गुरुवार, १ ऑगस्ट, २०१९

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय."
पण ते शक्य नाही!
किती काही मागे सोडलेले आहे आपण ! आणि किती काही जोडलय ?
' ती खटारा गाडी आणि नदिवरील उडी,
तिखट मीठाची कैरी आणि आजीच्या गोष्टी ऐकण्यात जागलेल्या रात्री,
खळयातील लंगडी, लपाछपी आणि पकडा-पकडी,
शाळेत न जाण्यासाठी केलेले बहाने आणि आईकडून मार खाने,
भातुकलीचा खेळ आणि शुभंकरोती ची वेळ'.

सारं काही निसटून गेल, गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी.
"प्लुटो कक्षा ओलांडून पुढे निघुन गेला ना तशाच काही गोष्टी आपल्या स्मृतीच्या दुनियेतून बाहेर निघाल्या आहेत! त्यांना उजाळा देउन, स्मृतीत ठेवण्यासाठीच हा पहीला प्रयत्न."
हा भाग कोकणी व इतर महाराष्ट्रातील अश्याच काही साधनां वरती आहे. हि साधने पूर्वी गावोगावी प्रत्येक कुटुंबाकडे वापरात असायची. आता क्वचितच कुठे पहायला मिळतात. अजुन काही वर्षांनंतर समुळ नष्ट होतील असं वाटतं. कालौघात या वस्तू केवळ स्मरणस्मृतीं मध्ये राहिल्या तरी फार झाल. चला तर सुरवातीला करते जात्या पासून.
१) जाते-
धान्य दळून त्याचे बारीक पीठ करण्यासाठी जात्याचा वापर केला जातो (जायचा) . जाते वर्तुळाकार गोल दगडाचे असते. त्यामध्ये दोन तळ्या असतात. खालची तळी ही स्थिर आणि जड असते. वरच्या तळ्याला कडेला एक उंच लाकडी खुंटी असते. ही खुंटी हाती धरून वरची तळी घडाळ्याच्या विरुद्ध दिशेने फिरवतात. या तळ्याच्या मध्ये एक छिद्र असते त्यांतून थोडे थोडे धान्य टाकतात. आणि दोन्ही तळ्या एकमेकांनवर घासून धान्याचे पीठ होऊन तळ्याच्या कडाच्या फटीतून बाहेर येते.
जात -
जात .jpg
स्त्रिया या जात्यावर धान्य दळत-दळत असताना काल्पनिक गाणी रचतं, त्याला जात्यावरची ओवी असे म्हणतात.
"कल्पनांचच बघा ना कल्पना ही हवेसारखी असते. जिथे वाट मिळेल तिथे-तिथे जागा व्यापून टाकते."
जसं की या काही काल्पनिक ओव्या....
सरला माझा दळप
सती भरली गंगा
कापुराची आरती
मींया ओवाळी पांडुरंगा ||
सरला माझा दळप
सुप सारीता पलीकडे
सासरी नि माहेरी
राज्य मागते दोनीकडॆ ||
सरला माझा दळप
पीठ काढी मी परातीत
माझ्या त्या गुरुजीचा
नाव घेई मी आरतीत ||
सुंदर माझे जाते ग फिरते बहुत |
ओव्या गाऊ कौतुक तु येरे बा विठ्ठला ||
जीव शीव दोन्ही सुंडे ग प्रपंचाच्या नेटे ग |
लावूनी पाची बोटे तु येरे बा विठ्ठला ||
बारा सोळा घडणी औघ्या त्या कामिणी |
ओव्या गावू बैसूनी येरे बा विठ्ठला ||
सासु आिण सासरा दिर तो तिसरा |
ओव्या गावू भर्तरा तु येरे बा विठ्ठला ||
या ओव्या कित्ती सहजपणे रचल्या गेलेल्या आहेत . जात्या वर दळन करायचं काम फारच कठीण असत. गाण्याने काम करताना थकवा जाणवत नाही, म्हणून जात्यावर दळण दळताना स्त्रिया ओव्या म्हणत. त्यांत स्त्रीयांच्या मनातील अनेक भावभावनां व्यक्त झालेले आहेत. बर्याचदा देवांची नावे घेऊन ओवी रचल्या गेलेल्या आहेत, जणु स्त्रीया आपल्या भावभावना देवा समोर व्यक्त करतात. मला वाटतं आज बिझी माणसांच्या युगात भावना व्यक्त करण्याच काम त्या smiley बाईच चांगल करतात ! आणि ओवी चा म्हणाल तर सद्धयातरी 'वापर फक्त मुलींच नाव ठेवण्यासाठीच होतो' (ओवी शिंदे, ओवी देशमुख वैगरे वैगरे).
दुसर म्हणजे बहिणाबाईंच नाव आल की ओवी आठवते.
बहिणाबाईचे जतन केलेले 'जाते'-
बहिणाबाईचे जतन केलेले 'जाते'.jpg
तसं पण तो मिक्सर चालु केल्यावर त्याचाच आवाज नुकता, ओवी काय डोंबलाची सुचणार ?
" जात्यावर बसल्यावर ओवी सुचते ’ अशी म्हण मराठीत प्रचलीत होती, एखादी जबाबदारी स्वीकारली, कि ती पार पडण्यासाठी क्षमता आपोआप येते, या अर्थाने ही म्हण असावी."

२) पाटा वरवंटा-

पुरणपोळीसाठी डाळीचे पुरण, ओला किंवा सुखा नारळ घालून केलेली चटणी किंवा वाटली डाळ, आंबे डाळ, किंवा इडली-वडय़ासारखे दक्षिणी पदार्थ, मांसाहार किंवा मत्स्याहार करण्यासाठी जो ओला मसाला करावा लागतो आणि देशावर खर्डा वगैरे मसालेदार पदार्थ वाटून तयार करण्यासाठी पाटा-वरवंटा उपयोगी पडतो.
पाटा वरवंटा-
varvanta-pata_0.jpg
"आमच्या कोकणात नारळ विपुल प्रमाणात असल्यामुळे ओल् खोबऱ जणू स्वयंपाचा राजा" जेवणात नारळ नसेल तर जेवणाची सभा रुचकर असुनही आमच्यासाठी व्यर्थच. मग घरी नारळ वाटायला पाटा नसेल तर कसं चालणार??
माझ्या आठवणीप्रमाने पुर्वी दुपारच्या वामकुक्षी वर टाकी ( टाकी घालने म्हणजे घाव/घाला घालने अशी म्हण आहे ना) घालायला काही बायका यायच्या....'मध घ्याव मध, टिकली..य, बांगडी..य,फणी..य,पाटय़ाला.. टाकीय'.असं काही-बाई बोलायच्या. ज्यांच्या घरातील पाट्याला टाकी लावून घ्यायची असेल त्या बायका त्यांच्याकडे घरातील पाटा-वरवंटयाला टाकी लावुन घेत असत.
आणि हो पाट्या वरिल वाटपाच जेवण एकदा तरी खाव, त्याची चव आयुष्यात विसरणार नाही.

३) खलबत्ता-
खलबत्ता हा साधारण दगडी किवा अनेकदा धातुचाही असतो. यात एक दगडाचे उभट आकाराचे भांडे असते. आणि एक दगडी दंडगोलाकार काठी असते.
लोखंडी खलबत्ता -
लोखंडी खलबत्ता .jpg
सरण बारीक करण्यासाठी तुम्ब्याचा वापर केला जातो. एखादे मिश्रण तयार करण्यासाठी याचा वापर होतो. खलबत्ता हा पदार्थ बारीक कुटण्यासाठी वापरला जात होता. प्राचीन काळी औषधी-वनस्पती वाटण्यासाठी वापर होत असे. अजूनही गावामध्ये खलबत्ता वापरला जातो. आसडणे, भाजणे, परतणे, पीठ करणे, कुटणे किंवा वाटणे इत्यादी. त्यातील कुटणे ह्य संस्कारासाठी खलबत्त्याचा वापर स्वयंपाकघरात, मिक्सर येण्यापूर्वी बहुतेक ठिकाणी केला जात होता.
दगडी खलबत्ता-
दगडी खलबत्ता.jpg
खलबत्त्यातील खल म्हणजे लोखंडाचे कडा नसलेले एक लहान आकाराचे पातेले. आणि त्यासोबत एक चांगला वजनदार आपल्या मुठीत पकडता येईल असा साधारण फूटभर लांब असा दंडगोलाकृती लोखंडी दस्ता म्हणजे बत्ता. थोडक्यात बत्ता म्हणजे पितळीच जड दोडा ज्याने वस्तू कुटता येईल. त्याची एक बाजू पहारीच्या टोकासारखी पण अणकुचीदार नव्हे, अशी दोन्ही बाजूंनी निमुळती पण बोथट केलेली असते. खलबत्ता लोखंडी, दगडी तर काही प्रमाणात लाकडाच्या पाहूनही बनवला जातो, हे सगळ मजबूतीवर अवलंबून असतं.
अगदी छोट्या प्रमाणावर म्हणजे चहासाठी आलं किंवा फोडणीसाठी मिरच्या कुटणे वगैरे अशा कामापुरते हे यंत्र वापरले जायचे.
विशेषतः कोकणात कोणाच भांडणं वैगरे झाल तर 'खलबत्त्यात घालून ठेसू' असा वाक्यप्रयोग केला जातो. शब्दशः अर्थ नाही घ्यायचा, पण मरेपर्यंत मारू असा काहीसा अर्थ आहे. म्हणजेच मरेपर्यंत (चिजा/ धाण्य आपल्याला पाहिजे तेवढ बारीक होई पर्यंत) कुंटण्याच काम हे खलबत्त्याच. (कधिही न ऐकणार्याला शब्द थोडे विचित्र वाटतील ) 
नारायण पुरी, ता.लोहा, जि. नान्देड यानच एक छानस गाण आहे खलबत्त्यावर. एक-एक शब्द अफलतुन. मज्ज्या येते ऐकायला.
youtube Link https://www.youtube.com/watch?v=qoKLcEecVvU
"प्रेमाचा झांगडगुत्ता गं , जीव झाला हा खलबत्ता गं .
उखळात खुपसले तोंड प्रिये, मुसळाचा तुंबळ रट्टा गं " 


४) उखळ- मुसळ-
उखळ ही विविध प्रकारचे धान्य व शेतीमालावर प्रक्रिया करण्यासाठी बनविलेली वस्तू आहे. ही कठीण दगडापासून बनवली जाते. दगडाला खोलगट आकार दिला जातो. धान्य कुटण्यासाठी लाकडी मुसळ किंवा अखंड खोडाचा वापर केला जातो. उखळ या शब्दावरून अनेक वाकप्रचार व म्हणीही निर्माण झाल्या आहेत.
खळ-मुसळ पासुन प्रचलीत काही वाक्यप्रचार –
उखळ पांढरं झालं-खूप पैसा मिळणे, अवघें मुसळ केरांत- अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष होणें .
धान्य कांडले/सडणे तांदूळ ,तीळ ई. कुटणे यासाठी मजघरात दणकट लाकडाचे एक उखळ असे.
पूर्वी घरातील बायका दुपारच्यावेळी बेगमीची कामे करत असत. चटण्या, पापड, पापड्या, कुरडया इत्यादी गोष्टी घरीच केल्या जात. उखळ, धान्य सडण्यासाठी वापरले जात असे. गहू यात सडले जात. चटणीसाठी दाणे दगडी उखळात कुटत असत. त्या कुटलेल्या दण्याच्या चटणीची चव व मिक्सरमधल्या चटणीची चव यात फरक आहे. उखळातली चटणी चविष्ट लागते. उखळाचे बरेच प्रकार आहेत. जमिनीत पुरलेले उखळ, आणि एक जमिनीच्या वर उभे उखळ असे. त्याला उखळी म्हणत. जमिनीत पुरलेले उखळ तांदूळ सडण्यासाठी वापरले जात असे. एकत्र कुटुंबामुळे जे काय करायचे ते जास्तप्रमाणात करावे लागे. त्यामुळे उखळ मुसळ पण ब-यापैकी मोठे असे.
हे यंत्र मोठे असून दगडी किंवा लाकडी असायचं. मोठे कमरेच्या उंचीचे उखळ हे खोलगट बादलीप्रमाणे असून त्यात कुटण्यासाठी एक लांब दांडा म्हणजेच मुसळ वापरले जात असे. यात लाल मिरची कुटून मसाला करणे, पोहे कांडणे वा भात कांडणे अशा क्रिया केल्या जात.
उखळ- मुसळ-
लाकडी उखळ-मुसळ.jpg

५) व्हाईन / वायन -
हे ट्विटरने काढलेले व्हाईन हे लूप व्हिडीओ शेअरिंग अॅप नाही हा किवा जॉर्जियात सापडलेली 8000 वर्षं जुनी वाईन सुद्धा नाही. ही वेगळी आहे. विशेषत: कोकणात घरातच जमिनीत एक गोलाकार खड्डा करून त्यात घराच्या वापरापुरत्या थोड्या गोष्टी कुटण्यासाठी याचा वापर केला जाई . पुर्वी कोकणातील प्रत्येक घरामध्ये लाकडी किंवा दगडी व्हाईन असायची. व्हाईन किवा वायन असाही उच्चार करतात.
व्हायनात कुटण्यासाठी मुसळीचा उपयोग केला जायचा आणि त्याची माहिती वरती आलेली आहे.
व्हाईन / वायन-
व्हाईन-वायन .jpg

६) कणवा/ कणगी/डालगे-
पुर्वी भात ठेवण्यासाठी पिशव्यांचा उपयोग न करता बांबूच्या बेळांपासून तयार करण्यात आलेल्या कणगीचा वापर केला जात असे. ही कणग टोपलीप्रमाणे परंतु पाच ते सहा फूट उंच असते. पश्चिम महाराष्ट्रात याच कणवाला डालगे म्हटले जाते. आता प्लास्टिकच्या पिशव्या स्वस्त मिळतात. तसेच या कणगी तयार करणे आता बंद झाले आणि त्यांची किंमत सुद्धा प्लास्टिकच्या व गोणपटांपेक्षा जास्त असल्यामुळे या कणगीचा वापर करणे बंद झाले. आता कणवाची जागा प्लास्टिकच्या बॅरलने घेतली आहे.
धान्य साठवायच्या मोठ्या म्हणजे जवळपास पुरुषभर आकाराच्या वेताच्या पिंपाला कणगी म्हटलं जातं. एखादा माणुस नक्कीच मावेल एवढा आकार असतो. कणगी हा तर कोकणात हमखास आढळणारा प्रकार .
कोकणात दूध-दुभतं खूप असल्यामुळे अर्थातच शेणाला तोटा नाही. शेणाने सारवलेल्या जमिनीत ही कणगी शेणाच्याच साहायाने पक्की बसवली जाते. आणि तिला बाहेरून शेणाचा लेप दिला जातो. त्यामुळे कणगीची छिद्रे बंद होतात व थराच्या वासामुळे बाहेरून येणाऱ्या किडय़ांपासून धान्याचे संरक्षण होते. कणगीच्या तळाशी गवताचा थर दिलेला असतो. यामुळे आर्द्रता शोषून घेतली जाते आणि धान्य खराब होत नाही.
कणगी-
कणगी.jpg

७) डवली/डाव -
नारळाच्या करवंटीला वरून आडवी दोन भोके पाडून त्यामध्ये काठी घालून डवली तयार केली जायची. या डवलीचा उपयोग पूर्वी आमटी वाढण्यासाठी तसेच भात उकडल्यानंतर तो भात टोपलीत टाकण्यासाठी केला जात असे. आता स्टीलच्या विविध आकाराच्या चमच्यांमुळे या डवलीचा उपयोग आता केला जात नाही.
(दुर्दैवाने मला याचा एकही फोटो सापडला नाही, असेल तर क्रुपया पाठवा)
61SYz8_2BOZFL._SL1200_large.jpg
मोडर्ण डवली-





८) रोवळी/दुरडी अथवा लहान टोपली -

कडधान्यांना मोड येण्यासाठी ,तांदूळ ,भाजी धुणे इ साठी रोवळी वापरतात.
रोवळी म्हणजे वरती गोल पण तळाशी चौकोनी आकारात विणलेली छोट्या आकाराची उभट बांबूची करंडी.
रोवळी ही लग्नकार्यात सुद्धा वापरली जाते.
रोवळीत धान्य किंवा भाजी धुतली की पाणी जाळीतून आपोआप निथळून जातं आणि आतला पदार्थ सांडतही नाही.
रोवळी-
रोवळी.jpg
बांबू तासून त्याच्या पट्ट्या करून त्या पासून गोलाकार टोपली/ दुरडी तयार करतात. काही भागात टोपलीमध्ये जेवण ठेवण्याची पद्धत होती भाकरी सुद्धा ठेवली जाते .
टोपली-
दुरडी अथवा लहान टोपली.png
उस्मानाबादच्या आठवडी बाजारात दुरड्या विकणारी बुरुड समाजाची अनेक दुकाने आजही आहेत, तशी ती कोकणात ही काही प्रमानात सापडतात .

९) सुप-
सुप हा रोवळीची चा जोडीदार आहे. सुपाचा वापर धान्य निवडाण्यासाठी,पाखडण्यासाठी करतात.
सुफ आजही वापरात आहे पण पण थोड मोडर्न झालय, बांबूची जागा आता प्लास्टिक, स्टिल ई ने घेतली आहे.
सुप-
download.jpeg


चिकन कटलेट्स

साहित्य-
बोनलेस चिकन पाव किलो (खीमा बनवन्यासाठी)

हिरव्या मिरच्या 2, आल्याचा छोटा तुकडा, लसूण पाकळ्या 3-4 (आलं-लसूण-मिरची पेस्ट करुन घ्यावी)

1 छोटा बटाटा उकडुन, १ छोटा कांदा, शिमला मिरची १/४ वाटी, कोबी १/४ वाटी, कोथिंबीर १/४  वाटी, अर्धा लिंबाचा रस
1 चमचा लाल तिखट, मीठ 1 चमचा, गरम मसाला 1 लहान चमचा, तेल तळण्यासाठी.

आवरणासाठी- कॉर्नफ्लॉवर आणि पोह्याचा चुरा (जास्त ऑईली होत नाही, म्हणुन मी पोह्याचा चुरा घेते. त्या ऐवजी ब्रेडक्रम्स वापरले जाते)


कृती:
स्वच्छ केलेल्या बोनलेस चिकन ला आलं-लसूण-मिरची पेस्ट लावुन घ्यावी. यामध्ये २ पेले पाणी घालुन हवा बंद कढई मध्ये शिजण्यासाठी टेवावे. पाणी पुर्णपणे निघुन गेल्यावर एखाद्या चमच्याने चिकन शिजले आहे का ते चेक करुन पहा. शिजले चिकन बाहेर काढुन त्याचे छोटे तुकडे करुन त्याचा व्यवस्थित खीमा बनवुन घ्यावा.
खीमा तयार आहे.
कांदा, शिमला मिरची,कोबी,कोथिंबीर हे सर्व बारिक चिरुन घ्यावे. बटाटा कुस्करुन घावा.
सर्वप्रथम तयार खीमा एका बोलमध्ये घेउन लिंबाचा रस व्यवस्थित लावुन घ्यावा. आता यामध्ये कांदा, शिमला मिरची,कोबी,कोथिंबीर,बटाटा हे सर्व  साहित्य मिक्स करुन घ्यावे. आता यामध्ये लाल तिखट ( कलर साठी) ,मीठ, गरम मसाला हे देखिल व्यवस्थित मिक्स करुन घ्यावे.
चिकन कटलेटस मिश्रण तयार झाले आहे. याचे आपल्याला हवे त्या आकाराचे गोळे करुन घ्यावे.
कॉर्नफ्लॉवर मध्ये अंदाजाने थोडे पाणी घालुन पातळ मिश्रण करुन घ्या. या मिश्रणा मध्ये चिकन कटलेटस मिश्रणा चे तयार गोळे बुडवुन हेच गोळे शेवटी पोह्याचा चुरा किवा ब्रेडक्रम्स मध्ये घोळुन घावे. या नतर पॅन मध्ये तेल गरम करुन त्या मध्ये घेउन मंद आचेवर तळुन घ्या.
तळल्या नंतर व्हाईट टीशू पेपर वर ठेवा (जास्तीचे तेल निघुन जाण्यासाठी).
तयार कटलेट सॉस, चटणी सोबत खायला चांगले लागते.

टिप-
कॉर्नफ्लॉवर ऐवजी अंड्याचा ही वापर केला जातो.

कोकण म्हणजे स्वर्ग

गावच्या आठवणी शब्दांत उतरवणं मला जमल नाही.
एक एक ओळ म्हणजे एक सुंदर कविता जणू.
जन्माला यावं तर कोकणात अन् खेळावं ते माडाच्या,केळीच्या बनात. स्वर्ग म्हणजे दुसरं काय असणार. हा माझ्या गावचा स्वर्ग, असंख्य आठवणींना उजाळा देत वाहणारी छोटीशी नदी. अख्खं बालपण इथे हरवलं आहे. इथेच कुठेतरी सारिपाठाचा खेळ सुरू असायचा, याच फणसामागे लपंडाव  खेळ रंगायचा, याच जास्वंदी अन तगरी च्या माळा विठ्ठलाच्या चरणी वाहिल्या जायच्या. रम्य ते बालपण आणि ते कोकणात असेल तर अतिरम्य.

गावची नदी




                                   दुरच्या रानात....

                                  केळीच्या बनात

माड

                              अंगणी झरती धारा गं...

                              भिरभिर-भिनला वारा गं

  ऋतु हिरवा ऋतु बरवा

                               भिजुनी उन्हे थरथरती

माळ्याच्या मळ्यामंदी









बुधवार, ३१ जुलै, २०१९

महाराष्ट्रातील पर्यटन


महाराष्ट्रातील पर्यटन समजुन घेण्यासाठी काही पर्यटन स्थळे त्याची ठिकाणे आणि त्या विषयी थोडी माहिती मी या माझ्या धाग्यावर प्रकाशीत करणार आहे. एका ठिकाणी संग्रहण व्हावे हा या मागील हेतू आहे. हि माहिती अंतरजाला चा उपयोग करुन संग्रहित केली आहे याची कृपया नोंद घ्यावी.

खंडाळा - कोंकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या सह्याद्री पर्वतराजीतील बोर घाट जेथे संपतो ते ठिकाण म्हणजे खंडाळा. उत्तर बाजूस खोल दरी आणि दक्षिण बाजूस सह्याद्री पर्वताचा उंच पहाड याच्या मध्यभागी खंडाळा गाव वसलेले आहे. गावाच्या उत्तर बाजूने मुंबई-पुणे हा राष्ट्रीय महामार्ग भारतीय रेल्वे मार्ग जातो. खंडाळा स्टेशन हे कोंकण प्रांतातील कर्जत स्टेशननंतर थांबा असणारे स्थानक आहे. खंडाळा १८.४४ अंश उत्तर अक्षांश आणि ७३.२१ अंश पूर्व रेखांशावर वसलेले आहे.मुंबई,पुणे इतर जवळच्या शहरातील तरुण पर्यटक येथे ट्रेकिंगसाठी येऊन पिकनिकचा आनंद लुटतात. ड्यूक्स नोज हे येथे एक जवळचे डोंगर शिखर आहे तेथून पर्यटकांना खंडाळ्याचा आणि बोर घाटाचा मनोवेधक नैसर्गिक सृष्टि सौंदर्याचा देखावा नजरेत सामावता येतो.



कार्ला आणि भाजा लेणी,भुशी लेक,ड्यूक्स नोज,अमृतांजन पॉइंट,टायगर लीप/वाघदरी खंडाळ्यातील हे एक मनाला मोहिनी घालणारे ठिकाण आहे

चिखलदरा- चिखलदर्याचा मनोरंजक इतिहास आपल्याला अगदी महाभारत काळापर्यंत मागे घेऊन जातो. पांडवांनी वनवासातील काही काळ चिखलदर्यात घालवला होता असे म्हणतात. येथे असलेल्या विराटनगरीतील जुलमी आणि भोगी राजा कीचक याचा वध भीमाने केला आणि त्याला विराटनगरीहून जवळ असलेल्या एका दरीत फेकून दिले. ती दरी म्हणजेच कीचकदरा. अपभ्रंश होत त्याचे नाव चिखलदरा झाले. ज्या दरीत भीमाने कीचकाला फेकून दिले, ती दरी आणि वरच्या अंगाला ज्या झर्यात भीमाने आंघोळ केली ते भीमकुंडसुद्धा पाहायला मिळते.

जव्हार - जव्हार हे शहर महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्याचे मुख्य ठिकाण/शहर आहे. ठाणे शहरापासून १०० किलोमीटर अंतरावर हे थंड हवेचे ठिकाण आहे. ह्याला ठाणे जिल्ह्याचेमहाबळेश्वर समजतात. येथे जुना राजवाडा, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला `शिरपामाळ, सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य पाहावयास मिळणारे `सनसेट पॉइंट आणि येथील आदिवासींची संस्कृती जवळून पाहावयास मिळते. या ठिकाणाला ६३२ वर्षांचा ऐतिहासिक वारसाही लाभलेला आहे.

तोरणमाळ - तोरणमाळ सातपुडा पर्वताच्या तिसर्या चौथ्या रांगेत अक्राणी तालुक्यात वसलेले आहे.अतिदुर्गम भागात असल्याने जवळपास कोणतेही मोठे शहर नसल्याने पर्यटक संख्या कमीच असते. पण त्यामुळे तोरणमाळ अधिकच शांत आणि रम्य वाटते.

पाचगणी- पाचगणी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे.जवळपास महाबळेश्वर इतकेच उंच असलेले आणखी एक थंड हवेचे ठिकाण म्हणजे पाचगणी. महाबळेश्वरपासून हे ठिकाण अवघ्या १८-२० कि. मी. अंतरावर आहे. महाबळेश्वर इतकेच निसर्गसुंदर असलेले हे ठिकाण येथील पब्लिक स्कूल्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. जुन्या काळात येथे पारशी लोकांनी बांधलेले बंगले आजही लक्ष वेधून घेतात. येथे राहण्याजेवणाच्या चांगल्या सोयी आहेत. पाच डोंगराच्या समूहावर हे ठिकाण विकसित झालेलं असल्याने त्यास पाचगणी नाव पडले असावे.

महाबळेश्वर - हे ठिकाण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण प्रेक्षणीय स्थळ असून, येथे पर्यटक वर्षभर भेट देतात. ब्रिटिश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला उत्कृष्ट गिरीस्थान हा लौकिक आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासून ,३७२ मीटर उंचीवर पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे सहलीचे निसर्गरम्य ठिकाण आहे. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे ठिकाण आहे.हे आतिशय थंड हवेचे ठिकाण आहे.

माथेरान - हे रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. मुंबई आणि पुण्याच्या लोकांना सहलीसाठी सर्वांत जवळची आणि निसर्गसौंदर्याने नटलेली जागा म्हणजे माथेरान. साधारण ८०३ मी. किंवा २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसले आहे. संपूर्ण माथा विविध तसेच घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी भरलेला आहे. येथील पठाराची बरीचशी टोके तसेच पूर्व-पश्विम दक्षिणेकडील कडे कोसळले आहेत. ह्या कडांनाच पॉईंटस् म्हटले जाते. ज्या इंग्रजांनी माथेरान वसवले त्यांनीच या पॉईंटस् ना नावे दिली, त्यामुळे सहाजिकच ती इंग्रजीत आहेत.

म्हैसमाळ - ‘मराठवाड्याचे महाबळेश्वर अशी ख्याती असलेल्या म्हैसमाळचे पर्यटन पर्यटकांसाठी खडतर अनुभव ठरत आहे.  म्हैसमाळ म्हैसमाळ हे महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील एक सुंदर परंतु लहान थंड हवेचे ठिकाण आहे.

लोणावळा- भारतातील राज्य महाराष्ट्रातील, पुणे जिल्ह्यामध्ये असलेले एक पर्यटनस्थळ आहे.[] लोणावळा पुण्यापासून ६४ किमी तसेच मुंबई पासून ९६ किमी अंतरावर आहे. तेथील चिक्की हा एक सुप्रसिद्ध चवीने गोड असलेला पदार्थ आहे. लोणावळा हे मुंबई पुण्यामधील एक महत्वाचे स्टेशन आहे.[] पुण्यामधील उपनगरीय क्षेत्रामधून येथे येण्यासाठी लोकल रेल्वेगाड्या असतात. तसेच मुंबईपुणे एक्सप्रेस हायवे आणि मुंबईचेन्नई हायवे लोणावळा शहरातून जातो. तसेच लोणावळा हे भारतीय नौदलाचे सर्वोत्तम तांत्रिक प्रशिक्षण केंद्र आयएनएस शिवाजी चे मुख्यालय आहे.

टिपेश्वर - ता.वणीयवतमाळ जिल्ह्यातील केळापूर आणि घाटंजी या तालुक्यांमध्ये पैनगंगा नदी खोऱ्यात टिपेश्वर अभयारण्य पसरले आहे. (७८° ३५' पूर्व ते ७८° २०' पश्चिम आणि २०° ००' उत्तर ते १९° ३५' दक्षिण) नागपूरहैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. वरील पांढरकवडा गावापासून सुमारे २० कि. मी. अंतरावर, यवतमाळहून ९२ कि. मी. अंतरावर, अदिलाबादपासून ४२ कि. मी. अंतरावर हे अभयारण्य आहे.दि. ३० एप्रिल १९९७ च्या अध्यादेशानुसार १४८.६२ चौ. कि. मी. क्षेत्राला टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषीत करण्यात आले. या अभयारण्याचे संचालन मुख्य वनसंरक्षक नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पेंच राष्ट्रीय उद्यान चे वनसंरक्षक करतात. या जंगलात असलेल्या टिपाई देवीच्या मंदिरावरून या अभयारण्यास टिपेश्वर नाव पडले आहे. अभयारण्य क्षेत्रात टिपेश्वर, मारेगांव आणि पिटापुंगरी अशी तीन गावे येतात. या अभयारण्यात इंग्रजांच्या काळातील एक छोटेसे विश्राम गृह आहे. एक निसर्ग वाचन/अभास केंद्रही येथे सुरू करण्यात आलेले आहे.शुष्क पानगळीचे हे जंगल अनेक वन्यजीवांचे आणि झाडांचे पोषण करते. येथे वाघ, बिबट्या, रानमांजर, छोटे उदमांजर, खोकड, झिपरे अस्वल, चौशिंगा, काळवीट, भारतीय मुंगीखाऊ, चितळ आदी मुख्य सस्तन प्राणी असून सरपटणारे प्राणी नाग, घोणस, धामण, अजगर, घोरपड येथे पहायला मिळतात.वृक्षांपैकी अंजन, आपटा, बहावा, बाभुळ, बेल, बिबा, बोर, चिंच, चंदन, धावडा, हिरडा, जांभुळ, काठ सावर, खैर, मोह, पळस, साग, सालई, सिताफळ, सुबाभुळ, तेंदू, तिवस, उंबर, वड हे मुख्य वृक्ष येथे आहेत.फुलपाखरांपैकी Blue Pansy, Chocolate Pansy, Grey Pansy, Lemon Pansy, Yellow Pansy, Common Sailor, Commander, Baronet, Common Leopard, Joker, Common Crow, Plain Tiger, Common Grass Yellow, Common Gull, Pale Grass Blue, Grass Jewel, Common Rose, Common Mormon, Crimson Rose [मराठी शब्द सुचवा] ही फुलपाखरे येथे दिसतात.
याशिवाय सुमारे १६० जातींचे विविध पक्षी येथे पहायला मिळतात, त्यात पाणकावळे, बगळे, घार, तितर, कबुतरे, सुतार, नवरंग, मैना, स्वर्गीय नर्तक यांचा प्रामुख्याने समावेष आहे.

मायणी - तालुका - खटाव जिल्हा - सातारा क्षेत्रफळ - ३८६० हेक्टर लोकसंख्या 15570 (2019 च्या जनगणनेनुसार) तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. मायणी या गावातून चांद नदी वाहते. या गावातून मिरज-भिगवण (प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग) पंढरपूर-मल्हारपेठ हे दोन राज्य महामार्ग जातात. हे महामार्ग गावातल्या चांदणी चौकातून जातात.
मायणी हे गाव ऐतिहासिक आहे, तसेच पर्यटन स्थळ सुद्धा आहे.या गावामध्ये यशवंतबाबा सिद्धनाथाची यात्रा भरते. गावात इसवी सनाच्या १३ व्या शतकात यादवकालीन राजा सिंघण याने बांधलेले हेमाडपंथी स्वरूपाचे महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. येथील मातोश्री सरुताईंचा मठ प्रसिद्ध आहे.मायणी सर्व सोयीयुक्त असून मध्यम स्वरूपाचे शहर आहे.भविष्यामध्ये मोठ्या स्वरूपाचे शहर म्हणून नावारूपास येईल.हे गाव पक्षी अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे. गावापासून कि.मी. अंतरावर ब्रिटिशकालीन तलाव आहे. येथे अनेक पाणपक्षी दिसतात. तसेच स्थलांतरित पक्षीही येतात.स्थलांतरीत पक्ष्यांमध्ये रोहित पक्ष्यांचे थवे हे विशेष आकर्षण असते. त्याशिवाय चक्रवाक, पट्टकदंब, हळद-कुंकू ही बदकेही आढळतात. कापशी घार, गरुड, दलदल ससाणा असे शिकारी पक्षी देखील येथे आहेत.नदी सूर्य, खंड्या, कवड्या,राखी बगळा, वंचक, चित्रबलाक असे पाणपक्षी सुद्धा आढळतात. पक्षी निरीक्षणासाठी वनविभागाने येथे दोन मनोरे उभारले आहेत. 

पाचगणी-पाचगणी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे.पाचगणी आणि महाबळेश्र्वर ही दोन्ही ठिकाणे अनेक प्रेक्षणीय दृश्यांसाठी प्रसिद्ध आहेत. डोंगरकडे, दाट झाडी, चिंचोळे मार्ग, पर्यटनाचे ठिकाण म्हणून मुद्दाम तयार केलेले उत्तर रस्ते हे पाचगणीचे वैशिष्ट्य.

कामशेत-कामशेत हे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे. पुणे-मुंबई महामार्गावर कामशेत नावाचा छोटासा घाट आहे. त्या घाटाच्या पायथ्याशी हे गाव आहे. हे गाव पुणे जिल्ह्याच्यामावळ तालुक्यात येते. कामशेत हे रियासतकार सरदेसाई यांचे जन्मगाव आहे. इथे तुम्ही पॅराग्लायडींग ट्रेकींगचा थरार अनुभवू शकता.

माळशेज घाट- माळशेज घाट हा नगर- कल्याण रसत्यावर आहे. मुसळधार पावसातील शहरातील बंदीस्त वातावरण, चिखल, ट्रॅफिक जाम हे सर्व सोडून शरीराला आणि मनाला विरंगुळा मिळण्यासाठी एखाद्या घाटात यावं असं वाटणं साहजिक आहे. अशा घाटात काही ठिकाणी विशेषत: माळशेज घाटात हात उंचावला तर हातात ढग येण्याची शक्यता असते. चोहीकडे मखमली हिरवळीचे गालिचे पसरलेले दिसतात. धुक्याची निळी दुलई लपेटली जाते. अशा धुंद वातावरणात पावसात चिंब होणचा आनंद आगळाच असतो.

अलिबाग- लिबाग शहर समुद्रकिनार्याला लागून आहे. हे शहर मुंबईला लागून आहे. अलिबाग हे शहर सतराव्या शतकात मराठा साम्राज्याचे सेनापती सरखेल कान्होजी आंग्रे यांनी वसवले. रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव कुलाबा जिल्हा होते. मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी मुंबई-गोवा या प्रमुख मार्गाने जाता येते. या मार्गावर असलेल्या वडखळ या ठिकाणापासून पुढे अलिबागला जाण्यासाठी मार्ग आहे.हे अंतर मुंबईपासून १०८ कि.मी.आहे. लिबागच्या समुद्रकिनार्यांशिवाय किहीम, थळ, वरसोली, अक्षी, नागाव, आवास, सासवणे, रेवस ,चौल, मांडवा, काशीद आणि कोरलई हे समुद्रकिनारेसुद्धा जवळच्या परिसरात आहेत. कुलाबा किल्ला, कनकेश्वर मंदिर, चौल, गणेश मंदिर(बिर्ला मंदिर), कान्होजी आंग्रे समाधी, उमा-महेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, मुरुड जंजिरा, दत्त मंदिर, हिंगुलजा मंदिर, शितळादेवी मंदिर, चुंबकीय वेधशाळा, कोरलई किल्ला ही काही मुख्य प्रेक्षणीय स्थळे अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरात आहेत. याच बरोबर मराठी भाषेतील पहिला मानला जाणारा शिलालेख अक्षी गावात आहे. सासवणे येथील करमरकर शिल्पालयातील अतिशय सुबक मूर्त शिल्पे आहेत.

दापोली- दापोली केंद्रस्थानी ठेवून सर्व पर्यटन स्थळांना भेट देणे सहज शक्य आहे. ‘वीकएंडला या सर्व स्थळांना भेट देऊन परत मुक्कामी परतता  येते. अलीकडे प्रत्येक वीकएंडला दापोलीत येणा-या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच दापोलीचा पर्यटनाचा हंगाम हा बाराही महिने असतो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. येथील अनेक ठिकाणे आता पर्यटनात्मकदृष्टय़ा विकसित होत आहेत.
निसर्गाने बहाल केलेले असीम सृष्टिसौंदर्य, स्वच्छ मनमोहक विस्तीर्ण समुद्रकिनारे, तालुक्यातील ऐतिहासिक बंदरे, आंजल्र्यातील कडय़ावरचा गणपती, आसूदचे केशवराज व्याघ्रेश्वर देवस्थान, दाभोळचे चंडिकामंदिर, केळशीतील स्वयंभू महालक्ष्मी मंदिर याकूबबाबा सरवरी यांचा दर्गा अशी धार्मिक स्थळे, ऐतिहासिक वास्तू यांमुळे दापोली तालुका पर्यटकांच्या आक र्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्याचबरोबर थंड, प्रसन्न हवेमुळेमिनी महाबळेश्वर म्हणून असलेली ओळख यामुळे पर्यटकांना दापोली अधिकच भुरळ पाडत आहे.

दिवेआगार-दिवेआगर हे अतिशय शांत रमणीय आरामदायक अस कोकणातील छोटासा टुमदार गाव. एकदा दिवेआगर ला भेट देवूनही मन भरला नाही म्हणून परत सगळं अनुभवण्यासाठी,समुद्र दर्शनाचा आनंद घेण्यासाठी,लहान पण सुबक मंदिरांच दर्शन घेण्यासाठी कोकण मेवा खाण्यासाठी एका वीकेंडला पुन्हा एकदा पाय दिवेआगर कडे वळले.. दिवेआगरहून दिघीही १६ कि.मीवरच आहे. इथे जंजीरा किल्ल्याला जाण्यासाठी मोटरलाँच मिळते. खळबळत्या समुद्रातून सुमारे अर्धा तास सफर करून आपण जंजीर्याजवळ पोचतो.

कास पठार- कास पुष्प पठाराने पर्यटनाच्या क्षेत्रात देशातच नव्हे तर जागतिक नकाशावर सातारा जिल्हयाचा लौकीक नोंदविला आहे. सौंदर्याची अनोखी खाण असणारे कास पुष्पपठार हे पश्चिम घाटासह वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजेच जागतिक वारसा स्थळामध्ये युनेस्कोकडून नुकतेच समाविष्ट करण्यात आले आहे. आज साताऱ्याच्या पर्यटनाची ओळख खऱ्या अर्थाने सातासमुद्रापार झाली आहे. सातारा शहरापासून अवघ्या 23 कि.मी. वर धरतीवरच्या स्वर्गरूपाने साक्षात कास पुष्प पठार वसले आहे.

लोणार सरोवर- पृथ्वीतलावरील अग्नीजन्य खडकातील एकमेव अशनीपात विवर असलेले लोणारचे खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणजे अद्वितीय, अद्भुत आणि सर्वांसाठी रहस्यमय असणारा, निसर्गाने दिलेला अनमोल ठेवा आहे. त्या अशनीपातात पृथ्वीतलावर चार विवरे तयार झाली. त्यामध्ये अॅरिझोना (अमेरिका), ओडेसा (अमेरिका), बोक्सव्होले (ऑस्ट्रेलिया) आणि लोणार (भारत) यांचा समावेश आहे. पृथ्वीच्या पाठीवर अग्नीजन्य खडकातील लोणार हे सध्याचे एकमेव विवर आहे.

निघोज रांजणखळगे- शिया खंडातील सर्वात मोठे कुंड म्हणून या ठिकाणाची ख्याती आहे. कित्येक शतकापासून या कुंडामध्ये सतत पाणी असते. कितीही दुष्काळ पडला तरी पाण्याची पातळी कमी होत नाही. अतिशय सुंदर अशा कोरीव कामाप्रमाणे खडक या ठिकाणी पहावयास मिळतो. वर्षाच्या तिनही ऋतुमध्ये या ठिकाणी निसर्गाचे वेगवेगळे सौदर्य पहावयास मिळते.

सिंधुदुर्ग किल्ला- सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणाजवळ अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे.

माथेरान- माथेरान हे रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. मुंबई आणि पुण्याच्या लोकांना सहलीसाठी सर्वांत जवळची आणि निसर्गसौंदर्याने नटलेली जागा म्हणजे माथेरान. साधारण ८०३ मी. किंवा २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसले आहे. संपूर्ण माथा विविध तसेच घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी भरलेला आहे. येथील पठाराची बरीचशी टोके तसेच पूर्व-पश्विम दक्षिणेकडील कडे कोसळले आहेत. ह्या कडांनाच पॉईंटस् म्हटले जाते.

लोणावळा- लोणावळा हे, भारतातील राज्य महाराष्ट्रातील, पुणे जिल्ह्यामध्ये असलेले एक पर्यटनस्थळ आहे. लोणावळा पुण्यापासून ६४ किमी तसेच मुंबई पासून ९६ किमी अंतरावर आहे. तेथील चिक्की हा एक सुप्रसिद्ध चवीने गोड असलेला पदार्थ आहे आणि हे मुंबई पुण्यामधील एक महत्वाचे स्टेशन आहे. पुण्यामधील उपनगरीय क्षेत्रामधून येथे येण्यासाठी लोकल रेल्वेगाड्या असतात. तसेच मुंबईपुणे एक्सप्रेस हायवे आणि मुंबईचेन्नई हायवे लोणावळा शहरातून जातो. तसेच लोणावळा हे भारतीय नौदलाचे सर्वोत्तम तांत्रिक प्रशिक्षण केंद्र आयएनएस शिवाजी चे मुख्यालय आहे.

आंबोली - आंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी तालुक्यातील ५६१९ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११च्या जनगणनेनुसार ह्या गावात ८२२ कुटुंबे एकूण ४००४ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर सावंतवाडी ३० किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये २२३५ पुरुष आणि १७६९ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक १९५ असून अनुसूचित जमातीचे आठ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणनेतील स्थल निर्देशांक ५६६८५५ [] आहे.
आंबोली हे महाराष्ट्रातील अत्यंतिक पाऊस पडणार्या ठिकाणांपैकी एक आहे. येथे वर्षभरात सरासरी ७५० सेंटिमीटर पाऊस पडतो. आंबोली हे अत्यंत सुंदर निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे.

अनेर - धुळे
अंधेरी - चंद्रपूर
औट्रमघाट - जळगांव
कर्नाळा - रायगड
कळसूबाई - अहमदनगर
काटेपूर्णा -
किनवट - यवतमाळ
कोयनासातारा
कोळकाज - अमरावती
गौताळा औट्रमघाट - औरंगाबाद, जळगांव
चांदोली - सांगली, कोल्हापूर
चापराला - गडचिरोली
जायकवाडी -
ढाकणा कोळकाज - अमरावती
ताडोबा - चंद्रपूर
तानसा - ठाणे
देऊळगांव रेहेकुरी - अहमदनगर
नवेगांव - भंडारा
नागझिरा - भंडारा
नांदूर मध्यमेश्वर - चंद्रपूर
नानज - सोलापूर
पेंच - नागपूर
पैनगंगा - यवतमाळ, नांदेड
फणसाड - रायगड
बोर - वर्धा
बोरीवली(संजय गांधी) - मुंबई
भिमाशंकर - पुणे, ठाणे
मधमेश्वर - चंद्रपूर
मालवण -
माळढोक - अहमदनगर, सोलापूर
माहीम - मुंबई
मुळा-मुठा - पुणे
मेळघाट - अमरावती
यावल - जळगांव
राधानगरी - कोल्हापूर
रेहेकुरी - अहमदनगर
संजय गांधी - मुंबई
सागरेश्वरसांगली
दौलताबाद-औरंगाबाद

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय." पण ते शक्य न...