ललितलेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ललितलेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१

हारून जिंकलेला हार

 आजोळ  मनाच्या कोपऱ्यात आठवणींची दाटी. कोरडी भाकर सोबतीला तुपाची वाटी.

भावनांचा पूर, भोलेभिसरे आठवणींचे सूर. सुरकुतलेल्या हातांच्या आठवणीने भरून येई उर.

'कामाच्या गडबडीत हल्ली मामाच्या गावाला जाणं फार कमी झाल. अगदीच वर्षातून एखाद्या दिवशी सकाळी जायचं आणि संध्याकाळी परतीच्या प्रवासाला निघायचं. आजी आणि आजोबा दोघेच राहतात, ते ही ७०-८० च्या घरातले, सणावारी मामा- मावश्या येऊन जातात, पण त्याही मोजकेच दिवस, बाकीचे दिवस एवढं मोठ्ठ घर अगदी निपचित पडलेले असतं, एखाद्या निर्जन ठिकाणी गाडी चुकलेला वाटसरू दुसऱ्या गाडीच्या प्रतीक्षेत एखाद्या झाडाच्या सावलीत पहुडलेला असतो अगदी तसं. गावची घर आणि त्यामध्ये एकटेदुकटे राहणारे आजी-आजोबा म्हणजे एक आठवणींचं दुकान असतं , ते ही अंशतः बंद पडलेले. त्यांच्याकडे खूप काही देण्यासारखं असतं पण घेणारं कोणी नाही.

आठवड्यापूर्वी आजीशी फोनवर बोलणं झालं. बोलता बोलता अगदीच हळवी झाली होती. मुलांनी, नातवंडांनी गजबजलेलं ते घर रिकामं झालाय जणू, पूर्वी चोवीसतास धगधगणारी चुल आत्ता दिवसातून एकदाच पेटते. तिच्या भाषेत, 'पूर्वी मुलाबाळांचा धांगडधींगा असायचा तिथे, आत्ता खायला उठणारी भयाण शांतता असते. माझं अर्ध्यापेक्षा जास्त बालपण मामाच्या गावी गेलं. त्यामुळे फोनवर बोलताना आज्जी आणि मी दोघीही भावुक होतो. बोलायला विषय सुद्धा खूप असतात, पण काय बोलू आणि काय नाही असं होतं. अन निम्मे विषय आमच्या अश्रूंमध्येच वाहून जातात. तब्ब्येत-पाणी याची चोकशी करता-करता माझ्या दाराची बेल वाजते किंवा आजीच्या अंगणात बाजूच्या काकूंची गाय आलेली असते, झालं मग… ‘नंतर फोन करते हा’, असं बोलून आम्ही फोन ठेवतो. नाहीतर तासभर बोलणं झालं तरी ठेवू का? विचारायची हिम्मत होत नाही... आजीलाही आणि मलाही.

पूर्वी आजोळी तसे चांगले दिवस होते. आजोबा गाव मंदिरात पुजारी आणि गावात पोस्टमनच काम करायचे, म्हणजे मिळकत जेमतेमच. बऱ्यापैकी शेतीवाडी होती, जमीन-जुमला आणि दूधदुभत्या गाई गुरांनी मिळणाऱ्या मिळकतीने घर भरलेलं असायचं, हळूहळू दिवस बदलले, घरी खाणारी दहा तोंड आणि बाहेरची पाहुणे मंडळी वगैरे ची आवक जावक तर नेहमीचीच. वंशाला दिवा पाहिजे म्हणत सात कन्यारत्नांचा जन्म झाला आणि मग दिवा उजळला. नऊ मुलांची आई आणि सासू सासरे असा लवाजमा सांभाळणे, यात आजीने आपले संपूर्ण आयुष्य वेचले. मुलांना वाढवणे, पालनपोषण आणि संगोपन करणे ही वेगळी गोष्ट, पण सात मुली आणि त्यांची लग्न वगैरे त्यावेळी निव्वळ अशक्य. न करून चालणार नाही. त्यावेळी आजी आपला एकुलता एक मोठा दागिना बँकेत ठेवून त्यावर व्याजी पैसे घेत असे, यात व्याज जास्त द्यावे लागे, कष्ट करून एकेक पै जोडून तो दागिना सोडवण्याची वेळ येई तोपर्यंत दुसऱ्या मुलीचे लग्न येऊन ठेपे. वर्षा आड जन्मलेल्या या मुली मग प्रत्येकीच्या लग्नासाठी परत तो हार बँकेत जात असे. काही वर्षांपूर्वी हा घरंदाज दागिना पोहेहार माझ्या आजीला माझ्या पंजीने म्हणजेच तिच्या सासूबाईंनी दिला. तेही त्यांच्या सेवेचा मोबदला म्हणून. पण तेव्हापासून आजीला तो गळ्यात घालून मिरवण्याचा योग जुळून येतच नसे.

सोन्याची तोळा ८००-९०० किंमत असल्यापासून ते ५०००-१०००० किंमत होत गेली, तरीही हार-ते पैसे याचे आदान-प्रदान संपेना. माझ्या अगदी शेवटच्या मावशीच लग्न झालं तरीही तो हार बँकेतच खितपत पडला होता. मुद्दलापेक्षा कितीतरी पट होऊन व्याजाची रक्कम देखील वाढत चालली होती. शेवटी तो सोडवणे अगदी आवाक्याच्या बाहेर गेले आणि सगळ्यांनी त्याची अपेक्षाच सोडली.
गाव सोडून खूप वर्षे झाली… गेल्या काही वर्षात आजोळी जाणे शक्य झाले नाही. मी जवळ जवळ तो हार विसरलेच होते. यंदा गौरी-गणपती येऊन गेले, त्यावेळचा काढलेला आजीचा फोटो मामाने व्हॉट्सअप ग्रुपला पाठवला होता, मी मुद्दाम झूम करून पाहत बसले, तीच सावळी बारीकशी शरीरयष्टि, आवडत्या निळ्याशार रंगाचं अगदी पायापर्यंत लोळणार नववारी लुगड नेसली होती. अर्ध कपाळ व्यापेल असं ठसठशीत लाल चुटुक कुंकू. अगदी तोंड उघडलं तर तोंडातच शिरेल एवढी मोठी मोत्यांची नथ नाकात तिच्या लग्नात मिळालेली. हातात सदैव असणारा हिरवा चुडा आणि गळ्यात मंगळसूत्र हे तिचे नेहमीचेच सौभाग्यअलंकार आणि गळ्यात तोच तिच्या आयुष्यभराच्या त्यागाचे प्रतीक असलेलला मोठा पाचपदरी पोहेहार. मला विश्वासच बसेना . क्षणात तिला फोन केला आणि बाकी सगळं सोडून आधी हाराची चौकशी केली. ' आजी तोच हार कि नवीन केला ग?'

ती मोठ्या आनंदाने म्हणाली. " ज्या वंशाच्या दिव्यासाठी आठ मुलींना जन्म दिला ना, त्याच दिव्याने सोडवला बघ तो हार. लहानपणी तूच विचारायचीस ना सारखी-सारखी ‘हार कुठे आहे म्हणून’, यातली एक चैन तुला देणार बघ."

ऐकून माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. क्षणभरही विचार न करता मी तिला म्हणाली, “मला चैन नको आजी. जेव्हा कधी तुला हा हार मोडावासा वाटेल ना, किंवा जेव्हा अशी काही परिस्थिती निर्माण होईल, तेव्हा सात तोळ्याच्या हिशेबाने काय पैसे होतील ते मी देईन तुला… तुझ्या त्यागाचं बक्षीस समज हवं तर.. पण तो हार मोडू नको. जसा च्या तसा मला दे. मी तो हार ठेवून घेणार. कायमचाच. "
हे ऐकून आजीपण फार खळखळून हसली फोनवरती.
संध्याकाळच्या दिवेलागणीच्या वेळ झालेली, म्हणून आजोबा मंदिराकडे निघाले होते आणि आजी त्यांना देण्यासाठी साखर फुटण्याच्या नैवेद्याची तयारी करायला गेली. जाता-जाता "आता ठेवते नंतर बोलू ग. फोन कर मग." म्हणत तिने फोन ठेवला.

आजीला वाटलं असावं मी मस्करी करतेय. पण नाही. लहानपणी मला शक्य न्हवतं, पण आता तो हार वाचवणं माझ्या हातात आहे आणि मी ते नक्की करणार.

आजीचं घर म्हंटल कि, महर्षी वि. रा. शिंदेंच्या साहित्यातील या काही ओळी नेहमी आठवतात.
'आजीचें घर धाब्याचें. जमीन धुळीनें भरलेली. न झाडावी तेंच बरें. सोपा कोठें संपला व गोठा कोठें सुरू झाला हें तीन आठवडे राहिलों तरी समजलें नाहीं.
खोलींत दोन मडकीं, एक काथवट व एक भला मोठा पाटा. तो सुध्दां कधीं उभा करावयाचा नाहीं. मग धुवायची गोष्ट कशाला !
मीठ असेल तर लसूण नाहीं व दोन्ही असलें तर मिरची नाहीं, हें रोजचें रडगाणें. तरी तिची तांबडी भगभगीत मिरच्यांची चटणी, घट्ट ताक आणि ताज्या शाळूच्या भाकरी हें जेवण आम्हांला परमामृतासारखें गोड लागे.

*****

https://siddhic.blogspot.com

मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०२१

ती सध्या गोळ्या घेते.

               

           


                    'पूजेचं साहित्य, पोथ्या-पुराणे, समई, ताम्हण, तांब्या-पळी आणि मिठाई सार काही आणून झालं होत. सगळं व्यवस्थित एका जागेवर ठेवून तात्या देवघरातून आतमध्ये किचनमध्ये वाकून ओरडले.'

" माई धूप-दीप लावला का? अगरबत्ती आहे ना? कि आणू. पूजेला ताजी-ताजी फुलं आणली आहेत, परडीमध्ये बघ."

 

" होय, झालं हो सगळं. तुम्ही पूजेला सुरुवात करा."   माई ओटीवरून उठून देवघराकडे वळल्या.

 

" सरीता, नैवेद्य झाला का गं? "   तात्यांनी पुन्हा आवाज दिला.   

 

" होय बाबा, आणते. "   हातातील  नैवेद्याचे ताट देवघरात ठेवत सरिता पुन्हा किचनकडे निघाली. आतून येणारा सुग्रास जेवणाचा सुवास नुसता घरभर दरवळत होता.  गावठी तांदळाचा मऊसर भात, जिऱ्याचं वरण, पालेभाजी, बटाट्याची उकड भाजी, कडधान्याच्या उसळी, साजूक तुपातील शिरा, अळूवडी, कोवळ्या काकडीचे रुचकर घारे, सोबत तळणीच्या पापड-फेण्या आणि घरचं कच्च्या कैरीच गोडं लोणचं असा मोठा जंगी बेत सुरु होता. आणि करणारी हि एकटी सून.

 

" पंचामृत? "    तात्यांनी पुन्हा आज्ञा सोडली.

 

" हे घ्या."   म्हणत हातातील पेला पाटावर ठेवून माई समोर हात जोडून बसल्या.  पदराच्या टोकाला हात पुसत सरिताही येऊन त्यांच्या शेजारी उभी राहिली. देवाला हळद-कुंकू वाहून झाले, नैवेद्य दाखवून तात्यांनी घंटी वाजवायला सुरुवात केली होती. आणि धपकन शेजारून आवाज आला. काय झालं समजेपर्यंत सरिता उभ्या जागी भिंतीला लागून कोसळली होती. हातातील ताम्हण खाली ठेवून तात्या त्वरित तिच्या जवळ आले. माईही तिथेच खाली बसल्या.

 

" सरिताsss, सरिताsss काय झालं. "

 

" सुनबाई उठ, काय होतंय, चक्कर आली का? "

 

तात्या आणि माई तिला उठवत होते. पण बराच वेळ झाला सरिताने हू कि चू केले नाही. शेवटी बाजूचा फोन उचलून त्यांनी आपला मुलगा आनंदला त्याच्या कार्यालयातून ताबडतोब बोलावून घेतले. एक तासाभरात तो घरी आला, सरिता तोंडावर पाणी मारल्यावर ती कशीबशी शुद्धीवर आली. पण  तिच्या अंगात शक्ती नव्हती. चालताना पाय लटपटू लागले होते. शेवटी माई आणि आनंदने तिला गाडीमध्ये बसवून दवाखान्यात दाखल केले.

 

आनंद सरिताचा हात धरून आतमध्ये घेऊन आला. तपासणी करून झाली होती. काही टेस्टही पार पडल्या. समोरच्या खुर्चीवर डॉक्टर बाई बसल्या होत्या. त्यांनी हात करून त्या दोघांना बसायला सांगितले.

 

" ताई, तुम्ही किती दिवस त्या गोळ्या घेताय? पाळी पुढे जाण्यासाठी. " डॉक्टर बाईंनी सरिताच्या थेट प्रश्न केला.

 

" पंधरा-वीस दिवस झाले असतील." सरिताने जरा घाबरत घाबरत उत्तर दिले.

 

" आणि याआधी केव्हा घेतल्या होत्या? कोणत्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेताय कि असच? "   डॉक्टर बाईनी पुन्हा प्रश्न केला.

 

" , असच थोडं मैत्रिणीला विचारून. ती ज्या गोळ्या घेते, त्याच तिने मला घ्यायला सांगितल्या. "  काहीतरी सारवा-सारव  करत सरिता उत्तरली.

 

" यापुढे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अश्या कोणत्याही गोळ्या घायचा नाहीत. कोणत्याही गोळ्या देण्याआधी पेशंटची हिस्ट्री महत्त्वाची असते. बाईला जर व्हर्टिगोचा, मायग्रेनचा त्रास असेल, आधी कधी स्ट्रोक येऊन गेला असेल, हाय किंवा लो ब्लडप्रेशर असेल, तिचं वजन जास्त असेल तर या गोळ्यांचा त्या बाईला जास्त त्रास होऊ शकतो. तसेच स्त्रियांचा आहार-विहार यावरही या गोळ्या घ्यायच्या कि नाही, हे अवलंबून असते."

 

" म्हणजे डॉक्टर? त्यामुळे त्रास होतोय का मला? "

 

" होय.  या गोळ्या नक्की काय काम करतात हे तुम्हाला माहित आहे का? आणि त्याचे दुसपरिणाम ? " 

डॉक्टरानी सरिताच्या आणि तिच्या नवऱ्याला प्रश्न केला.आणि सरिताच्या त्यांच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघता नकारार्थी मन डोलावली. तश्या त्या स्वतःतच पुढे बोलू लागल्या.   

 

" इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टोरॉन असे दोन हार्मोन्स स्त्रियांच्या शरीरात असतात, त्यावर पाळीचं चक्र आधारित असतं. पाळी उशिरा यावी म्हणून या हार्मोन्सच्याच गोळ्या घ्याव्या लागतात. एका परीने या गोळ्या हार्मोन्सच्या चक्रावर परिणाम करतात. नैसर्गिकरित्या चाललेलं पाळीचं चक्र पुढेमागे केल्याचे अनेक वाईट परिणामही होऊ शकतात.  या हार्मोन्सचं सातत्यानं अतिसेवन केलं तर ब्रेन स्ट्रोक, पॅरालिसिस, फिट येणं अशा केसेस पाहायला मिळतात.  पाळी लांबवण्यासाठी बायका दहा-पंधरा दिवस या गोळ्या घेत राहतात, त्याही हाय डोसमध्ये ...  त्याचे परिणाम फार घातक असतात. अशा गोळ्यांमध्ये progesterone असतात. त्यामुळे त्याचा दुष्परिणाम progesterone चे प्रमाण वाढल्यासारखाच  असतो.  तुम्हाला चक्कर येणे, थकवा जाणवणे, मळमळ, उलटी येणे, केस गळणे अश्या समस्या होत आहेत. पण तुम्ही यापुढेही अश्या कोणत्याही गोळ्यांचं वारंवार सेवन केलं. तर तुम्हाला Anaphylactic reaction, Vaginal inflammation, एडिमा, हिपॅटायटिस, हायपरटेन्शन असे गंभीर आजार देखील होऊ शकतात."

 

" डॉक्टर, पाळी लंबवण्यासाठी मी दुसरा काही उपाय करू शकते का?  आमच्याकडे ऑगस्ट महिना आला की सणवार सुरु होतात. पंचमी, मग पॊर्णिमा, त्यानंतर अष्टमी , मग आले गणपती...  उपासतापास, पूजापाठ, आरती, नैवेद्य हे सगळं करावं लागत, घरी करणार दुसरं कोणीही नाही.  एरवी ठीक आहे पण सनवारी पाळी आली तर घरी अजिबातच चालत नाही. मग मला या अश्या गोळ्या वारंवार घ्याव्या लागतात. "   

सरिताने मुद्दामच डॉक्टरांच्या समोर हे सर्व सांगितले, त्यामुळे अप्रत्यक्षपणे तिने नवऱ्यासमोर आपली बाजू ठेवली होती.  कारण या गोष्टींचा तिला देखील शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत होता. लग्न झाल्यापासून गेली पाच-सहा वर्षे याआधी तिने कधीही बोलून दाखवले नसले तरीही नाईलाज म्हणून तिला या गोळयांचा वापर करावा लागत होता.

 

" बायका पाळीत मंदिरात जात नाहीत, सणावाराच्या वेळेस गोळ्या घेऊन पाळी पुढे ढकलतात, उलट पाळी पुढे जाण्याच्या गोळ्या घेऊन उपवास करतात, मग त्याचे शरीरावर अजूनच वाईट परिणाम होतात.  हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामुळे त्यांना पुढे शारीरिक व्याधीना बळी पाडावे लागते. हि गोष्ट तुम्ही तुमच्या आई-बाबांना समजावून सांगा. नाही जमल तर त्यांना इथे घेऊन या, मी समजावते त्यांना.  देव असं म्हणत नाही, की पाळीत माझी पूजा करू नका किंवा धार्मिक कार्य करू नका. त्यामुळे चुकीच्या समजुतींमुळे आरोग्याशी खेळू नका. मासिक पाळी ही अपवित्र नाही. ते निसर्गाचं देणं आहे. ते आनंदाने स्विकारलं पाहिजे. तरीही तुमच्या रूढीपरंपरा असतील तर अश्या दिवसात देवाच्या पूजेची, नैवेद्याची तयारी करण्यासाठी काहीतरी दुसरी सोय करा, पण स्त्री आरोग्याशी खेळू नका. "

 

डॉक्टर बाई सरिताच्या नवऱ्याला समजावत होत्या.  आनंद देखील मनोमन खजील झाला होता. त्याला कधीही ध्यानी मणी नसलेल्या अश्या बऱ्याच गोष्टी समजल्या होत्या. डॉक्टर बाईंचे आभार मानून सरिताला घेऊन तो घरी जायला निघाला. घरी पोहोचल्या पोहोचल्या तात्या आणि माईला या सर्व गोष्टी सांगणार. अगदी निःसंकोचपणाने दोघांनाही विश्वासात घेऊन समजवून सांगितले पाहिजे. हे त्याने मनाशी पक्के केले.

 ------------------------------

 समाप्त

https://siddhic.blogspot.com

सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१

चारच दिवस का?



 ' शालीनी ताई हात धुवून किचन मधुन बाहेर आल्या. तृप्ती आणि रवी आपली तयारी करून निघणारच होते. त्यांना बघताच शालीनी ताईंचा पारा चढला.'

" रवी तिला चिकटून चालू नको‌. आणि हो तू मागच्या सिटवर बसतेस ना? की सगळं मेल सरमिसळ करून टाकता? "

" हो आई. मागेच बसते ती."  रवी लॅपटॉप उचलत म्हणाला.

" अग सुनबाई, हे काय? आज दुसरा दिवस ना तुला. केसांवरून पाणी घेतलं नाही. "
शालीनी ताईंच्या या वाक्यासरशी तृप्ती ही चा पारा चढला. आधीच उशीर झाला होता. एक क्लाईंन्टची अर्जंट मिटिंग होती आणि त्यामध्ये हे काय आता नवीन. त्यामुळे ती थोडी चिडली होती.

" आई, काल केसांवरून पाणी घेतलं ना. रोजरोज केस धुवावेत असं कुठे लिहिल आहे. आणि एवढ केसात काय अडकुन पडलं आहे? रोज ते ओले केस बांधून

ऑफिला जायचं का? "


" अगं, रोज केस धुतले की काही बाधिकार नसतो. आपण हे चार दिवस पाळतो ना. मग व्यवस्थित करावं. चारच तर दिवस असतात ना."  शालीनी ताईं तिला समजावत म्हणाल्या.

" हो आई, अहो पण चारच दिवस का? मला तर फक्त दोनच दिवसांची पाळी असते. तरीही चार दिवस पाळायचे?"

" अगं आधीपासून आपल्या घरी चालत आलेली परंपरा आहे. आम्ही सगळ्यांनी पाळणूक केली आहे. आमच्या सासूबाई तर खाष्ट होत्या. कुठे हात लावू द्यायच्या नाहीत. चार दिवस अगदी कडक."

" आई, वन्स ना तर सात दिवस त्रास होतो. मग त्या तर चौथ्या दिवसांनंतर अख्या घरभर फिरत असतात. मग पाळणूक नक्की कशासाठी?"   तृप्ती देखील आता संतापली होती. हे अर्धवट चाललेले पाळणूकीचे प्रकार तिला अजीबात मान्य नव्हते. तरीही एवढे दिवस शांत राहून तिने मुकाट्याने सगळे सहन केले. आता नाही, तिने रवीला थोडावेळ थांबायला सांगितले आणि आपला विषय अगदी समजेल अशा सोप्या भाषेत पण उदाहरण देऊन स्पष्ट केला.

" आई, मी तुमच्या भावना समजू शकते. पण तुम्ही देखील काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्या आहेत. मी एका कॉरपोरेट ऑफिसमध्ये प्रोजेक्ट हेड आहे. कालच एक सव्वा दोन कोटींचा प्रोजेक्ट जवळपास कोटी च्या बजेटमध्ये बसवून कंपनीला कितीतरी लाखांचा फायदा कमवुन दिला आहे. मग तिथे जर काही तोटा, काही अपशकून झाला नाही, तर इथे घरी आपण एवढी अंधश्रद्धा का पाळतो? फक्त पुर्वीपासून चालत आलेल्या परंपरा म्हणून, की खरंच काही तथ्य आहे यामध्ये, यांचा विचार करायला हवा. " 

शालीनी ताईंनी तोंडाला पदर लावला, सोफ्यावर रवीच्या शेजारी बसत बसत त्यांना भरुन आले.
" आम्ही बापड्या या पाळी वरुन खुप अवहेलना सहन केली. सासुबाईंचे खुप त्रास सहन केले. पण तोंडुन एक अक्षरही काढले नाही."

" आई, तू एक अक्षरही तोंडुन काढले नाहीस, म्हणून तर तुला विनाकारण त्रास सहन करावा लागला. पण म्हणून वस्तुस्थिती नाकारता येत नाही. आवाज उठवला तरी. विरोध केला तरच काही तरी नवीन बदल घडतील ना."
रवी त्यांची समजूत काढू लागला.

" आई वाईट वाटुन घेऊ नका. आपण स्त्री आहोत. आणि मासिक पाळी हे आपल्या स्त्रीत्वाचे मुळ. विनाकारण आपण विटाळ मानतो, पण त्याच चार दिवसांमूळे तर ही मानव सृष्टी आहे."
तृप्ती देखील त्यांच्या शेजारी उभी राहून समजूत काढू लागली.

" बरं बाई, तू नको पाळत जाऊस, हे चार दिवस. काही हरकत नाही माझी." शालीनी ताईं शांत होत म्हणाल्या.

" आई, खरंच?" तृप्तीला देखील आनंद झाला.

" हो. तुला मनाला वाटल तर पाळत जा. नाहीतर नको. मी सक्ती करणार नाही तुला. "

रवी आणि तृप्ती आनंदाने घरा बाहेर पडले. जाताना आईला म्हणाले, 'आई आपण या विषयावर एकत्र बसुन शांतपणे विचार करु, आणि मग एकमेकांना समजून घेऊन काय तो निर्णय घेऊ.'

शालीनी ताई देखील 'हो' म्हणाल्या.


समाप्त.

शनिवार, १३ मार्च, २०२१

१४ फेब्रुवारी...

 १४ फेब्रुवारी...


१४ फेब्रुवारी...
Valentine च यंदाच गीफ्ट, ते म्हणजे माझा कोरोना टेस्टचा आलेला रिपोर्ट.
detected म्हणजेच Positive ! Sad Sad Sad

बघता क्षणी मला घाम फुटला होता. एवढी काळजी घेतली तरीही?  कसं काय?  का?  काही समजेना. काय करावे सुचेना.नवरा सुदधा कोवीड positive.  एवढं कमी काय तर एक-एक करत घरातील इतर संगळ्यांचा रिपोर्ट positive आला.  सासू-सासरे, नवरा सगळे admit झाले. माझ्यासाठी तो पर्याय राहिला नाही. पाच महिन्यांच माझं छोटंसं पिल्लू... ते पण फक्त दुधावर अवलंबून, त्याला कुठेही ठेवता येत नव्हते. माझ्याशिवाय कुणाकडे ही जास्त वेळ राहत नाही. फॅमिली डॉक्टरांना विचारुन पाहिले. 'लहान मुलांची प्रतिकार शक्ती मोठयांपेक्षा चांगली असते, त्यामूळे तुम्ही बाळाला तुमच्या जवळ ठेवू शकता.  फक्त योग्य ती काळजी घ्या. मास्क लावा, समोर खोकू नका, sanitizer वापरा, वारंवार हात धुत जा...कोरोनाचा काही त्रास होणार नाही.' असा सल्ला मिळाला आणि त्यामुळे जीवात-जीव आला.

बाळाला घेऊन होम क्वारंटाइन राहण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. रिपोर्ट पाहिला तेव्हा एका क्षणी डोळ्यासमोर अंधारी आली होती. पण हार पत्करली नाही. आधी नेटवरती घरगुती उपचार शोधले. एक लिस्ट तयार केली. विज्ञान तंत्रज्ञान, वैद्यकीय उपचार कितीही पुढे गेले, तरीही आपल्या आयुर्वेदाला कशाचीही तोड नाही. आयुर्वेदिक काढा, लिंबू-तुलसी रस, आद्रक, गवती चाहा, ओली हळद हे सारे रामबाण उपाय सापडले. बिग बास्केट ने घरी सुद्धा पोहोचविले. कोरोना म्हटलं की शेजारी-पाजारी, नातेवाईक सगळेच सोयीस्कररीत्या पण अप्रत्यक्षपणे वाळित टाकतात. दाखवायला वरवरची आपुलकी बाकी वेळेला कोणी नाही. यामुळे सगळं काही स्वतःच ऑनलाइन मागवलं होत आणि सुरुवात केली. या प्रसंगी जे उपयोगी पडलेल्यां पैकी महत्वाचे म्हणजे ते म्हणजे सुर्वे काका आणि मावशी, मावस बहीण दिक्षिता तसेच आमच्या वहिनी यांचे व्यक्तिश: आभारच मानावे लागतील. 
रुग्णालयात घरचे सगळे ट्रिटमेंट घेत होतेच आणि मी घरुन. माझ्या छोट्याशा पिल्लूला फक्त दुधा पुरतेच जवळ घ्यायचे. नाहीतर ते आपलं टुकू टुकू वाट बघून रडून एकटंच झोपायच. त्याला रडताना बघून आपल्या आणि इतरांच्या निष्काळजीपणाची सारखी आठवण व्हायची. दारातूनच नुसती माझी झलक जरी दिसली, तरी हुंकारे देऊन हात पसरणार ते माझं पिल्लू बघून डोळे सारखे भरायचे.  ती वेळ आणि ती परिस्थिती खरंच शब्दात नाही सांगता येणार. 

एक आठवडा असाच ढकलला. मग शेवटी एकदा माझी आई आली, तिला माझी अवस्था पाहवेना. खरच एक आईच आईची अवस्था समजू शकते. तिचे उपकार मी या जन्मीच काय, सात वेळा जन्म घेतला तरीही फेडू शकत नाही. तिच्याकडे बाळाला सोपवल्यानंतर मला हायसे वाटले. मग मात्र मी स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले... तिथेच सार खाणं-पाणी चालू होत. इकडे मी आणि होस्पीटल मध्ये घरचे बाकीचे अशी टांगती तलवार डोक्यावर होती. त्यातून पण सगळ्यांना माझीच जरा जास्त काळजी, कारण रुग्णालयात मिळाणारी ट्रिटमेंट म्हणजे सलाईन, इंजेक्शन यातले काही मला घरी मिळत नव्हते. पण काहीही झालं तरी सगळ्यांनी यातून बरं व्हायचं आहे. बास्स! दुसरा कसलाही विचार मनात येऊ दिला नाही.

नवव्या दिवशी रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि मी जिंकले. सुदैवाने मला शुगर, ब्लड प्रेशर नाही किंवा कोणतीही शस्त्रक्रिया झालेली नाही, कोणत्याही प्रकारचा आजार नसल्याने, फक्त घरगुती उपाय केले. त्याबरोबरच'पॉझिटिव्ह एनर्जी, विल पॉवर' आणि celine 500, raricap या दोन गोळ्या याच्या जोरावर पळवल त्या कोरोनाला. जवळपास एक महिना गेला या सगळ्यामध्ये, तो जो काही काळ होता, जणू काही आमच्यासाठी काळच थांबला होता, अस सारख वाटायच. आता हळूहळू सार काही पुर्ववत होत आहे. घरचे बाकीचे सगळे ही बरे होऊन घरी आले आहेत.

थोडक्यात हेल्दी खा आणि हेल्दी रहा. आरोग्य जपा. पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला खुप कणखर बनवते. मनात सतत सकारात्मक विचार करत राहिल तर पन्नास टक्के आजार तिथेच गायब होतो. सगळा रोगप्रतिकारशक्ती चा खेळ आहे बाकी काही नाही.

मी घरी करत असलेले काही साधेसोपे उपाय -
*रोज सकाळी उपाशीपोटी एक कप गरम काढा.
(लवंग ४, काळीमिरी ४, एक काडी दालचिनी, एक टिस्पून ओवा, एक टिस्पून ओली हळद, आर्दक एक इंच, तुळस पाने ८-१०, लिंबा एवढा गुळ यामध्ये चार पेले पाणी घ्यावे, ते दोन पेले होईपर्यंत आटवून तयार केलेला काढा. )

*रोज २-४ उकडलेली अंडी.

*सफरचंद, संत्री दोन्ही रोज एक-एक. उपलब्ध असल्यास किवी, ड्रॅगन फ्रुट सुद्धा खावे.

*पाणी गरम करून त्यात थोडी हळद घालून पिण्यास घ्यावे. गरम दूध मध्ये देखील हळद घालून ते पिण्यास घ्यावे.

*सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि संध्याकाळचे जेवण वेळेवर आणि भरपूर करावे. शक्यतो खाण्यामध्ये जास्त अंतर ठेवू नये. हिरव्या भाज्या-मोडाचे कडधान्य ई चा समावेश करावा.

*जेवनात तेलचा वापर अगदी कमी करावा.

*थंड पाण्याचा वापर टाळावा.

*रोज मीठ व कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्यात.

*सकाळी आणि संध्याकाळी कपूर आणि निलगिरी तेल टाकून वाफ घ्यावी.

(एखाद्याला कोरोना पेशन्टला याचा फायदा व्हावा या एकमेव हेतूने, फक्त एक अनुभव म्हणून मी हे इथे शेअर करत आहे.)
सिद्धि चव्हाण
https://siddhic.blogspot.com

शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०१९

just cut my hair short

एका छोटेखानी पण प्रोफेशनल पार्लर मध्ये ' ती ' वाट बघत बसलेली आहे . काही तरुणी , मध्यम वयाच्या स्त्रिया , अगदी नववधू देखिल, असा बर्यापैकी लावाजमा अवती-भोवती पहायला मिळतो . कोणी नुसतीच चेहर्यावर रंगरंगोटी चढवत आहे.  तर कोणी भारीतले स्पेशल फेशियल, कोणि ब्लिच आणि काय-काय ते सगळ मेकपचेकप करण्यात दंग आहेत.  मध्येच हसण्या खिदळण्याचा आवाज . यात भर म्हणुन काही-बाही बायकांच्या रंगलेल्या गप्पाठप्पा.
पण तीचा चेहरा मात्र भावभावनांचा लवलेशही नसलेला, अगदी पांढरा फट, निर्विकार...
" टिंग...टिंग.....नेक्स्ट कस्टमर प्लिज ! "
नंबर आल्याच समजल्यावर ती आतमध्ये चेअरवर जाऊन बसते.
हेअरड्रेसर : येस मॅम ?
ती : कट माय हेअर.
हेअरड्रेसर तीच्या काळ्याभोर, मुलायम कमरेपर्यंतच्या लांब केसावर हात फिरवत विचारते, " can i do layers ? your hair is so beautiful. "
ती : just cut my hair short . (धीरगंभीर, निर्विकार स्वर )
५-१० मिनीटामध्ये तीचे बर्यापैकी कापलेले केस फ्लोअर वरती पडलेले आहेत.
हेअरड्रेसर : see mam... it looks good.
" no....Cut it Short Please. "  अगदी शोल्डरच्या थोडेसेच खाली असे रुळणारे,  छानशा स्ट्रेटकट मध्ये तीला मस्त शोभुन दिसणारे आपले केस क्षणभर पहात तीने सांगीतले.

अजुन थोडे, अजुन थोडे असे करता-करता आता बरेचसे केस कापुन झालेले आहेत . ते निर्जीव केस तीच्यापासुन अलीप्त होऊन खाली असाह्यतेने विखुरलेले. छानसा डुलणारा Choppy Bob cut आरश्यात पाहुन एका क्षणासाठी स्तब्ध झालेली तीची नजर.... थोडीशी साशंक आणि आश्चर्याने तीच्याकडे पाहणारी पार्लरवाली आणि इतर कस्टमर्स...दोन मिनीट....एक भयान शांतता...

हेअरड्रेसर :  now is it ok mam ?
ती :  no. Make it even shorter.

अगदी शेवटी ती तीचे केस दोन्ही हातानी घट्ट पकडून ओढुन बघते.... अजुनही केस सहजपणे हातामध्ये येत आहेत ते पाहुन हताश झालेल्या "ती"चे  शेवटचे वाक्य....." cut it short, so that no one can hold me by my hair...no one can hold it like this again. "


the real reason why she wants her hair cut. because it’s been used by an abuser to hurt her.



*****


https://www.youtube.com/watch?v=Ckr4zzUyd64 - International Women's Day | Jui - 
ही एक  बेंगॉली शॉर्ट अ‍ॅड आहे. बघताना सुन्न झाल, अगदी Speechless.






'ती' ही जी कोण 'ती' आहे, ती तुझ्या-माझ्या मधलीच एक आहे.
केस म्हणजे स्त्रिच सौंदर्य... तीला पाहीजेत तर ती केस मोठे ठेवते.  तीला पाहीजेत तर ती ते वाढवते, कीवा अगदी छोटे करते . पण हे सगळ तीच्या आवडी-निवडी नुसार आहे. आपल्या केसांना पकडुन-ओढून आपल्याला वेदना देतात. त्रास देतात आणि मारहान करतात.  म्हणुन तू तुझे केस कापलेस, पण जर कोणी तूझा हात पकडुन तो तूझी छेडछाड करत असेल , किवा हात पिरघळत असेल, तर तू काय तूझा हात कापणार आहेस ? का तर कोणी हाताला धरुन आपल्याला ईजा करु नये म्हणुन ? उद्या कोणि तूझा गळा पकडला, म्हणुन तू गळा कापुन आत्महत्या करणार ! नाही ना ? नाहीतर तूच तूझ अस्तित्व संपवण्यासाठी जबाबदार ठरणार आहेस. हे तूझ्या अस्तित्वावर उठलेले हात मग कोणाचेही असोत.  तूझ्या केसापर्यंत आलेले तूझ्या गळ्यापर्यंत येण्याच्या आतच त्याना त्यांची जागा दाखवून देण्याची सद्ध्या  गरज आहे .

माझी एक मैत्रिण, जी अगदी साधी-भोळी. एवढी की नेहमी साधा ओढणीचा ड्रेस घालणारी.  तीला दुसर्या स्टायलीश कपड्यामध्ये याआधी पाहील्याचे मला कधी आठवत नाही.....मागे तीला जिन्स-कुर्त्यामध्ये पाहुन मला फार आश्चर्य वाटले.

'suddenly changed ?'  म्हंटल्यावर ती सांगत होती.  ट्रेनने प्रवास करताना गर्दीचा फायदा घेऊन कोणितरी तीची ओढणी खेचत होते.... ती अक्षरश्या गर्दीमध्येच खाली पडली. कोसळली.  गर्दीमध्ये चुकुन असे झाले यातलाही हा प्रकार नाही. कारण तीच्या बरोबर प्रवास करणार्या एका माणसाने तीला सांगीतले की, बाजुने जाणार्या एकाने तीची पर्स ओढण्याच्या नादात ओढणी खेचली होती.
'आता जॉब सोडू शकत नाही. कीवा ट्रेनचा प्रवासही टाळू शकत नाही. मग काय ? तर ती ओढणीच काढुन तीने खुंटीला लावली.'

परिस्थिती नुसार स्वतःमध्ये बदल घडवण्याची गरज आहे, पण आपल्या अस्तित्वाला तडा जाऊ न देता. आणि आपल्या मधल्या प्रत्येक 'ती' ने याची सुरुवात केली पाहिजे. us women need to be brave. break  the silence and fight for yourself.

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

" गोष्टी फ़राळाच्या "




प्रत्यक्ष दिवाळीला १५-२० दिवस शिल्लक असतात, पण दसरा होतोन-होतो तोच दिवाळी जवळ आली की, काय काय करायचे याची चर्चा घरोघरी सुरु होते. याबाबतीत घरातील वडीलधारी मंडळी जरा जास्तच संवेदनशील असतात. " अरे आरामात काय बसलाय ? साफसफाई कधी करणार ? भांडी घासायची आहेत. रंगरंगोटी करायची आहे. बापरे फराळाच काय ? "  असे म्हणत एखादी आजी फराळ या मुद्द्यावर येऊन एक मोठा पॉस घेते. आणि रमून जाते ती,  गेल्या वर्षीच्या फराळाच्या आठवणीत. घरी काकु , आत्याबाई , मावशी अश्या कोणकोण सगळ्याच मग तीच्या शेजारी येऊन बसतात... आणि चालू होते फ़राळाच्या गोष्टीची ऊकळ-बेर !

" वन्स गेल्या वर्षी त्या पिंट्याचे आईने लाडू दिले होते काय म्हणून सांगू ....तोंडात टाकल्या-टाकल्या विरघळले की. "

आणि हो , त्या आक्काच्या नव्या सुनेने अनारसे केलेले , आठवतंय का हो ? काय चविष्ट होते सांगू...  आज कालच्या मुलीच हुशार बाई. नाहीतर त्या मामाच्या सुनेला काही धड करता येत नव्हते. " असे म्हणत आजी विषयाला हात घाली . ' मग शेजारच्या कोणाकोणाच्या चकल्या फसल्या , कोणाचे लाडू बसले, शेवेचा तर चुराच झाला , शंकरपाळे फसफसले आणि अनारसे कुस्करले . गेल्या वर्षीच नव्याने शिकुन तयार केलेला पदार्थ,   ते कळीचे लाडू खाऊन पोटात कळ यायला लागली, असे म्हणत मग सगळ्या खो-खो हसत. '

यात अगदी ५० वर्षापुर्वी आजीचं लग्न झाल होत तेव्हाची दिवाळी कशी साजरी केली जायची याचीही चर्चा होई . अशी तिखट-गोड पण खुसखुशीत चर्चा चविचविने चघळली जायची . मग यामध्ये काही असे विषय निघत जे दरवर्षी ऐकुन-ऐकुन कंटाळलेली कोणी काकु यामध्ये विषयांतर म्हणून आठवण करुन देत असे, " अहो सासुबाई ,  या वर्षीची काहीच तयारी झाली नाही. साफसफाईला सुरुवात करु म्हणते ! आणि माळ्यावर ची भांडी-कुंडी घासून-पुसुन ठेवू म्हणते. " अशी आठवण करुन दिल्याबरोबर सगळे महिला मंडळ तात्पुरती बरखास्त होई . आणि साफसफाई पासून सुरुवात होऊन त्याचा शेवट होई तो फराळानेच !


बहुतेक घरी आजही फराळ बनवण्याचा श्री गणेशा होतो तो चिवड्यापासुन ! सहज सोपा पदार्थ म्हणजे चिवडा.  चिवड्यासाठी पोहे पातळच हवेत , यामध्ये खोबर्‍याच्या चक्त्या सुद्धा पातळ असु देत, शेंगदाणे खरपुस तळावे, नाहीतर चिवडा खवट लागतो.  पुढे शंकरपाळे.... ते प्रमाणबद्ध हवेत , उगाच वाकडा-तिकडा, छोटा-मोठा आकार करु नये.  चणा डाळ चांगली भाजुन घ्या कच्ची रहायला नको... लाडू जास्त मोठा नको, तसेच नीट गोल गरगरीत बांधावा. चकलीची भाजणी व्यवस्थीत करावी, उडिद डाळ कमी घ्यावी , यात जुना जाडा तांदूळ वापरावा यामुळे भाजणी फुलते व चिकट होते चकल्या फुटत नाहीत आणि खुसखुशीतही होतात. करंजी नंतर ही खुसखुशीत राहायला पाहीजे.  मऊ पडता कामा नये यासाठी मैदा मळताना यात थोडे तेलाचे मोहन घालावे.

हुश्श्श  ! किती त्या सुचना.  यामध्ये घरी कोणाला डायबेटीस आहे हे पाहुन गोडाचे प्रमाण कमी जास्त केले जाते. तसेच म्हान-म्हातारी माणसे लहान मुलांचा विचार करुन तिकटाचे प्रमाण ही विचारात घेतले जाते. मागील फराळाच्या गप्पा, कडू-गोड आठवणी आणि त्यातून शिकलेले धडे, याचे मोजमाप समोर ठेऊनच प्रत्येक पदार्थ केला जातो.  यात अजीबात कोणतेही प्रमाण न लावता ओतपोत घेतला जाणार एक त्रुप्त घटक म्हणजे त्या गृहिणीचे प्रेम ! रात्र-रात्र जागुन हे पदार्थ बनवताना येणारा थकवा, आपली पाठदुखी , कंबरदुखी, जागरण हे सगळ सहन करुन आपल्या कुटुंबाच्या दिवाळीमध्ये खर्‍या अर्थाने आनंद भरण्याचा महत्वाचा वाटा कोणाचा असेल तर त्या गृहिणीचा !

अजूनही बऱ्याच ठिकाणी शेजारीपाजारी आणि नातेवाईकांना फराळाची ताटं किवा डब्बे पाठवण्याचा रिवाज आहे. कोणाकडे किती फराळ पाठवायचा ,  यामध्ये ते शेजारचे आपल्याला फराळ देतात की नाही . (खोखो स्माईली) गेल्या वर्षी बाजुवाल्या ताईने तीच्या फराळातून आपलेच लाडू आपल्याला परत दिले होते . समोरच्या काकुने तर उरलेला फराळ दिला होता. तीचे सगळे लाडू फुटलेले, करंजे तुटलेले आणि चिवडा पण चिवट  होता.  या वर्षी त्या दोघींना फराळ द्यायचा नाही असाही पवित्रा घेतला जातो.

तर बाबुच्या मम्मीने छान खुसखुशीत फराळ दिला होता. आणि अनारसे तर फारच चविष्ट करतात त्या,  असे म्हणत त्यांच्या डब्यात दोन एक्स्ट्राचे लाडू भरले जातात. (स्माईली)

प्रभात समई उटण्याची आंघोळ , नविन कपडे, घराची रंगरंगोटी झाली, दिव्याची आरास सजली, दाराला तोरणे आणि फुलापानांची माळा गुंफल्या, की शेवटी अंगणात रांगोळीचा सडा पडतो आणि मग  एकत्र बसून फराळाचा फन्ना उडवला जातो.

डायबेटीस असुनही एखादा मुगाचा लाडू गपकन तोंडात टाकला जातो, ' जरासे शंकरपाळे बघते ' म्हणत डिशभर शंकरपाळे आणि वर दोन करंजा रिचवुनही अजुन काहीतरी खावे असे सारखे वाटत रहाते.
दिवाळी आणि फराळ याचे गणितच वेगळे. फराळाशिवाय दिवाळी हे समीकरण जुळतच नाही. थोडा गोड, थोडासा तिखट व बराचसा खुसखुशीत चवदार असा ठेवा म्हणजे दिवाळीचा फराळ !

तर अशा खुसखुशीत फराळाच्या आठवणीनसह , दिवाळी सणाच्या तुम्हा सगळ्यांना थोड्याशा तिखट , जराशा आंबट पण खुपसार्‍या गोड-गोड शुभेच्छा !


( सिद्धि चव्हाण- ९८३३३२६६०९ )

गुरुवार, १ ऑगस्ट, २०१९

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय."
पण ते शक्य नाही!
किती काही मागे सोडलेले आहे आपण ! आणि किती काही जोडलय ?
' ती खटारा गाडी आणि नदिवरील उडी,
तिखट मीठाची कैरी आणि आजीच्या गोष्टी ऐकण्यात जागलेल्या रात्री,
खळयातील लंगडी, लपाछपी आणि पकडा-पकडी,
शाळेत न जाण्यासाठी केलेले बहाने आणि आईकडून मार खाने,
भातुकलीचा खेळ आणि शुभंकरोती ची वेळ'.

सारं काही निसटून गेल, गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी.
"प्लुटो कक्षा ओलांडून पुढे निघुन गेला ना तशाच काही गोष्टी आपल्या स्मृतीच्या दुनियेतून बाहेर निघाल्या आहेत! त्यांना उजाळा देउन, स्मृतीत ठेवण्यासाठीच हा पहीला प्रयत्न."
हा भाग कोकणी व इतर महाराष्ट्रातील अश्याच काही साधनां वरती आहे. हि साधने पूर्वी गावोगावी प्रत्येक कुटुंबाकडे वापरात असायची. आता क्वचितच कुठे पहायला मिळतात. अजुन काही वर्षांनंतर समुळ नष्ट होतील असं वाटतं. कालौघात या वस्तू केवळ स्मरणस्मृतीं मध्ये राहिल्या तरी फार झाल. चला तर सुरवातीला करते जात्या पासून.
१) जाते-
धान्य दळून त्याचे बारीक पीठ करण्यासाठी जात्याचा वापर केला जातो (जायचा) . जाते वर्तुळाकार गोल दगडाचे असते. त्यामध्ये दोन तळ्या असतात. खालची तळी ही स्थिर आणि जड असते. वरच्या तळ्याला कडेला एक उंच लाकडी खुंटी असते. ही खुंटी हाती धरून वरची तळी घडाळ्याच्या विरुद्ध दिशेने फिरवतात. या तळ्याच्या मध्ये एक छिद्र असते त्यांतून थोडे थोडे धान्य टाकतात. आणि दोन्ही तळ्या एकमेकांनवर घासून धान्याचे पीठ होऊन तळ्याच्या कडाच्या फटीतून बाहेर येते.
जात -
जात .jpg
स्त्रिया या जात्यावर धान्य दळत-दळत असताना काल्पनिक गाणी रचतं, त्याला जात्यावरची ओवी असे म्हणतात.
"कल्पनांचच बघा ना कल्पना ही हवेसारखी असते. जिथे वाट मिळेल तिथे-तिथे जागा व्यापून टाकते."
जसं की या काही काल्पनिक ओव्या....
सरला माझा दळप
सती भरली गंगा
कापुराची आरती
मींया ओवाळी पांडुरंगा ||
सरला माझा दळप
सुप सारीता पलीकडे
सासरी नि माहेरी
राज्य मागते दोनीकडॆ ||
सरला माझा दळप
पीठ काढी मी परातीत
माझ्या त्या गुरुजीचा
नाव घेई मी आरतीत ||
सुंदर माझे जाते ग फिरते बहुत |
ओव्या गाऊ कौतुक तु येरे बा विठ्ठला ||
जीव शीव दोन्ही सुंडे ग प्रपंचाच्या नेटे ग |
लावूनी पाची बोटे तु येरे बा विठ्ठला ||
बारा सोळा घडणी औघ्या त्या कामिणी |
ओव्या गावू बैसूनी येरे बा विठ्ठला ||
सासु आिण सासरा दिर तो तिसरा |
ओव्या गावू भर्तरा तु येरे बा विठ्ठला ||
या ओव्या कित्ती सहजपणे रचल्या गेलेल्या आहेत . जात्या वर दळन करायचं काम फारच कठीण असत. गाण्याने काम करताना थकवा जाणवत नाही, म्हणून जात्यावर दळण दळताना स्त्रिया ओव्या म्हणत. त्यांत स्त्रीयांच्या मनातील अनेक भावभावनां व्यक्त झालेले आहेत. बर्याचदा देवांची नावे घेऊन ओवी रचल्या गेलेल्या आहेत, जणु स्त्रीया आपल्या भावभावना देवा समोर व्यक्त करतात. मला वाटतं आज बिझी माणसांच्या युगात भावना व्यक्त करण्याच काम त्या smiley बाईच चांगल करतात ! आणि ओवी चा म्हणाल तर सद्धयातरी 'वापर फक्त मुलींच नाव ठेवण्यासाठीच होतो' (ओवी शिंदे, ओवी देशमुख वैगरे वैगरे).
दुसर म्हणजे बहिणाबाईंच नाव आल की ओवी आठवते.
बहिणाबाईचे जतन केलेले 'जाते'-
बहिणाबाईचे जतन केलेले 'जाते'.jpg
तसं पण तो मिक्सर चालु केल्यावर त्याचाच आवाज नुकता, ओवी काय डोंबलाची सुचणार ?
" जात्यावर बसल्यावर ओवी सुचते ’ अशी म्हण मराठीत प्रचलीत होती, एखादी जबाबदारी स्वीकारली, कि ती पार पडण्यासाठी क्षमता आपोआप येते, या अर्थाने ही म्हण असावी."

२) पाटा वरवंटा-

पुरणपोळीसाठी डाळीचे पुरण, ओला किंवा सुखा नारळ घालून केलेली चटणी किंवा वाटली डाळ, आंबे डाळ, किंवा इडली-वडय़ासारखे दक्षिणी पदार्थ, मांसाहार किंवा मत्स्याहार करण्यासाठी जो ओला मसाला करावा लागतो आणि देशावर खर्डा वगैरे मसालेदार पदार्थ वाटून तयार करण्यासाठी पाटा-वरवंटा उपयोगी पडतो.
पाटा वरवंटा-
varvanta-pata_0.jpg
"आमच्या कोकणात नारळ विपुल प्रमाणात असल्यामुळे ओल् खोबऱ जणू स्वयंपाचा राजा" जेवणात नारळ नसेल तर जेवणाची सभा रुचकर असुनही आमच्यासाठी व्यर्थच. मग घरी नारळ वाटायला पाटा नसेल तर कसं चालणार??
माझ्या आठवणीप्रमाने पुर्वी दुपारच्या वामकुक्षी वर टाकी ( टाकी घालने म्हणजे घाव/घाला घालने अशी म्हण आहे ना) घालायला काही बायका यायच्या....'मध घ्याव मध, टिकली..य, बांगडी..य,फणी..य,पाटय़ाला.. टाकीय'.असं काही-बाई बोलायच्या. ज्यांच्या घरातील पाट्याला टाकी लावून घ्यायची असेल त्या बायका त्यांच्याकडे घरातील पाटा-वरवंटयाला टाकी लावुन घेत असत.
आणि हो पाट्या वरिल वाटपाच जेवण एकदा तरी खाव, त्याची चव आयुष्यात विसरणार नाही.

३) खलबत्ता-
खलबत्ता हा साधारण दगडी किवा अनेकदा धातुचाही असतो. यात एक दगडाचे उभट आकाराचे भांडे असते. आणि एक दगडी दंडगोलाकार काठी असते.
लोखंडी खलबत्ता -
लोखंडी खलबत्ता .jpg
सरण बारीक करण्यासाठी तुम्ब्याचा वापर केला जातो. एखादे मिश्रण तयार करण्यासाठी याचा वापर होतो. खलबत्ता हा पदार्थ बारीक कुटण्यासाठी वापरला जात होता. प्राचीन काळी औषधी-वनस्पती वाटण्यासाठी वापर होत असे. अजूनही गावामध्ये खलबत्ता वापरला जातो. आसडणे, भाजणे, परतणे, पीठ करणे, कुटणे किंवा वाटणे इत्यादी. त्यातील कुटणे ह्य संस्कारासाठी खलबत्त्याचा वापर स्वयंपाकघरात, मिक्सर येण्यापूर्वी बहुतेक ठिकाणी केला जात होता.
दगडी खलबत्ता-
दगडी खलबत्ता.jpg
खलबत्त्यातील खल म्हणजे लोखंडाचे कडा नसलेले एक लहान आकाराचे पातेले. आणि त्यासोबत एक चांगला वजनदार आपल्या मुठीत पकडता येईल असा साधारण फूटभर लांब असा दंडगोलाकृती लोखंडी दस्ता म्हणजे बत्ता. थोडक्यात बत्ता म्हणजे पितळीच जड दोडा ज्याने वस्तू कुटता येईल. त्याची एक बाजू पहारीच्या टोकासारखी पण अणकुचीदार नव्हे, अशी दोन्ही बाजूंनी निमुळती पण बोथट केलेली असते. खलबत्ता लोखंडी, दगडी तर काही प्रमाणात लाकडाच्या पाहूनही बनवला जातो, हे सगळ मजबूतीवर अवलंबून असतं.
अगदी छोट्या प्रमाणावर म्हणजे चहासाठी आलं किंवा फोडणीसाठी मिरच्या कुटणे वगैरे अशा कामापुरते हे यंत्र वापरले जायचे.
विशेषतः कोकणात कोणाच भांडणं वैगरे झाल तर 'खलबत्त्यात घालून ठेसू' असा वाक्यप्रयोग केला जातो. शब्दशः अर्थ नाही घ्यायचा, पण मरेपर्यंत मारू असा काहीसा अर्थ आहे. म्हणजेच मरेपर्यंत (चिजा/ धाण्य आपल्याला पाहिजे तेवढ बारीक होई पर्यंत) कुंटण्याच काम हे खलबत्त्याच. (कधिही न ऐकणार्याला शब्द थोडे विचित्र वाटतील ) 
नारायण पुरी, ता.लोहा, जि. नान्देड यानच एक छानस गाण आहे खलबत्त्यावर. एक-एक शब्द अफलतुन. मज्ज्या येते ऐकायला.
youtube Link https://www.youtube.com/watch?v=qoKLcEecVvU
"प्रेमाचा झांगडगुत्ता गं , जीव झाला हा खलबत्ता गं .
उखळात खुपसले तोंड प्रिये, मुसळाचा तुंबळ रट्टा गं " 


४) उखळ- मुसळ-
उखळ ही विविध प्रकारचे धान्य व शेतीमालावर प्रक्रिया करण्यासाठी बनविलेली वस्तू आहे. ही कठीण दगडापासून बनवली जाते. दगडाला खोलगट आकार दिला जातो. धान्य कुटण्यासाठी लाकडी मुसळ किंवा अखंड खोडाचा वापर केला जातो. उखळ या शब्दावरून अनेक वाकप्रचार व म्हणीही निर्माण झाल्या आहेत.
खळ-मुसळ पासुन प्रचलीत काही वाक्यप्रचार –
उखळ पांढरं झालं-खूप पैसा मिळणे, अवघें मुसळ केरांत- अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष होणें .
धान्य कांडले/सडणे तांदूळ ,तीळ ई. कुटणे यासाठी मजघरात दणकट लाकडाचे एक उखळ असे.
पूर्वी घरातील बायका दुपारच्यावेळी बेगमीची कामे करत असत. चटण्या, पापड, पापड्या, कुरडया इत्यादी गोष्टी घरीच केल्या जात. उखळ, धान्य सडण्यासाठी वापरले जात असे. गहू यात सडले जात. चटणीसाठी दाणे दगडी उखळात कुटत असत. त्या कुटलेल्या दण्याच्या चटणीची चव व मिक्सरमधल्या चटणीची चव यात फरक आहे. उखळातली चटणी चविष्ट लागते. उखळाचे बरेच प्रकार आहेत. जमिनीत पुरलेले उखळ, आणि एक जमिनीच्या वर उभे उखळ असे. त्याला उखळी म्हणत. जमिनीत पुरलेले उखळ तांदूळ सडण्यासाठी वापरले जात असे. एकत्र कुटुंबामुळे जे काय करायचे ते जास्तप्रमाणात करावे लागे. त्यामुळे उखळ मुसळ पण ब-यापैकी मोठे असे.
हे यंत्र मोठे असून दगडी किंवा लाकडी असायचं. मोठे कमरेच्या उंचीचे उखळ हे खोलगट बादलीप्रमाणे असून त्यात कुटण्यासाठी एक लांब दांडा म्हणजेच मुसळ वापरले जात असे. यात लाल मिरची कुटून मसाला करणे, पोहे कांडणे वा भात कांडणे अशा क्रिया केल्या जात.
उखळ- मुसळ-
लाकडी उखळ-मुसळ.jpg

५) व्हाईन / वायन -
हे ट्विटरने काढलेले व्हाईन हे लूप व्हिडीओ शेअरिंग अॅप नाही हा किवा जॉर्जियात सापडलेली 8000 वर्षं जुनी वाईन सुद्धा नाही. ही वेगळी आहे. विशेषत: कोकणात घरातच जमिनीत एक गोलाकार खड्डा करून त्यात घराच्या वापरापुरत्या थोड्या गोष्टी कुटण्यासाठी याचा वापर केला जाई . पुर्वी कोकणातील प्रत्येक घरामध्ये लाकडी किंवा दगडी व्हाईन असायची. व्हाईन किवा वायन असाही उच्चार करतात.
व्हायनात कुटण्यासाठी मुसळीचा उपयोग केला जायचा आणि त्याची माहिती वरती आलेली आहे.
व्हाईन / वायन-
व्हाईन-वायन .jpg

६) कणवा/ कणगी/डालगे-
पुर्वी भात ठेवण्यासाठी पिशव्यांचा उपयोग न करता बांबूच्या बेळांपासून तयार करण्यात आलेल्या कणगीचा वापर केला जात असे. ही कणग टोपलीप्रमाणे परंतु पाच ते सहा फूट उंच असते. पश्चिम महाराष्ट्रात याच कणवाला डालगे म्हटले जाते. आता प्लास्टिकच्या पिशव्या स्वस्त मिळतात. तसेच या कणगी तयार करणे आता बंद झाले आणि त्यांची किंमत सुद्धा प्लास्टिकच्या व गोणपटांपेक्षा जास्त असल्यामुळे या कणगीचा वापर करणे बंद झाले. आता कणवाची जागा प्लास्टिकच्या बॅरलने घेतली आहे.
धान्य साठवायच्या मोठ्या म्हणजे जवळपास पुरुषभर आकाराच्या वेताच्या पिंपाला कणगी म्हटलं जातं. एखादा माणुस नक्कीच मावेल एवढा आकार असतो. कणगी हा तर कोकणात हमखास आढळणारा प्रकार .
कोकणात दूध-दुभतं खूप असल्यामुळे अर्थातच शेणाला तोटा नाही. शेणाने सारवलेल्या जमिनीत ही कणगी शेणाच्याच साहायाने पक्की बसवली जाते. आणि तिला बाहेरून शेणाचा लेप दिला जातो. त्यामुळे कणगीची छिद्रे बंद होतात व थराच्या वासामुळे बाहेरून येणाऱ्या किडय़ांपासून धान्याचे संरक्षण होते. कणगीच्या तळाशी गवताचा थर दिलेला असतो. यामुळे आर्द्रता शोषून घेतली जाते आणि धान्य खराब होत नाही.
कणगी-
कणगी.jpg

७) डवली/डाव -
नारळाच्या करवंटीला वरून आडवी दोन भोके पाडून त्यामध्ये काठी घालून डवली तयार केली जायची. या डवलीचा उपयोग पूर्वी आमटी वाढण्यासाठी तसेच भात उकडल्यानंतर तो भात टोपलीत टाकण्यासाठी केला जात असे. आता स्टीलच्या विविध आकाराच्या चमच्यांमुळे या डवलीचा उपयोग आता केला जात नाही.
(दुर्दैवाने मला याचा एकही फोटो सापडला नाही, असेल तर क्रुपया पाठवा)
61SYz8_2BOZFL._SL1200_large.jpg
मोडर्ण डवली-





८) रोवळी/दुरडी अथवा लहान टोपली -

कडधान्यांना मोड येण्यासाठी ,तांदूळ ,भाजी धुणे इ साठी रोवळी वापरतात.
रोवळी म्हणजे वरती गोल पण तळाशी चौकोनी आकारात विणलेली छोट्या आकाराची उभट बांबूची करंडी.
रोवळी ही लग्नकार्यात सुद्धा वापरली जाते.
रोवळीत धान्य किंवा भाजी धुतली की पाणी जाळीतून आपोआप निथळून जातं आणि आतला पदार्थ सांडतही नाही.
रोवळी-
रोवळी.jpg
बांबू तासून त्याच्या पट्ट्या करून त्या पासून गोलाकार टोपली/ दुरडी तयार करतात. काही भागात टोपलीमध्ये जेवण ठेवण्याची पद्धत होती भाकरी सुद्धा ठेवली जाते .
टोपली-
दुरडी अथवा लहान टोपली.png
उस्मानाबादच्या आठवडी बाजारात दुरड्या विकणारी बुरुड समाजाची अनेक दुकाने आजही आहेत, तशी ती कोकणात ही काही प्रमानात सापडतात .

९) सुप-
सुप हा रोवळीची चा जोडीदार आहे. सुपाचा वापर धान्य निवडाण्यासाठी,पाखडण्यासाठी करतात.
सुफ आजही वापरात आहे पण पण थोड मोडर्न झालय, बांबूची जागा आता प्लास्टिक, स्टिल ई ने घेतली आहे.
सुप-
download.jpeg


वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय." पण ते शक्य न...