बुधवार, १४ ऑगस्ट, २०१९

गुळा-नारळाच्या पुर्‍या/वडे/घारे-नारळी पौर्णिमा स्पेशल



साहित्य
२ वाटी तांदळाचे पीठ (साधारण पाव किलो), 1 मोठया नारळाचा (संपूर्ण) चव/ किस, 1 वाटी गूळ(आवडी प्रमाणे कमी /जास्त घेऊ शकता).
किंचीतसे मीठ, पाव चमचा जायफळ पूड आणी वेलची पूड, तळण्यासाठी तेल. २ टिस्पून तूप.

कृती-
पराती मध्ये थोडेसे पाणी घालून बारीक मिक्सर केलेला नारळाचा कीस घालून घ्या.त्यामध्ये बारीक केलेला गूळ घ्यावा.
आता यात जायफळ पूड, वेलची पूड आणी किंचीतसे मीठ मिक्स करून घ्या. या तयार मिश्रणा मध्ये जेवढे मावेल तेवढेच तांदळाचे पीठ थोडे-थोडे मिक्स करायचे. नारळाचा कीस हा तांदळाच्या पीठा पेक्षा थोडा जास्त असला पाहीजे, तरच याला छान टेस्ट येते. हे मिश्रण अजिबात पाणी न वापरता तयार करायचे आहे. शेवटी तयार मिश्रण थोडे तूप हाताला लावून मऊसर मळून घ्यावे. तयार मिश्रणाचा गोळा झाकून अर्धा तास तसाच बाजूला ठेवून द्यावा. यामुळे ते व्यवस्थित मिळून येते. तसेच गुळाचे थोडे मोठे असलेले तुकडे देखील विरघळून जातात.
तयार पिठाला तुपाचा हात लावून लहान-लहान गोळे बनवून त्याच्या छोटया-छोटया पुर्‍या करून घ्याव्या.(श्रीखंड पुरी करतो त्या मधील पुरी प्रमाणे) थोडी जाडसर, पण आकाराने छोट्या अश्या पुर्‍या थापाव्यात. तेल कडकडीत तापवून घ्यावे. आपण वडे तळतो त्या प्रमाणे या पुर्‍या तेला मध्ये मध्यम गॅसवर दोन्ही साईडने मस्त खुसखुशीत, लालसर रंगावर तळून घ्यावे. नारळी पौर्णिमेला दाखवल्या जाणाऱ्या नैवेद्यासाठी आम्ही अश्या पुर्‍या/ वडे करतो. नारळी भाताला पर्याय म्हणून. फार तर २० मिनिटांत या तयार होतात. दुधा बरोबर,चहा बरोबर किंवा सकाळचा नाष्टा म्हणून खायला हरकत नाही. चविष्ट लागतातच आणि पौष्टिक ही आहेत.


*या पाककृती मध्ये तांदळाचे पीठ वापरत असल्याने काही ठिकाणी याच रेसिपी ला ‘गुळा- नारळाचे वडे' असे देखील म्हणतात. 'घारे' असे ही म्हणतात. साहित्य वगैरे विषेश काही लागत नाही. अगदी सहज-सोपी पाककृती आहे. ओभड-धोबड पणे घाई-घाई मध्ये करण्याजोगी रेसीपी आहे.
* उकडीच्या मोदकाचे सारण उरले असेल तर त्याच्या देखील सेम अश्याच तांदळाच्या पिठा मध्ये मिक्स करून पुर्‍या बनवता येतात.
* मैदा आणि गव्हाचे पिठ एकत्र करुन ‘नारळाच्या पोळ्या किंवा सांजोर्या/ साटोर्‍या' बनवल्या जातात. ती रेसिपी वेगळी आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते.
"आमच्याकडे कणीक वेगळे मळुण घेतले जाते. त्यामध्ये घातले जाणारे सारण हे उकडीच्या मोदकाच्या सारणा प्रमाणे असते. हे सारण पुरणपोळी च्या, पुरणा प्रमाने कणकेच्या गोळ्यामध्ये आत भरले जाते. आणि पोळी प्रमाणे लाटुन केल्या जातात."

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय." पण ते शक्य न...