' शालीनी ताई हात धुवून किचन मधुन बाहेर आल्या. तृप्ती आणि रवी आपली तयारी करून निघणारच होते. त्यांना बघताच शालीनी ताईंचा पारा चढला.'
" रवी तिला चिकटून चालू नको. आणि हो तू मागच्या सिटवर बसतेस ना? की सगळं मेल सरमिसळ करून टाकता? "
" हो आई. मागेच बसते ती." रवी लॅपटॉप उचलत म्हणाला.
" अग सुनबाई, हे काय? आज दुसरा दिवस ना तुला. केसांवरून पाणी घेतलं नाही. "
शालीनी ताईंच्या या वाक्यासरशी तृप्ती ही चा पारा चढला. आधीच उशीर झाला होता. एक क्लाईंन्टची अर्जंट मिटिंग होती आणि त्यामध्ये हे काय आता नवीन. त्यामुळे ती थोडी चिडली होती.
" आई, काल केसांवरून पाणी घेतलं ना. रोजरोज केस धुवावेत असं कुठे लिहिल आहे. आणि एवढ केसात काय अडकुन पडलं आहे? रोज ते ओले केस बांधून
ऑफिला जायचं का? "
" अगं, रोज केस धुतले की काही बाधिकार नसतो. आपण हे चार दिवस पाळतो ना. मग व्यवस्थित करावं. चारच तर दिवस असतात ना." शालीनी ताईं तिला समजावत म्हणाल्या.
" हो आई, अहो पण चारच दिवस का? मला तर फक्त दोनच दिवसांची पाळी असते. तरीही चार दिवस पाळायचे?"
" अगं आधीपासून आपल्या घरी चालत आलेली परंपरा आहे. आम्ही सगळ्यांनी पाळणूक केली आहे. आमच्या सासूबाई तर खाष्ट होत्या. कुठे हात लावू द्यायच्या नाहीत. चार दिवस अगदी कडक."
" आई, वन्स ना तर सात दिवस त्रास होतो. मग त्या तर चौथ्या दिवसांनंतर अख्या घरभर फिरत असतात. मग पाळणूक नक्की कशासाठी?" तृप्ती देखील आता संतापली होती. हे अर्धवट चाललेले पाळणूकीचे प्रकार तिला अजीबात मान्य नव्हते. तरीही एवढे दिवस शांत राहून तिने मुकाट्याने सगळे सहन केले. आता नाही, तिने रवीला थोडावेळ थांबायला सांगितले आणि आपला विषय अगदी समजेल अशा सोप्या भाषेत पण उदाहरण देऊन स्पष्ट केला.
" आई, मी तुमच्या भावना समजू शकते. पण तुम्ही देखील काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्या आहेत. मी एका कॉरपोरेट ऑफिसमध्ये प्रोजेक्ट हेड आहे. कालच एक सव्वा दोन कोटींचा प्रोजेक्ट जवळपास कोटी च्या बजेटमध्ये बसवून कंपनीला कितीतरी लाखांचा फायदा कमवुन दिला आहे. मग तिथे जर काही तोटा, काही अपशकून झाला नाही, तर इथे घरी आपण एवढी अंधश्रद्धा का पाळतो? फक्त पुर्वीपासून चालत आलेल्या परंपरा म्हणून, की खरंच काही तथ्य आहे यामध्ये, यांचा विचार करायला हवा. "
शालीनी ताईंनी तोंडाला पदर लावला, सोफ्यावर रवीच्या शेजारी बसत बसत त्यांना भरुन आले.
" आम्ही बापड्या या पाळी वरुन खुप अवहेलना सहन केली. सासुबाईंचे खुप त्रास सहन केले. पण तोंडुन एक अक्षरही काढले नाही."
" आई, तू एक अक्षरही तोंडुन काढले नाहीस, म्हणून तर तुला विनाकारण त्रास सहन करावा लागला. पण म्हणून वस्तुस्थिती नाकारता येत नाही. आवाज उठवला तरी. विरोध केला तरच काही तरी नवीन बदल घडतील ना."
रवी त्यांची समजूत काढू लागला.
" आई वाईट वाटुन घेऊ नका. आपण स्त्री आहोत. आणि मासिक पाळी हे आपल्या स्त्रीत्वाचे मुळ. विनाकारण आपण विटाळ मानतो, पण त्याच चार दिवसांमूळे तर ही मानव सृष्टी आहे."
तृप्ती देखील त्यांच्या शेजारी उभी राहून समजूत काढू लागली.
" बरं बाई, तू नको पाळत जाऊस, हे चार दिवस. काही हरकत नाही माझी." शालीनी ताईं शांत होत म्हणाल्या.
" आई, खरंच?" तृप्तीला देखील आनंद झाला.
" हो. तुला मनाला वाटल तर पाळत जा. नाहीतर नको. मी सक्ती करणार नाही तुला. "
रवी आणि तृप्ती आनंदाने घरा बाहेर पडले. जाताना आईला म्हणाले, 'आई आपण या विषयावर एकत्र बसुन शांतपणे विचार करु, आणि मग एकमेकांना समजून घेऊन काय तो निर्णय घेऊ.'
शालीनी ताई देखील 'हो' म्हणाल्या.
समाप्त.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा