रविवार, ३० जून, २०१९

कोकणचा रानमेवा- 'करवंदे'

करवंदे (डोंगराची काळीमैना) KARANDA-
आमच्या गावी एक म्हण आहे, ‘पाडव्याला पाड आणि अखितीला गोड’. "गेल्याच आठवड्यात गावी जाऊन आले, रस्त्याच्या दुतर्फा करवंदाच्या डहाळी च्या डहाळी भरुन आलेल्या पाहील्या. अश्या या रान मेव्यासाठी कोकण प्रसिद्ध आहेच. सर्वसाधारण रानमेवा म्हणजे करवंदे, जांभळे, आंबा, फणस, आवळा, रायआवळे, तोरणं, आमगुळे, आळू ही आहेत. हा रानमेवा आरोग्यरक्षणासाठी सर्वानी आवर्जून खावा. खर्च न करता ही अतीशय उपयुक्त असे हे करवंद मुबलक प्रमानात उपलब्ध असते. अश्या या बहुगुणी फळा बद्द्ल थोडी माहीती".
करवंदाचे मूळ स्थान भारत असून, करवंद हिंदीमध्ये ‘खट्टा मीठा’ या नावाने प्रसिद्ध आहे, तर शास्त्रीय भाषेत उवाऊर्सी या नावाने ओळखले जाते. करवंद ही वनस्पती अपोसायनेसी या कुळातील आहे.

करवंदांचा _n.jpg


निसर्गाच्या गोष्टी

" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"
                  कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निधळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी  रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर  भाव | अगदी तरल.
"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
                विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर  झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही  निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."

पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.
                       निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.
मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.

(मा.बो. वरील जागू ताई यांच्या निसर्गाच्या गप्पा या धाग्यासाठी लिहिलेले मनोगत)

बारिश आती है तो...



बारिश आती है तो मेरे शहर को कुछ हो जाता है..
टिनकि छत, तर्पाल का छज्जा, पीपल, पत्ते, पर्नाला सब बजने लगते है।

तंग गली में जाते जाते,
मेरी साइकल का पहिया पानी की कुल्लियाँ करता है।
बारिशमे कुछ लम्बे हो जाते है कद भी लोगोंके
जितने ऊपर है, उतने ही पैरो के नीचे पानी में
ऊपरवाला तैरता है तो नीचेवाला डूब के चलता है !

खुश्क था तो रस्ते में टिक टिक छतरी टेंक के चलते थे
बारिशमें आकाश पे छतरी तक के टप टप चलते है..

-गुलजार


सोमवार, २४ जून, २०१९

अळूची पातळ भाजी/फदफदं/फतफत आणि एक कथा

अळूची पातळ भाजी हे नाव बहुतेक सगळ्यांना माहीत आहे, मात्र अळु भाजीच्या बुळबुळीतपणा या गुणधर्मावरुन अळूचं फदफदं हे नाव ठेवल गेल आहे.

अळू भाजीची पाने ही थोडी पातळ आणि पोपटीसर रंगाची असतात.
तर अळू वडी साठी थोडी जाडसर अन् गडद हिरवी, वरती मोठ्या गडद शिरा असणारी पाने वापरली जातात.
हा या दोघांमधील फरक आहे.

अळूपासुन शरीरास मिळणारे फायदे:-
अळूच्या पानांमध्ये अ व क जीवनसत्त्वे असतात तसेच झिंक, मॅग्नेशियम, कॉपर, आयर्न आणि पोटॅशियम ही भरपूर प्रमानात आहे.
रक्त वाढवणारी, ताकद वाढवणारी या साठीही अळू भाजी उपयोगी ठरते.

मामाच्या गावी गेल्यावर केव्हा-केव्हा हा अळूच्या फदफद्याचा बेत अजुनही होतो, आणि आजीचा  "भात भाकरी आहे हो खुप. आवडल म्हणुन नुसत फदफदंयावर भागवु नका" असा टोला पण असतोच. आजी अस का म्हणते ग नेहमी? अस विचारताच आजी तिचीच नेहमीचीच/पुर्वापार चालत आलेली कथा रंगवून सांगत असते. मला तिच ती कथा परत-परत ऐकायला आवडत. विषय अळुचा आहे म्हणुन ती कथा मी इथे टाकत आहे.

तर कथा अशी आहे.... एक नव विवाहीत जावई बायको सोबत तिच्या माहेरी जेवणासाठी आलेला असतो, घरी अठरावीष्व दारिद्र्य, धान्य नाही, जावयाचा पाहुणचार कसा करावा ? हा सासुबाईंना पडलेला प्रश्न. मनाशी काही तरी ठरवुन त्या गाठीशी असलेले पेलाभर तांदुळ शीजत घालतात. परसातील कोवळी अळुची पाने काढुन भरपुर प्रमानात अळूचं फदफदं बनवतात. जावई जेवायला बसल्यावर पापड-कुर्ड्या, भात आणि फदफदं असा बेत पानामध्ये वाढला जातो. जावईबुवा भातावरती  यथेच्छ पसरवलेल फदफदं समपवुन "वा छान झाल आहे फदफदं" अस म्हणत खाली असणार्या भाताला हात लावणार तेवढ्यात सासुबाई " आवडल ना मग  घ्या अजुन लाजू नका" अस म्हणत वरती प्रेमानेच(?) अजुन फदफदं वाढत.
आता फदफदं खावुन तृप्त (?) झालेला जावईबुवा पानात लावलेला भात कसाबसा संपवुन सासुरवाडीचा प्रेमभावे निरोप घेतो. वरती अजुन फदफदं वाढत असताना सासुबाईच्या तोंडुन सारख बाहेर पडणार एक वाक्य मात्र तो कायमचच लक्षात ठेवतो "भात भाकरी आहे हो खुप. आवडल म्हणुन नुसत फदफदंयावर भागवु नका"
आजीची कथा संपली की आम्ही  पोट धरुन हसतो, आणि तितकच वाईट ही वाटत.
 तर "अळूची पातळ भाजी,अळूचं फदफदं किवा अळूचं फतफत " काहीही म्हणा याची मी करत असलेली पाककृती मी इथे पोस्ट करत आहे.

साहित्य: 
अळूची पाने ५-६
शेंगदाणे व चणा डाळ दोन्ही छोटी अर्धी वाटी.

फोडणीसाठी साहित्य: 
तेल ४ टेबल स्पून ,१  छोटा चमचा मोहोरी ,हिंग चविनुसार (ऐच्छिक), १/२ चमचा हळद व तितकाच गरम मसाला , १ चमचा लाल तिखट,अर्धा कादा आणि  टोमटो(ऐच्छिक), लसुन २-३ पाकळी, मिठ चविनुसार, १ चिंच किवा कोकमाची साल, १ तमालपत्र (ऐच्छिक), 2-4 मेथ्याचे दाणे (ऐच्छिक).
गोडा मसाला २  मोठे चमचे. (गोडा मसाला पाककृती लवकरच )

कृती:
शेंगदाणे/चणा डाळ ४ तास पाण्यात भिजत ठेवावा, अळूची पाने स्वच्छ धुवून पुसून घ्यावी. देठं वरिल पातळ आवरन काढुन घ्यावे. नंतर पानं व देठंही बारीक चिरून घ्यावे. हे सर्व प्रेशर कुकरमध्ये पाहीजे तेवढे पाणी घालुन १ शिट्टी करून शिजवून घ्यावे.(नंतर फोडणीमध्ये  वरुन पाणी घालु नये)


कढईत तेल गरम करून फोडणीसाठी साहित्याच्या दिलेल्या क्रमनुसार फोडणी करून घ्यावी. यात चिरलेली अळूची पाने आणि देठं घालावीत. झाकण ठेवून ५ मिनिटे शिजवावे. वरुन भुरभुरायला आवडत असेल तर थोडस ओल खोबर घालु शकता.

गावठी तांदळाचा भात किवा भाकरी बरोबर खायला घ्या, पावसाळ्यात एक मस्त बेत होउन जाईल.


 टिप:
१)  अळूत ऑक्झॅलिक अ‍ॅसिड असल्यामुळे खाताना घशाला खाज सुटते, त्यासाठी चिंच, कोकम किवा आमसूल घालावा लागतो.
अळू चिरताना हातालाही खाज सुटते, त्यासाठी हाताला चिंचेचा कोळ लावून, अथवा साधे प्लास्टिकचे ग्लोज घालुन ते चिरावं लागत.
२)  अळूच्या देठा पासुन देठी हा रुचकर पदार्थ ही बनवता येतो.
३) शिजवून घेतलेला अळु  मिक्सर करुन किवा मस्त पैकी घाटुन घेतला की भाजी मिळुन येते.   

सोमवार, १० जून, २०१९

अशीच काही मनामध्ये गुंतलेली गाणी...१) आयेगा आनेवाला...


टण.....टण..... मंदिरातील मोठ्याल्या घंटेला एकदाच टोला दिल्यावर घुमतो तो आवाज.
दुरदर्शन असाव तेव्हा. बाबा hall मध्ये t.v. बघत होते. मी बाजुलाच झोपलेले. मला अजुनही आठवतय. दोन टोले कानावर पडले तेव्हा मी तडक उठुनच बसले होते. घाबरून थोडं बाबांकडे सरकत माझा पहिलाच प्रश्न होता.
" बाबा हा एकटाच आहे ?
बाबांचं उत्तर होत: नाही दोघे आहेत. पण तो ही एकटाच आणि ती ही एकटीच!
मी: कस काय बाबा ? (मला म्हणायच होत या चित्रपटामध्ये अजुन कोण-कोण आहे.)
बाबांचं उत्तर: असच असत आयुष्यात. हा दुनियादारिचा गोतावळा फक्त नावालाच....बाकी आपण सगळे एकटेच येतो आणि एकटेच जातो."
(चित्रपट बघताना काही प्रश्न विचारला की बाबा असच काही-बाही बोलायचे....तेव्हा मला वाटायच त्यांना डिस्टर्ब होत असाव. पण त्याच्या बोलण्याचा खरा अर्थ समजण्यासाठी मला पुढे काही वर्ष मोजावी लागली. आणि वयानुसार त्याची उकलही झाली.) तेव्हा मात्र जास्त प्रश्न नको म्हणुन मी t.v. कडे मान वळवली होती.
बॉम्बें टॉकीजचा चित्रपट- महल.
आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ करणारी हिदी चित्रपट अभिनेत्री मधुबाला आणि अशोक कुमार हि जोडी.
गीत-आयेगा आनेवाला...
गायिका लता दीदी ' दीदी ते भारताची गाण कोकीळा' या पर्वाच्या प्रवासाची सुरुवात होती ती कारण या गाण्यानंतर लता दीदींना चांगली प्रसिद्धी मिळाली असं म्हणतात. गाण्यात प्रतिध्वनी निर्माण करण्यासाठी या गाण्याचे ध्वनीमुद्रण एका बंद खोलीत करण्यात आलं. दोन भाग आहेत पहिला script demand म्हणुन दुसरा मुखडा. पहिला भाग हा माईक पासुन थोड दुर फिरत-फिरत गायला गेला आहे. आणि याचे effects काय अफलातुन आहेत हे गाण ऐकताना क्षणो-क्षणी जाणवत. रिमिक्स, पॉप  सॉग्सं च्या जमान्यात आज हे गाणं मनात घर करून बसलं आहे. भारतीय सिनेसृष्टीच्या मुकूटातील सुरुवातीच्या काळात खोवल गेलेल एक अढळ मोरपिस जणू.
खेमचन्द प्रकाश यांच गूढगम्य म्युझिक. विणा,पेटी,झांज,तंबोरा,तबला,व्हायोलिन काय अन कोणती-कोणती वाद्य वापरली आहेत या गाण्यात माहीत नाही. पण गाण ऐकताना ह्र्दयात असंख्य विणेच्या तारा झंकारतात. मनाच्या कोपर्यात  कुठे तरी भावनांची पेटी वादन चालु होत, ह्र्दयाचे ठोके अन तंबोऱ्याचा टणकार यातला फरकच जाणवेनासा होतो. दुर्दम्य आशावाद आणि प्रबळ इच्छाशक्ती यांचा अप्रतिम देखावा.
टण..... टण.... तेच ते दोन टोले....हा गजर आहे घडाळ्याचा. अन बजर आहे विश्वासाचा. काळोखाच्या रांगोळीने श्रुंगारलेला भव्यदीव्य महल, लपत-छपत दिसणारा सावल्यांचा खेळ करत ढळणारी रात्र, बेसहारा नावेप्रमाने पण वारा नसतानाही हेलकावे घेणारे झुंबरं, एकटाच नायक, आणि आर्त टोले देणारी २ ची घटीका, काळोखाला घाबरणारा देखील रात्रीच्या प्रेमात पडेल असा कृष्णधवल देखावा (कृष्णधवल या शब्दाचा खरा अर्थ मला इथे उमगला) आणि जन्म घेते एक विश्वासक आळवणी.
"खामोश है ज़माना, चुप-चुप हैं सितारे
आराम से है दुनिया, बेकल है दिल के मारे
ऐसे में कोई आहट, इस तरह आ रही है
जैसे कि चल रहा है, मन में कोई हमारे
या दिल धड़क रहा है, इक आस के सहारे"
मिट्ट काळोखात एक मिनमीनती मेणबत्ती घेऊन विश्वासाने उजेडाला आमंत्रण देणारी कामिनी. तिच्या प्रेमाच्या शोधात फिरत असते. काहीही झालं तरी कामिनीचा तिच्या प्रेमावर विश्वास आहे, खात्री आहे. तिचा प्रियकर तिला नक्की भेटायला येईल असा दृढ विश्वास तिला आहे. अंधार्या रात्री गर्द दाटलेल निराशेच सावट,सारच शांत,निस्तेज,निष्क्रिय. पण एवढ्या निराशेमध्ये देखील जन्म घेते एक विश्वासक साद...."आएगा, आएगा, आएगा, आएगा आनेवाला, आएगा आनेवाला. "
"दीपक बग़ैर कैसे, परवाने जल रहे हैं 
कोई नहीं चलाता, और तीर चल रहे हैं
तड़पेगा कोई कब तक, बे-आस बे-सहारे 
लेकिन ये कह रहे हैं, दिल के मेरे इशारे"
सारच गुढ, कल्पने पलीकडुन आलेल आणि कधिही न पाहीलेल. झुल्यावर बसुन झुलणारी नायिका, अजुनही अंधाराच्या दिशेने चाचपडत चालणारा नायक आणि रिकामा झुला पाहुन हिरमोड झालेली त्याची पाठमोरी छबी. तरी देखील तिच विश्वासक साद...."आएगा, आएगा, आएगा, आएगा आनेवाला, आएगा आनेवाला."
"भटकी हुई जवानी, मँज़िल को ढूँढती है 
माझी बग़ैर नय्या, साहिल को ढूँढती है
क्या जाने दिल की कश्ती, कब तक लगे किनारे
लेकिन ये कह रहे हैं, दिल के मेरे इशारे"
आधीच भटकता प्रवास तरीही मँज़िल शोधताना..... झाडांच्या मधोमध अडखळलेली ती नायकाची गंभीर पण शोधक नजर.
माझी बग़ैर साहिल शोधताना, किणारा कधी मिळेल याची काहीच कल्पना नाही, पण तरीही अदृश्य होत असणार्या नावेतून येणारा तोच आश्वासक इशारा...."आएगा, आएगा, आएगा, आएगा आनेवाला, आएगा आनेवाला."
...........................................................................
"महल संपला तेव्हा बाबांना म्हणाले होते, " बाबा पुन्हा केव्हा हा चित्रपट लागला तर सांगा, मला पहिल्या पासुन बघायला आवडेल. बाबाही हो म्हणाले होते." पण परत कधीही महल लागण्याच्या आतच बाबा आयुष्याच्या शेवटच्या प्रवासाला निघुन गेले, परत कधीही न येण्यासाठी. साल २००५,मे महीना,आणि आएगा आनेवाला या गाण्यापासुन पुढचा सगळा महल चित्रपट चांगला लक्षात राहीला. परत कधीही न विसण्यासाठी.
म्हणतात की अपुर्ण काही ठेवु नये, पण काही गोष्टी या अपुर्णच एवढ्या परिपुर्ण असतात की त्याना पुर्णत्वाच्या मोहोरेची गरज नसते. बाबांबरोबर हा चित्रपट पाहीला, पहील्यांदाच अन शेवटचा. त्यानंतर बघायला धीरच होत नाही. आजही तो माझ्यासाठी अपुर्ण असुनही परिपुर्ण आहे बाबांच्या आयुष्यासारखाच.

( बाबा आणि मी -एक आठवण )

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय." पण ते शक्य न...