रविवार, ८ ऑगस्ट, २०२१

"वाचलास रेsssss वाचलास !"



           'पॉssssssss.... रात्री १२:४० ची शेवटची लोकल निघून गेली. बाहेर रस्त्यावर २० वर्षे जुनी फटफटी वाट बघत होती. किक मारताच गाडीत भरलेल्या रॉकेलची साक्ष म्हणून, ढीगभर धूर परिसरात सोडून, उरलेल्या ब्रँडीचे दोन घोट पोटात टाकत, मी तशाच भिजलेल्या बेलबॉटम मध्ये बाटली कोंबली आणि तोऱ्यात निघालो... चांगलीच किक बसली होती, फटफटीला पण आणि मला पण.'

आठ-दहा पावलांवर कोणी तरुणी पावसात आपली छत्री सरळ करताना पाहून मला पुढे जावेना. तेवढाच विरंगुळा... आणि ती तरुणी, अर्थातच सुंदर तरुणी.
"पुराणी ब्रँडी आणि गळ्यात रुमाल,
चिंब पावसाळी निशा.
फाटकी बेलबॉटम आणि फटफटी रॉकेल वाली.
समोर उभी ती...जणू अप्सरा नखशिखांत भिजलेली."

वाह्ह वाह।” {मी… माझे… मलाच.}


माझ्यातला कवी क्षणात जागा झाला. चार शब्दाची बळेच जुळवा-जुळव करून, एक चार ओळी रचुन करकचून ब्रेक लावला.
"
काही मदत हवी आहे का? " {अगदी अगदी फिल्मी स्टाईल. }

 

तिने एक तिरकस कटाक्ष माझ्याकडे टाकला. गाडीतून निघणाऱ्या धुराकडे आणि नंतर माझ्या त्या गलिछ अवताराकडे तुच्छतेने बघून, नाक मुरडत पुढे निघाली.

 

"आयला, मी एवढा वाईट दिसतो?"
त्या शेक्सपिअर ने 'नावात काय आहे'? या पेक्षा 'दिसण्यात काय आहे?' असा डायलॉग मारायला हवा होता. असा विचार माझ्या मनात येतो न येतो, तोच हा निव्वळ माझा गैरसमज आहे, हे मला लक्षात आले. कारण जात जात ती मला ऐकू येईल अश्या आवाजात पण पुटपुटत म्हणाली होती.
"
बेवडा कुठला."

 

"वा ... म्हणजे मी तेवढा वाईट दिसत नाही तर. चला, हे ही नसे थोडके."
मला हायसे वाटले. तिचा बेवडा शब्द ऐकताक्षणी मला माझ्या बाटलीची आठवण झाली. झटक्यात बाहेर काढून सगळी फटक्यात गट्टम करून टाकली .
"स्वाहा...
दर्द ए जिंदगी में, बस तुही एक सहारा हैं.
और एक गम हैं, जो सदियोंसे हमारा हैं."
माझी उस्फुर्त शायरी विनाकारण बाहेर पडली. नेहमीप्रमाणेच.

 

बाई फार चांगल्या होत्या... म्हणजे, फारच चांगल्या होत्या... दिसायला..."

पुन्हा गाडीला किक मारून मी तिच्या मागेमागे निघायाच ठरवलं. एवढ्या सुमसान रस्त्यावर एकटीच ती, मनाला काही बारं वाटेना, ते ही उगाचच… एव्हाना मागून येणाऱ्या एका आलिशान पांढऱ्याफट कारला हात दाखवत ती आत जाऊन बसली देखील, आतमध्ये बसलेला एक तरुण असा गोरा-गोमटा इसम स्पष्ट दिसत होता. कदाचित मला घाबरून ती त्या गाडीत बसली असावी , मी पुन्हा खजील होऊन आपला स्वतःचा रस्ता पकडला.

'जेमतेम दहा मिनिटे झाली असावी. एका वळणाला मी माझी फटफटी डावीकडे घेतली. ती सफेद कार सरळ समोर निघून गेली. का कोण जाणे, मला ओरडलया सारखा आवाज आला, खरं-खोट माहित नाही. कसलाही विचार न करता मी माझी फटफटी पुन्हा वळवून त्या गाडीचा पाठलाग करू लागलो. दोन घोट चढवून डोक्यात फारच हवा भरली होती त्याचा परिणाम. जसा त्या गाडीतून ओरडण्याचा आवाज येई तसा मी अजून वेगाने मोटार पळवत होतो. बराच वेळ पाठलाग असाच चालू होता. एक आलिशान ह्युन्दाईची कार आणि माझी जुनी-पुरानी फटफटी... जवळजवळ अशक्य पाठलाग.'

' सुमारे अर्ध्या तासाने अचानक त्या गाडीचा वेग कमी कमी होऊ लागला, संधीचा फायदा घेऊन मी त्या गाडीच्या सरळ पुढे माझी गाडी आडवी केली. दोन्ही गाड्या जागच्या जागीच थांबल्या होत्या. इकडे-तिकडे न बघता त्या पोराला गाडीतुन बाहेर ओढलं. तो आधीच रक्तबंबाळ झाला होता. शर्टची बटने तुटली होती. नखांचे ओरबडे अंगावर स्पष्ट दिसत होते.'


"
साल्या. भर रस्त्यात मुलीची छेड काढतोस. बघतोच तुला." मी थोडी रजनीकांत स्टाईल मारत त्याला ठोकणारचं होतो. उगाच त्या मुलीला शायनिंग दाखवावी. तेवढेच इम्प्रेशन म्हणून मी तिच्या दिशेने त्याला कॉलर धरून सरळ वरती उचलले. आणि माझी दातखिळी बसली.

 

'गाडीच्या बंद दरवाज्यातून तशीच आरपार बाहेर पडून ती बाजूला असणाऱ्या नदी घाटाकडे निघाली, तशीच पाठमोरी तिची मान गर्रकन मागे वळली, एक छद्मी हास्य आपल्या विद्रुप चेहऱ्यावर दाखवत दुसऱ्याच क्षणी डोळे विस्फारून तिने त्या गोऱ्या पोराकडे पहिले, आणि मोठयाने ओरडून आम्हाला दिसेनासी झाली.'
"वाचलास रेsssss वाचलास !"

---------------------------------

 

            'हिरव्या गर्द झाडीतून रातकिड्यांची भयंकर किर-किर ऐकू येत होती, जणू हातचे सावज गमावलेल्या शिकाऱ्याचा आक्रोश सुरु आहे. त्यामध्येच सडकून आदळणारा पाऊस माघार घ्यायच लक्षण दिसेना. रस्ता खड्यातून जातो, कि खड्डा रस्त्यातून त्याचा पत्ता लागेना. त्याच खड्यातून मागचा पुढचा कसलाही विचार न करता गाडी फरपटत होती. टायरची पार चाळण झाली असावी. गाडीचे हेडलाईट्स तर केव्हाचे टाटा-बाय-बाय करून गेले. काहीही असो गाडी थांबवायची नाही. कारण जीव महत्वाचा होता. दोन तास न थांबता गाडी चालत होती. शेवटी शहराचा रस्ता लागला. थोडी रहदारी वाढू लागली. तसे दोघेही एक चहाची टपरी बघून उतरले. घडलेला प्रसंग कोणालाही सांगणे शक्य नाही आणि कोण विश्वास ठेवणार ?'

 

" भाऊ, दोन कटिंग."

 

" जी साब." म्हणत चहा वाला तयारीला लागला.

 

" साल्या, तू तिच्या वाटेतच का गेलास?"

 

" मित्रा, अरे केव्हापासून तेच सांगतोय, मी काहीही केलं नाही, तिला फक्त विचारलं होत. कुठे जायचं आहे ? आणि... आणि तिने नव्वदच्या कोनात मान फिरवली... आणि...." तो पुन्हा भीतीने थरथरू लागला.

 

" आणि... काय? बोल पुढे. आपण आता शहरात आलोय, घाबरू नको."

 

" ती म्हणाली, 'माझं सोड, तुला बघा कुठं पोहोचवते ती.' हादरलो होतो रे मी तिथेच, गाडी थांबवण्याचा खूप पर्यंत केला पण गाडी थांबेना, आणि तिने माझी मानगुटी पकडली होती. मन... " बोलता बोलता त्याची बोबडी वळली. आणि भीतीने तो बेशुद्ध पडला. त्या चहावाल्या भाऊंच्या मदतीने मी त्याला त्याच टपरीच्या मागे एका लाकडी खुर्चीवर आडवं केलं. थोडे पाणी तोंडावर मारल्यावर त्याने डोळे उघडले. या डोळ्यात खोलवर भीतीचा डोंगर उसळला होता.

 

" म्या बन्या, हा घ्या गरमागरम चाsss. " चहाचे कप हातात देत चहावाला बन्या शेजारी येऊन बसला. मी काहीही न बोलता कप तोंडाला लावला. आमच्या डोळ्यासमोर काजवे चमकत होते, आणि हा काय नाव-गाव खेळतोय.

 

" सायेब घाबरल्यात वाटतं, कुठून आलात म्हणायचं? " बन्याच्या तोंडाचा पट्टा पुन्हा चालू झाला.

 

" हा सलीम, माझा मित्र. इकडून आलो ते... येताना थोडं लागलं गाडीला. अपघात झाला... अपघातच .." 'बर झालं गाडीमध्ये सलीमला त्याच नाव विचारलं होत.' मी काहीतरी सांगून वेळ मारून नेली. सलीम तर बोलण्याच्या मनस्थितीत न्हवता.

 

" सायेब, गाडीवर भागल तेवढं बरं... नाहीतर त्या रोडन येणारा वाचत नाय हो! "

बन्याच्या त्या वाक्यासरशी मी चांगलाच चपापलो. सालीमही सावध झाला. " त्या रोडने...म्हणजे ? " तो चटकन उद्गारला.


" तुमाला काय माहित नाय व्हय पाव्हणं, हितन दीड-दोन तासावर नदी घाटापासन ते टेशन येईस्तोवर चेटकिणीची वाडी हाय. त्या रस्त्यावरून एवड्या रातीच कोण बी येत नाय, आलाच तर, त्याचा मुडदा बी बागायला मिळत नाय."

 

बन्या शक्य तेवढ्या हळू आवाजात माझ्या कानात कुजबुजला, त्यासरशी माझ्या हातातला कप खाली गाळून पडला. सर्रकन अंगावर काटा उभा राहिला. सलीमची अवस्था माझ्यापेक्षा वाईट होती. मगापासून मला ओरडून ओरडून सांगत होता. की, ' मी तिला काही केलं नाही.' आता मला याची खात्री पटली.

 

" मला घरी सोडशील का मित्रा? आज माझी वाईट वेळ आहे असं वाटतंय. अल्ल्हा कसम, पुन्हा त्या रोडने गाडी आणणार नाही. " एवढं बोलून तो उठला.

 

" म्हनजी, या सायेबांना पकडलं होत? "

 

" हो. निघायला हवं. उशीर झालाय. किती पॆसे ? " पैश्याच पाकीट काढत मी सरळ विषय बदलला. बन्याच त्याकडे लक्ष न्हवत. मला स्पष्ट दिसत होते, त्याने टपरीच्या मध्यभागी ठेवलेल्या गणपतीच्या फोटोपुढचा दिवा घाईघाईने पुढे ओढला. चहाच्या स्टोव्हच्या जाळावर एक सुका कागद धरून तो त्या दिव्यावर ठेवला. दिव्याची ज्योत क्षणात पेटली. हात जोडून त्याने बाजूच्या पितळेच्या डब्यातून दोन कागदाच्या पुड्या काढून माझ्या आणि सलीम च्या हातावर ठेवल्या. " नेमकं काय घडलं सांगितलं असत तर नक्की मदत केली असती. सायेब आत्ता वाचलात, पण ती तशी कुणालाबी सोडत न्हाय, काळजी घ्या. आणि ह्या अंगारा सोबत ठेवत जा. "


'मी गप-गुमान पन्नासची एक नोट त्याच्या हातावर टेकली. त्या अंगार्याच्या पुड्या खिशात टाकत, आभार मानत आम्ही तिथून काढता पाय घेतला. तरीही निघता-निघत बन्या म्हणालात, " काय मदत लागली तर सांगा."'

------

'सलीमला त्याच्या गाडीसकट थेट घरी सोडून मी रिक्षा पकडून घराचा रास्ता धरला, तोपर्यंत चांगलीच सकाळ उजाडली होती. माझी गाडी त्या घाटातच सोडून आलो होतो. तिची आठवण तर येत होतीच पण, पण घरी जायची घाई लागली होती. कारण ही तसच होत.'

' निघताना सालिमने नाव विचारलं आणि मी क्षणात सांगून मोकळा झालो. नको सांगायला हवं होत.... की मीच, ज्याच्या कथा सत्यात उतरतात असा आरोप लावून अर्धी मीडिया माझ्या मागे हात धुवून लागली आहे तो, आणि या सगळ्यांपासून लपण्यासाठी वेषांतर करून दारूच्या बाटल्या संपवत गल्लोगल्ली फिरणारा, तो एक प्रसिद्ध पण अभागी भयकथा लेखक, मी 'अभिमन्यू कारखानीस.'

 ---------------------------------


                
त्या नदी घाटावर आजूबाजूचा कानोसा घेत मी गाडीला किक मारली, ती काही केल्या स्टार्ट होईना. बरेच दिवस पावसात भिजल्याने तिची अवस्था खूप वाईट झाली होती. सात वर्षे झाली, माझ्या स्वकमाईतून घेतलेली पहिली गाडी. असा कसा वाऱ्यावर सोडेन मी तिला. डिकी चेक करून आधी माझी डायरी उचलली. माझी डायरी, तिच ज्यामध्ये मी कथा लिहितो. माझ्या [अजरामर] कथा. मी लिहितो, मग वेबसाईटला पब्लिश करतो, आणि मग त्याच भयकथा कोणाच्या ना कोणाच्या आयुष्यच वाटोळं करतात. अगदी नायनाट....
आणि सुरु होतो लपंडाव. मी, माझी कथा आणि या सगळ्याच्या मागे लागलेली मीडिया, माझ्या कथेसारखीच घटना आयुष्यात घडून आयुष्याची फरफट झालेला एखादा अभागी देखील यात सामील असतो, जर तो अजून जिवंत असे तर.
नाही, यापुढे आता माझी कोणतीही कथा सत्यात उतरणार नाही. कारण आज मी या डायरीचा शेवट करतोय. लिखाण तर यापुढे बंदच… टाळेबंद म्हणा ना हवं तर.'

हातातल्या डायरीची पान फडफडत होती आणि मला खूप चरफडलं. अगदी खोल काळजात दुखरी कळ उमटली.
" कडकड कडाडणार्या मेघांची, गडगड त्या चमकणाऱ्या विजेची,
फडफड साऱ्या भरलेल्या पानांची, अन चरफड झाली या जीवाची. "
तरीही मी काळजाला हात घातला, आणि त्या डायरीची पानं ओरबाडायला सुरुवात केली. मिळेल ते, हातात सापडेल ते पान फाडत चाललो होतो. शेवटी आठवडाभरापूर्वी लिहिलेली ती कथा समोर आली, अजूनही क्रमश असलेली ... 'मी आणि सलीम, जिथे आम्ही सापडली होतो, चेटकिणीची वाडी.' नष्ट करायची होती सारी पानं, मी उजव्या हाताच्या मुठीत सलग चार पानं चुरगळून टाकली. फाडून टाकणारच होतो. इतक्यात, इतक्यात सोसाट्याचा वर सुटला. अकाली वादळाला सुरुवात झाली होती. काय चाललंय याचा थांगपत्ता लागेना, आणि ती डायरी माझ्या हातून निसटत चालली. अचानक तिच्यामध्ये कुठूनतरी बळ आले. नाही ... नाही, माझ्या हातातून कोणीतरी ओढतच नेली डायरी. असंख्य धुळीचे लोटच्या लोट वाहू लागले होते. त्यामागे कोण होते ते दिसेना. मी ही त्या डायरीला निसटता-निसटता अजूनच घट्ट पकडू लागलो. ती पुढे आणि मी मागे विव्हळ- फरपटत चाललो होतो. आता माझी शक्ती कमी पडू लागली आणि माझे अवसान गळून पडले. एका बाभळीच्या झाडाखाली मी डोकं टेकलं. शरीराला अगणिक काटे रुतत चालले होते.
आणि... आणि पुन्हा तेच वीभत्स हास्य ऐकू आले, त्याच विद्रुप चेहेर्यामागे दडलेले छद्मी पण विजयाचे हास्य. तिने डायरी हिसकावून घेतली होती. उपाशी लांडग्याला शेळी मिळवी, तशी ती डायरीतील त्या पानांवर तुटून पडली, मी जणू तिला नको असलेला निरुपद्रव प्राणी होतो. तिने एका हाताने माझी मान पकडली आणि सरळ हुसकावून लावले, थेट त्या नदीपात्रात. धडामsss, धूम. '

' डाव्या हाताच्या कोपराला खालची इटालियन मार्बल चांगलीच लागली होती आणि कमरेला सुद्धा. डोळे उघडले तर मी बेडवरुन खाली आडवा पडलो होतो. म्हणजे? म्हणजे ते माझं स्वप्न होत तर? माझा विश्वास बसेना. घाबरल्याने अंगावरचे कपडे घामाने चांगले ओलेचिंब झाले होते. मी कमरेला हाताचा आधार दिला आणि विव्हळत उठून पुन्हा बेडवर आडवा झालो. स्वप्न ते, खड्ड्यात गेली ती फटफटी. मारो ती डायरी, पुन्हा तिकडे जाणे नाही, स्वप्नात पण जायला नको.'

 

" अहो, त्याला पुन्हा वेडाचे झटके येत आहेत, आठवडा झाला तो येऊन. रूमच्या बाहेर पडत नाही. खाण्या-पिण्यामध्ये लक्ष नाही आहे. फक्त बडबडतो, 'वाचवा, वाचवा' म्हणून. "

 

" एवढं सुखसोयींयूक्त घर आहे, माझा कारखाना सुद्धा बक्कळ नफा कमावतो, पण त्यात या मुलाला काडीचा रस नाही. जातोच कशाला त्या निर्जन गावात? काय मिळत याला घर-दार सोडून ? काही कमी नाही इथे."

" असूदेत हो. लेखनाची आवड आहे. जातो अनुभव लेखनासाठी. पण आल्यापासून पाहतेय, तर मागच्या वर्षी सारखंच चालू आहे. परत वेड लागलं वाटत. "

 

" मग काय करू म्हणतेस? पुन्हा त्या सायकॅट्रिसला बोलवू ? "

 

" होय, बोलवा. दुसरा काही पर्याय दिसत नाही. आणि अभि आपलं ऐकतो कुठे. यावेळी त्याच्यासाठी चांगला डॉक्टर करूया. "

 

' बाहेर हॉलमधून आई-बाबांचा आवाज मला स्पष्ट ऐकू आला. मी आत्तापर्यंत केलेल्या चुकांची उजळणी सुरु झाली होती. मला वेड्यात ठरवून इलाज सुरु करायचा, ही त्यांची जुनी ट्रिक. ते तरी काय करणार? मी वागतोच असा, वेड लागल्या सारखा. पण पुरे झालं आत्ता हे सगळं, पुन्हा हॉस्पिटलची पायरी चढायची नाही. मला यातून बाहेर पडायचं आहे. माझ्या वेदना कुठल्या कुठे पळाल्या होत्या, मनाशी पक्का निर्धार करून, मी उठून तयारीला लागलो. आता पुन्हा सुरुवात, जिथे सगळं सोडून पळ काढला होता, तिथूनच पुन्हा नव्याने सुरुवात करायची.'


'पुन्हा मागे जाणं, फार अवघड नाही, आणि वाटत तितकं सोप्पही नाही. ठीक आहे, सुरुवात तरी करू. कोणाशी तरी मन मोकळं करावा म्हणून विचार करत होतो. मी कितीही वेळा पाठ फिरवू दे तरीही मला माझ्या चुकांसह पुन्हा पुन्हा बेशर्त स्विकारणारं, माझ्या हक्कच एकच माणूस, ती म्हणजे रक्षा. '

 ---------------------------------


              'अंधार्‍या रात्री आजूबाजूचा परिसर राकट धुक्याने आच्छादला होता. झाडे-वेली शांत निवांतपणे पहुडलेल्या, त्यावर नुकत्याच पडुन गेलेल्या पावसाचे ओघवते थेंब पाझरू लागले. सकाळचा पाच-साडेपाच चा प्रहर. अभिमन्यूची गाडी पार्किंगमध्ये उभी होती, शेजारी रक्षाची बाईक. या वेळी बाबाच्या अड्ड्यावर तसे कोणी चिटपाखरूही नसे. त्यामुळे बोलायला निवांत वेळ मिळतो. शिवाय हा अड्डा शहरवस्तीपासुन एका बाजूला येतो. त्यामुळे एवढ्या पहाटे इथे फक्त आणि फक्त अंधारलेल्या शांततेचे साम्राज्य होते. शिवाय रहदारीच्या ठिकाणी रक्षा भेटायला येणे, हे जवळजवळ अशक्य, म्हणुनच अभिमन्यूने ही जागा निवडली होती.
आल्यापासून चार-पाच कप चहा प्रत्येकी संपवून झाला होता. ' गेल्याचं आठवड्यात घडुन गेलेली घटणा आपण सांगितली, पण तिची काहीच प्रतिक्रीया नाही. नक्की काय चालु असावं तिच्या डोक्यात? ' या विचारात तो असतानाच रक्षाने आपला फोन कानाला लावला.
"
सुन्या, सकाळी सातला भेट, शिवाजी चौकात, तो टेकडीवरचा बुवा भेटेल का रे? थोडं कामं होत."

 

"..... “

 

 

" ठिक आहे."

 

"..... "


काहीतरी बोलून पलिकडून फोन कट झाला होता. अभिमन्यूने अधाशीपणाने फोनकडे पाहत लगेच प्रश्न केला, " कधी भेटतोय, तो मांत्रिक, बुवा."

" तो दोन वर्षांपूर्वी वारला, म्हातारा झाला होता त्यामुळे असेल." रक्षा त्यांच्याकडे कटाक्ष टाकत म्हणाली. आणि अभिमन्यू पुन्हा नाराज झाला.

 

" एक विचारू का? "

 

" हो, काय? "

 

" अभी तू सांगतोस ना, त्यावर माझा अजिबात विश्वास बसत नाही. फक्त तू म्हणालास म्हणून मी ते मांत्रिक, बुवा वगैरे शोधतेय."

 

" म्हणजे तुझा विश्वास नाही तर? " तो जरा रागानेच ओरडा."

 

" आवाज कमी कर, आणि शांत हो. प्रश्न फक्त विश्वासाचा नाही, नाहीतर मी एवढ्या दिवसांनी तुला भेटायला इथे आले नसते. "

 

" मग?"

 

" एक वाईट स्वप्न समजून तू हे सगळं विसरून का जात नाहीस. मग बघ, सारं काही व्यवस्थित होईल. तसेही त्या एका स्वप्नाव्यतिरीक्त तुला याचा पर्सनली असा काहीच त्रास नाही. "

 

" रक्षा, मी तेच ठरवलं होतं, पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायची. पण...पण, हे बघ."
सकाळीच आलेला मोबाईलवरचा मेसेज वाचुन दोन मिनिटे ती देखील अवाक झाली होती. सलीम चा मेसेज होता.


................... ' मित्रा खुप दिवस तुला शोधण्याचा प्रयत्न केला. पण नावापलिकडे मला काहीही माहित नव्हते. जेव्हा तू एक मोठा कथालेखक आहेस हे समजलं तेव्हा वेबसाईट वरून तुझा व्यावसायिक नंबर मिळाला. फोन तर उचलत नाहीस. कमीतकमी मेसेज उघडुन बघशील अशी आशा करतो. मी फार मोठ्या अडचणीत सापडलो रे. ती जी कोण होती ती, जिथे जाईन तिथे माझा पाठलाग करतेय. मला बोलावतेय, त्याच नदीघाटावर... मी एकटाच आहे आणि माझी फक्त एक अम्मी.... याव्यतिरिक्त आम्हाला दुसरं कोण नाही रे. फक्त एकदा येऊन जा. मग सविस्तर बोलू.
तुझी मदत लागेल.'
---------------------------------- सलीम महोम्मद.

 

" हा सलीम, तो तुझ्याबरोबर तिथे घाटात सापडलेला मुलगा? राईट."

 

" हो. माझ्यामुळे तो बिचारा अडचणीत सापडला. "

 

"आणि ते कसं? उलट तुचं त्याची मदत केलीस ना, म्हणून तर तो बचावला. नाहीतर... "

 

"तो देखील असच समजतोय. पण सत्य काहीतरी वेगळं आहे."

 

" तो जो प्रसंग आमच्या सोबत घडला त्याच्याच आदल्या रात्री मी नवीन कथा लिहायला घेतली होती. त्या कथेची सुरुवात जिथून झाली, आणि पुढे मी जिथे क्रमश: लिहून कथा तात्पुरती थांबवली, तो सगळा प्रसंग, म्हणजे सलीम आणि माझ्या सोबत घडलेला ती सत्य घटना. "

" नक्की काय म्हणायचं आहे तुला? तू जे लिहीत जातोस ते सत्यात उतरतं, हे खार आहे? आणि आत्ता तू हे मान्य ही करतोस. " रक्षा आपल्या पोलिसी शब्दांत त्याची उलट तपासणी घ्यायला लागली होती.

 

" होय. म्हणजे सध्या तरी तसाच घडत आहे. "

 

" पण या आधी जेव्हा, सगळे मीडियावाले आणि इतर तुझे नावापुरते फॅन्स तुझ्यावरती हाच आरोप करायचे तेव्हा तू ते मान्य करायचा नाहीस. "

 

" होय! कारण तेव्हा मला तसं कधीही जाणवलं नाही. "

 

" आता अचानक का जाणवलं बरं? एक, एक मिनिट, म्हणजे तुझ्या या कथेत मुख्य पात्र तू आहेस तर? आणि आधी लिहिलेल्या कथा तू दुसऱ्या कोणालाही मध्यस्थानी ठेवून लिहायचासं."

 

" एक्झॅक्ट्ली! त्यामुळे ते सत्यात उतरते कि नाही, हे मला समजायचे नाही. पण इथे मी लिहीणार्‍या कथेत स्वतः समाविष्ट आहे, त्यामुळे मी जशी कथा लिहिली तंतोतंत तशीच घटना माझ्या सोबत घडली, आणि सलीम फक्त त्या रस्त्याने जात होता. तो यात विनाकारण अडकला गेला. "

 

" मग हे जर खर असेल तर तुला त्याची मदत केली पाहिजे. पण माझा अजून विश्वास बसत नाही. हे असं देखील घडत ? आणि यामध्ये कोणाच्या तरी जीवावर देखील बेतू शकत? निव्वळ अशक्य वाटत रे. "

 

" कालपर्यंत मी ही हेच समजत होतो. पण आज मला त्याचा प्रत्यय येऊ लागलाय. "
त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा भयचकित भाव दिसू लागले होते. फासातं अडकलेल्या सावजासारखी अवस्था होती. कधीही शिकारी येईल आणि फास आवळेल. मग त्या सलीम ची काय अवस्था असणार? रक्षा देखील क्षणभर विचार करू लागली.

 

" अभि, तुला काय मदत हवी? आय मिन, मी काय करू शकते सांग? "

 

" हे नक्की काय चाललं आहे? याचा छडा लावायचा ठरवलंय मी. त्या प्रमाणे मी विचार करतोय, त्याप्रमाणे सगळं असेल तर... तर हे प्रकरण संपवणार मी. कायमचं. "

 

" ते कसं काय? "

 

" एक मांत्रिक शोधशील प्लिज. तुझे चेले असतात इकडे तिकडे फिरत, त्यांना सांग.... माझ्यासाठी. "

 

" चेले काय बोलतोस. गुप्तहेर आहेत, ते आम्हाला एखाद्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी मदत करतात. "

 

" असुदे. एवढं करशील?"

 

" होय. पुढे?"

 

" बघतो मी. कारण अजूनही या गोष्टीवर तुझा विश्वास नाही बसलाय. सध्या एवढीच मदत पुरे. "

" ऐकतोस, त्या बन्याला भेटायचं का? म्हणजे तू म्हणतोस तसं, तो आपल्याला काहीतरी मदत करू शकेल. "

 

" नक्कीच. आणि तो भेटल्यावर तुझी सुध्या खात्री पटेल, तुझा माझ्यावर विश्वास बसण्यासाठी आपण त्याला नक्कीच भेटू. "

 

" अभि माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि काही झालं तरीही मी तुला मदत करणार, हे देखील तुला चांगलं ठाऊक आहे, म्हणून तर सगळी दुनियादारी सोडून मला भेटायला बोलावलस ना! "

 

" थॅक्स. निघूया मग ? " चावी आणि पाकीट घेऊन तो ही उठला.

 ---------------------------------


           काल रात्री बन्याच्या टपरीला भेट देऊन आल्यापासून रक्षाच्या डोक्यात सतत काही ना काही वाईट विचार येत होते. अभिमन्यू ज्या विश्वासाने तिला तिथे घेऊन गेला होता, त्या नुसार काहीही माहिती हाती लागली नाही. उलट तिथे बन्या नावाचा कोणीही टपरीवाला दिसला नाही. जी एक टपरी त्याच जागेवर उभी होती, ती कुण्या जग्या नावाच्या बिहारी माणसाची होती. तो तर म्हणाला कि, ' त्याने दोन दिवसापूर्वीच नवीन टपरी चालू केली आहे, त्याआधी तिथे काहीही नव्हते. अगदी निर्जन अशी ती जागा...' कोणाच खरं आणि कोणाच खोटं? तिला काही समजेना.' काय करावं? याच विचारात ती असताना बाजूचा फोन खणाणला. अपेक्षित होत, त्याप्रमाणे पलीकडून अभिमन्यूचा आवाज आला.

" रक्षा, एक सांगायचं राहील, ती कथा, मी ज्या डायरीमध्ये लिहीत होतो ना, ती डायरी माझ्या फटफटीच्या डिक्कीत राहिली आहे." फोन उचलल्या उचलल्या तो पटकन बोलू लागला.

 

" अच्छा, मग त्याचं काय? "

 

" ती गाडी अजूनही त्याच घाटात आहे, जखनीची वाडी आहे तिथे. "

 

" तुला काय करायची आहे ती गाडी, आणि ती डायरी? जाऊदे ना. का फिरून-फिरून परत तिथेच जातोस? "

 

" ऐकतेस का? जर मी लिहितो ते खरं होत असेल, तर मीच माझ्या या कथेचा शेवट करून

मोकळा होतो ना. म्हणजे ही कहाणी कायमची दि एन्ड होईल. "

 

" म्हणजे तू तुझ्या कथेच्या पुढील भागात ती जी कोण बाई होती तिचा शेवट लिहिलास तर ती कहाणी संपेल? आणि...." आत्ता रक्षाला त्याचा मुद्दा समजू लागला होता.

" आणि या दृष्टचक्रातून माझी सुटका निश्चित... माझ्या सोबत त्या सलीमची ही सुटका." तो अतिउत्साहाने बोलून गेला.

 

" अभि, तुला वाटत असं होईल? शक्य आहे? "

 

" सध्या याव्यतिरिक्त दुसरं काहीही माझ्या हातात नाहीय. प्रयत्न तरी करून बघतो. काय म्हणतेस?"

 

" होय, बरोबर आहे तुझं. कर ना मग, आजच सुरुवात कर."

 

" होय, पण त्या डायरीसाठी ती माझी फटफटी परत इकडे घेऊन यावी लागेल. " त्याचा आवाज किंचित चिंताजनक होता.

 

" दुसऱ्या डायरीत लिहू शकतोस ना? " रक्षा आश्चर्याने म्हणाली.

 

" नाही. जे जिथून सुरु होत तिथेच येऊन संपत. ती कथा अजून क्रमश आहे, तिला पूर्णविराम मिळाल्यानंतरच तिचा शेवट होईल. वेगळ्या डायरीमध्ये सुरु करून नाही चालणार. "

 

" काय बडबडतोयस? आज सकाळ सकाळ बाटली घेऊन बसलायस ना ? "

 

" तुला नाही समजणार. सांगेन पुन्हा केव्हा तरी. "

 

" मरणाच्या दारातून तू परत आलास, पुन्हा तिथेच जायचं म्हणतोस. वेड लागलाय का तुला. "

 

" प्लिज, तुझ लेक्चर पुन्हा चालू करू नको. आणि मला तुझी मदत हवी... शेवटची समज. पुन्हा नाही त्रास देणार."

 

" नाही. मी तिथे येणार नाहीय. आणि तुला सुद्धा जाऊ देणार नाही. नको ती डायरी आणि मारो तुझी अर्धवट कथा. " रक्षा जवळजवळ ओरडलीच. आणि तिने लागलीच फोन कट केला.

 

' रक्षा एक पोलीस अधिकारी, सहसा कोणावर विश्वास ठेवत नाही. मग त्या ठिकाणी जायला ती स्पष्टपणे नकार का देते? याचाच अर्थ तिला त्या ठिकाण बद्दल काहीतरी धागेदोरे सापडलेत.' चाणाक्ष अभिमन्यूच्या हे लगेच लक्षात आले. घडलेली घटना पुन्हा-पुन्हा क्रमाने उजळणी करत तो त्याचावर तर्क-वितर्क लावत बसला.

*****

 

'इकडे रक्षा अगदी पहाटे ५ च्या सुमारास वेष बदलून निघाली. कारणही तसेच होत. अभिमन्यूने सांगितलेल्या त्या घटनेवरून शोध घेताना, बरीच माहिती हाती लागली होती. सात वर्षापूर्वी त्याच गावात त्या स्टेशनवर एक मालगाडी उलटून पन्नास एक कामगारलोक जागीच ठार झाले होते, मालगाडी स्टेशनच्या इमारतीवर कोसळली आणि स्टेशन देखील नेस्तनाबूत झाले. रुग्णालयात दाखल झालेले कामगार आणि अधिकारी अक्षरशः वेडे झाले होते. त्याच्यावर कोणतेही उपचार लागू पडत नव्हते. बरं, ती मालगाडी का उलटी झाली? याचे कारण देखील अद्यापही कोणाला समजले नाही. तेव्हापासून ते स्टेशन कायमचे बंद आहे. सात वर्षात तिथें एकही ट्रेन ये-जा करत नाही. तसही तो गाव कमी लोकवस्तीचा, त्यामुळे स्टेशनची आवश्यकता नाहीच, पण त्याकाळी तिथे निवडून आलेल्या नेत्याने आग्रहाने ते स्टेशन बांधून घेतले होते. आता एवढी वर्ष ते बंद आहे.'

'ज्यामुळे रक्षाची झोप उडाली होती. ती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, अभिमन्यूने त्याच्या कथेत लिहिलं कि त्यादिवशी तिथून शेवटची १२:४० लोकल निघाली. आणि ती तरुणी त्याच लोकल ने आली होती. म्हणजे मृतआत्मे सुद्धा ट्रेनने प्रवास करतात ? की रिकाम्या ओसाड ठिकाणावर त्यांचे साम्राज्य असते? आणि याने निव्वळ कथा लिहिली म्हणून तिथून लोकल आलेली त्याला दिसली? कारण मागील काही दिवसात तरी कोणत्याही वृत्तपत्रात तिथे पुन्हा स्टेशन सुरु झाल्याची बातमी आलेली नाही. हा काय प्रकार आहे. हे तिच्याही डोक्यात येईना. '

' या तपासामध्ये तिच्या हाती अजून एक माहिती लागली होती. ती म्हणजे, गेली सात वर्षे ते ठिकाण, स्टेशन ते तो नदीघाट, हे हॉंटेड म्हणून घोषित करण्यात आले होते. नेट वरती त्याचे बरेच किस्से विख्यात होते. रात्री १२ नंतर त्याठिकाणी कोणीही जात नसे. आणि चुकून त्या रस्त्याने प्रवास करणारे तिथेच गायब होऊन जातात. बऱ्याच लोकांनी यावर लेख, ब्लॉग्स वगैरे लिहिले होते. तिथे नक्की काय आहे, आणि त्याचा अभिमन्यूशी काय संबंध, याचा छडा लावण्यासाठी ती तयार झाली होती. त्याआधी एकदा सलीम आणि अभिमन्यूला भेटणे अनिवार्य होते. म्हणून तयारी करून ती बाहेर पडली.'

 ---------------------------------

         पावरी वस्ती सोडून, डावीकडे जाणाऱ्या छोट्या अरुंद रस्त्याने, टोकाला एका बैठ्या चाळीत दहा-बाय दहाच्या रूममध्ये सलीम आणि त्याची आई राहत होते. सलीम टॉक्सी ड्राइव्हर म्हणून काम करत असल्याने त्याची रूम शोधायला रक्षाच्या लोकांना वेळ लागला नाही. बराच वेळ कोणीही आतून दार उघडले नाही, ती दार ठोकून थेट आत शिरली. आत जाताच क्षणी एक कुबट वास तिच्या नाकाजवळ भनभनला. अंगावर एक भयंकर काटा उभा राहिला. एका लाकडी बाकड्यासारख्या छोट्या पलंगावर सलीम झोपला होता. त्याची अम्मी शेजारी डोकं टेकून बसून होती. सलीमची अवस्था फारच वाईट होती. खोबणीत आत घुसलेले डोळे, अगदी रुक्ष झालेले शरीर, जणू हाडांचा सापळा... मानेवर आणि हातावर नखांचे असंख्य ओरखडे दिसत होते. त्यावर बांधलेले बॅंडेज देखील रक्ताने भिजून गेले होते.
'अभिमन्यूने मला इथे पाठवल आहे, तुम्हाला मदत करायला.' अशी ओळख सांगितल्यानंतर सलीमच्या अम्मीने घडत असलेल्या घटना सांगायला सुरुवात केली.

 

' त्या घाटातून आल्यापासून तो आजारी होता. त्याच्या अंगावर उठलेल्या जखमांवर कोणतेही औषधं लागू पडत नव्हते. बरेच डॉक्टर करून झाले. गेले काही दिवस रात्री १२ नंतर त्यांच्या दारावर थापा पडतात. बाहेरून विचित्र आवाज येत असतो. अचानक याच्या अंगावर उठलेलया नखांच्या जखमांमधुन रक्त वाहू लागते. जस-जसा त्या जखमेमध्ये शिवाशिव उठतो, तस-तसा तो बिचारा वेड्यासारखा बडबडू, ओरडू लागतो, विव्हळू लागतो. त्याचा आक्रोश पाहवत नाहीती त्याचे हालहाल करत असते.'

हे सांगत असताना त्याच्या अम्मीच्या डोळ्यातुन घळाघळा पाणी वाहू लागले. सलीमच्या जीवाची भीक मागत ती माता अल्लाहचा धाव करत एकेक दिवस अक्षरशः ढकलत होती. सलीम तर आता बोलण्या-चालण्याच्या मनस्थितीत राहिलेला नव्हता. त्याने जगण्याची आशाच सोडली... ‘मला मुक्त करा या यातनांतून, सोडवा’ अशी सारखी बडबड करत होता.'

मनाशी काहीतरी निर्धार करून सलीम आणि त्याच्या आईला आश्वासन देऊन रक्षा तिथून निघाली. तिची गाडी थेट त्या जांभूळवाडी स्टेशनच्या दिशेने भरधाव वेगाने धावू लागली.

अभिमन्यूला प्रत्यक्ष असा काही त्रास नसला तरीही त्या स्वप्नाने त्याची देखील पाठ सोडलेली नव्हती. म्हणजे हे दोघेही त्या मायावी शक्तीच्या सावटाखाली आलेले होते. अभिमन्यू सांगत होता, त्यात खरोखर तथ्य आहे, हे आता रक्षाला मनोमन पटले. तरीही ती अजून काही माहिती मिळते का ? ते पाहण्यासाठी या घटनेशी संबंधित धागेदोरे गोळा करू लागली होती.

*****

 

रिव्हॉल्वर, कटर, मोबाईल आणि काहीबाही इतर हवे असलेले साहित्य भराभर बॅगमध्ये ठेवून, एक काळे मिट्ट ब्लेझर अंगावर चढवत ती घराबाहेर पडली. आज बाईक नको, आपली मारुतीची नवो कोरी भरधाव वेगाने धावणारी चारचाकी गाडी, वाऱ्याच्या वेगाने उडवत तिने बन्याची टपरी गाठली. आजूबाजूला कोणीही नाही याचा अंदाज घेत ती टपरीकडे वळली, सकाळचा मस्त गारठा जाणवत होता. सुदैवाने टपरीवर कोणीही नव्हते. चहाचा एक कप भरून बन्या तिच्या दिशेने आला.

" पोलिसवाल्या बाई ना? चा आणला होता." कप तिच्या हातात देत, घाबरत घाबरत बन्या समोरच्या लाकडी बाकावर बसला.

 

" बन्या माझ्या माणसांनी तुला बरोबर शोधून काढलं. मला माहित होत. मला हवी असलेली माहिती तूच देऊ शकतोस. बोल! " कप बाजूला ठेवत रक्षाने आपल्या ब्लेझरच्या खिशातील रिव्हॉल्वर काढून हातात घेतला.

 

" मेडम, त्याची काय बी गरज नाय. म्या सांगतु सगल." तो चाचरत बोलू लागला.

 

" हि माझी टपरी म्या गपचूप चालवतू, फकस्त रातीचं, आणि दिस उजडायच्या आत हितन निघून जातो. हे कुणाला बी सांगू नका. '

 

" तू सगळी खरी माहिती दे. तुला जे माहित आहे, ते-ते सगळं सांग. तुला कोणीही काहीही त्रास देणार नाही. विनापरवाना टपरी चालवतोस म्हणून घाबरतोस ना, पाहिजे तर मी तुला परवाना काढून देते, म्हणजे तुला असं रात्रीच चोरून इथे येण्याची गरज नाही. दिवसा देखील तू इथे येऊ शकशील. "

 

" उपकार होतील मेडम. "

 

" बरं, मग मला सांग तुला त्या नदीघाटावरील अघटित घटनांची काय माहिती आहे? आणि तिथे नक्की काय आहे? " फोनचा रेकॉर्डर ऑन करून ती रेकॉर्ड करायला लागली होती. त्या दिवशी अभमन्यू आणि सलीम बराबर घडलेली घटना, तसेच त्याच ठिकाणच्या अजून काही वाईट घटना त्याने तिला सांगितल्या.

एकदंरीत बोलण्यावरून त्या ट्रेन अपघाताचा आणि त्यानंतर चालू झालेल्या या अघटित घटनांचा अगदी जवळचा संबंध आहे, हे तिच्या लक्षात आले. राहून-राहून तो एक गोष्ट रिपीट करत होता. ती म्हणजे, अभिमन्यूचा त्या ट्रेन अपघाताशी काहीतरी संबंध नक्कीच असणार.

बोलता बोलता रक्षाने सलीमची काय अवस्था आहे, याविषयी सांगितले. तेव्हा बन्या चांगलाच घाबरला होता. त्याच्या तोंडातून एवढेच शब्द निघाले. " त्या जखीणीला तो पोरगा पायजे, त्याच रगात तिच्या तोंडाला लागलाय, त्याला ती सोडणार नाय, म्हणून त ती येवडी पिसळलेय. त्याला वाचवा मेडम. "

 

" मग अभिमन्यूच काय? त्याला त्या स्वप्नाशिवाय तसा काहीच त्रास नाही. तो सुद्धा सलीम बरोबर तिच्या तावडीत सापडला होता ना? "

 

" सांगतोय काय मेडम, त्या सायबांशी काय तरी उसनवार हाय तीचं, कायतरी बाकी हाय, ते एकदा का वासूल झालं कि मग त्यांची बी बारी. "

 

" म्हणजे? "

 

" म्हणजे बगा, सायब मागून गेलं, म्हणून ते सलीमसायब बचावल. नायतर त्यांना ती चेटकीण घेऊन गेली असती. अजून एक, ती त्या दोगांना बी घेऊन जाऊ शकत व्हती, पर तिनं तसं केलं न्हाई, म्हणजेच अभिमनू सायबांशी अजून कायतरी हिशोब बाकी हाय." त्याच्या शब्दासरशी रक्षाच्या अंगावर काटा आला. कोणत्याही परिस्थिती ती अभिमन्यूला काही होऊ देणार नव्हती. हवी असलेली बरीच माहिती मिळाली होती. जांभूळवाडी गावातून मिळालेली माहिती आणि बन्याने सांगितलेल्या घटना यावरून अंदाज लावणे शक्य होते.

 

' बन्या म्हणाला, हे जे काही विचित्र प्रकार चालू आहेत, ते सात-एक वर्षापासून… तिथे जाऊन जी काही माहिती मिळाली होती त्यानुसार, त्यावेळी ते गाव तसं मागासलेलं होतं, तिथल्या नदी किनाऱ्यावर नुकतच एक पुलाचे काम सुरु झालेले. स्टेशन, गाव आणि तो नदीघाट यांना जोडणारा असा कच्चा रस्ता डांबरीकरण करण्याचे काम मध्यावर आलेले.
आमच्यासाठी सात-एक वर्षांपूर्वीचा काळ म्हणजे? अभि आणि मी कॉलेजला असतानाचा काळ. आमच्या प्रेमाची सुरुवात. कॉलेजमधलं फेमस कपल आम्ही होतो. तेव्हा तो नुकताच लिहायला लागला होता. कथांच्या पलीकडे सांगण्यासारखं काही नसायचंच त्याच्याकडे. मला त्याच्या लिखाणात तसा फारसा इंटरेस्ट नव्हता. आणि त्यामुळे तो ही मला नवीन काही सांगायचा नाही. आधी जेवढं मोकळेपणाने बोलायचं, भेटायचं ते सार जवळजवळ संपून गेलेलं. हळूहळू त्याच्या छापील पुस्तकांना देखील चांगलंच मार्केट मिळू लागलं होत. पण हवी तशी प्रसिद्धी एका कादंबरीने मिळवून दिली, फार गाजली ती. ..कारण त्या कादंबरीमुळेच तो लिहितो ते खरं होत, असा ठपका त्याच्यावर पडला आणि मीडिया हात धुवून त्याच्या मागे लागली. त्यामुळे अभि घरापासून दुरावला आणि माझ्यापासूनही… त्याच्या आणि माझ्या आयुष्यात वादळ निर्माण करण्यासाठी मी त्याच्या लिखाणाला जबाबदार ठरवते, आणि मुख्य म्हणजे ती एक कादंबरी, त्या कादंबरीची एक प्रत त्याने मला भेट म्हणून दिली होती, पण मी रागाने ती अद्यापही वाचली नाही. काय असेल ती? एकदा बघावी का? नावसुद्धा आठवत नाही. '

रक्षाच्या हातातील स्टीयरिंग पळत होते, आणि तिच्या-त्याच्या भूतकाळातील आठवणींचे क्षण ही त्यासोबत धावू लागले. त्या जुन्या आठवणींनी भरून वाहणाऱ्या वार्याला लगाम लावणं तिला शक्य नव्हतं. पण त्यासोबत शर्यत करण्याची तिची नेहमीचीच खोड. कधीतरी आपला विजय होईल हे निश्चित... आपण आजही अभिमन्यूवर तितकच प्रेम करतो. हे तिला खूप चांगलं माहित होत. आणि आपल्या त्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी होती.

आज खूप वर्षांनी तिने पुन्हा कारखानिसांच्या घराचा रस्ता पकडला...

 ---------------------------------


        'मिसेस कारखानिस नी हसत हसत रक्षाचे स्वागत केले. तिचे येणे म्हणजे खरं तर त्यांच्यासाठी सुखद धक्का होता. दोघी खूप दिवसांनी फार मनमोकळेपणाने बोलल्या. अभिमन्यूची काळजी होतीच, एवढ्या दिवसांनी दोघींची भेट झाली आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला होता. तोपर्यंत अभिमन्यू देखील त्यांच्या बैठकीत सामील झाला. चहापान उरकून त्या भूतकाळातून वर्तमानकाळात आल्या तेव्हा त्यांची मुद्रा फार चिंताग्रस्त वाटली. म्हणून रक्षाने देखील विषय बदलला. ती अभिमन्यूच्या येणाऱ्या नवीन कादंबरी विषयी बोलू लागली.'

 

" अभि, कुठपर्यंत आली तुझी प्रेमकथा? "

 

" संपेल काही दिवसात, तशी थोडीच राहिलेय, पण लिखाणात म्हणावे तसे मन लागत नाही ग. "

 

" अरे अभि, तू चक्क प्रेमकथा लिहितोस? मी तर फक्त भयकथा लिहिणारा म्हणूनच तुला ओळखते. " मिसेस कारखानिस सहज बोलून गेल्या.

 

" काकू, याच्या कथा तुम्ही वाचल्या आहेत का? " हातातील रिकामी डिश खाली ठेवत रक्षा म्हणाली.

 

" वाचते म्हणजे, मला एवढा वेळ कुठे असतो. पण याची ती सुप्रसिद्ध कादंबरी वाचलेय हो मी. काय भीतीदायक लिहितो हा. "

 

" मम्मा त्याला फार वर्षे झाली, त्यानंतर माझी शंभर एक पुस्तक छापली गेली असतील. " तो हसत हसत म्हणाला.

 

" नको रे बाबा, एक कथा वाचली तेव्हा फार घाबरून गेले होते. त्यानंतर तुझ्या भयकथा वाचण्याची माझी हिम्मत झाली नाही. हं, पण प्रेमकथा लिहितोयस तर नक्की वाचेन हं. शेवट गोडं कर म्हणजे झालं. "

 

" काकू कोणती होती ती कथा? आणि तुम्ही घाबरण्यासारखं काय होत एवढं ? " काहीतरी गवसल्यासारखे सावधपणे रक्षा त्या कथेविषयी माहिती काढू लागली.

 

" सोड ना तू पण, काय घेऊन बसतेस. मम्मा तुला कारखान्यात व्हिजीटसाठी निघायचं होत ना, उशीर करू नको, नाहीतर पप्पा पुन्हा रागवतील. " अभिमन्यू विषयाची टाळाटाळ करत उठला.

 

" अरे हो. मी निघते, तुम्ही दोघे बोलत बसा. तसाही मला उशीर झालाय. " हातातील पर्स आणि फाइल्स घेऊन मिसेस कारखानिसनी निघण्याची तयारी करू लागल्या.

 

" काकू सांगा ना, कोणती होती ती कादंबरी? " रक्षा आपल्या मुद्द्यावर आडून होती.

 

" काय बर ती... आठवत नाही गं. नक्की आठवत नाही. काही तरी 'वाडी...' असं नाव होत." दारातून बाहेर पडत असताना त्या बोलत होत्या.

 

" मु.पो.जांभूळवाडी…? " चाणाक्ष रक्षा चटकन बोलून गेली. आणि तिच्या वाक्यासरशी बावरलेला अभिमन्यू गर्रकन मागे वळला.

" होय ग, बरोबर हेच नाव आहे. चलो बाय, आल्यावर बोलू. "
टाटा-बायबाय करून त्या घराबाहेर पडल्या आणि रक्षाने आपला मोर्चा अभिमन्यूकडे वळवला. " तुझी लायब्ररी कुठे आहे दाखव. मला ती कथा वाचायची आहे. "
त्याच्या उत्तराची वाट न पाहता ती तरातरा जिने चढून वरच्या मजल्यावर आली. अभिमन्यूही तिच्या मागून धावत वरती आला. पण त्याला काही समजण्याच्या आत बेडरूममध्ये दिसेल ते कपाट उघडून तिने पुस्तक चाळायला सुरुवात केली होती. रक्षाला थांबवणे आता कोणाच्याही हातात नव्हते, त्या रूममध्ये हळूहळू पुस्तकांचा ढीग सर्वत्र विखुरला गेला. "कुठे आहे ती कथा ? इथे....नाही, तिथे....नाही." तिची सुरु असलेली असंबंध बडबड, सोबत अस्ताव्यस्त पसरलेला ढिगारा, पुस्तकंच-पुस्तकं , त्यातच स्टेशनरी साहित्य, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू, सगळे आलेले गिफ्ट्स, विखुरलेले कपडे आणि जुन्या फोटोचे अल्बम्स सगळा पसारा उपसून झाला होता. पण पाहिजे असलेले काही तिच्या हाती लागले नाही. तेव्हा ती मटकन तिथेच बेडवर बसली. एका कोपऱ्यात उभाराहून बघत असलेला अभिमन्यू तिच्या शेजारी येऊन बसला.

 

" तू शेधत आहेस ती कथा इथे नाही. ते छापील पुस्तक मी माझ्याकडे ठेवलेलं नाहीय. होय पण त्याचे कच्चेचिटठे, रफ लेखन माझ्या डायरीत आहे... "

तो पुढे बोलणार एवढ्यात ती ओरडलीच. " आणि ती डायरी तू त्या घाटात सोडून आलेल्या बाईकच्या डिक्कीत आहे. बरोबर ना ? "

 

" होय." तो मन खाली घालून म्हणाला.

 

" म्हणजे तुला माहित होत. हे सगळं त्या जुन्या कथेमुळे घडत आहे. आणि तू हे माझ्यापाहून लपवून ठेवलास. यापुढे मी तुझी काहीही मदत करणार नाही. बाय. " तिचा राग अनावर झाला होता. आता ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती सरळ उठून ती बाहेर निघाली.

 

" रक्षा थोडा वेळ दे. मी सगळं सांगतो. प्लिज. " तिला अडवण्याचा पर्यंत करत तो हि तिच्या मागे-मागे हॉल मध्ये आला.

 

" बोल. सगळं खरं आणि स्पष्ट... काहीही न लपवता. "

" माझी ती कथा सात वर्षापूर्वीची, मु.पो.जांभूळवाडी यामध्ये मी जांभूळवाडी या एका काल्पनिक गावात घडलेल्या अघटित घटनांवर कथा लिहिली होती. दुर्दैव असे कि, त्या तंतोतंत घटना काही दिवसांनी सत्यात उतरल्या, मुख्य म्हणजे तो ट्रेन अपघात मी जसा माझ्या कथेत उतरवला तसाच तिथे प्रत्यक्ष घडला, माझ्या कथेमध्ये जे प्रसंग होते ते बहुतांशी त्या गावी घडून गेलेत. पण हे मला आता समजलं, कारण मागे काही दिवसांपूर्वी मी त्या गावात जाऊन वेष बदलून राहून आलोय."

 

" बरं, मला कथेची सुरुवात आणि शेवट सांग? "

 

" कथा थोडक्यात सांगतो, एका गावात रेल्वे स्टेशनचे बांधकाम सुरु करण्यासाठी गरीब आदिवासी लोकांची जमीन जबरदस्तीने बळकावली जाते, त्या बदल्यात त्यांना काहीही मिळत नाही. मग सुरु होते, मृत्यू सत्र... त्यातील काही लोक आत्महत्या करतात, आणि आत्मे बनून बदला घेतात, ज्या दिवशी स्टेशनचे बांधकाम संपुष्ठात येते आणि ट्रेन सुरु होते, त्यादिवशी स्टेशन ऑफिसचे सामान घेऊन आलेली एक मालगाडी उलटवून लावली जाते, या घडवून आणलेल्या अपघातामध्ये स्टेशनवरील सगळे नोकरवर्ग आणि अधिकारी सापडतात आणि स्टेशन नेस्तनाबूत होते, त्यापुढे ते स्टेशन केव्हाही चालू होत नाही. आणि कथा संपते. "

 

" हि सेम घटना तिथे घडली होती हे मलाही माहित आहे. म्हणजे त्यानंतरच लोक तुझ्या या कथेवर भडकले तर? सत्य घटना म्हणून."

 

" तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे माझी ती डायरी... " अभिमन्यू पुढे बोलू लागला.

 

" आता तिचं का? "

 

" मी खूप कथा, कादंबऱ्या लिहिल्या आहेत, बऱ्याच वेळा समाजात घडत असलेल्या घटनांवर लिहायचो, आणि त्या प्रसिद्ध हि व्हायच्या यामुळे माझे शत्रू, जे लेखक आहेत पण स्वतःला माझे स्पर्धक मानतात, ते माझ्या कथांचा कुठेही घडणाऱ्या सत्य घटनांशी संबंध जोडून माझी उगाचच बदनामी करायचे. "

 

" बरोबर, कारण तू रोज डझनभर कथा लिहायचास त्यातली एखादी तरी कुठल्या सत्य घटनेशी मिळती जुळती होऊ शकते, पण त्याचा इथे काय संबंध ? "

 

" खरं सांगायचं तर, मी फक्त त्या डायरीत लिहिलेल्या कथाच खऱ्या होतात. " तो हळू आवाजात बोलला.

 

" म्हणजे " ती पुन्हा जवळजवळ ओरडली.

 

" ती डायरी विशेष आहे, त्यात मी फक्त दोन कथा लिहिल्या एक 'मु.पो. जांभूळवाडी', आणि दुसरी 'नदीघाटातील रहस्य' जी अजून अपूर्ण आहे. "

 

" एक, एक मिनिट... म्हणजे तू काही दिवसांपूर्वी तिथे राहायला गेलास तेव्हा तुला समजलं कि तू लिहिलेली ती जांभूळवाडी कथा खरोखर सत्य झाली होती, तेव्हा जाणून बुजून तू त्याच ठिकाणवरून दुसरी कथा लिहायला घेतलीस. ते पण स्वतःला मध्यस्थी ठेवून... बरोबर? "

 

" शंभर टक्के अचूक ओळखलस. मी मुद्दाम लिहीत असलेली कथा दुसऱ्या रात्री खरी ठरली आणि सलीम त्यात अडकला. मी फक्त माझ्यावरतीच कथा लिहिली असती तर बरं झालं असतं. तो अडकला, आणि मी हि घाबरलो होतो, त्यामुळे मी माझी डायरी सुध्या तिथेच सोडून तिथून पळ काढला. नाहीतर मी त्या डायरीचा आणि सगळ्या कथेचा शेवट करणार होतो. तसही गेल्या काही वर्षात मला खूप वाईट अनुभव येत होते, कोणीतरी सतत माझा पाठपुरावा करत असतं. ती वाईट स्वप्न, माझे वेडाचे झटके या सगळ्यातून सुटका करून घेण्यासाठी, त्याची पाळेमुळे शोधून काढण्यासाठी मी त्या गावी गेली होतो, पण आता काहीतरी नवीनच गोष्टी सुरु झाल्या आहेत. ज्याला थांबवणे बहुदा माझ्या हातात राहिलेले नाही."

 

" ती डायरी कोणी दिली होती कि तू विकत घेतली होतीस? आणि कुठून ? तिचा काही इतिहास आहे का रे? " रक्षाने प्रश्न केला.

 

" आपला कॉलेजचा शेवटचा दिवस आठवतो? त्या दिवशी आपण सगळे फ्रेंड्स एकमेकांना आठवण म्हणून भेटवस्तू दिल्या होत्या. एक कादंबरी म्हणून माझी फ्रेंड होती. ती सुद्धा लेखक होती, तिने दिलेले गिफ्ट आहे ती डायरी..." अभिमन्यू सांगताना थोडा भूतकाळात गढून गेला.

 

" तुझे काय बाबा, खूप सारे फ्रेंड्स होते, नावाजलेला लेखक ना तू, कादंबरी, हु ,,, एवढी काय आठवत नाहीय मला... ती आता कुठे असते? आय मिन आता तुला तिची काही माहिती आहे का? किंवा काही कॉन्टॅक्ट? "

 

" सध्या मी सगळ्यांपासून लांब आहे. त्यामुळे काहीही माहिती नाही. " तो त्याच्या विचारात अजूनच गढून गेला होता . हे रक्षाच्या लक्षात आलं, त्यामुळे ती देखील शांत बसली.

 ---------------------------------


'खड्ड... खड्ड, एक मोठा दगड डिक्कीवर आपटला होता. काहीही फायदा झाला नाही. उलट ती अजूनच घट्ट झाली. बाजूला उभ्या असलेल्या आपल्या गाडीतील स्पॅनर आणि इतर साहित्य काढून त्याने फटफटी सुरु करण्याचा पर्यंत केला. तो ही व्यर्थ होता. फटफटी जागची हलेना. चावी सुद्धा लॉकमध्ये आत फसून बसली होती. त्यामुळे गाडी स्टार्ट होईना आणि डिक्की सुद्धा उघडू शकत नव्हती. एवढे दिवस पावसात भिजल्याने तिची अवस्था वाईट झाली होती. भर पावसात अभिमन्यूला घाम फुटला. आंगातला पांढरा शर्ट चिखल-मातीने लालेलाल झाला होता. गाडी पार उलटी-पालटी करू झाली, तरीही जैसे थे स्थिती होती. रागाने गाडीला एक सणसणीत लाथ घालण्याची इच्छा असूनही ते करता येत नव्हते, कारण गाडीमागच्या नंबरप्लेटच्या बरोबर वरती हौसेने चिकटवून घेतलेली अगदी छोटीशी आणि पातळ अशी प्लॅस्टिकची गणपतीची मूर्ती... ऊन-पाऊस असो वा वारा-वादळ असो, हा बाप्पा गाडीच्या मागे आणि अर्थातच अभिमन्यूच्याही मागे ' सदरक्षणाय खलनिग्रहणाय' म्हणत उभा असायचा.'

' सूर्यनारायण पश्चिमेकडे झुकण्याच्या तयारीत होते. दिवस मावळतीकडे चालला होता. रात्रीचे इथे थांबणे शक्य नाही, सगळे प्रयत्न करून झाले. गाडी तीळमात्र जागची हलेना. काहीतरी विचार मनाशी पक्का करून अभिमन्यू उठला. बाजूला रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या आपल्या मारुती कारचा दरवाजा उघडून त्याने रॉकेल डब्बा आणि माचीस पेटी बाहेर काढली. एका हातात छत्री पकडून तो फटफटीकडे वळला. रॉकेल डब्बा बाजूला ठेवून खिशातील कटरने सावकाशपाने फटफटी मागचा गणपती कोरुन बाहेर काढू लागला. कडेकडेने अलगदपणे कातरून झाले होते, गणपतीची मूर्ती जवळजवळ त्याच्या हातात आली. "सॉरी बाप्पा, खूप साथ दिलीस पण आता तुला माझ्या मागे राहता येणार नाही. आतल्या डायरीचा किस्सा संपवण्यासाठी मला हि गाडीच नष्ट करावी लागेल, त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय दिसत नाही. " म्हणत त्याने बापाला हातात घेतले आणि सावकाशपणे खिशात ठेवून दिले. लागलीच खाली असलेल्या डब्याचे झाकण काढून आत असलेले रॉकेल फटफटीवरती ओतायला सुरुवात केली. पण, पण, संधीकाळ वर आला आणि त्याबरोबरच दिनकर अस्त पावला. दाही दिशा अंधारू लागल्या, एका अशुभ प्रहरात दिवसाची कायापालट झाली होती. वाऱ्याने साशंक होऊन आपली दिशा बदलली, तोच वरूनराजा निर्ढावला. सरपटणारा रंगबदलू चूकsss, चूकsss करत दिसेनासा झाला. दोन वटवाघळे उडत-उडत जाऊन शेवरीच्या झाडात गडप झाली. तेच झाड, स्वप्नात दिसलेले, अगदी हाकेच्या अंतरावर असलेले, तेच झाड. ए क वाऱ्याची उष्ण झुळूक कानाला घासून गेली त्याबरोबर अभिमन्यूने आपला पाय मागे मागे घ्यायला सुरुवात केली. " कोण आहे इथे? कोण आहे? " तो मोठ्याने ओरडला. आणि तोल जाऊन मागे चिखलात पडला. समोर फटफटीला किक बसली होती. आपोआपच, आणि ती चालू लागली, त्या शेवरीच्या झाडाच्या दिशेने, जणू तिला ओढ होती कुणाच्या तरी भेटीची. "माझी गाडी, सोड तिला, माझी गाडी... " गाडीचा पाठलाग करत अभिमन्यूही घाटावरून नदीकाठाकडे सरळ थेट वाऱ्याच्या वेगाने धावू लागला होता. बाप्पाचा वरदहस्त काढून घेतल्यावर आज अखेर इतक्या दिवसांनी तिने त्या फटफटीवर आपले वर्चस्व प्राप्त केले होते, जणू ती वाटच पहात होती, या संधीची. एवढे प्रयत्न करूनही, एवढी हिम्मत एकवटुनही अभिमन्यूला शेवटच्या क्षणाला चकवा मिळाला होता.

**************

" हॅलो काकू, अभि कुठे आहे? फोन का उचलत नाही? "
पलीकडून रक्षा काळजीने विचारात होती.

"अगं तो तासापूर्वीच बाहेर गेलाय, ती त्याची जुनी बाईक होती ना, ती घेऊन येतो म्हणाला. " अभिमन्यूच्या आईचे हे शब्द ऐकल्याबरोबर रक्षाला घाम फुटल.

"का, कायsss बोलताय! "
ती जवळजवळ ओरडलीच आणि फोन तसाच कट करून ती सलीमच्या घरी जायला निघाली. सोबत बन्यालाही घेऊ असा विचार तिच्या मनात आला.
'का गेला तो? त्याच्या जीवाला धोका आहे, माहित असूनही गेला, त्या सलीमसाठी. नाही..... मी असं होऊ देणार नाही.'
काय करावे तिला काही सुचत नव्हते. स्वतःशी पुटपुटत रक्षाने गाडी स्टार्ट केली.

******

"सोड माझी गाडी. कोण आहेस तू? काय पाहिजे तुला? बोलsss बोलs! " अभिमन्यू मोठं-मोठ्याने ओरडत होता. एक निर्जन-निसरडे असे ते ठिकाण, तिथे त्याला गाडीसकट ती दुष्टशक्ती फरफटत घेऊन आली होती, चार दगडी भिंतींचे पडके खोपटे, सर्वत्र मिट्ट काळोखाचे साम्राज्य पसरले होते. पाय ठेवावा तिथे दलदलीचे थर होते, आणि भिंतीवर शेवाळाची ठिगळे लावलेली चादर. अंगावर काटा यावा एवढे हिडीस वातावरण. हाताला आणि गुढग्याला बराच मार बसला होता. त्यामुळे एका जागेवरून हलणे अभिमन्यूला शक्य नव्हते. आणि शरीरात तेवढी ताकद राहिली नव्हती. तो चक्कर येऊन खाली पडला. समोर त्या विद्रुप काळया शक्तीने विचित्र हावभाव करत एकाच फटक्यात त्या फटफटीचे दोन तुकडे केले, बिचार्या गाडीचे तुकडे तिथेच कोपऱ्यात विखुरले गेले. तिच्या हातात आता डायरी लागली होती. तिचे प्रत्येक पानं उलट-सुलट करून अधाशीपणाने ती पाहत होती. शेवटी लिखाणाची पाने संपली, तिथे एक कोरडा कटाक्ष टाकून तिने तिरकस नजरेने अभिमन्यूकडे पहिले. आणि तिच्या खोबणीत आत घुसलेल्या त्या हिरव्यागार डोळ्यांच्या बुबुळात हिंस्र भाव उमटले. तोंडावर पसरलेल्या मातकट केसाच्या दोन-चार बटा मागे सरकवत ती हळूहळू अभिमन्यूच्या जवळ येऊ लागली. आपला रुक्ष काटकुळा हाडांचा सापळा झालेला हात पुढे करत तिने अभिमन्यूची मान पकडण्याचा प्रयत्न केला, पण झटका लागावा तसे काहीस होऊन ती मागच्या मागे कोलमडून पडली.
रक्षा आणि सलीम तिथे पोहोचले होते, सोबत आलेल्या बन्याने आपल्या खिशातील एक अंगाऱ्याची पुडी हातात घेऊन तिच्यावर फुंकर मारली होती. आजूबाजूच्या वातावरणात थोडाफार बदल झाला होता. कोलमडून पडलेली ती दुष्टशक्ती अजूनच चवताळून उठली. डायरी अभिमन्यूच्या अंगावर टाकून ती मोठ्याने ओरडली, " आता यात तुझा शेवट लिही, आणि संपवून टाक ती कथा. तेव्हाच माझा बदल पूर्ण होईल. हाहाहाहा... " तिच्या गडगडाटी हास्या बरोबर एक उष्णतेची लाट पसरली आणि दुसऱ्याच क्षणी तिने आपल्या हात लांब करून सलीमच्या बखोटीला पकडले होते आणि फरफटत घेऊन सरळ भिंतीवर आपटले होते.


आधीच आधू झालेला तो, पुन्हा विव्हळू लागला. उजव्या हाताचे मनगट वाकडे झाले होते, आणि मान डावीकडे कलली होती. आता त्याची जगण्याची आशा जवळजवळ संपली होती. 'त्याला आपण उगाच घेऊन आलो' असे रक्षाला वाटले. आपले अंगारे-धुपारे इथे तिच्या राज्यात चालत नाहीत, हे बघून बन्याची दातखिळी बसली होती. तरीही हिम्मत एकवटून त्याने एक रेशमी धागा तिच्यासमोर पकडला. "बोल, काय पायजे तुला? समद तुज्या मनासारक व्हईल, म्या वचन देतो. "
पुन्हा आपले मोठे डोळे बन्यावर रोखून ती ओरडली. " तू काय देणार रेsss ? मला याचा मृत्यू बघायचा आहे. तडफडताना बघायचं आहे, ते पण माझ्या डोळ्यासमोर. " अभिमन्यूकडे इशारा करत तिने उत्तर दिले.

"पण का? तुला काय मिळणार त्याने?" रक्षाने घाबरत घाबरत प्रश्न केला.

"खूप वर्षांपूर्वीचा हिशोब चुकता करायचा आहे. सात वर्षे झाली, त्या, बाजूच्या स्टेशनवरती कामाला लागले होते मी, याच्या कथेमुळे मालगाडी उलटली आणि तिथे गरीब लोक नाहक बळी गेले. त्यात मी सुद्धा होते. क्षणात सारं होत्याच नव्हतं झाल ते याच्यामुळे, आणि अजून हा मुक्त फिरतोय. काय झालं? कसं झालं? कोणाला माहित नाही, आणि याला कोणतीही शिक्षा झाली नाही. "

"हे बघ, तू कोण आहेस, ते मला माहित नाही, पण मी एवढं नक्की सांगू शकते की, मालगाडी उलटून जे झालं, त्याला अभि जबाबदार नाही आहे. तिथल्या गरीब लोकांनी त्यांच्या जमिनीसाठी आपले प्राण गमावले, त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला नव्हता. जे त्यांना जिवंतपणे शक्य झाले नाही, ते त्यांनी मरणानंतर शक्य केले होते. त्यांच्या जागेवर उभे राहिलेले रेल्वे स्टेशन आणि ती मालगाडी हे सारे उध्वस्त करून टाकले. त्यामध्ये तुम्हा सगळ्यांना जीव गमवावा लागला, याचे आम्हाला देखील वाईट वाटते. पण यामध्ये अभि किंवा त्याच्या कथेचा काही दोष नाही, कथा आणि ती घटना हा निव्वळ योगायोग आहे. मी वनांनी करते, समजून घे, आणि प्लिज त्याला सोड. "

"कथा आणि ती घटना हा निव्वळ योगायोग वाटतो तुम्हाला? अजून तुम्हाला समजले नाही तर? ती डायरी करते हे सगळं, माझी डायरी. हॅहॅहॅहॅ, हाहा!" कुस्तीरपणे हसत तिने पुन्हा डायरीकडे पाहिले.

भिंतीला पाठ करून निपचित पडलेल्या अभिमन्यूला जाग आली होती. काहीतरी गवसल्याचा आनंद त्याच्या डोळ्यात चमकत होता. लगोलग डायरी हातात पकडून त्याने ती घट्ट धरून ठेवली. त्या दुष्ट शक्तीची नजर त्याच्यावरच स्थिरावली होती, केव्हाही झडप घालून तो आपला बदला घेऊ शकत होती. पण अभिमन्यूला आता याची जणू फिकीर नव्हती. डायरीची शेवटची कथा जिथे क्रमशः होती. तिथून पुढे असणाऱ्या कोऱ्या पानावर त्यांनी नजर फिरवली. दुरूनच तिच्या समोर डायरी धरून त्याने पेन हातात घेतला.
" तुला माझा शेवट हवा आहे ना? आणि तो ही माझ्याच हाताने लिहिलेला. हा बघ ! मी माझा आणि तुझा दोघांचा हि शेवट करतोय. बघ! " तो शक्य तितक्या मोठ्या आवाजात ओरडला.

"अभि काय करतोस? नाही, तू काहीही लिहिणार नाहीस." रक्षा त्याला अडवण्यासाठी धावून आली होती, त्या चेटकिणीने तिला मागच्या मागे दाबून ठेवले, तिच्या हिडीस हाताच्या बोटांचा विळखा रक्षाच्या मानेवर पडला होता. रक्षा सुटण्यासाठी तडफड करत होती. अगदी सगळी शक्ती पानास लावून तिने सुटण्याचा प्रयत्न केला, पण ते अजिबात शक्य नव्हते. तिच्या मानेवरची पकड अजूनच घट्ट झाली, ती बेशुद्ध झाली होती. सलीम ने आपला लोंबकळत असलेला तुटका हात उचलण्याचा खूप प्रयत्न केला, पण पाय आणि हात कायमचेच जेरबंद झाले होते. "अभिमन्यू तिचा शेवट... " एवढेच शब्द त्याच्या तोंडून पडले. परिस्थिती आपल्या कंट्रोल मध्ये आहे, ते लक्षात येताच ती दुष्टशक्ती अजूनच चवताळली.

" जर हिला जिवंत बघायचं असेल, तर तुला तुझा शेवट लिहावाचं लागेल. ते ही तुझ्या हाताने लिही." तिने डायरीच्या कोऱ्या पानाकडे बघत आज्ञा केली. तिच्या हातात बेशुद्ध अवस्थेत पडलेली रक्षा आणि बाजूलाच अधर्मेला झालेला सलीम यांच्याकडे बघून अभिमन्यूने लिहायला सुरुवात केली. आता नाईलाज होता. स्वतःसाठी कोणाच्याही जीवाशी खेळणे अभिमन्यूला शक्य नव्हते.

"सायब जरा इचार करा, काय बी लिवू नका. ती तुम्हाला हात लावू शकत नाय, काय तरी ताकद हाय तुमच्यात. नायतर तीनं आत्तापर्यंत तुम्हाला मारलं बी असत नाय." कोपऱ्यात फटफटीच्या तुकड्यांच्या मागे घाबरून लपलेला बन्या उठून उभा राहिला होता. ढाब्यावर स्टोव्ह पेटवण्यासाठी वापरत असलेले लायटर खिशातून काढून त्याने ते पेटवले होते. काय समजायचं ते अभिमन्यू समजला होता. डोक्याला एक हिसका देत त्या विकृत भुताने आपला मोर्चा बन्याकडे वळवला. आणि तेवढीचं संधी साधून अभिमन्यूने उर्वरित कथा खरडायला सुरुवात केली होती.

काही वेळापूर्वी फटफटीमागील खिशात ठेवलेला बाप्पाचा तो फोटो चाचपडत अभिमन्यूने त्याला हातात घेतले. एका हाताने लेखणी सुरु होती. डायरीवर भराभर अक्षरे उठू लागली होती. बन्याच्या अंगामध्ये कंप सुटला होता, ती दुष्टशक्ती त्याच्या जवळ जवळ जाऊ लागली होती. तो मागे-मागे सरकू लागला होता. अगदी मागच्या भिंतीला डोके टेकेपर्यंत बन्याने निकराने प्रतिकार केले. पण आता मागे जाणे शक्य नव्हते. आणि तिने बन्याच्या मानेला धरून त्याला सरळ वरती उचलून धरले. तो हात-पाय मारू लागला होता. त्याची असह्य तडफड सुरु होती. कुठल्याही क्षणी त्याने आपले प्राण गमावले असते. हातातील लेखणी तशीच खाली टाकून अभिमन्यू उठला.
"थांब कादंबरी!" त्याच्या वाक्यासरशी त्या जखिणीने आपले डोळे त्याच्या दिशने वळवले. आश्चर्य आणि कुत्सितपणाचे भाव तिच्या डोळ्यात उमटले होते.

"म्हणजे, शेवटी तू ओळखलस मला? " ती अभिमन्यूच्या जवळ येत ओरडली.

"हो ओळखलं! आणि तुझा डाव देखील ओळखला आहे, सात वर्षांपूर्वीच तू मला मारण्यासाठी ही डायरी दिली होतीस. बरोबर ना? पण दुर्दैव, मी माझे मरण या डायरीमध्ये लिहिण्याआधीच त्या स्टेशनवरील मालगाडी अपघातात तुझा अंत झाला. आणि मला या अशुभ डायरीच्या पराक्रमाची चाहूल लागली होती. त्यानंतर मी केव्हाच यात लिखाण केले नाही. जेव्हा मला या प्रकरणाचा आणि माझ्या मागे लागलेल्या आरोपांचा सोक्षमोक्ष लावायचा होता, तेव्हा मी परत या डायरीमध्ये कथा लिहिण्यास सुरुवात केली, ही संधी साधून तू परत माझ्या मागे लागलीस, तसे तर तू त्याच दिवशी या नदीघाटात घाटात मला अडवू शकत होतीस. पण माझ्या फटफटीच्या मागे असणाऱ्या गजाननाने माझे नेहमीप्रमाणे रक्षण केले आणि तेव्हा तुला काही करता आले नाही. स्टेशन ते हा नदी घाट, या पुढे तुझी काहीही ताकद चालत नाही. म्हणून तू त्यादिवशी सलीमला तुझे सावज केलेस. त्याचे हाल-हाल करायला सुरुवात केलीस, त्याच्या मार्फत तुला माझ्यापर्यंत पोहोचायचे होते. हा बघ! तोच विघ्नहर्ता आजही माझ्यासोबत आहे. आजही तू माझं काहीही वाईट करू शकत नाहीस."
हातातील छोटासा बाप्पा दाखवत अभिमन्यू तिच्यासमोर तटस्थ उभा राहिला होता. आणि डिवचलेल्या नागाप्रमाणे फंकारे मारत ती मागे मागे होऊ लागली. मागे भिंतीजवळ निपचित पडलेली रक्षा आता हळूहळू शुद्धीवर येत होती. पण कादंबरीच्या हातात टांगलेल्या बन्याची शुद्ध कायमचीच हरपण्याची शक्यता होती. त्याचा प्रतिकारही आता गळून पडला.


"का? का करतेस हे सगळं? तुझं मी काय वाईट केलं? " सावध पवित्रा घेत अभिमन्यू तिच्या जवळ-जवळ सरकत होता.

" कॉलेजमध्ये असताना तुझ्या लिखणामुळे मी कायम दुय्यम स्थानी राहिले. तुला नेहमीच पहिला नंबर, तुझे हजारो फॅन्स, आणि कॊतुकही. त्यामुळे माझे लिखाण कोणीही वाचायचे नाही. सगळीकडे तुझी वाह वाह होती, यात माझे लेखक होण्याचे स्वप्न कुठल्या कुठे मागे पडले. आणि तेव्हाच मी तुझ्या विनाशासाठी आणि तुझ्या लेखणीच्या सर्वनाशासाठी तुला ती अशुभ डायरी दिली होती. तू तुझ्याच हाताने, तुझ्याच लिखणाने कुप्रसिद्ध व्हावास आणि तुझे नावलौकिक मातीमोल होऊन तुझा विनाश व्हावा याची मी वाट बघत होती. पण काहीच दिवसात त्या स्टेशन अपघातात मी मारले गेले. आणि माझा सूड अपूर्ण राहिला. आज तू माझी इच्छा पूर्ण करणार आहेस. तुझा विनाश लिह त्यात, नाहीतर मी या टपरीवाल्याला मारून टाकेन, त्या लंगड्याला आणि त्या तुझ्या रक्षाला मारून टाकेन, कॉलेजमध्ये असताना पासून प्रेम करतोस ना तिच्यावर. मग उचल ती डायरी आणि लिही तुझा मृत्यू. " आपल्या विस्फारलेल्या डोळ्यातून आग ओकत तिने फर्मान सोडला होता. अभिमन्यू खाली पडलेली डायरी उचलणार होता. आणि एवढयात इकडे शुद्ध हरपलेल्या बन्याच्या हातातील पेटते लायटर फटफटीच्या अस्थाव्यस्थ पडलेल्या दोन तुकड्यांवर पडून त्यावर आधीच ओतलेला रॉकेलमुले क्षणात भडका उडाला होता. बन्याने नकळत का होईना, आपले काम केले होते. आणि शुद्धीवर आलेल्या रक्षाने खाली पडलेल्या डायरीवर एक लाथ मारून ती सरळ त्या पेटत्या गाडीच्या तुकड्यांवरती फेकून दिली होती.
"शेवट तर त्याने केव्हाच लिहिलंय, पण त्याचा नाही तुझा." एवढे बोलून ती अभिमन्यूच्या शेजारी उभी राहिली.

'काही समजण्याच्या आताच डायरीने पेट घेतला होता. तिच्या चिंद्याचिंध्या होऊन हजारो जळके तुकडे चोहीकडे विखुरले गेले. कादंबरीने आपल्या कानावर दोन्ही हात घेत मोठ्याने किंकाळी फोडली. त्यामुळे बन्या तिच्या हातून निसटला होता. आगीच्या लाटांमध्ये आपसूकच ती ओढली गेल्याने त्याच अग्निज्वालांमध्ये लपेटलेले तिचे शरीर भस्म होऊ लागले. अभिमन्यूने डायरीमध्ये लिहिल्या प्रमाणे तिचा शेवट झाला होता. तरीही जाता-जाता ती मोठ्याने ओरडली, "वाचलास रे वाचलास."


अग्निदेवतेने त्या विनाशकारी डायरीचे देखील अस्तित्व संपुष्टात आणले होते. बाहेर बेभान सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने जळून पडलेले राखेचे कण दाही दिशांत सैरभैर उधळून लावले. जणू ते पुन्हा केव्हाही या कलियुगात एकत्र येऊ नयेत. अंधाराचे सावट दूर झाले होते. बन्या आणि अभिमन्यू आपल्या दोन्ही हातांनी सलीमला उचलून गाडीच्या दिशेने चालू लागले. तश्या अवस्थेतही तो झालेल्या विजयावरती मंद हसला. अर्धमेले झालेल्या सलीमच्या शरीरात अचानक नव चैतन्य दिसू लागले होते. आपल्या लायटरचे किंचिंतसे आभार व्यक्त करत बन्याही या आनंदात वाटेकरी झाला. रक्षाला मिठी मारून अभिमन्यू एकच शब्द म्हणाला, "सॉरी " '


'खऱ्या होतील या भीतीने अपूर्णच राहिलेल्या अश्या अजून खूप साऱ्या भयकथा लिहायच्या बाकी आहेत, ते ही माझ्या साथीने, 'रक्षा त्याच्या कानात पुटपुटली.

फटफटीवरील तोच छोटासा बाप्पा अभिमन्यूच्या मारुती कारच्या स्टिअरिंगच्या बरोबर वरती विराजमान झाला होता. त्याचे मनोमन आभार मानून सगळ्यांनी शहराचा रस्ता धरला.


----------------------------------------------------------------------------

 

                                                                       समाप्त


1 टिप्पणी:

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय." पण ते शक्य न...