कोकण विशेष लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कोकण विशेष लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

राहिल्या त्या काही आठवणी (कोकण ) - २

(मागील भागात आपण वाचले की, मजल-दरमजल करत आपण घरापर्यंत पोहोचलोय. गावच्या वेशीपासुन ते घराच्या दारापर्यंतचा प्रवास  आपण वाचला. आणि त्याला भरभरुन प्रतिसादही दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार. या भागामध्ये आपण या सगळ्या आठवणींना असाच उजाळा देत सैर करुया कोकणातील माझ्या घराची. हाच प्रवास पुढे नेण्यापुर्वी मी या भागात  माझ्या कोकणातील टुमदार जुन्या घराच्या काही निवडक आठवणी मांडत आहे. खरतर कोकणातील  घराची वर्णन खुप ठिकाणी वाचायला मिळतात. पण तरीही माझ्या लेखमालीकेचा एक भाग म्हणून, मी इथे थोडक्यात घराचे वर्णन करत आहे. कारण पुढील भागातील पुष्कळशा आठवणी या घराच्याच आवती-भोवती फिरणार्‍या आहेत. )

कोकणातील घर म्हणजे एक टुमदार आयताकृती कलाकुसरीचा देखावाच. संपूर्ण घराच्या भिंती या मातीच्या किवा विटांच्या मापानी बनवलेल्या. त्यांना मस्त शेणामातीने सारवून गुळगुळीत केलेले असते. वरती कौलारु छत . वलई करुन पायाखालची जमीन देखील मस्त शेणामातीने सारवली जाते. सारवणे ही सुद्धा एक कलाच आहे . आता लादी-प्लास्टरच्या युगात सारवणे म्हणजे काय ? हे देखील खुप जाणना माहीत नसावे. मस्त रबरबीत शेणामध्ये थोडे पाणी घालुन दहीकाला प्रमाणे काला केला जातो. यातील थोडे-थोडे मिश्रण हातामध्ये घेऊन हातानेच जमीनीवर फिरवले जाते. खोलीच्या एका कोपर्यापासुन दुसर्या कोपऱ्यापर्यंत हेच शेणाचे मिश्रण हाताने फिरवत खाली-खाली आणले जाते. जमीनीमध्ये एखादा खाच-खड्डा पडला असेल, एखादी चिर पडली असेल, तर यावर मिश्रणाचा हात मायेने गोंजारला जातो,  तिची मरम्मत केली जाते . मग जमीन अगदी नव्यासारखी गुळगुळीत होते. आणि बैठक मारुन खाली बसणार्यालाही याचा आनंद मिळतो.
कधी झरझरत्या हातानी यावर राखुंडीची नक्षी , तर कधी नुसत्याचा थोड्या सागरलाट ओढुन ही जमीन सुशोभीत केली जाई.  उंबर्यावर याच रांगोळीने फुलवेलीची नक्षी काढली जाते . देवासमोर स्वस्तिक काढले जाते . या सगळ्यावर हळद-कुंकू वाहिल्या शिवाय या  सजावटीस पुर्णत्व  प्राप्त होत नाही. दार-खिडकीवर पान-फुलांच्या माळा गुंफल्या की  मग ते घर कोणत्याही सणा-समारंभासाठी सज्ज असे..... अगदी दिमाखात .  तो  शेणामातीचा दरवळ घरामध्ये एक विशिष्ट प्रकारची प्रसन्नता पसरवत असे.

कोकणात सर्वसाधारण घर आणि आजुबाजुचा परिसर याची रचना सारखीच असते.  सुरुवातीलाच एक बेडा लागतो. त्यानंतर दगड ,चिरे , विटा ,  यांच्या पासुन बनवलेल्या २-४ पायर्या . पायर्या चढुन वरती आल्यावर खळ लागत, तेही मस्त वलई करुन तयार केलेल.  वलई करणे म्हणजे जमीन करणे.  हे देखिल एक कौशल्ल्याचे काम. खळ्यातील, परसातील  आणि अगदी घरातील जमीनीची वलई केली जाते. या मध्ये त्या भागातील जमीन कुदळाने किवा खनतीने खणुन घेतली जाते.  खनलेली मोठीमोठी ढेकळे फोडुन सारखी करुन बारीक माती तयार होते.  यासाठी या ढेकळावर चोपण्याने जोराचा चोप दिला जातो.  ही बारीक झालेली माती काहीही चढउतार न ठेवता सरळ एकसमान अशी पसरवुन यावर पाण्याचा फवारा केला जातो. माती अगदी आतपर्यंत ओली होऊन मऊशार होई पर्यंत पाणी मारले जाते. अगदी यावर पाय ठेवला तर पायही आतमध्ये रुतेल एवढ्या प्रमानात पाणी मारुन या जमीनीवर हलकेच दाब दिला जातो.  ६-७ तासांमध्ये ही जमीन वाळली की मग परत २-३ वेळा यावर चोपन्याने दाब दिला जातो. यावेळी मात्र ही जमीन कुठेही उंचसखल राहणार नाही, याची काळजी घेतली जाते.  समांतर अशी जमीन तयार झाल्यावर यावर शेणामातीचे सारवण करुन दुसर्या दिवशी ही वलई केलेली जमीन वावरास योग्य अशी तयार होते. खळ्यातील वलई केलेल्या जमीनीवर भात वगैरे झोडले जाले,  अश्या वेळी या थोड्याशा ओलसर जमीनीत एखादा भातदाणा रुजुन वरती येई. आपली ईवलीशी पाने फडफडवत ताठ मानेने तो खळ्यामध्ये झोकात उभा ठाके. जणू येणार्या जाणाऱ्यांच्या स्वागतासाठीच त्याला नेमले असावे.
' डोंगर का पाणी' खेळण्यासाठी खळ प्रसिद्ध असे . खळ्याच्या कडेला अर्धगोलाकारपणे लावलेल्या दगडाला डोंगर आणि खळ्यामधील जमीनीला पाणी समजुन खळ्यामध्ये मस्त खेळ रंगायचा . आता कोणी असे खेळ खेळताना पाहील्याच अजीबात आठवत नाही.


दितील रंगीत गारगोटे ,फरश्यांचे वेगवेगळ्या रंगानचे तुकचे ईत्यादी पासुन बनवलेली तुळस घराच्या समोर पुर्वेकडील दिशेस उभी असे.  तिच्या समोर एखादे स्वस्तिक त्यावर थोडे हळदी-कुंकू, समोर एक दोन तगरीची फूले असत.  बाजुला एक तेवते निरांजन ही असे. तुळशीमध्ये एक-दोन अगरबत्ती रोवलेल्या असत. पुजेच्या वेळेस तुळशीला वाहीलेल्या दुर्वा ,  झेंडूची फुले तेथेच रुजुन तुळशी लगतच वृंदावनामध्ये दाटीवाटीने वरती पसरत.  घरासमोर खळ्याच्या दोन्ही बाजुला मस्त जासवंदि वाढत ... कर्दळीची बेटेच्या बेटे फुलून येत... अबोलीचे ताटवे बहरत.... सोनचाफा, निशिगंध , रातराणी ही फुलझाडे मात्र थोडी दुर कुंपणालगत लावलेली असत. त्याच्या वासाला जनावरे येत , म्हणुन अशी झाडे घरापासुन योग्य अंतर राखुनच लावली जात..

ग पुढे लागे, ते घरचे मुख्य प्रवेशद्वार ! घराचे दरवाजे... 'हो दरवाजा नाही.... दोन दरवाजे. ' , कारण तोही एकटा नसे.  एकमेकांच्या हातात-हात आणि गळ्यात-गळे घालुन मधोमध दोन दरवाजे अगदी दत्त म्हणून उभे असत.  कुंडी बाजुला सारली की हे दोन्ही दरवाजे कुरबुर करत एकमेकांन पासुन विलग होत. आजकाल एकटा-दुकटाच दरवाजा पहायला मिळतो....अगदी निराश आणि एकलकोंडा....त्यावर ही छोटस टाळ, जणु त्याची कुरबुर कुलूपबंद करण्यासाठी. पुर्वी मात्र ते दोघे सताड उघडे असत... एकमेकांच्या साथीने.

दारातुन प्रवेश झाला की आपण पडवी मध्ये पोहोचतो.  लाकडी गजाच्या मोठाल्या उभ्या-आडव्या बार्या असणारी पडवी. एका बाजुला दणकट लाकडाचा झुलता झोपाळा आणि  दुसर्या  बाजुला एक जुनाट लाकडाची पण पॉलिश केलेली आरामखुर्ची... बुजुर्गांच्या आठवणीची  निशाणी म्हणुन... त्यावर नायलॉनच्या ताठ धाग्यानी विनलेली झालर असे . उजव्या बाजुला अगदी कोपर्‍या सरशी एक भलामोठा लाकडी पेटारा दिमाखात बसवलेला असे.  घरातील जुन्यापुराण्या अवजड वस्तु , शेतीची हत्यारे-अवजारे अश्या सगळ्या प्रकारच्या अडगळीचा भार अत्यंत प्रेमाने यात सामावलेला असे. या सगळ्या लावाजम्यावरुन तुम्ही मनसुबे बांधू शकता की, या समोरच्या पडवीचा आकार किती मोठा असावा .

पुढे तीन बाजुनी भिंती आणि  समोरची बाजु उघडीच अशी ओटी पडवी ओटी लागे.  छोटीशी हवेशीर रुम म्हणजे ओटी. आमचा देवाराही ओटीवर असायचा. सोनं-नाणं सांभाळून ठेवण्याची जागाही माजघरातच असे. ' कोकणात घरोघरी गणपती येतात. तसेच शिमगोत्सावाच्या वेळी, देवाची पालखी किवा डोलारा ही घरी येतो. अश्या वेळी देवाला बसवण्यासाठी या ओटीची रचना केली, असे माझे अजोबा सांगायचे.'  हल्लीच्या  नविन घरानमध्ये ओटी असल्याचे जास्त पाहावयास मिळत नाही .

पुढे पडवी , त्या मागे ओटी आणि स्वयंपाकघराच्या मधोमध तयार होणार्या कोपर्‍यात माजघर असे. यालाच काही ठिकाणी  मजघर असेही म्हणतात.  ही अगदी ठेवणुकीची रुम.  पुजे पासुन ते  छोट्यामोठ्या  सण-सोहळ्यासाठी माजघर वापरले जाई.  आजीच्या चंची पासुन ते काकुच्या बटव्या पर्यंत चे सगळे सामान  इथे असे.  इथे मुख्यता: स्त्रियांचे राज्य. पुरुष मंडळीचा ओटी-पडवीमध्येच जास्त  वावर . इथे एखादी लाकडी  अलमारी...त्यामध्ये एखादा कृष्णधवल फोटो , बंद पडलेला एखादा जुनाट रेडीओ असे. याची गम्मत अशी की,  आजोबा  '' हात्तीच्या मारी बन्द कसा पडला ररर हा ? " असे म्हणत त्यावर दोन फटके मारत , हे धपाटे पडल्यावरती तो आपोआप चालु होत असे .
जेवनाचा-खाण्याचा कार्यक्रमही माजघरातच होत असे. यावरुन वेगवेगळ्या प्रसंगावरुन वेगवेगळी अशी माजघरातील गाणीही प्रसिद्ध होती.

 जेवनावरुन रचलेल गाण.

* सांगा  प्रभुला  सैयपाक झाला । विठुजी जेवायला चला ॥०॥
रांगोया काढुनया लावील्या समया । लावया उदबया सुगनधीया ।
चांदीचा हा मांडूनी पाट । कनकाचशोभतबघा ताट । 
पेला घेतिला पांचुचा कांठ ।
सर्व थाट घडवुनीं  सुन्दर केला ।  विठुजी जेवायला चला ॥१॥
शोभेपान केळी ची लिमबलवणी  । डाळीची नारळाची वाटल चटणी ।
कोशबीर पेरु केळीची फणी । रायतीं रुचिर झालंलीसाजणी । 
भरत वांडा दोडयाचे भोपळ्याचे।
आवडीने देवा केलेमी  तुजला  । वठुजी जेवायला चला ॥२॥


कोणाला मुलगा बघायला आला, म्हणजे स्थळ आल तर त्यावरुन रचलेल गाण.
* आलं गंगाला मागनं पावना घ्यावा पारकून
बसायला टाका  पिनढपाट . पसायाचे जातगोत 
याची जात धनगराची आमची गंगा बामनाची ॥०॥
याची आमची सोयरक हाई आमची गंगा याची हाई
जागा पाहूंजागाईत मळा पाहूं बागाईत
नवरां पाहूं रुपशाई तथं देऊं गंगाबाई ॥१॥


भाऊ बिजेला ओवाळनीच्या वेळेस चलेल गाण.
* भाऊबीज माझे सदनीं मनीं हर्ष झाला
दिन बंधु करुणा सिन्धू ओवाळीन त्याला ॥०॥
नवलपरचीं नव पक्वाने करीन स्वये आजी
श्रवणाचे शंकरपाळे,  किर्तन करंजी
हरी स्मरण केल कैसी जिलेबी ताजी
चरण सेवनाचे लाडू वळूनी वाढूंया याला ॥१॥

नवा कोरा कपडा-लत्ता, सनासुदीला घालायचे दाग-दागीनेही याच माजघरात ठेवलेले असत त्यावरुन रचलेल गाण. 

* धन संपतीला काय उणं , सख्या वो आपल्या वो घरी जाऊनी या
पिवळी  शेलारी यावी घेऊनी अवघ्या नगीं लव भरजरची
घडी  रुमालांत घालनी  आणावी चौकशी करोनी
एवढं वरचेवरी ऐकुनी पिवळी शलारी यावी घेऊनी  ॥०॥
श्रावण शुद्ध आला महना नागर पंचीम आली साजणा
मन पुजा  करीन गौरीची आवड मला पिवळ्या  शेलारीची
राधा नेसनी रुपसुनदर लोळे पतीच्या ग चरणावर  ॥१॥



कडे स्वयंपाकघराची तर्‍हा मात्र न्यारीच... अन्नपूर्णेचा भरभरुन मिळालेला वरदहस्त आणि घर मालकीनीचे ओतपोत भरलेले प्रेम याने स्वयंपाकघर  नेहमीच समृद्ध असे .  आग्नेयेला तांब्या-पितळेची भांडी, एखादे  मातीचे माठ , गरम पाण्याचा बंब असे सर्व ठेवलेले असे .  तर पुर्वेला चुल्हा मांडलेला असे . त्या शेजारी वैल ही असे .  चुल आणि वैल याच्या वरती मोकळी जागा राहते तिथे लोखंडाचा चिमटा , चावी माचिसचा बॉक्स , घासलेटची चिमणी  हे साहित्य नेहमीच पहायला मिळे . चुलीच्या बाजुला फाटयाचा छोटासा ढिगही सदैव रचुन ठेवला जाई .  एखादे काळे पडलेले तपेले ही पाणी भरुन बाराही महिने चुलीवरतीच ठेवलेले पहायला मिळे. दिवसभर केव्हाही पाणी लागले तर यातील पाणी काढुन, यामध्ये पुन्हा भर घातली जाई. भांडी ठेवण्यासाठी लाकडी मांडणी , स्वयंपाकास लागणारे साहीत्य ठेवण्यासाठी  लाकडी आयताकृती  पेटी  अशी या खोलीमध्ये दाटीवाटी एकंदरीत असे.  पुर्वी मिक्सर नसायचे तेव्हा पाटा-वरवंटा याचे राज्य ही याच खोलीत .... पाट्यावरील वाटपाच्या जेवनास कशाचीही तोड नाही. लसुन खोबर्याची चटणी , दाण्याचे कुट , शेंगदाण्याची चटणी , धाण्याची भरड ईत्यादीसाठी व्हायन, उखळ-मुसळ तसेच खलबत्ता वापरला जाई  तोही याच खोलीत असे.
(अधीक माहीतीसाठी पहा - https://siddhic.blogspot.com/2019/05/blog-post_2.html )  या सगळ्या वस्तु स्वयंपाकघरात पहावयास मिळत . याच स्वयंपाकाच्या खोलीत साठवणुकीच्या धाण्याच्या कणग्या, हारा, टोपल्या वरती कढीलिंबाचा पाला लावून किडमुंगी लागु नये म्हणुन बंद करुन ठेवलेल्या असत.

न्हाणीघर आणि शौचालय मात्र  शेवटी एका बाजूला कोपर्‍यात असते .
पण लहान मुलाना न्हाऊ घालण्यासाठी बाहेर परसात पोफळी किवा वेळूचे बांबू आणि नारळाच्या झावळ्या या पासून छोटेखानी न्हाणीघर बनवलेले पहावयाला मिळे. पातेलीमध्ये गरम-गरम पाणी घेऊन तांब्याने लहानग्यांना कडेवर घेऊन प्रेमाने न्हाऊ घातले जाई . याची एक गम्मत अशी की , माझ्या लहानपणी आजी आम्हा सक्ख्या-चुलत भावंडांना एकत्र न्हाऊ घालत असे. तेव्हा आम्ही एकत्र रांगेत अंघोळीला बसायचो, गरम पाण्यात थोडा कढीलिंबाचा पाला टाकुन एक-एक तांब्या प्रत्येकाच्या डोक्यावर ओतुन, लालेलाल लाईफबॉय साबणाची प्रसन्न अंघोळ असे . अगदी दिवाळीच्या पहिल्या अंघोळीप्रमाने वर भिजलेल्या चणाडाळ आणि सहानेवर उगाळलेल्या चंदनाचे एकत्रीत असे तयार केलेके मिश्रण अंगाला लावले जाई .... त्याचा मस्त सुहास पसरायचा.  " आजी तु ताईला थोडे अधीक चंदन लावले,  मला कमी , मला छान वास येत नाही  " असे म्हणत आम्ही थोडे जास्त डाळ-चंदनाचे मिश्रण अंगाला लावुन घेण्यासाठी भांडायचो.... रुसूनही बसायचो.  Mysore Sandal Gold Soap चा टॉप ब्रॅन्ड वापरला तरीही त्या आजीच्या हातच्या अभ्यंगस्नानाची सर यायची नाही.


काही ग्रामीण शब्द-
बेडा - अंगणाचे प्रवेशद्वार
माप - मातीच्या घरगुती विटा
पडवी- ओसरी
राखुंडी - राख
जनावर - साप
चोपने - धुणी बडवायच्याला धोका
फाटी - चुलीत जाळण्यासाठी घालायची लाकडं 
हारा-बांबूची मोठी टोपली
वलई  करणे - उठण्या-बसण्या योग्य नविन जमीन  तयार  करणे
कुदळा/खनती - जमीन खनतन्याचे साधन
बार्या - खिडक्या
डोलारा - मोठ्या आकाराची पालखी 
अलमारी - मोठे लकडी कपाट
वैल - चुलीच्या बाजूला असणारा गोलाकार वईल चार खुर असलेला त्यावर स्वयंपाकासाठी पातेले वगैरे ठेवले जाते.
घासलेट - रॉकेल

(डकवलेले फोटो फक्त रेफरन्ससाठी घेतलेले आहेत.) (क्रमश)

शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१९

राहिल्या त्या काही आठवणी (कोकण) - १

कोकण म्हणजे ओल्या मतीचा गंध,
कोकण म्हणजे हळुवार मनाचा बंध,
कोकण म्हणजे कोवळी पहाट स्वच्छंद,
माझ्या मनातील कोकण म्हणजे... एक लहर बेधुंद ॥
हिरव्यागार रान पसार्‍याच्या मधुन कुठुन तरी सुर्य नारायणाचा चोरटा कटाक्ष पडत होता. त्याच्या उदयाची चाहूल होती ती. त्या कटाक्षाने वातावरणात पसरलेले धुके किंचीतसे दूर पळू लागले होते. सळसळत्या गवतपात्यावरील दवबिंदू चमचम करत होते.
कुणीतरी विस्तवावर फुंकनीने फुऊsssss, फुऊsss,,,, फुऊss,,,, अशी फुंकर घाली त्याचा आवाज, आणि त्यातच भर म्हणुन, मधुन येणारा जळक्या कोर्‍या चहाचा गोडूस वास.... चालत असताना बाजूला रस्त्यालगत असणार्या, एका घरासमोरील खळ्यात माझी नजर गेली. मस्त शेणाच्या सारवणावर, राखेच्या करड्या भुकटीने झरझरती रांगोळी आकारली होती. कोण्या साठीपार आजीचे थरथरते हात या मागे असावे. (लाकुड जळाल्या नतर जी सफेद, करडी भुकटी मागे शील्लक राहते, त्याचा पुर्वी रांगोळी म्हणुन वापर करत असत.) पाय वाटेचा रस्ता अगदीच कच्चा होता. गावच्या लोकांच्या जीवनात जे खाचखळगे असतात आणि एवढ्या खाच-खळग्यातही ते आनंदी रहातात याच जणू प्रतिक म्हणजे हे रस्ते. मातीची नुसतीच भरणी, कधी ओभड-धोबड दगडांची चादर, तर कधी अर्ध्यातच पसरवलेले खडी आणि डांबर. या रस्त्यांची कहानीच वेगळी.

'गाव म्हणजे गावच । शब्दात मांडणे कठीण. दुसरे, तीसरे काही शब्द याला लागू होत नाहीत.'
सकाळचा प्रवास, छे... सकाळ कुठली पहाट, पहाटेचा पाच साडेपाचचा प्रहर. नुकताच बसचा प्रवास करुन, शेवटी आजुबाजुच्या वातावरणाचा कानोसा घेत, आम्ही आमच्या गावच्या मुख्य रस्त्याला लागलो होतो. दुर शेतीबांधा पलीकडे, झरझर वाहणारी आमची थोरली नदी मंजुळ गाणे ऐकवत होती.
तर दुर डोंगर कपारीतुन म्याओssss,,,, म्याओ sss,,,, म्याओss,,,, असा मोराचा आवाज कानी पडत होता.
खडबडीचा मेन रस्ता संपवून, आम्ही चिखल मातीच्या पाऊलवाटेला लागलो. पाऊलवाट असली तरी गावातील लोकांनी मोठाले दगड वगैरे रचुन ही वाट चालण्यायोग्य केली होती हे एक बरी झाले. मध्येच एखादे बेडकाचे पिटुकले पिल्लू टुनकन उडी मारुन इकडुन तिकडे जाइ. ईथुन चालताना आपला झगा संभाळण्यासाठी मला मात्र कसरत करावी लागत होती. गुडघाभर वाढलेल्या गवताने, लवलव करत माझ्या पायात मस्त फेर धरला होता. आणि त्यावर भरभरुन पसरलेले दवाचे थेंब, माझा पायघोळ झगा कधी भिजवून गेले मला समजले देखिल नाही. बाबांची पॅन्ट् देखिल पायालगत थोडी भिजून गेली होती. केव्हा एकदा घरी पोहोचू असे झाले होते.
आता रस्त्याचा दुतर्फा घरे दिसू लागली, आणि मला हायसे वाटले. येणार्‍या जाणार्‍याच्या स्वागता साठी जणू ही घरे प्रथमदर्शनास सज्ज झाली होती. बाजुच्या वेणू काकुच्या कौलारू घरावर धुराची वलय चढत होती. वाटे पळत - पळत जाऊन एक घोट कोरा चहा मागावा..... थोडीशी चहापावडर, साखरेचा किवा गुळाचा नुसता पाक, मापक प्रमानातच पाणी आणि चहाची हिरवी पात, अद्रक असेलच तर फक्त नावाला.... असा कोकणी मानसाच्या गोड स्वभावाप्रमाने गोड चहा... आहा । पहाटेची सुंदर सुरुवात अजुन वेगळी ती काय असणार ? आणि लाल तांदळाचे दोन मऊ-लुसलुशीत घावणे या चहा बरोबर न मागता मिळत, त्याचा आनंद आगळा-वेगळाच.
पण अशा गोड विचारा मध्ये ही, मी पाय ईकडचा तिकडे करायला तयार नव्हते. कारण मला जास्त ओढ होती ती माझ्या स्वतःच्या घरी पोहोचण्याची.


थोड पुढे गेल्यावर बाजुच्या भात शेतातुन बुजगावणी लावलेले दिसत होती. हिरव्या पिवळ्या शेतामध्ये साधारण आठ-दहा हाताच्या अंतरावर एक- एक असे बुजगावणे लावलेले असत. त्याचे पाय म्हणून दोन जाड बांबू रोवले जात, वरती सुक्या गवताच्या पेंढीवर स्त्री किवा पुरुषाचे रंगीत- संगीत कपडे चढवून देत, आणि त्याचे तोंड म्हणुन त्यावरती घरचाच एखादा फुटका माठ पालथा घातला जाई. त्या माठावर जळके लाकुड विझुवन तयार झालेल्या काळ्या कोळश्याने मस्त दोन डोळे, मधोमध नाक, तोंड .... तसेच तो पुरुष असेल तर जाडजूड मिश्या.... असा एकंदरीत त्या बुजगावण्याचा अवतार असे.
तेवढ्यात पाठीमागे कुठेतरी घुंगूरांचा आवाज ऐकु आला म्हणुन मी त्या दिशेने वळले. बाजुने गजुकाकाची बैलगाडी दिमाखात निघुन गेली. वर जाता-जाता " चाकरमाण्यानूssssss , आलाव काय ? मग किती दिसाचा मुकाम ? " अशी जुजबी विचारपुसही त्याच्याकडून झाली. त्याच्या गाडीची बैलजोडी ' सोन्या आणि मोत्या' मला फार आवडे. गळ्यातील सुपारी एवढ्या घुंगूरमाळचा रुणझुण आवाज करत, आणि ती लाल रंगवलेली टोकदार शिंगे दाखवत ते मस्त ऐटीत चालत. विषेश म्हणजे एवढ्या पहाटेच्या धुक्यातही दुरुन सुद्धा उठून दिसत, एवढे पांढरेशुभ्र बैल.
उठा उठा हो साधुसंत । साधा आपुले हित ।
गेला गेला हा नरदेह । मग कैचा भगवंत ॥ १ ॥
'उठोनि वेगेंसी । चला जाऊं राऊळासी ॥
जळती पातकाच्या राशी । काकड आरती देखलिया ॥ २ ॥

घंटानादाच्या तालावर असा अभंगाचा आवाज गाव मंदिरातुन येत होता. मंदिरामध्ये सोनार मामांनी काकड आरतीची तयारी केली होती. म्हणजे आम्ही आमच्या वाडीच्या अगदी जवळ आलो होतो तर...
मला आठवले.....आषाढ शुद्ध एकदशी च्या दरम्यान काकड आरतीची सुरुवात होते. जेव्हा आजोबा मंदीराचे पुजारी होते. तेव्हा काही वेळा, मी ही आजोबांच्या बरोबर भल्या पहाटे काकड आरतीसाठी जायचे. ‘ ‘त्रिगुण काकडा द्वैतघृते तिंबिला ।’ काठीला चिरगूट गुंडाळून त्यावर तेल ओतून पेटवलेली मशाल म्हणजे काकड. पाहाटे स्नान वगैरे करुन, हा काकडा हाती घेऊन कुडकुडत आम्ही मंदीराची वाट धरायचो. हरिनामाचा गजर करत त्या सावळया माऊलीस ऊठवले जाते. दही-दुध-तुप-लोण्याने अभिषेक करुन विठ्ठल- रखुमाईस अंघोळ घातली जाते. याच दही, दुध, तुपामध्ये मध घालुन पंचामृत केले जाते. विठ्ठल- रखुमाईस तलम रेशमी वस्त्रे आणि अलंकार घातले जातात. हळद, कंकू, गंध, फुले, तुळशी, ऊद, बेल, उदबत्ती, निरांजन, कापुर वगैरे वापरुन मस्त प्रसन्न अशी सांग्रसंगीत पुजा असे.

मला काकड आरती आवडण्याचे अजुन एक कारण म्हणजे, देवाला दाखवण्यासाठी बनवला जाणारा नैवेद्य. गावठी मऊसर शिजवलेला तांदूळ त्याच उभा-आडवा चिरलेला गुळ, असेलच तर एखादीच अखंड वेलशी..... अशी भरपुर प्रमाणात दुध घालुन खीर केली जाते. खीर तयार झाल्यानंतर शेवटी त्या मध्ये हलक्या हातानेच, एक छोटासा लोण्याचा गोळा वरुन टाकला जातो. पंचामृत आणि त्या बरोबर ही खीर खाण्यासाठी आम्ही सगळेच उतावीळ असायचो. घरी आईने केव्हा अशी खीर बनवली तरी नैवेद्याच्या खीरीची चव काही औरच.... त्यास कशाची ही सर नाही.
भक्तीचिया पोटीं बोध काकडा ज्योती ।
पंचप्राण जीवें भावे ओवाळू आरती ॥

माझ्या मनात काकडा आरतीच्या कितीतरी आठवणी तरळत होत्या, आणि या आठवणीच्या साथीने चालत-चालत मी आमच्या घराच्या खळ्यापुढील पायरीवर पाऊल ठेवले. आम्ही इथवर केव्हा पोहोचलो हे समजले देखिल नाही.
----------
काही ग्रामीण शब्द-
शेण - गोबर
गवताच्या पेंढीवर- वाळलेला गवताचा छोटा भारा
खळ -अंगण

गुरुवार, १ ऑगस्ट, २०१९

कोकण म्हणजे स्वर्ग

गावच्या आठवणी शब्दांत उतरवणं मला जमल नाही.
एक एक ओळ म्हणजे एक सुंदर कविता जणू.
जन्माला यावं तर कोकणात अन् खेळावं ते माडाच्या,केळीच्या बनात. स्वर्ग म्हणजे दुसरं काय असणार. हा माझ्या गावचा स्वर्ग, असंख्य आठवणींना उजाळा देत वाहणारी छोटीशी नदी. अख्खं बालपण इथे हरवलं आहे. इथेच कुठेतरी सारिपाठाचा खेळ सुरू असायचा, याच फणसामागे लपंडाव  खेळ रंगायचा, याच जास्वंदी अन तगरी च्या माळा विठ्ठलाच्या चरणी वाहिल्या जायच्या. रम्य ते बालपण आणि ते कोकणात असेल तर अतिरम्य.

गावची नदी




                                   दुरच्या रानात....

                                  केळीच्या बनात

माड

                              अंगणी झरती धारा गं...

                              भिरभिर-भिनला वारा गं

  ऋतु हिरवा ऋतु बरवा

                               भिजुनी उन्हे थरथरती

माळ्याच्या मळ्यामंदी









रविवार, ३० जून, २०१९

कोकणचा रानमेवा- 'करवंदे'

करवंदे (डोंगराची काळीमैना) KARANDA-
आमच्या गावी एक म्हण आहे, ‘पाडव्याला पाड आणि अखितीला गोड’. "गेल्याच आठवड्यात गावी जाऊन आले, रस्त्याच्या दुतर्फा करवंदाच्या डहाळी च्या डहाळी भरुन आलेल्या पाहील्या. अश्या या रान मेव्यासाठी कोकण प्रसिद्ध आहेच. सर्वसाधारण रानमेवा म्हणजे करवंदे, जांभळे, आंबा, फणस, आवळा, रायआवळे, तोरणं, आमगुळे, आळू ही आहेत. हा रानमेवा आरोग्यरक्षणासाठी सर्वानी आवर्जून खावा. खर्च न करता ही अतीशय उपयुक्त असे हे करवंद मुबलक प्रमानात उपलब्ध असते. अश्या या बहुगुणी फळा बद्द्ल थोडी माहीती".
करवंदाचे मूळ स्थान भारत असून, करवंद हिंदीमध्ये ‘खट्टा मीठा’ या नावाने प्रसिद्ध आहे, तर शास्त्रीय भाषेत उवाऊर्सी या नावाने ओळखले जाते. करवंद ही वनस्पती अपोसायनेसी या कुळातील आहे.

करवंदांचा _n.jpg


वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय." पण ते शक्य न...