बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१

हारून जिंकलेला हार

 आजोळ  मनाच्या कोपऱ्यात आठवणींची दाटी. कोरडी भाकर सोबतीला तुपाची वाटी.

भावनांचा पूर, भोलेभिसरे आठवणींचे सूर. सुरकुतलेल्या हातांच्या आठवणीने भरून येई उर.

'कामाच्या गडबडीत हल्ली मामाच्या गावाला जाणं फार कमी झाल. अगदीच वर्षातून एखाद्या दिवशी सकाळी जायचं आणि संध्याकाळी परतीच्या प्रवासाला निघायचं. आजी आणि आजोबा दोघेच राहतात, ते ही ७०-८० च्या घरातले, सणावारी मामा- मावश्या येऊन जातात, पण त्याही मोजकेच दिवस, बाकीचे दिवस एवढं मोठ्ठ घर अगदी निपचित पडलेले असतं, एखाद्या निर्जन ठिकाणी गाडी चुकलेला वाटसरू दुसऱ्या गाडीच्या प्रतीक्षेत एखाद्या झाडाच्या सावलीत पहुडलेला असतो अगदी तसं. गावची घर आणि त्यामध्ये एकटेदुकटे राहणारे आजी-आजोबा म्हणजे एक आठवणींचं दुकान असतं , ते ही अंशतः बंद पडलेले. त्यांच्याकडे खूप काही देण्यासारखं असतं पण घेणारं कोणी नाही.

आठवड्यापूर्वी आजीशी फोनवर बोलणं झालं. बोलता बोलता अगदीच हळवी झाली होती. मुलांनी, नातवंडांनी गजबजलेलं ते घर रिकामं झालाय जणू, पूर्वी चोवीसतास धगधगणारी चुल आत्ता दिवसातून एकदाच पेटते. तिच्या भाषेत, 'पूर्वी मुलाबाळांचा धांगडधींगा असायचा तिथे, आत्ता खायला उठणारी भयाण शांतता असते. माझं अर्ध्यापेक्षा जास्त बालपण मामाच्या गावी गेलं. त्यामुळे फोनवर बोलताना आज्जी आणि मी दोघीही भावुक होतो. बोलायला विषय सुद्धा खूप असतात, पण काय बोलू आणि काय नाही असं होतं. अन निम्मे विषय आमच्या अश्रूंमध्येच वाहून जातात. तब्ब्येत-पाणी याची चोकशी करता-करता माझ्या दाराची बेल वाजते किंवा आजीच्या अंगणात बाजूच्या काकूंची गाय आलेली असते, झालं मग… ‘नंतर फोन करते हा’, असं बोलून आम्ही फोन ठेवतो. नाहीतर तासभर बोलणं झालं तरी ठेवू का? विचारायची हिम्मत होत नाही... आजीलाही आणि मलाही.

पूर्वी आजोळी तसे चांगले दिवस होते. आजोबा गाव मंदिरात पुजारी आणि गावात पोस्टमनच काम करायचे, म्हणजे मिळकत जेमतेमच. बऱ्यापैकी शेतीवाडी होती, जमीन-जुमला आणि दूधदुभत्या गाई गुरांनी मिळणाऱ्या मिळकतीने घर भरलेलं असायचं, हळूहळू दिवस बदलले, घरी खाणारी दहा तोंड आणि बाहेरची पाहुणे मंडळी वगैरे ची आवक जावक तर नेहमीचीच. वंशाला दिवा पाहिजे म्हणत सात कन्यारत्नांचा जन्म झाला आणि मग दिवा उजळला. नऊ मुलांची आई आणि सासू सासरे असा लवाजमा सांभाळणे, यात आजीने आपले संपूर्ण आयुष्य वेचले. मुलांना वाढवणे, पालनपोषण आणि संगोपन करणे ही वेगळी गोष्ट, पण सात मुली आणि त्यांची लग्न वगैरे त्यावेळी निव्वळ अशक्य. न करून चालणार नाही. त्यावेळी आजी आपला एकुलता एक मोठा दागिना बँकेत ठेवून त्यावर व्याजी पैसे घेत असे, यात व्याज जास्त द्यावे लागे, कष्ट करून एकेक पै जोडून तो दागिना सोडवण्याची वेळ येई तोपर्यंत दुसऱ्या मुलीचे लग्न येऊन ठेपे. वर्षा आड जन्मलेल्या या मुली मग प्रत्येकीच्या लग्नासाठी परत तो हार बँकेत जात असे. काही वर्षांपूर्वी हा घरंदाज दागिना पोहेहार माझ्या आजीला माझ्या पंजीने म्हणजेच तिच्या सासूबाईंनी दिला. तेही त्यांच्या सेवेचा मोबदला म्हणून. पण तेव्हापासून आजीला तो गळ्यात घालून मिरवण्याचा योग जुळून येतच नसे.

सोन्याची तोळा ८००-९०० किंमत असल्यापासून ते ५०००-१०००० किंमत होत गेली, तरीही हार-ते पैसे याचे आदान-प्रदान संपेना. माझ्या अगदी शेवटच्या मावशीच लग्न झालं तरीही तो हार बँकेतच खितपत पडला होता. मुद्दलापेक्षा कितीतरी पट होऊन व्याजाची रक्कम देखील वाढत चालली होती. शेवटी तो सोडवणे अगदी आवाक्याच्या बाहेर गेले आणि सगळ्यांनी त्याची अपेक्षाच सोडली.
गाव सोडून खूप वर्षे झाली… गेल्या काही वर्षात आजोळी जाणे शक्य झाले नाही. मी जवळ जवळ तो हार विसरलेच होते. यंदा गौरी-गणपती येऊन गेले, त्यावेळचा काढलेला आजीचा फोटो मामाने व्हॉट्सअप ग्रुपला पाठवला होता, मी मुद्दाम झूम करून पाहत बसले, तीच सावळी बारीकशी शरीरयष्टि, आवडत्या निळ्याशार रंगाचं अगदी पायापर्यंत लोळणार नववारी लुगड नेसली होती. अर्ध कपाळ व्यापेल असं ठसठशीत लाल चुटुक कुंकू. अगदी तोंड उघडलं तर तोंडातच शिरेल एवढी मोठी मोत्यांची नथ नाकात तिच्या लग्नात मिळालेली. हातात सदैव असणारा हिरवा चुडा आणि गळ्यात मंगळसूत्र हे तिचे नेहमीचेच सौभाग्यअलंकार आणि गळ्यात तोच तिच्या आयुष्यभराच्या त्यागाचे प्रतीक असलेलला मोठा पाचपदरी पोहेहार. मला विश्वासच बसेना . क्षणात तिला फोन केला आणि बाकी सगळं सोडून आधी हाराची चौकशी केली. ' आजी तोच हार कि नवीन केला ग?'

ती मोठ्या आनंदाने म्हणाली. " ज्या वंशाच्या दिव्यासाठी आठ मुलींना जन्म दिला ना, त्याच दिव्याने सोडवला बघ तो हार. लहानपणी तूच विचारायचीस ना सारखी-सारखी ‘हार कुठे आहे म्हणून’, यातली एक चैन तुला देणार बघ."

ऐकून माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. क्षणभरही विचार न करता मी तिला म्हणाली, “मला चैन नको आजी. जेव्हा कधी तुला हा हार मोडावासा वाटेल ना, किंवा जेव्हा अशी काही परिस्थिती निर्माण होईल, तेव्हा सात तोळ्याच्या हिशेबाने काय पैसे होतील ते मी देईन तुला… तुझ्या त्यागाचं बक्षीस समज हवं तर.. पण तो हार मोडू नको. जसा च्या तसा मला दे. मी तो हार ठेवून घेणार. कायमचाच. "
हे ऐकून आजीपण फार खळखळून हसली फोनवरती.
संध्याकाळच्या दिवेलागणीच्या वेळ झालेली, म्हणून आजोबा मंदिराकडे निघाले होते आणि आजी त्यांना देण्यासाठी साखर फुटण्याच्या नैवेद्याची तयारी करायला गेली. जाता-जाता "आता ठेवते नंतर बोलू ग. फोन कर मग." म्हणत तिने फोन ठेवला.

आजीला वाटलं असावं मी मस्करी करतेय. पण नाही. लहानपणी मला शक्य न्हवतं, पण आता तो हार वाचवणं माझ्या हातात आहे आणि मी ते नक्की करणार.

आजीचं घर म्हंटल कि, महर्षी वि. रा. शिंदेंच्या साहित्यातील या काही ओळी नेहमी आठवतात.
'आजीचें घर धाब्याचें. जमीन धुळीनें भरलेली. न झाडावी तेंच बरें. सोपा कोठें संपला व गोठा कोठें सुरू झाला हें तीन आठवडे राहिलों तरी समजलें नाहीं.
खोलींत दोन मडकीं, एक काथवट व एक भला मोठा पाटा. तो सुध्दां कधीं उभा करावयाचा नाहीं. मग धुवायची गोष्ट कशाला !
मीठ असेल तर लसूण नाहीं व दोन्ही असलें तर मिरची नाहीं, हें रोजचें रडगाणें. तरी तिची तांबडी भगभगीत मिरच्यांची चटणी, घट्ट ताक आणि ताज्या शाळूच्या भाकरी हें जेवण आम्हांला परमामृतासारखें गोड लागे.

*****

https://siddhic.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय." पण ते शक्य न...