मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०२१

ती सध्या गोळ्या घेते.

               

           


                    'पूजेचं साहित्य, पोथ्या-पुराणे, समई, ताम्हण, तांब्या-पळी आणि मिठाई सार काही आणून झालं होत. सगळं व्यवस्थित एका जागेवर ठेवून तात्या देवघरातून आतमध्ये किचनमध्ये वाकून ओरडले.'

" माई धूप-दीप लावला का? अगरबत्ती आहे ना? कि आणू. पूजेला ताजी-ताजी फुलं आणली आहेत, परडीमध्ये बघ."

 

" होय, झालं हो सगळं. तुम्ही पूजेला सुरुवात करा."   माई ओटीवरून उठून देवघराकडे वळल्या.

 

" सरीता, नैवेद्य झाला का गं? "   तात्यांनी पुन्हा आवाज दिला.   

 

" होय बाबा, आणते. "   हातातील  नैवेद्याचे ताट देवघरात ठेवत सरिता पुन्हा किचनकडे निघाली. आतून येणारा सुग्रास जेवणाचा सुवास नुसता घरभर दरवळत होता.  गावठी तांदळाचा मऊसर भात, जिऱ्याचं वरण, पालेभाजी, बटाट्याची उकड भाजी, कडधान्याच्या उसळी, साजूक तुपातील शिरा, अळूवडी, कोवळ्या काकडीचे रुचकर घारे, सोबत तळणीच्या पापड-फेण्या आणि घरचं कच्च्या कैरीच गोडं लोणचं असा मोठा जंगी बेत सुरु होता. आणि करणारी हि एकटी सून.

 

" पंचामृत? "    तात्यांनी पुन्हा आज्ञा सोडली.

 

" हे घ्या."   म्हणत हातातील पेला पाटावर ठेवून माई समोर हात जोडून बसल्या.  पदराच्या टोकाला हात पुसत सरिताही येऊन त्यांच्या शेजारी उभी राहिली. देवाला हळद-कुंकू वाहून झाले, नैवेद्य दाखवून तात्यांनी घंटी वाजवायला सुरुवात केली होती. आणि धपकन शेजारून आवाज आला. काय झालं समजेपर्यंत सरिता उभ्या जागी भिंतीला लागून कोसळली होती. हातातील ताम्हण खाली ठेवून तात्या त्वरित तिच्या जवळ आले. माईही तिथेच खाली बसल्या.

 

" सरिताsss, सरिताsss काय झालं. "

 

" सुनबाई उठ, काय होतंय, चक्कर आली का? "

 

तात्या आणि माई तिला उठवत होते. पण बराच वेळ झाला सरिताने हू कि चू केले नाही. शेवटी बाजूचा फोन उचलून त्यांनी आपला मुलगा आनंदला त्याच्या कार्यालयातून ताबडतोब बोलावून घेतले. एक तासाभरात तो घरी आला, सरिता तोंडावर पाणी मारल्यावर ती कशीबशी शुद्धीवर आली. पण  तिच्या अंगात शक्ती नव्हती. चालताना पाय लटपटू लागले होते. शेवटी माई आणि आनंदने तिला गाडीमध्ये बसवून दवाखान्यात दाखल केले.

 

आनंद सरिताचा हात धरून आतमध्ये घेऊन आला. तपासणी करून झाली होती. काही टेस्टही पार पडल्या. समोरच्या खुर्चीवर डॉक्टर बाई बसल्या होत्या. त्यांनी हात करून त्या दोघांना बसायला सांगितले.

 

" ताई, तुम्ही किती दिवस त्या गोळ्या घेताय? पाळी पुढे जाण्यासाठी. " डॉक्टर बाईंनी सरिताच्या थेट प्रश्न केला.

 

" पंधरा-वीस दिवस झाले असतील." सरिताने जरा घाबरत घाबरत उत्तर दिले.

 

" आणि याआधी केव्हा घेतल्या होत्या? कोणत्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेताय कि असच? "   डॉक्टर बाईनी पुन्हा प्रश्न केला.

 

" , असच थोडं मैत्रिणीला विचारून. ती ज्या गोळ्या घेते, त्याच तिने मला घ्यायला सांगितल्या. "  काहीतरी सारवा-सारव  करत सरिता उत्तरली.

 

" यापुढे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अश्या कोणत्याही गोळ्या घायचा नाहीत. कोणत्याही गोळ्या देण्याआधी पेशंटची हिस्ट्री महत्त्वाची असते. बाईला जर व्हर्टिगोचा, मायग्रेनचा त्रास असेल, आधी कधी स्ट्रोक येऊन गेला असेल, हाय किंवा लो ब्लडप्रेशर असेल, तिचं वजन जास्त असेल तर या गोळ्यांचा त्या बाईला जास्त त्रास होऊ शकतो. तसेच स्त्रियांचा आहार-विहार यावरही या गोळ्या घ्यायच्या कि नाही, हे अवलंबून असते."

 

" म्हणजे डॉक्टर? त्यामुळे त्रास होतोय का मला? "

 

" होय.  या गोळ्या नक्की काय काम करतात हे तुम्हाला माहित आहे का? आणि त्याचे दुसपरिणाम ? " 

डॉक्टरानी सरिताच्या आणि तिच्या नवऱ्याला प्रश्न केला.आणि सरिताच्या त्यांच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघता नकारार्थी मन डोलावली. तश्या त्या स्वतःतच पुढे बोलू लागल्या.   

 

" इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टोरॉन असे दोन हार्मोन्स स्त्रियांच्या शरीरात असतात, त्यावर पाळीचं चक्र आधारित असतं. पाळी उशिरा यावी म्हणून या हार्मोन्सच्याच गोळ्या घ्याव्या लागतात. एका परीने या गोळ्या हार्मोन्सच्या चक्रावर परिणाम करतात. नैसर्गिकरित्या चाललेलं पाळीचं चक्र पुढेमागे केल्याचे अनेक वाईट परिणामही होऊ शकतात.  या हार्मोन्सचं सातत्यानं अतिसेवन केलं तर ब्रेन स्ट्रोक, पॅरालिसिस, फिट येणं अशा केसेस पाहायला मिळतात.  पाळी लांबवण्यासाठी बायका दहा-पंधरा दिवस या गोळ्या घेत राहतात, त्याही हाय डोसमध्ये ...  त्याचे परिणाम फार घातक असतात. अशा गोळ्यांमध्ये progesterone असतात. त्यामुळे त्याचा दुष्परिणाम progesterone चे प्रमाण वाढल्यासारखाच  असतो.  तुम्हाला चक्कर येणे, थकवा जाणवणे, मळमळ, उलटी येणे, केस गळणे अश्या समस्या होत आहेत. पण तुम्ही यापुढेही अश्या कोणत्याही गोळ्यांचं वारंवार सेवन केलं. तर तुम्हाला Anaphylactic reaction, Vaginal inflammation, एडिमा, हिपॅटायटिस, हायपरटेन्शन असे गंभीर आजार देखील होऊ शकतात."

 

" डॉक्टर, पाळी लंबवण्यासाठी मी दुसरा काही उपाय करू शकते का?  आमच्याकडे ऑगस्ट महिना आला की सणवार सुरु होतात. पंचमी, मग पॊर्णिमा, त्यानंतर अष्टमी , मग आले गणपती...  उपासतापास, पूजापाठ, आरती, नैवेद्य हे सगळं करावं लागत, घरी करणार दुसरं कोणीही नाही.  एरवी ठीक आहे पण सनवारी पाळी आली तर घरी अजिबातच चालत नाही. मग मला या अश्या गोळ्या वारंवार घ्याव्या लागतात. "   

सरिताने मुद्दामच डॉक्टरांच्या समोर हे सर्व सांगितले, त्यामुळे अप्रत्यक्षपणे तिने नवऱ्यासमोर आपली बाजू ठेवली होती.  कारण या गोष्टींचा तिला देखील शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत होता. लग्न झाल्यापासून गेली पाच-सहा वर्षे याआधी तिने कधीही बोलून दाखवले नसले तरीही नाईलाज म्हणून तिला या गोळयांचा वापर करावा लागत होता.

 

" बायका पाळीत मंदिरात जात नाहीत, सणावाराच्या वेळेस गोळ्या घेऊन पाळी पुढे ढकलतात, उलट पाळी पुढे जाण्याच्या गोळ्या घेऊन उपवास करतात, मग त्याचे शरीरावर अजूनच वाईट परिणाम होतात.  हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामुळे त्यांना पुढे शारीरिक व्याधीना बळी पाडावे लागते. हि गोष्ट तुम्ही तुमच्या आई-बाबांना समजावून सांगा. नाही जमल तर त्यांना इथे घेऊन या, मी समजावते त्यांना.  देव असं म्हणत नाही, की पाळीत माझी पूजा करू नका किंवा धार्मिक कार्य करू नका. त्यामुळे चुकीच्या समजुतींमुळे आरोग्याशी खेळू नका. मासिक पाळी ही अपवित्र नाही. ते निसर्गाचं देणं आहे. ते आनंदाने स्विकारलं पाहिजे. तरीही तुमच्या रूढीपरंपरा असतील तर अश्या दिवसात देवाच्या पूजेची, नैवेद्याची तयारी करण्यासाठी काहीतरी दुसरी सोय करा, पण स्त्री आरोग्याशी खेळू नका. "

 

डॉक्टर बाई सरिताच्या नवऱ्याला समजावत होत्या.  आनंद देखील मनोमन खजील झाला होता. त्याला कधीही ध्यानी मणी नसलेल्या अश्या बऱ्याच गोष्टी समजल्या होत्या. डॉक्टर बाईंचे आभार मानून सरिताला घेऊन तो घरी जायला निघाला. घरी पोहोचल्या पोहोचल्या तात्या आणि माईला या सर्व गोष्टी सांगणार. अगदी निःसंकोचपणाने दोघांनाही विश्वासात घेऊन समजवून सांगितले पाहिजे. हे त्याने मनाशी पक्के केले.

 ------------------------------

 समाप्त

https://siddhic.blogspot.com

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय." पण ते शक्य न...