पासपोर्ट, कपडे, खाण्याच्या वस्तू वगैरे वगैरे सगळं भरून झालं. भूमी परत परत चेक करून बघत होती.
"भूमी हा फराळ आणि गोडाधोडाचे डब्बे घेऊन जायला परवानगी आहे ना? नाहीतर सगळं काढून घेतील चेकिंगच्या वेळेस..." माईंनी तिच्यासाठी बनवलेला फराळ, काही स्वीट्स सुद्धा बॅगमध्ये व्यवस्थित ठेवून दिले होते.
"सगळं चालत हो माई. " आवराआवर करत भूमी एकेक सामान चेक करत होती.
"माझ्या लेकाला पण दे हो थोडं. स्वतःच नको खाऊ..." माई हसत-हसत म्हणाल्या.
"हो माई." एवढंच बोलून भूमी अंगणात आली. तुळशी वृंदावनासमोर हात जोडून ती आता घराचा निरोप घेणार होती. खरं तर असं खोट सांगून निघणं तिच्या तत्वात बसत नव्हतं, नाना आणि माईंना खऱ्या गोष्टी सांगण्याची हिम्मतही कुठून येणार. त्यांना ते सहन होणार नाही. आणि कमीतकमी या वयात आपल्याकडून तरी त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये, याची ती पुरेपूर काळजी घेत असे. दोघांचाही निरोप घेऊन भूमी बाहेर पडली. एअरपोर्टसाठी टॅक्सी दारात उभी होती. एवढंच कि परदेशी जाणाऱ्या फ्लाईटने विभासला भेटायला जाणार नसून भूमी आपल्या स्वप्नांच्या मागोव्यावरती निघाली होती. आयुष्याला कलाटणी देणारा एक मोठा गिअर टाकून...
माईंना बाहेर येण्याचे धाडस होईना. नानांचे डोळे अश्रू धारांनी भरून वाहत होते. एवढ्या वर्षात त्यांचा एकमेव आधार म्हणजे भूमी. घर आणि माई-नानांना सोडून ती कुठे जात नसे. आता एवढ्या लांब, ते पण अनिच्छित काळासाठी जाणार, एकटी… हे त्यांना पटतचं नव्हते. आपल्याजवळ अजून किती दिवस त्या तरुण मुलीला ठेवणार? ही सल नानांच्या मनात टोचत होतीच आणि एकाएकी विभासचे बोलावणे आले. यामुळे अजिबात आढेवेढे न घेता दोघांनीही भूमीला परदेशी जाण्यास परवानगी दिली.
'भूमी या घरात आल्यापासूनचा एकेक दिवस माईंच्या आठवणीत होता. बघताच क्षणी कोणाच्याही ह्रदयात स्थान निर्माण करणार व्यक्तिमत्व. उंची जेमजेम पण टपोरे पाणीदार डोळे, नाजूक सडपातळ बांध्याची गोरीपान भूमी, चेहऱ्यावर सदैव हास्याची छटा घेऊनच घरात वावरायची. सळसळणाऱ्या लांब केसांप्रमाणेच सदैव सळसळणारे चैतन्य होते तिच्या रूपात. विभासाठी तिची निवड करताना माईंना आपल्या मुलाचा हेवा वाटाला होता. सुलक्षणी सून घरी येणार म्हणून आजूबाजूच्या लोकांनाही त्यांचे कौतुक होते.'
गॅसवरचा चहा आटायला आला होता, याची जाणीव झाल्यावर आपल्याच विचारात गढलेला माई उठल्या.
"जाऊ दे तिला विभासकडे. तिने तरी तिची हॊसमौज कधी करायची. आमच्या म्हाताऱ्याचं काय, आज आहोत, उद्या नसू. आणि मुलगा परदेशी आहे तर काय करणार." म्हणत नाना देखील आपल्या आराम खुर्चीवर डोकं टेकून पेपर चाळू लागले.
*****
आज मेघाताईंना राहून राहून काहीतरी चुकल्या सारखं वाटत होत. साठे काकांचा फोन येऊन गेला होता.
काका असं का म्हणाले? 'क्षितिजचे नक्षत्र त्याला फिरवत आहेत, योग चांगला आहे, पण नवीन गाठीभेटी होतील आणि आयुष्याला कलाटणी देणाऱ्या घटना घडू लागतील. सुरुवात आजपासूनच होणार.’
देवाने त्याच्या नशिबात अजून काय-काय वाढून ठेवलय तेच कळत नाही. आपल्या आयुष्यात कोणाला डोकावू देईल तर शपथ. एकटा पडलाय तो. मैथिली त्याच्या आयुष्यात आली तो एक अपघातच. तिथून त्याचे ग्रह बदलत गेले. पैसे, प्रसिद्धी हे सगळं जरी मिळालं, तरीही त्यात त्याच सुख गेलं. हसरा खेळता क्षितिज त्यानंतर काही पाहायला मिळाला नाही. फक्त मैथिलीच्या शुद्धीवर येण्याचा आशेवर जगतोय तो. ती शुद्धीवर आली तरीही शारीरिक अपंगत्व घेऊनच, मग काय? तो ते सहन करू शकेल का? तिच्या या अवस्थेला आपणच जबाबदार आहोत, असं वाटत त्याला. कोणीतरी अशी त्याच्या आयुष्यात येउदे की मला माझा जुना क्षितिज ती पुन्हा मिळवून देईल.'
"बसली का शून्यात जाऊन? दुनियादारी आटोपली वाटतं!"
७०-८० च्या घरात असणार पण स्वतःला १६ वर्षाची तरुण मुलगी समजणारी आजो, म्हणजेच मेघाताईंच्या आई आणि क्षितिजची आज्जी, आपला बॉबकट नीटनेटका करत मेघाताईंच्या रूममध्ये शिरल्या आणि तडक टेबल उघडून आपल्या फंकी पीच वनपीसवर मॅच अश्या काही ऍक्सेसरीज मिळतायत का पाहू लागल्या होत्या.
"हो झाली दुनियादारी. तुला काय पाहिजे? आणि हा काय ड्रेस घातलास गं?" मेघाताई उठून त्यांच्या मदतीला आल्या.
"हा काय ड्रेस म्हणजे, वनपीस आहे माझा. पार्टीला जातेय, मेघे मॅचिंग नेकपीस असेल तर दे ग." एव्हाना ड्रॉव्हर मधला पसारा बाहेर काढून त्यांनी हवा तो नेकलेस घातला सुद्धा. आपल्या लेकीकडे एक लाडिक कटाक्ष टाकत, त्यांनी नजरेनेच विचारले. 'कशी दिसतेय?'
आपली आई या वयातही अल्लडपणाच उत्तम उदाहरण, मेघाताई तरी काय बोलणार, 'फारच सेक्सी म्हातारी, ' म्हणत त्यांनी बाहेर काढलेले सगळे सामान ड्रॉव्हरमध्ये ढकलले आणि पुन्हा येऊन पलंगावर बसल्या.
"बरं, माझ्या नातवाला सारखा त्रास देत जाऊ नकोस. त्याला मर्जीप्रमाणे जगुदे त्याचं आयुष्य. कोणीतरी माझ्यासारखी सेक्सी भेटली की बघचं, कसा उड्या मारत लग्नाला तयार होतो."
बाहेर पडत त्या मेघाताईंना बजावत होत्या. आणि अचानक काही तरी आठववल्या सारखं परत माघारी फिरून त्यांनी एक लिफाफा मेघाताईंचा हातात ठेवला. " याचा पीक पाठव त्याला, चंदीगड ला गेलाय तर दोन दिवसांनी हे फंशन पण अटेंड कर म्हणावं. माझ्या नात्यातल लग्न आहे. "
ऑर्डर सोडून त्या निघूनही गेल्या.
---------------------------------------------
हातातील लग्न पत्रिका बघून मेघाताईंनी नकारार्थी मान डोलावली. 'निलचे लग्न, ते पण एका पंजाबी मुलीशी, एक साधारण घरातला मुलगा, पण गडगंज पैसेवाल्याची मुलगी पटवून लग्न करतोय. या आधी किती अफेअर्स केलेत त्याच गणित नाही. नाहीतर माझा क्षितिज, नको त्या मुलीच्या मागे लागून पुरताच फसला. जवळजवळ सगळ्याच नातेवाईकांच्या मुलामुलींची लग्न झाली. याच्या समवायच्या मित्र मैत्रिणींची लग्न झाली. आता याची आजी तिसर्या लग्नाची तयारी करेल. पण याच्या लग्नाचा योग नाही.' आज स्वतःशीच बडबड करत बसल्या होत्या त्या. विचारांच्या तंद्रीत त्यांनी फोन डाईल केला.
"पोहोचला का रे?"
"जस्ट फ्लाईटमधून उतरलो, कारमध्ये बसलोय." क्षितिज एक दिर्घ श्वास घेऊन खिडकीबाहेर बघत होता.
"काही खाल्लं का?"
"हॉटेल वर जाऊन फ्रेश होतो, मग नाश्ता करून घेईन, तू ? "
"मी बसते आहेच, तुला फोन करावं म्हंटल. तू घरी नसला कि काळजी लागून राहते रे. " मेघाताईंच्या आवाजात खरोखरच काळजी जाणवत होती. जणू क्षितिज खूप दिवसांसाठी बाहेर पडला असावा.
"आई मी आता लहान आहे का? का काळजी करतेस एवढी?”
"साठे काकांचा फोन येऊन गेला रे. 'तुझे ग्रह तुला फिरवत आहेत’ म्हणाले. तेव्हापासून मला थोडं अस्वस्थ वाटतंय."
"तुला माहित आहे ना, अश्या गोष्टींवर माझा विश्वास नाही, ते काहीही सांगतात. बरं ते जाऊ दे, आज्जो म्हणत होती, 'नीलचं लग्न आहे चंदिगढला' मला जायला सांगितलं आहे, जाऊ?"
"बघ जमेल का. मला माहित आहे, अर्थात तुला असे प्रोग्रॅम्स अटेंड करायला नाही आवडत, सो जावंस वाटलं तर जा."
"ओके आई, आज्जोला वाईट वाटायला नको. मी ट्राय करतो." क्षितिज
क्रमशः
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा