊन बसली, आणि पोह्याने बकाने भरू लागली. आर्धी डिश पोहे तर अंगावरील कपड्यांवर सांडले होते. तिचा गुढग्यापर्यंत आलेला  गाऊन सरळ करून विजूने गोळ्यांची पाकीट उघडली. एव्हाना सदा तयार होऊन ऑफिसला जाण्यासाठी बाहेर आला होता.
"कशी आहे आई, तिच्या तब्येतीत काही सुधारणा होते का? "  विजूच्या कानात हळूच पुटपुटत त्यांना विचारले.

"जैसे थे !"  विजूही हळू आवाजात उत्तरली.

"जयवंत ला काय सांगू मग? ते लोक तुला पाहायला यायचं म्हणत आहेत."

" नको एवढ्यात. " विजूने नकारार्थी मान हलवली.

"ताई असं काय करतेस. आईसाठी तू अजून किती  वर्षे थांबणार आहेस. आता तुला तुझा विचार करायला हवा."

"तू लग्न कर. तुझी बायको आली ना घरी, की मग माझं पाहुया."  विजूने आपली थंड झालेली पोह्यांची डिश हातात घेतली. एक-एक घास तोंडात टाकत त्याबरोबरच  पाकिटातून काढलेली एक-एक गोळी ती आईला देऊ लागली.

" ताई मी आत्ता ग्रॅज्युएट झालोय. माझ्या लग्नाला खूप वेळ आहे ग अजून ,  बघ तू विचार कर. "

"आधी तू विचार कर रे, माझं लग्न झाल्यावर आईच काय. ती बिना आईची राहील का? आपण लहानपणी आईशिवाय एकही दिवस राहायचो नाही. आता तिचं लहानपण आहे, मग तिला अशी वाऱ्यावर सोडायची. पटत का ते तुला? "

विजूच्या या नेहमीच्याच उत्तरावर हिरमुसलेला सदा न सांगताच बाहेर पडून ऑफिसला निघून गेला. आईही आपल्या भातुकलीच्या राजा बरोबर तिच्या खेळात  रमून गेली. 

मग विजूच्या मनात विचार आला,
'खरचं,  डॉक्टरानी सांगितल्याप्रमाणे आईच्या डोक्याची सर्जरी केली तर ती बरी होईल का? त्याचे चान्सेस पण ५०-५० आहेत. आणि तसे झाले तरीही यातून तिला काय मिळणार?   त्या जुन्या आठवणी.... पुराच्या पाण्यात वाहून गेलेले बाबा आणि त्यामुळे डोक्याला मर लागून तिला येणारे वेडाचे असह्य झटके आणि त्यामुळे झालेला स्मृती संभ्रम, पैश्याच्या पायी मोडलेला माझं लग्न.
भारी भारी तर तिला आठवेल की,  ती दोन मुलांची आई आहे, म्हणजे एक मोठया जबाबदारीच ओझं...दुसरं काहीच नाही.
मग... मग कशाला हवं ते मोठ होणं. ती लहानच बरी आहे, त्यात तिचा भातुकलीचा राजा आहे. कसलीही चणचण नाही. की उद्याची चिंता नाही.  नुसतं दिवसभर खेळायचं. अगदी...  अगदी मनसोक्त.
उगाच म्हणतात ते, लहानपण देगा देवा.'  म्हणत उठून विजूने आईच्या अंघोळीची तयारी करायला घेतली.
"चला माऊ, अंघोळीला. "
आई देखील आज्ञाधारक मुलाप्रमाणे तिच्या मागून न्हाणीघराकडे निघाली.


समाप्त.

सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१

चारच दिवस का?



 ' शालीनी ताई हात धुवून किचन मधुन बाहेर आल्या. तृप्ती आणि रवी आपली तयारी करून निघणारच होते. त्यांना बघताच शालीनी ताईंचा पारा चढला.'

" रवी तिला चिकटून चालू नको‌. आणि हो तू मागच्या सिटवर बसतेस ना? की सगळं मेल सरमिसळ करून टाकता? "

" हो आई. मागेच बसते ती."  रवी लॅपटॉप उचलत म्हणाला.

" अग सुनबाई, हे काय? आज दुसरा दिवस ना तुला. केसांवरून पाणी घेतलं नाही. "
शालीनी ताईंच्या या वाक्यासरशी तृप्ती ही चा पारा चढला. आधीच उशीर झाला होता. एक क्लाईंन्टची अर्जंट मिटिंग होती आणि त्यामध्ये हे काय आता नवीन. त्यामुळे ती थोडी चिडली होती.

" आई, काल केसांवरून पाणी घेतलं ना. रोजरोज केस धुवावेत असं कुठे लिहिल आहे. आणि एवढ केसात काय अडकुन पडलं आहे? रोज ते ओले केस बांधून

ऑफिला जायचं का? "


" अगं, रोज केस धुतले की काही बाधिकार नसतो. आपण हे चार दिवस पाळतो ना. मग व्यवस्थित करावं. चारच तर दिवस असतात ना."  शालीनी ताईं तिला समजावत म्हणाल्या.

" हो आई, अहो पण चारच दिवस का? मला तर फक्त दोनच दिवसांची पाळी असते. तरीही चार दिवस पाळायचे?"

" अगं आधीपासून आपल्या घरी चालत आलेली परंपरा आहे. आम्ही सगळ्यांनी पाळणूक केली आहे. आमच्या सासूबाई तर खाष्ट होत्या. कुठे हात लावू द्यायच्या नाहीत. चार दिवस अगदी कडक."

" आई, वन्स ना तर सात दिवस त्रास होतो. मग त्या तर चौथ्या दिवसांनंतर अख्या घरभर फिरत असतात. मग पाळणूक नक्की कशासाठी?"   तृप्ती देखील आता संतापली होती. हे अर्धवट चाललेले पाळणूकीचे प्रकार तिला अजीबात मान्य नव्हते. तरीही एवढे दिवस शांत राहून तिने मुकाट्याने सगळे सहन केले. आता नाही, तिने रवीला थोडावेळ थांबायला सांगितले आणि आपला विषय अगदी समजेल अशा सोप्या भाषेत पण उदाहरण देऊन स्पष्ट केला.

" आई, मी तुमच्या भावना समजू शकते. पण तुम्ही देखील काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्या आहेत. मी एका कॉरपोरेट ऑफिसमध्ये प्रोजेक्ट हेड आहे. कालच एक सव्वा दोन कोटींचा प्रोजेक्ट जवळपास कोटी च्या बजेटमध्ये बसवून कंपनीला कितीतरी लाखांचा फायदा कमवुन दिला आहे. मग तिथे जर काही तोटा, काही अपशकून झाला नाही, तर इथे घरी आपण एवढी अंधश्रद्धा का पाळतो? फक्त पुर्वीपासून चालत आलेल्या परंपरा म्हणून, की खरंच काही तथ्य आहे यामध्ये, यांचा विचार करायला हवा. " 

शालीनी ताईंनी तोंडाला पदर लावला, सोफ्यावर रवीच्या शेजारी बसत बसत त्यांना भरुन आले.
" आम्ही बापड्या या पाळी वरुन खुप अवहेलना सहन केली. सासुबाईंचे खुप त्रास सहन केले. पण तोंडुन एक अक्षरही काढले नाही."

" आई, तू एक अक्षरही तोंडुन काढले नाहीस, म्हणून तर तुला विनाकारण त्रास सहन करावा लागला. पण म्हणून वस्तुस्थिती नाकारता येत नाही. आवाज उठवला तरी. विरोध केला तरच काही तरी नवीन बदल घडतील ना."
रवी त्यांची समजूत काढू लागला.

" आई वाईट वाटुन घेऊ नका. आपण स्त्री आहोत. आणि मासिक पाळी हे आपल्या स्त्रीत्वाचे मुळ. विनाकारण आपण विटाळ मानतो, पण त्याच चार दिवसांमूळे तर ही मानव सृष्टी आहे."
तृप्ती देखील त्यांच्या शेजारी उभी राहून समजूत काढू लागली.

" बरं बाई, तू नको पाळत जाऊस, हे चार दिवस. काही हरकत नाही माझी." शालीनी ताईं शांत होत म्हणाल्या.

" आई, खरंच?" तृप्तीला देखील आनंद झाला.

" हो. तुला मनाला वाटल तर पाळत जा. नाहीतर नको. मी सक्ती करणार नाही तुला. "

रवी आणि तृप्ती आनंदाने घरा बाहेर पडले. जाताना आईला म्हणाले, 'आई आपण या विषयावर एकत्र बसुन शांतपणे विचार करु, आणि मग एकमेकांना समजून घेऊन काय तो निर्णय घेऊ.'

शालीनी ताई देखील 'हो' म्हणाल्या.


समाप्त.

सोमवार, २७ जुलै, २०२०

कपाशीचा पाऊस




'काळ्या मेघाराजाने आभाळात दाटी-वाटी केली होती. वारा भिरभिर घिरट्या घालत होता. फक्त एका थेंबाच्या प्रतिक्षेत कुठेतरी एखादा चुकार चातकपक्षी आवासून आशेने नभाळाकडे टक लावून होता. शेवरीच्या झाडाची बोंड आता चांगलीच तयार झाली. त्यातून निघणार्या सफेद म्हातार्या गोल-गोल भिंगर्या घालत स्वच्छंद विहार करत होत्या. लहानपणी आम्ही त्यांनाच कपाशी समजायचो, आणि ही कपाशी म्हणजे कापसासारखी दिसणारी म्हातारी जेव्हा वार्याबरोबर उडायची, तेव्हा जो पहीला पाऊस यायचा त्याला म्हणायचो, 'कपाशीचा पाऊस'.

'कपाशीचा पाऊस'... विज चमकावी तसं काहीस मला झालं.  नको तो कपाशीचा पाऊस. नकोच त्या आठवणी.  कधी काळी चिंब कोसळलेल्या त्या पावसाने पार भिजवून टाकल या मनाला, एवढं की आता भिती वाटते याची. '

पाऊस यायच्या आधी शाळा गाठावी. मी लगबगीने आपली पर्स सावरत पाय उचलला.

" सुप्रभात बाई! "

 सुप्रभात मुलांनो! म्हणत मी रजिस्टर हातात घेणार, एवढ्यात शिपाईकाका वर्गात येऊन टपकले.

" बाई तुम्हाला स्टाफरुममध्ये बोलावलं आहे. कालचे ते गणेश मानेचे पालक, तुम्हाला भेटायचं म्हणत आहेत. "

" दामूकाका, गणेशचे पालक तर कालच त्याच्या मास्तरांना भेटून गेले ना! आता परत काय आहे? "   मी आश्चर्याने प्रश्न केला.

" बाई जरा येऊन बघता का. तुम्हालाच भेटायचं आहे असं म्हणतात ते. " म्हणत शिपाईकाका निघून गेले. आणि मी सुद्ध्या त्यांच्यामागून माझ्या केबिनकडे निघाले.  गणेशच्या आई आणि तो स्वत: दोघेही आधीच तिथे येऊन माझी वाट पाहत होते.

" हा बोला!  काय म्हणताय काकू."     मी प्रश्न केला.

त्याच्या आई अगदी शांत होत्या, कधी बाजूच्या भिंतीकडे, तर कधी समोरील टेबलाकडे टकमक बघत त्यानी गणेशकडे पाहीले. पण एक शब्द ही त्यांच्या तोंडातून बाहेर पडेना.

" काकू जे असेल ते बिनधास्त बोला. तिकडे माझा वर्ग चालु आहे. मला लवकर जाव लागेल. " मी पाण्याचा ग्लास त्यांच्यापुढे करत त्याना बोलत करण्याचा प्रयत्न केला. दोन… पाच मिनिट अशीच शांतता पसरली. मग मात्र मी गणेशला बाहेर थांबायला सांगून त्या काकुंशी बोलले .

विषय नाजूक होता.

' दुसर्या वर्गातल्या एका मुलीशी गणेशचे प्रेम सूत जुळले आहे, अशी चर्चा शाळेत चालू होती, त्या मुलीच्या पालकांनी मुख्याध्यापकांजवळ गणेश विरुद्ध तक्रार ही केली होती. त्यावेळी फार आरडाओरड आणि गोंधळ झाला होता. शाळेत या चर्चेस उधाण आले होते. प्रकरण जरा जास्तच चिघळले. या अशा प्रकारामुळे शाळेला नावं पडायला नको, म्हणून मुख्याध्यापकांनी सहमताने तडक गणेशचे नाव शाळेतून काढून टाकण्याच निर्णय घेतला होता.'

यामध्ये तालुक्यात ही एकच शाळा. आपल्या मुलाचे शालेय नुकसान होऊ नये, ही त्या मातेची कळकळ होती.

मी गणेशला आतमध्ये बोलावल. खरेखोटे मला त्याच्या तोंडून ऐकायचे होते. १४-१५ वर्षाचे ते पोर, पण तो जे काही बोलला, ते ऐकून मला एक झटका लागला. " म्हणे… खरच आवडते मला ती, तिच्यासाठी खुप कष्ट घेईन, मोठा ऑफिसर बनेन, पण आता मी अभ्यासात लक्ष देईन, कोणालाच त्रास वैगरे होईल अस यापुढे वागणार नाही."  त्याने प्रामाणिकपणे सारं काही कबूल केल. अगदी कोणतीही गोष्ट न लपवता. मी देखिल त्याला समजावलं. ' अद्याप तरी तू खुप लहान आहेस. पण समजुद्दार आहेस. सध्या या सगळ्या गोष्टींपेक्षा अभ्यास महत्वाचा आहे. शिकून खुप मोठा हो.  बाकी सगळ्या गोष्टी त्या त्या वयामध्ये आपोआप होत जातात. मी मुख्याध्यापकांनी बोलेन पण लक्षात ठेव यापुढे यासंदर्भात तुझी एकही तक्रार येता कामा नये. '

गणेश आणि त्याची आई निघून गेले. मी तडक आबांच्या कॅबिनमध्ये जाऊन त्यांना गणेशला एक संधी देण्यासंदर्भात विनंती केली. एका मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न होता. शिक्षण नाही तर त्याला आयुष्यात पुढे जाण्याची संधी मिळणार नाही.  जिल्ह्याच्या शाळेत घालून त्याला शिकवण्याएवढी त्या माऊलीची परिस्तिथी नव्हती.  मी प्राध्यापक म्हणजेच आबांशी, त्या मुलाच्या भवितव्यासाठी एक संधी मागितली, पण आबांनी साफ नकार देऊन या विषयी काहीही न बोलणे पसंत केले.  मी खजिल मनाने माझ्या वर्गाकडे जायला निघाले आणि तेवढ्यात कोणीतरी मला हाक मारली. आवाजाच्या दिशेने सहज लक्ष टाकले तर तिथे गौरी उभी होती.  माझी एक हुशार विध्यार्थीनी.

" गौरी तू .... काय गं? वर्गात गेली नाहीस का? "

" नाही बाई, मी जिल्ह्याच्या शाळेत शिकायला जाते. आजच दाखला देऊन आले. खर तर तुमचे आभार मानायचे होते, म्हणूनच इथे आले. "

" आभार कसले गं? "      मी अती आश्चर्याने प्रश्न केला.

" बाई गणेशला एक संधी दिल्याबद्दल आभार!  तो भेटला होता मला.  माझ्यामुळे त्याच नुकसान होऊ नये, म्हणुन मी स्वतःच बाहेरच्या शाळेत शिकायला जाते. त्याला इथे शिकूदेत. "    आजूबाजूचा कानोसा घेत तिने सगळे स्पष्ट केले होते. आता कुठे माझ्या लक्षात यायला लागले. 

" बाई आम्ही चुकीच काही केल नव्हत हो! कधीतरी येताजाता भेटायचो, पण शाळेतल्या मुलांनी एकाच दोन करुन काय मनाला वाट्टेल ते सगळीकडे पसरावलंय.  जेव्हा मिट्टीन्ग झाली, तेव्हा मला कोणीही काही बोलण्याची संधी दिली नाही. पण आता जेव्हा गणेशला एकट्यालाच दोशी ठरवून, शाळेतून  काढणार समजले, तेव्हा मी सारे काही घरी सांगून टाकले, आणि स्वतःच शाळाही बदलण्याचा निर्णय घेतला. यापुढे कोणाला त्रास होईल अस अजिबात  वागणार नाही. " बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला. परत एकदा आभार मानून ती जड पावलांनी निघूनही गेली.

खरतर आबांनी गणेशला शाळेत ठेवण्याची परवानगी तर दिली नाहीच. मला माझीच लाज वाटली, आणि तिच कौतुक. कारण आज तिच्यामध्ये असलेला प्रामाणकपणा काही वर्षांपूर्वी मी दाखवला असता तरतर असाच कोणतरी गणेश एकटाच दोशी ठरला नसता. पण तेव्हा ते साहस माझ्यामध्ये नव्हते.  मी एका लाचारासारखे परिस्थिती पुढे हात टेकले होते. पण नाही ... आता नाही. आज परत आबांना मी जिंकू देणार नाही.

मी तडक निघाले ते मॅनेजमेंट कमिटीकडे. पण नेहमी प्रमाणेच आबा समोरच उभे होते. मी काही बोलण्याच्या आधीच त्यांनी मान डोलावली.

" मनू! गणेशला उद्या वेळेवर यायला सांग. आणि हो!  या वर्षी देखिल तो वर्गात पहिला आला पाहिजे, ती जबाबदारी तुझी. "

 एवढं बोलून ते निघूनही गेले.

कदाचित माझं आणि गौरीच जे बोलन झालं ते त्यांनी ऐकल असाव. कदाचित परत एकदा त्यांना या गौरीची माझ्यासारखी मनू करायची नव्हती.

कदाचित तेव्हा अशीच एक संधी जर त्याला मिळाली असती तरतो... तो...

' विसर मनू.... एवढी वर्ष झाली, पण तो अजूनही मनात तसाच आहे. स्वतःला जगापासून बंधीस्त करुन ठेवल मी, कोणाला आयुष्यात सामील करुन घेतल नाही. पण त्याला नाही विसरले, विसरता आलच नाही. 

कुठे असेल तो? काय करत असेलमी, मी आठवत असेन का त्याला? कदाचित तो त्याच्या संसारात ही रमला असेल.'

मी माझ्याच विचारांत वहात चालले होते. जुन्या कटू आठवणी उगाळत मुक अश्रू ढाळीत होते. अचानक जोराने विज कडाडली आणि क्षणात सार्‍या विचारांची आहुती देऊन ती निघूनही गेली. मला नको असणारा कपाशीचा पाऊस परत एकदा सुरु झाला होता, माझ्या मनात... आत... खोलवर… आणि बाहेर ही…   

*************************************************

"मनू, ते नवीन चेअरमन भेटायला येणार आहेत. खरतर मीच आग्रह करून बोलावलं आहे त्यांना. तू ही येते का बाहेर? तेवढीच भेट होईल."   आबांनी अंगणातूनच ओरडून मला हाक दिली होती. 

 नवीन चेअरमन ते कशासाठी? मला काही समजेना.

"आबा, कोण नवीन चेअरमन? मला काहीच समजले नाही."     मी कपडे चेंज करून, ओले कपडे तिथेच एका दांडीवर वाळत टाकत तडक अंगणामध्ये आले.

"अगं, शाळेची जमीन एका जमीनदाराची होती. त्यांना पैश्याची अडचण होती म्हणून ती जागा त्यांनी विकली. मग शाळेच काय करायचं ? हा प्रश्न उभा राहीला.  बंदच करायची वेळ आली होती पण योगायोग बघ... एका सद्गृहस्थाने तीच जागा विकत घेतली आणि परत शाळेच्या नावे सुपूर्द केली. माझ्या आग्रहावरून ते भेटायला येत आहेत  इथे."  नेहमीप्रमाणे समोर पेपरमध्ये डोकं घालून आबा सकाळच्या बातम्या संध्याकाळी वाचत होते. 

"आबा एवढी मोठी गोष्ट तुम्ही याआधी मला केव्हाच सांगितली नाही. " 

" शाळेच्या काही गोष्टी खाजगीत ठेवाव्या लागतात. त्यात वयोमानानुसार मी ही आजकाल खूप काही विसरत चाललोय ग. तुझे आबा म्हातारे झाले आता. "

म्हणत आबा त्यांच्या जाडजूड चष्म्याच्या काड्या वरती करत हसले.

एवढ्यात ते नवीन चेअरमन येऊन बसले, तिथे अंगणातच असलेल्या  झोपाळ्यावर त्यांच्या आणि आबांच्या गप्पा-ठप्पा रंगल्या देखील. त्याआधीच मी "बरं बरं. चहा घेऊन येते." म्हणत आतमध्ये स्वयंपाकघराकडे वळले होते.

" मनू। चहा? "

आबांच्या आवाजासरशी मी चहाचा ट्रे घेऊन अंगणात आले. चहा ठेवून बसणारच एवढ्यात आबांनी आमची ओळख करून दिली,

"हे 'मिस्टर तांबे' नवीन चेअरमन आणि ही माझी मुलगी मनस्विनी. त्याच शाळेत शिक्षिका आहे. "

 'मी नमस्कार म्हणण्यासाठी हात जोडून वरती पाहिले, पण मला काही म्हणण्याची हिम्मत झालीच नाही. नुसतेच हात जोडून मी मिनिटभर आवासून बघतच राहिले.  हे  'मिस्टर तांबे'? एक जुनी ओळख होती. त्याची, एका पावसाची आणि माझी... पुढचे काही आठवण्याची हिम्मत माझ्यामध्ये आत्ता उरलीच नाही.  मान खाली घालून मी नुसती बसून राहिले. कारण त्याच्याही नजरेत ओळखीची झलक होती. जुनी ओळख. वर्षानुवर्षांची...

मला उशीर होतोय आणि आभाळ भरून आलंय त्यामुळे पाऊस येण्याचे चिन्ह ही दिसत आहे. निघतो मी. पुन्हा केव्हातरी भेटू. "   म्हणत ते उठलेही. एवढ्यात आत माजघरात असलेल्या जुन्या टेलिफोनची रिंग वाजत होती.

"एक महत्वाचा फोन येणार होता. तोच असेल बहुदा. मलाच जाऊन पाहावं लागेल." म्हणत आबा ही त्यांचा निरोप घेऊन आत वळले.

जाताना, "मनू पाहुण्यांना गेटपर्यंत सोडून ये. "  अशी आज्ञा करून गेले.

मी एकही शब्द न बोलता बाजूची एक छत्री घेऊन त्यांच्यासोबत गेटपर्यंत आले, गेटजवळ एक जुनी जिप्सी कार उभी होती. येतो म्हणत ते दरवाजा उघडणारच तेवढ्यात अचानक पावसाला सुरुवात झाली होती.

"पाऊस आहे, जा तुम्ही. मी निघतो."    म्हणत त्यांनी माझ्याकडे पाहिलं.

"होय. पहिला पाऊस आहे."    उगाचच काहीतरी बोलायचं म्हणून मी बोलून गेले.

"पहिला नाही. कपाशीचा पाऊस...बराबर ना?"    म्हणत त्यांनी परत माझ्याकडे पाहिलं आणि मी अगदी निःशब्ध झाले.

"राजन."   एवढा एकच शब्द माझ्या तोंडून निघाला. छत्री सावरत मी मागे वळणार तोच जोराची वीज चमकली, बेभान वार्याने माझी छत्री उलटी केली होती. तिला सावरण्याची धडपड करत मी जागीच खिळले.

"अजून विजेला घाबरतेस? "    म्हणत त्याने माझ्या हाताची छत्री स्वतःचा हातात घेत तिला सरळ केले. परत बंद करून माझ्या हातात देत पुढे म्हणाला,

"आज परत एकदा भिजवास वाटतंय, अगदी त्या दिवशी सारखं, ना विजेची भीती ना वार्याचे भय, उनाड लहान मुलाच मन घेऊन, सैरभैर धावत सुटावं... रानोमाळी. ते ही तुझ्यासोबतीने."

"का आलास परत?"   मी रागारागाने प्रश्न केला.

"यावंच लागलं.  माहित होत मला, कोणीतरी वाट पहाताय माझी आणि नाही नाही म्हंटल तरी त्या कपाशीच्या पावसाचीही. "

त्याच्या उत्तराने माझा राग कुठल्या कुठे पळाला होता. त्याचा हात हातात घेत मी भरल्या आभाळाकडे पाहिले.

'खरच भिजायचं. अगदी त्या दिवशी सारखं, लहान मुलं होऊन."

त्यानेही मानेने होकार भरला.आणि तसेच आम्ही निघालो... त्या कपाशीच्या पावसाचा आनंद घेत. ना विजेची भीती ना वार्याचे भय.

दोन पावलं चालताच तो मध्येच थांबला. मी मानेने काय झालं म्हणून विचारताच म्हणाला,

"मनू. आज परत तेव्हासारखं कुणी पाहिलं तर? काय म्हणतील लोक? "

मी ही दोन मिनिट स्तब्ध झाले, मग हसून त्याला म्हणाले,

"आता तुला कोणीही शाळेतून हाकलून देऊ शकत नाही. कारण आता  शाळाच मुळी तुझी आहे. आणि...आणि..."

"होय. तेव्हा शाळेतून काढलं नसत तर, तो राजू आता मिस्टर राजन तांबे झाला नसता. तुझ्या आबांचे आभारच मानायला पाहिजेत."  म्हणत तो ही हसला.

"होय. पण आबांनी तुला ओळखलं कस नाही?''  मी माझ्या मनातलं आश्चर्य व्यक्त केलं.

तो अजूनच मोठ्याने हसून म्हणाला,

"ओळखल्याशिवाय तो महत्वाचा फोन घ्यायला ते गेले का? त्यांनी केव्हाच ओळखलं मला. तस बोलूनही दाखवलं. त्यावेळेसही ते माझ्यासाठी उभे होते. पण शाळेच्या नियमांपुढे कुणाचे काही चालले नाही."

"म्हणजे आबांनी त्यासाठी मला तुला गेटपर्यंत सोडायला सांगितलं तर? "   माझा अजूनही विश्वास बसत नव्हता.

"होय. चल... पुन्हा एकदा शाळेत जाऊ."  

आम्ही दोघेही शाळेच्या दिशेने निघालो.  आज कपाशीच्या पावसाची मला भीती नाही, किवा कोणीतरी पाहिलं त्याची लाज ही नाही. आज कोणी विचारलं तर, अगदी गौरीने जेवढ्या निर्भीडपणे गणेशाची साथ दिली, तेवढ्याच हिमतीने ओरडून-ओरडून सांगेन त्यांना,

 ' होय। आवडतो मला तो, आणि त्यालाही मी आवडते, आणि आम्हाला दोघांना आवडतो हा बरसणारा कपाशीचा पाऊस.

थोडं तुझं थोडं माझं



क्लिक... क्लिक... क्लिक...
"वाह! ब्युटीफुल."
एका निळसर झाक असलेल्या धोतर्याच्या फुलावर बसलेले, लाल ठिपकेदार फुलपाखरू पिनीने अलगद टिपले होते. आपला डी एस एल आर कॅमेरा गळ्यात अडकवत तिने एक समाधानाचा सुस्कारा सोडला तेव्हा कुठे तिच्या लक्षात आलं, कि आपला फोन केव्हापासून वाजतो आहे. स्क्रीनकडे पाहून एक हलकीशी स्माईल देत तिने फोन उचलला.
"गुडssss मॉर्निंग. एक परफेक्ट शॉट आणि एका परफेक्ट माणसाचा फोन. क्या बात है? सकाळी-सकाळी कॉल."

"काय करणार. त्या परफेक्ट शॉटच्या नादात मला विसरत चालली ना तू? " कॉफी मग टेबलवर ठेवत विराजने लॅपटॉप बंद केला.

"एक्सट्रीमली सॉरी... खरच मी रात्री खूप वेळ ट्राय करत होते, बट इकडे नेटवर्क प्रॉब्लेम आहे आणि सकाळी शूटसाठी निघाव लागलं. सो राहून गेलं."

"ओके हनी. नो प्रोब्स. बाय द वे, रिटर्न केव्हा येतेस?"

"रात्रीची फ्लाईट आहे. सो अर्ली मॉर्निंग भेटूया. प्रॉमिस."

"याह! डन... मिस यू हनी. एक क्लाईंट कॉल वेटिंगवर आहे नंतर बोलूयात प्लिज."

"ओके. मिस यू टू. बाsss बाय." म्हणत पिनीने फोन कट केला. तिचा डोक्यात विचारचक्रे फिरू लागली.
'आपण कालपासून विराजला एकही फोन केला नाही. खरच माझ्या परफेक्ट शॉट च्या नादात विसरते की काय मी त्याला? आणि हो उद्या भेटल्यावर काय सांगू? त्याने दोनच ऑपशन्स माझ्यापुढे ठेवलेत. 'एकतर एखाद्या वर्षाचा करिअर ब्रेक किंवा लग्न पोस्पॉन्ड करायचं. हे कॉम्प्रोमाइज फक्त मलाच करावं लागणार. का? तर, तो एका जागेवर सेटेल आहे, आणि मी माझ्या फोटोग्राफीसाठी इकडे तिकडे फिरत असते. म्हणजे झालं तर, याचा अर्थ असा आहे की, थोडक्यात मी त्याला , म्हणजेच आमच्या रिलेशनशिपला वेळ देऊ शकत नाही.
रेवा म्हणाली ते एका अर्थी बरोबर होत. 'मी सुध्या एक नामांकित फोटोग्राफर आहे. माझं सुद्धा करिअर आहे. याकडे विराज जाणून बुजून दुर्लक्ष करतोय. ????'
दोन महिन्यांनी आमचं लग्न आहे, आणि तो स्वतःच्या ऑफिस कामासाठी आता काहीच दिवसात म्हणजे १ जुलैला टर्कीला जायला निघणार आहे. ते पण एक महिना. 'पोस्पॉन्ड कर म्हणाले,' तर 'अजिबात पॉसिबल नाही,‘ म्हणत हात वर केले. म्हणजे याच करिअर महत्वाचं आणि माझं काय?' रोजचे हेच विचार तिच्या मनात यायचे. पण शेवटी, 'तोच मला आठवणीने फोन करतो. काळजी करतो. मग ठीक आहे.' या वाक्याने सगळ्याचा शेवट व्हायचा.
*****

"हॅलो, हो जस्ट बॉक्स पॅक केला आणि मी निघतेच आहे."

"ओके. मी सुध्या निघालो. पण तो बॉक्स कशासाठी?"

"भेटल्यावर सांगते."

"ओके हनी."

"बाय."
फोन कट करून पिनीने एकदा बॉक्सवर नजर फिरवली. 'एका मोठ्या बॉक्समध्ये सगळ्या वस्तू, विराजने दिलेले सगळे गिफ्ट्स पॅक करून झाले. पण आठवणींचं काय? त्या पॅक करून ज्याच्या त्याला रिटर्न करता येत नाहीत ना. काश तस करता आलं असत.' या विचारात तो बॉक्स डिकीत ठेवून तिने गाडी स्टार्ट केली.

*****
'माझ्या करिअरसाठी मी खूप मेहनत घेतली आहे. तसही अजून आमचं लग्न झालेलं नाहीये. अजूनही वेळ गेलेली नाही. तेव्हा गोष्टी पुढे वाढू न देता आहेत तिथेच थांबवणे योग्य. विराजला कल्पनासुद्ध्या नसेल याची, पण हरकत नाही. मी समजावेन त्याला. समजून घ्यावच लागेल. यापुढे मला कोणतंही कॉम्प्रोमाइज करायचं नाहीये आणि त्याच्यासाठी तर माझ्यापेक्षा त्याच करिअर महत्वाचं आहे, हे सुध्या मला वेळीच लक्षात आल, ते एक बार झालं. दरवेळेसची भांडण आणि मग रुसवे फुगवे, कंटाळा आलाय याचा. अजिबात इमोशनल होणार नाहीये मी आणि आज सगळ्याचा शेवट करणार आहे.'
स्वतःशी चाललेली बडबड थांबवून पिनीने गाडीला ब्रेक लावला. त्याच्या गाडीच्या बरोबर विरुद्ध दिशेला गाडी पार्क करून ती उतरली.
विराजची गाडी कॅम्प रोडला एका बाजूला उभी होती. त्या दोघांचं या आधीच रोजचं भेटण्याचं एकमेव ठिकाण... डोक्यावरच्या उंच आभाळात मस्त बहावा चोहोदिशांत बहरत असे, त्याच्या फुलांच्या पिवळसर सडयाची चादर ओढलेला तो सुमसान रस्ता, म्हणजे पिनीची आवडती जागा. ते दोघे तिथे भेटले की पाच-दहा मिनिटे ती अगदी-अगदी शांतपणे तल्लीन होऊन त्या बहाव्याच्या आस्वाद घ्यायची. समोर हाताची घडी घालून गाडीला टेकलेलया अवस्थेत विराज तिचीच वाट बघत होता. ती त्याचा दिशेने चालत येईपर्यंत पावसाची एक हलकीशी सर उडत-उडत त्यांच्या डोक्यावरून निघूनही गेली होती.
"काय परफेक्ट टायमिंग आहे. १५ मिनिटे झाले, मी इथे तुझी वाट बघत थांबलोय, आणि तुझी एंट्री झाली नाही तोच पाऊस सुरु झाला. हा रस्ता, भरभरून फुलणारा बहावा, तू आणि पाऊस...काहीतरी गुपित आहे राव."
एक हलकीशी स्माईल देत विराजने तिच्या नाकावर लांबूनच एक टिचकी मारली.

"हा शांत रस्ता, भरभरून फुलणारा बहावा, वाट बघणारा तू, अकाली बरसणारा पाऊस आणि नेमहीच उशीरा येणारी मी, हेच तर गुपित आहे ना."
तिही हाताची घडी घालत त्याच्या शेजारी येऊन गाडीला टेकली.

"म्हणजे ऍग्री आहेस तर, तुला नेमहीच उशीर होतो."

"कदाचित यापुढे मला उशीर होणार नाही. आणि तुला कधीच वाट पाहावी लागणार नाही." आपल्या हाताची थरथर थांबवण्याचा आटोकाट पर्यंत करत पिनीने डायरेक्ट विषयाला हात घातला.

"थॅट्स गुड अ‍ॅन्ड एक्सपेक्टेड, मी सुध्या तेच म्हणतो. ऑल इज वेल ना, देन वि कॅन थिंक अबाउट इट."

'म्हणजे तू सुद्धा तोच विचार करतोयस?" पिनीने अती आच्छर्याने प्रश्न केला.

"फक्त विचार नाही. मी तर लन्गाची डेट सुध्या कन्फर्म करणार होतो. बट विचार केला, आधी तुझं शेड्युल कसं आहे ते बघून ठरवूयात. काय म्हणते?"
आपल्या खिशातील किटकॅट आणि एक छोटस रेड रोज तिला देत, विराजने एक स्माईल दिली. पिनीला काय बोलावे सुचेना. आता कुठे तिच्या लक्षात आलं, की आपण एक विचार करतोय, आणि हा तर दुसराच विचार करतोय. ते रेड रोज नाजूक हाताने गोंजारत तिने सेकंदासाठो डोळे मिटले. सगळी शक्ती एकवटून आता ती सज्ज झाली.
"मी काय म्हणते विराज. बी सिरिअस अँड प्रॅक्टिकल. बघ...हल्ली आपली रोज भांडण होतात. एकमेकांच्या खूप साऱ्या गोष्टी एकमेकांना खटकतात, आपलं प्रोफेशनही डिफ्रन्ट आहे, त्यामुळे नंतर कदाचित आपण एकमेकांना जास्त वेळही देऊ शकणार नाही. नंतर हेच छोटे छोटे प्रॉब्लेम्स मोठे होत जातील आणि ताण-तणाव वाढेल. सो... " तिने एक दीर्घ श्वास घेतला पण वाक्य पूर्ण करण्याचा आधीच त्याने रागाने तिच्याकडे बघत प्रश्न केला.

"सो वॉट? हान. हे सगळं होतच असत गं. म्हणून तर आपण गेली तीन-चार वर्षे थांबलो ना. अजून थांबायचं असं म्हणायचं आहे का तुला? आणि किती वेळ थांबायचं ? त्याने प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील?"

पिनीला काय बोलावं आणि याला आपला डिसिजन कसा समजवावं हेच कळेना. तिने आपल्या बोटातली एंगेजमेंट रिंग हातात काढून ती घट्ट मुठीत आवळली. विराजला परत देऊन सरळ इथून निघून जाऊया, या विचारात असतानाच एक लखलखती वीज कडाडली, आणि धो धो करून तोच अकाली पाऊस पुन्हा एकदा बरसू लागला. विराजला काही कळायच्या आत पिनीने उघडली मूठ तशीच दाबली. "गाडीत बसून बोलूया." म्हणत ती आपल्या गाडीकडे वळणार तोच विराजने तिचा हात पकडला होता.

"थांबते का? थोडं भिजूया म्हणतो आज. त्याने किमान तुझ्या मनावर जमा झालेले मळभ वाहून जाईल."

"पण तुला पाऊस आवडत नाही ना?" म्हणत पिनीने आपला हात सोडवून घेतला.

"पाऊस मला आवडत नाहीच. पण तू आवडतेस. आणि तुला आवडत असलेली प्रत्येक गोष्ट मी आवडून घेतो."

त्याच्या त्या शब्दासरशी पिनी गर्रकन मागे वळली होती. "काल एक तास भांडत होतो आपण. त्याने माझी फॅमिली सुध्या डिस्टर्ब् आहे. हल्ली हे असं रोजच होतंय. त्यापेक्षा इथेच थांबूया हे सगळं."
जवळ येत एक बोट पिनीच्या ओठांवर ठेवत विराजने तिला चूप केले. "मी एक वेगळा विचार करतोय, आणि तुझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच सुरु आहे. त्याचा विचारही मी करु शकत नाही. सगळं इथेच थांबवणं, हा एकच पर्याय नाहीये. सो थिंक पॉसिटीव्ह. थोडं तुझं थोडं माझं... असं दोघांनी एकमेकांना वेळ देऊ. दोघांनी मिळून अ‍ॅडजेक्ट करुयात मग सगळ्याचा बॅलन्स होईल."

"आणि जर ते नाही जमलं तर?" पिनीने त्याला थांबवत मध्येच प्रश्न केला.

"एवढ्या वर्षाचे रिलेशनशिप असुनही जर आपल्या दोघांचं एकमेकांशी नाही जमल तर दुसऱ्या कोणाबरोबर ते जमेल याची काय गॅरेंटी?"

यावर पिनिच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला. "सॉरी."
तिचा निर्णय ठाम होता. ‘थोडं तुझं थोडं माझं,' म्हणतो हा... पण कॉम्प्रोमाइज करायची वेळ आली की मात्र ते मला करावं लागत. लग्नासाठी एका वर्ष माझं करिअर मी सोडणार नाही.

'मनात काहीतरी पक्के करून ती पुन्हा गाडीकडे वळली. तो बॉक्स त्याचा स्वाधीन करून तिथून निघण्यासाठी... तिने बॉक्स काढण्यासाठी डिकी उघडली, आणि क्षणात धाडकन बंदही केली. कारण डिकी उघडताना तिचे हातातल्या घड्याळाकडे सहजच लक्ष गेले. त्यावर तारीख होती १ जुलै. ती धावतच विराजकडे आली. तो तसाच पावसात भिजत शांत उभा होता. आपले दोन्ही हात पसरून तिच्याकडे बघत.
"सरप्राईज म्हणून एक बॉक्स घेऊन येणार होतीस ना? त्याच काय ?"

"काही नाही. घरीच विसरले तो मी पण टर्की ट्रिप कॅन्सल करून तूच मला सरप्राईज केलस." म्हणत पिनी पळत जाऊन सरळ त्याच्या मिठीत शिरली.

"आलं का लक्षात? थोडं तुझं थोडं माझं." म्हणत तोही पुन्हा हसला.

हीच तर खरी गंमत आहे या अकाली बरसणाऱ्या पावसाची...
हा शांत रस्ता, भरभरून फुलणारा बहावा, वाट बघणारा तो आणि उशीरा का होईना पण नेहमी न चुकता येणारी ती.

2380234-bigthumbnail.jpg©सर्व हक्क लेखिकेस्वाधिन

जाई!

श्रावणात घन निळा बरसला
रिमझिम रेशिमधारा !
उलगडला झाडांतुन अवचित
हिरवा मोरपिसारा !




‘पाडगावकरांचे गीत, ते ही लता दिदींच्या आवाजात ऐकण्याचा आनंदच वेगळा ना?'
"वर्षा झालं का तुझं? निघायच का?" घनश्यामने रेडीओचा आवाज कमी करत हाक दिली. बाहेर मुसळधार पाऊस फेर धरुन तांडव करत होता.’
'आज काय झालय काय याला? वर्षभराच एकदाच पडून घेतोय वाटत.' त्याच्या मनात विचार आला. "वर्षा झालं का गं? " त्याने परत आतल्या दिशेने पाहत विचारले. पण काहीच उत्तर मिळाले नाही.
'हिचा आपला नेहमीचा उशीर. एवढ्या दिवसांनंतरही काही बदल झालेला नाही. आहे तशीच आहे.' म्हणत घना किचनकडे वळणार तेवढ्यात टेलिफोनची रिंग वाजली.
"हॅलो!"

"घना तात्या बोलतोय." पलिकडून चाचपडत्या आवाजात.

"हा, तात्या बोला ना! कसे आहात?"

"मी ठिक रे, ते हॉस्पीटलमध्ये वर्षा...." तात्या मधेच अडखळले.

"हो काका, आम्ही तिथेच निघालोय चेकपसाठी. एक, एकच मिनिट ह... " म्हणत त्याने रिसिव्हर बाजुला करुन पुन्हा एकदा वर्षा असा आवाज दिला.

"तुला केव्हा समजलं? फार वाईट झाल रे! वर्षा..." तात्या फोनवरती रडायला लागले. त्यांचा रडण्याचा आवाज घनाला अगदी स्पष्ट ऐकू येत होता.

"काका झालं तरी काय? बोला ना! वर्षाला फोन देऊ का?"

"वर्षाला फोन कसा देणार? ती गेली ना रे. आपल्याला सोडून गेली रे ती... कायमचीच!" काका पुन्हा हमसून हमसून रडू लागले होते. ते काय बोलत आहेत ते ऐकून घनाचे तर आवसानच गळून पडले.

"वेड्यासारख काय बोलताय काका... कस काय शक्य आहे? ती... ती तर काल रात्रीच इथे आली... आम्ही आत्ता हॉस्पिटलमध्ये निघालो आहोत."

"घना... तू ठीक आहेस ना? तुला शॉक लागला असेल ऐकून, लागणार म्हणा, एकत्र राहत नसलात तरीही शेवटी तुझी बायको होती ती ... पण हेच खर आहे. वर्षा आता आपल्यामध्ये नाही आहे."

काकाचे शेवटचे वाक्य, आणि घनाला दरदरुन घाम फुटला होता. हातातले रिसिव्हर गळून पडले. दुसर्याच क्षणी त्याने किचनकडे धाव घेतली.
'वर्षा!'
'वर्षा!'
खुप वेळा आवाज दिला, सैरभेर शोधल त्याने, पण वर्षा घरी कुठे दिसेना. गोठून टाकणारा गारवा हवेत पसरला होता, बाहेर घनघोर पाऊस आणि याच्या मस्तकावरुन मात्र घामाचे ओघळ लागले होते.
'काल रात्रीच तर आली ती. मध्यरात्री... त्या बाहेरच्या जुईच्या झुडपाखाली उभी होती माझी वाट पाहत. केवढी भिजली होती. मला पण घरी यायला उशीर झाला होता. आल्या-आल्या माझ्या मिठीत शिरून खुप-खुप रडली वेडी. किती गप्पा मारल्या आम्ही... मग एकदास ठरवुन टाकलं, यापुढे भांडायचे नाही. मी अगदी शुल्लक गोष्टीवरुन भांडत बसायचो, एकदा ती रागावून माहेरी निघून गेली ती ६-७ महिने आलीच नाही, आणि मी पण हट्टी... तिला आणायला ही गेलो नाही. ना फोन... ना भेट. पण काल आली ती. हो कालच आली... लवकरच मी बाबा होणार आहे हे सांगायला. मला पक्क आठवतंय. मी काय वेडा नाही. तिचे काका काहीही बोलतात. बेडरुममध्ये असेल.... असेलच....'
त्या बाहेरच्या पावसासारखाच बेभान झालेला घना बेडरुमकडे वळला.
'कपाटाच्या इथे? नाही... नाही... तिला तयार व्हायला वेळ लागतो ना, आरश्याच्या इथे असेल... नाही, मग बाथरुममध्ये?' अख्खे घर शोधून झाले, तेव्हा हताश घना डोक हाताने गच्च धरुन पलंगावर बसला. काय चालल आहे हे त्याच त्यालाच कळेना. आसमंत बडबडला, तडफडला, खुप रडला. अगदी बरसणार्या पावसासारखा. बाजूला असेलेल्या टेलीफोनची रिंग वाजून-वाजून थकली, एक... दोन, तीन वेळा... कितीतरी वेळ फोन वाजतच राहीला होता.
एका घटीकेचा अवधी हा हा म्हणता सरला होता. कडाडून विजेने आपण आल्याची वर्दी दिली. ढगांचा नाद सुरु झाला आणि पुन्हा पावसाने जोर धरला. वादळवार्‍याने एकाकी बंद खिडकी खडखडून उघडली होती. त्या आवाजाने शुद्धीवर येऊन घना पलंगावरून उठला. बाजूचा फोन उत्तराच्या अपेक्षेने अजून ही अधूनमधून वाजतच होता. घनाने तो सुन्नपणे कानाला लावला.

"घना तू ठिक आहेस ना? आम्ही वाट पहातोय रे हॉस्पिटलमध्ये. येतोयस ना?" तात्या मलुल आवाजात बोलत होते.

"सारच संपलं. आता काय बाकी आहे काका. माझ्यासाठी संपलं सगळ."

"अरे अस म्हणू नकोस. त्या लहान जिवासाठी तरी. तुझी वर्षा एक छोटी कळी मागे सोडून गेली आहे. इथून कायमचेच निघून जाण्याआधी तिने काल एका गोंडस मुलीला जन्म दिला आणि मध्यरात्री अचानक जीव सोडला."

"म्हणजे काका... मला मुलगी झाली..." पुढे घनाच्या तोंडातून एकही शब्द फुटेना.

आता त्याला एकत्रीतपणे मिळालेला आनंद आणि त्याबरोबरच आलेले दुखः या दोन्ही गोष्टी पचविणे जड झाले होते. अवाक होऊन तो पुन्हा जागच्या जागीच कोसळला. बाजूच्या धडधडणार्या खिडकीतून अचानक आतमध्ये सपकन थोड्या जनधारांचा मारा झाला होता. त्यासरशी बाहेरुन आत डोकावू पहाणार्या जाईच्या वेलीची ओंजळभर ताजी टवटवीत फुले त्या लालसोनेरी चादरीच्या घडीवर येऊन विखुरली. तिचं चादर, जी सभोवती लपेटून वर्षा त्याच्या कुशीत शांत निजली होती. काल रात्री...कदाचित कायमचीच...स्वप्नात की सत्यात?

पलिकडून तात्या फोनवरती बडबडत होते. "तुला माहिती आहे. वर्षाने तर बाळाच नाव सुद्ध्या ठरवून ठेवल होत रे. मुलगा झाला तर विहंग... आणि मुलगी झाली तर जाई. तुझी जाई तुझी वाट बघतेय. येतोस ना?."
त्या जाईच्या फुलांसकट ती चादर उराशी लावून घना खिन्न मनाने उठला. तसेच रडविले नेत्र पुसत घाईघाईने निघालाही, त्याच्या जाईला भेटायला. सकाळपासून सुरु असलेली पावसाची रिपरिप ही थांबली होती.
कधीही न थांबण्यासाठी एक चिरंतन पाऊस आता घानाच्या आत बरसू लागला. आत... मनात... खोलवर...
त्याच्या आणि वर्षाच्या विरहाचा पाऊस.

समाप्त
------------------------------------------------------------------------------------------------------------
पुर्वप्रसिद्धी - "रेशिमधारा" पावसाळा ई विशेषांक २०२० https://drive.google.com/file/d/1axoKzr6csU5YUmYhOGrm7wk_BtzyCjvM/view?u...
©सर्व हक्क लेखिकेस्वाधिन.

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय." पण ते शक्य न...