मंगळवार, २५ जानेवारी, २०२२

नक्षत्रांचे देणे ११



 ‘ग्रहशांती अगदी व्यवस्थित पार पडली, मिस्टर आणि मिसेस सावंत सत्यनारायण पूजेला बसले. तोपर्यंत संध्याकाळ व्हायला आली होती. अजूनही भूमीची काहीही माहिती मिळाली नाही, म्हणून क्षितीजची काळजी अजून वाढत चालली होती. तो आपल्या माणसांना फोनवर फोन करून सारखी विचारपूस करत होता. आलेली बहुतेक सगळी मंडळी पूजेचा प्रसाद घेऊन घरी निघायला लागली.

साठे काका प्रसाद घेऊन निघालेच होते. मिस्टर सावंत आणि मंडळी त्यांच्या पाय पडले आणि काका दरवाजाकडे वळले. गर्दी कमी झालेली पाहून, मिस्टर सावंतांनी पुन्हा क्षितिजला विचारले, ''काही माहिती मिळाली का?''

''नाही.'' म्हणून मन डोलावत क्षितीज अस्वस्थ झाला. खरतर त्याची आशा आता पूर्णपणे मावळली होती. थोड्याचवेळात  बाहेरच्या मुख्यदारावर कोणीतरी विचारत होते, ''मिस्टर क्षितीज सावंत इथेच राहतात का?''

आवाज क्षितिजच्या ओळखीचा होता. पण विश्वास  बसत नव्हता. तो आणि त्याची आई, मेघाताई सरळ बाहेरच्या दाराजवळ पोहोचले. दारात एक मुलगी उभी होती. साठे काका देखील तिथेच बाजूला उभे होते. '

‘कोणीतरी मुलगी, ती पण क्षितीजला विचारतेय, या गोष्टीवर मेघाताईंचा विश्वासच बसेना, म्हणून मेघाताईंनी तिच्याकडे बघत विचारले. ''आपण?''

''ही भूमी... भूमी साठे. माझी नातलग लागते.'' साठेकाकांनी भूमीकडे बघत उत्तर दिले.

''म्हणजे तुम्ही यांना ओळखता?''  गोंधळलेल्या क्षितीजने त्यांना पुन्हा विचारले.

''होय. पण भूमी तू इथे कशी काय?'' काकांनी भूमीला प्रश्न केला.

''काका ते थोडं काम होतं.''  भूमी.

नक्की काय चालू आहे, याचा काहीही सुगावा न लागलेल्या मेघाताईनी सगळ्यांना आतमध्ये यायला सांगितले. 'दारात उभे राहण्यापेक्षा आता येऊन बोलूया.' असं म्हणत त्या आतमध्ये वळल्या.

''नाही मी आत नाही येत. तुमच्या इथे काहीतरी फंक्शन आहे वाटत. मी जस्ट हे पेपर्स रिटर्न करायला आले होते.'' पेपर्स पुढे करून भूमी निघायच्या तयारीत होती.

''घाई आहे का? पूजा आहे घरी, पाया पडून तू निघून जा.'' मेघाताई पेपर्स हातात घेत म्हणाल्या. आत्ता कुठे त्यांना लक्षात आले होते की, हीच ती मुलगी... भूमी साठे… आणि ही साठे काकांची नातलग सुद्धा लागते. त्यांच्या आग्रहाखातर भूमी आतमध्ये पूजेच्या ठिकाणी आली. आपण शोधत असलेले पेपर्स मिळाले तेही स्वतः भूमीने आणून घरी दिले होते. तिला शोधण्यासाठी आपले लोक असमर्थ ठरलेले होते. क्षितिजचे पप्पा आणि आज्जो यांना तर नवलच वाटले.

'' माझे एकमहत्वाचे काम आहे, त्यामुळे मी निघतो.'' असं म्हणत भूमीचा देखील निरोप घेऊन साठेकाका बाहेर पडले. 

पाया पडून प्रसाद घेऊन निघालेल्या भूमीला आज्जो आणि मेघाताईंनी  थोडा वेळा थांबवले त्या तिघी गप्पा मारत बसलेल्या होत्या.  बोलता-बोलता आज्जोने तर तिचा मोबाइल नंबरही मिळवला.

मिस्टर सावंत स्वतः येऊन तिला 'थँक्स' म्हणले, एवढा मोठा माणूस आपल्याले आभार मानतो याचे भूमीला फार नवल वाटले. 'घरी एक इमर्जन्सी आल्याने आपल्याला चंदिगढ वरून ताबडतोब परत निघावे लागले. त्यामुळे हे पेपर्स परत करायचे राहून गेले.' हे तिने स्पष्ट केले. दुरून हे  सर्व गुपचूप पाहत आणि ऐकत असलेला क्षितीज मात्र अजून तिच्याशी एकही शब्द बोलला नव्हता. आपण काय विचार करत होतो आणि काय समोर आले. या विचाराने क्षितिजला मनोमन खजील झाल्यासारखं झालं होत.

''पण तुला आमचा पत्ता कसा काय सापडला?'' अचानक मेघाताईंनी मनातील प्रश्न तिला विचारला. 

'' या पेपर्सवरच्या माहितीवरून SK ग्रुप च्या वेबसाइटवर थोडं सर्चिंग केलं. तिथेच तुमची थोडी माहित आणि सावंत सरांच्या PA चा नंबर होता, त्यावर फोन लावला, महत्वाचे कागदपत्र परत करायचे आहेत सांगितल्यावर, त्यांनी हा पत्ता दिला. आधीच फार दिवस हे कागद माझ्याकडे आहेत,  उशीर नको म्हणून तडक इथेच आले.'' भूमीने स्पष्टीकरण दिले.

 

''पण तू ते पेपर्स PA जवळ सुद्धा देऊ शकली असती, आय मिन तुला एवढ्या लांब यायला लागलं नसत ना.'' आज्जो म्हणाल्या.

 

''होय, पण ते पेपर्स असे कोणाच्याही हातात देणे योग्य नाहीय. आणि हे सरांना माहित असेलच.'' भूमी मिस्टर सावंतांकडे बघत म्हणाली.

 

''म्हणजे तुला माहित आहे. ते...'' ते आश्यर्य चकित होऊन म्हणाले.

 

''होय. चंदीगढला असताना ती फाइल माझ्याकडे दिली गेली. केसच्या संदर्भात मला थोडा स्टडी करावा लागला. तेव्हा ते माझ्या लक्षात आलं होत.''

भूमीच्या या वाक्यावर क्षितीज अवाक झाला होता. अचानक त्याने तिला विचारले. '' मग तुम्ही चंदीगढला असताना ती केस का घेतली?''

 

''त्यावेळी बरोबर आणि चूक यापेक्षा मला माझं कर्म महत्वाचं वाटलं. तुम्ही मला आक्सिडेंटच्या वेळी मदत केली, त्याबदल्यात तुमची थोडी मदत केली. आणि  केस खोटी आहे, हे माहित असूनही मी मीटिंगमध्ये ती क्लिअर केली.'' भूमीने एका वाक्यात उत्तर दिले होते, आणि सगळी सावंत कंपनी तिच्याकडे डोळे विस्फारून बघत होते.

 

''भूमी मी तुला ऑफर देतो. आमची कंपनी जॉईन करणार का?'' अचानक मिस्टर सावंतानी तिला विचारले. आणि ती फार गोंधळून गेली.

 

''म्हणजे?'' तिला पुढे काय बोलावे कळेना.

 

''येस, आम्हाला आमच्या कंपनीसाठी एका लीगल ऍडवायजर ची गरज आहे.  तू इंटरेस्टेड असशील तर कळवं आम्हाला. काही घाई नाही.'' मिस्टर सावंत ठामपणे बोलत होते.

 

'' सर सॉरी, पण अश्या चुकीच्या आणि खोट्या केसेस लढणं नाही जमणार मला.'' भूमी प्रामाणिकपणे म्हणाली.

 मेघाताई तिचा विश्वास आणि प्रामाणिकपणा यामुळे तर भारावूनच गेल्या होत्या.

 

''नाही आता खोट्या  केस लढायची गरज नाही. खरी केस पाहायची आहे आणि कंपनीत चाललेले असे खोटे व्यवहार उघडकीस आणायचे आहेत. जमेल? '' मिस्टर  सावंत पुन्हा आपला मुद्दा मांडत म्हणाले.

 

''म्हणजे तुमच्या कंपनीत चाललेल गैरव्यवहार उघडकीस आणून तुम्ही तुमचेच नुकसान करून घेणार? का?'' भूमीला त्यांची गोष्ट लक्षात येईना. म्हणून तिने आपली शंका विचारली.



क्रमश 

https://siddhic.blogspot.com/


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय." पण ते शक्य न...