शनिवार, ४ एप्रिल, २०२०

बटाटा वडा


साहित्य:
पाव किलो बटाटे.
बेसन १ छोटा कप.
४-५ हिरव्या मिरच्या, ५ लसूण पाकळ्या, एक इंच आल्याचा तुकडा, मुठभर कोथिंबीर धुवून बारिक चिरुन,  ४-५ कढीपत्ता पाने धुवून,
चिमुटभर मोहरी आणि चिमुटभर हळद , थोड हींग, १ चमचा मिठ.

कृती:
पाव किलो बटाटे स्वच्छ धुवून, उकडुन घ्यावे.  हाताने थोडे हलकेच कुस्करुन घ्यावे. अतिशय बारिक करु नये. (चित्रात दाखवल्या प्रमाणे घ्यावे.)
बेसनामध्ये चिमुटभर मिठ, अगदी थोडी हळद टाकुन पाणी मिक्स करावे. बॅटर जास्ती पात्तळ किंवा खूप जाड नको. 
मिरच्या, लसूण, आल हे एकत्र सहित्य करुन मिक्सर मधुन किवा खलबत्त्यामध्ये जाडसर ओबडधोबड वाटुन घ्या.


फोडणीसाठी कढईत  तेल गरम करा. तेल कडकडीत तापले कि त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली कि, कढीपत्ता पाने, हळद आणि हिंग घालून मग मिरची, आल, लसुन पेस्ट घाला. वरुन कुस्करलेल्या बटाट्याला फोडणी द्या. मिठ, कोथिंबीर घालुन पाचचं मिनिटात गॅस वरुन उतरुन ही भाजी थोडावेळ थंड करायला ठेवा. आता याचे लहान लहान गोळे करुन, बेसनाच्या बॅटर मधुन गोळा बुडवून तेलात सोडा. कडकडीत तेलामध्ये मस्त छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत मध्यम आचेवर वडे तळून घ्या.


एखादी खरपुस तळलेली मिठातील मिरची आणि तिखट खोबर-लसनाची चटणी जोडीला घेऊन, चविष्ट वडे खायला तयार आहेत.


मंगळवार, ३१ मार्च, २०२०

एग फ्राइड राइस रेसिपी



साहित्य-
बासमती किवा कोणताही तांदुळ १ वाटी धुवून अर्धा चमचा मिठ घालुन व्यवस्थित शिजवुन घ्यावा,
शिमला मिरची, गाजर , पत्ताकोबी , कांदा हिरवी पात व सफेद भाग वेगवेगळा या धुवून बारिक चिरलेल्या भाज्या प्रत्येकी १/ ४ वाटी.
अदरक-लसुन का पेस्ट - १ चमचा,  हिरवी तिखट मिरची ४,  काळीमीरी पावडर १ चमचा.
अंडी २, मीठ १ चमचा , तेल ४ चमचे. 
चिली सॉस , टोमैटो सॉस , सोया सॉस , प्रत्येकी  १/२ छोटा चमचा.
मुठभर कोथिंबीर.


कृती - 
शिजवुन घेतलेला राईस थोडा सुटा मोकळा करुन हवेवर ठेवा.
कढईमध्ये तेल गरम करुन यात अदरक-लसुन पेस्ट, हिरवी मिरची, शिमला मिरची, गाजर, पत्ताकोबी, कांदा फक्त सफेद भाग, काळीमीरी पावडर मीठ हे सर्व क्रमाने घाला. पाच मिनिट वरिल साहित्य व्यवस्थित शिजु द्या. 
मग हे मिश्रण कढईच्या एका बाजुला घेऊन, दुसर्‍या बाजुला राहिलेल्या तेलामध्ये दोन अंडी फोडुन घाला त्यावर थोडे मिठ घालुन ते फेटुन व्यवस्थित शिजवुन घ्यावे (चित्रात दाखवल्या प्रमाणे अजुन एखादी कढई लागु नये म्हणुन एकाच कढईमध्ये दोन्ही करा).

आता कढईमधील सर्व साहित्य एकत्र करा (अंडी मिश्रण व भाज्या मिश्रण).
यामध्ये शिजवुन घेतलेला राईस व कांदा हिरवी पात घालुन वरुन चिली सॉस, सोया सॉस, टोमॅटो सॉस हे सगळे सॉस मिक्स करा. 
५-१० मिनिट एक वाफ काढुन गॅस बंद करा.  
एग फ्राइड राइस तयार आहे. वरुन कोथिंबीर भुरभुरुन गरमागरम सर्व करा.




रविवार, २९ मार्च, २०२०

रिक्वेस्टेड रेसिपीज

" मागिल आठवड्यापासून WFH चालू आहे. या वेळात करायचं तरी काय ? हा सध्या भेडसावणारा महा गहन प्रश्न ! झोपा तरी किती काढणार ? गप्पा तरी किती मारणार ? लिहिणार तरी किती आणि काय ?
कंटाळ्याचा पण आता कंटाळा आला आहे.
घरात करण्यासारखे काय-काय उद्योग आहेत. यांची उजळणी करुन, मी नेहमीप्रमाणे शेवटी वळते ती स्वयंपाकघराकडेच. आणि सुरु होतात रेसिपीज बनवण्याचे नवनवे प्रयोग. 😋  याआधी आणि या आठवड्यात केलेल्या रेसिपीज ची लिंक मी इथे देत आहे.... काही मैत्रिणींना उपयुक्त आणि रिक्वेस्टेड रेसिपीज पुढील प्रमाणे."



वेज मोमोज आणि चटणी

बटाटा वडा रेसिपी
एग फ्राइड राइस रेसिपी

श्रीखंड 

अंडा बिर्याणी

अळूची पातळ भाजी/फदफदं/फतफत 

नारळीभात

चिकन कटलेट्स

पुडिंग- साधे सोपे आणि झटपट

मच्छी कढी / fish curry

गुळा-नारळाच्या पुर्‍या/वडे/घारे

तांदळाची बोर

एगलेस पॅनकेक (pancake) झटपट आणि चविष्ट

मिश्र डाळीचा झटपट आणि पौष्टीक ढोकळा

घरगुती साजूक तूपाची खास रेसिपी !

चिरोटे

मोड आलेल्या मेथीदाण्याची भाजी

गोडा मसाला-ऐनवेळी कराव्या लागणाऱ्या स्वयंपाकासाठी.

कुडाच्या शेंगांची भाजी

सोमवार, २३ मार्च, २०२०

एगलेस पॅनकेक (pancake) झटपट आणि चविष्ट

एगलेस पॅन केकेची रेसिपी




साहित्य -
२ वाटी मैदा किवा गव्हाचे पीठ, ३ चमचे पिठीसाखर, १ चमचा बेकिँग पावडर, अर्धा चमचा बेकिँग सोडा, ३ चमचे तूप, १ ते दिड वाटी दूध. १ चमचा vanilla essence.

कृती-
मैदा, पिठीसाखर, बेकिँग पावडर आणि बेकिँग सोडा, vanilla, मेल्टेड तुप हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करुन घ्यावे. यानंतर यामध्ये थोडे-थोडे दुध घालून मिश्रण थोडे सैलसर करावे. इडलीच्या मिश्रणाप्रमाणे हे मिश्रण तयार झाले पाहीजे. जास्त पातळ करु नये.
आता हे मिश्रण पाच मिनिटासाठी झाकून ठेवावे. यानंतर (अगदी बारीक आचेवर) नॉनस्टीक पॅन वरती थोडेसे तुप लावून घ्यावे, व त्यावर पळी ने थोडेसे मिश्रण घालावे (फुलक्या एवढेच लहानसे पसरावे). एका बाजुने भाजून दुसया बाजूनेही सोनेरी सर भाजून घ्यावे.
ही अगदी साधीसोपी एगलेस पॅन केकेची रेसिपी आहे.

* बेकिँग सोडा आणि बेकिँग पावडर या दोघांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. त्यामुळे हे दोन्ही वापरले जाते.
* जर या मिश्रणामध्ये बेकिँग सोडा ऐवजी एक अंडे फेटून घातले तर तो ही केक चविष्ट लागतो.






रविवार, २२ मार्च, २०२०

मिश्र डाळीचा ढोकळा

साधारणपणे तिघांसाठी.
साहित्य: * तांदुळ, चना डाळ, मुग गळ, उडीद डाळ प्रत्येकी अर्धी वाटी. * हळद, हिरवी मिरची व आले व लसुन पेस्ट २ मोठे चमचे, १ चमचा साखर, मीठ चवीपुरते. * फोडणीसाठी तेल ४ चमचे, १ मोठा चमचा मोहरी ,कढिपत्ता ८-१० पाने, ३ हिरवी मिर्ची. * सजावटीसाठी थोडी कोथींबीर. कृती: तांदुळ, चना डाळ, मुग डाळ, उडीद डाळ प्रत्येकी अर्धी वाटी स्वच्छ धुवून ४ तास भिजत ठेवा. त्यानतर हे सर्व ईडलीच्या मिश्रणाप्रमाणे मिक्सरमध्ये वाटून घ्या. आणि ६-७ तास हे मिश्रण झाकुन ठेवा. {साधारणता दुपारी डाळी व तांदुळ भिजत घातले तर रात्रीते मिक्सर करुन घ्या. व रात्रभर आंबवण्यासाठी झाकुन ठेवा. या मध्ये पिठ छान फुलून येते व खायचा सोडा घालण्याची अजीबात गरज नसते. }
ह्या मिश्रणात हळद, हिरवी मिरची व आले व लसुन पेस्ट, अर्धा चमचा साखर, मीठ घाला व चांगले ढवळुन एकजीव करावे. मिश्रणाची कन्सीस्टन्सी भजी करण्यासाठी ज्या प्रमाने बेसन पिठ तयार केले जाते त्याप्रमाने ठेवावी. ढोकळ्याच्या स्टण्ड् किवा एक पसरट पातळ स्टिल यांच्या डब्याला आतुन तेलाचा हात लावुन घ्या. आता हे मिश्रण त्या डब्यामध्ये ओतून व्यवस्थित टॅप करा. एकसारखे पसरु द्या. मग हा डब्बा कुकरमधे ठेवा. शिटी न लावता १५ मिनिटे वाफवून घ्या. कुकरमधे पाणी जरा जास्त ठेवावे. डबा थोडा पाण्यावरतीच रहाण्यासाठी कुकरमधे आतमध्ये डब्याखाली एखादी उंच प्लेट ठेवून द्यावी. तेल, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिर्ची, अर्धा चमचा साखर याची फोडणी करून घ्यावी. या फोडणी मध्ये अर्धा पेला पाणी ओतून मग हे सर्व गरमागरम मिश्रण वाफवलेल्या ढोकळ्यावर ओतावे शेवटी त्याचे आवडत्या आकाराप्रमाने तुकडे करावे.



ढोकळा खायला तयार आहे.

संतोस



णखणीत आवाजात दोन टाळ्या वाजवुन संतोषने उजवा हात पुढे पसरला. डाव्या हाताने उगाचच पदराला चाळा करत, तिचे ते बायकी नखरे चालू झाले. " ओय्य चिकने ! ए मामा , चल दे दे फटाकसे ! भोत दिनो के बाद आयी मै. चल दे दे !" लालभडक बांगड्यानी भरलेला तो हात, नुसताच राकट आणि रुक्ष... स्त्रिपणाचा जरा ही लवलेश नाही.
" किधर किधर से आते है, भगवानने हात पॉव तो दिये है कमाके खाने को, यहा हमने क्या ठेका लेके रखा है सबका. " संतोसचा हात आपल्याच दिशेने येत आहे हे पाहुन, तो घाणेरडा स्पर्श टाळण्यासाठी सुधावाण्याने काहीतरी कुरकुरत २ रुपयाच एक नाण तिच्याकडे भिरकावलं.
" हु मामा! तुम भी नॉ... दो रुपयेसे क्या होता है रे ? अच्छा चल. टाटा." परत पदराशी चाळा करत , लटकत मुरडत ती पुढ्च्या दुकानाकडे वळली. पण दुकानदाराने तिच्या तोंडावरतीच शटर डाऊन केले होते. अजुन दोन-चार टपर्या आणि दुकाने ढुंडाळत, दोन तास रस्ता पायदळी तुडवत, तिने रेल्वे फाटकाचा रस्ता पकडला. आता चांगलीच काळोखी रात्र झाली होती.
" दोन...पाच...विस... दोन... दोन... दोन...पाच....दहा..., ....., ....,,.... कुल मिलाकर ८७ रुपया. " हातातले पैसे मोजत ती भरल्या आभाळाकडे बघु लागली. तसाच फुटपाथवर टाकुन दिलेला कडकडीत, अर्धमेला देह. " आयेगा मजा अब बरसात का, तेरी-मेरी दिलकश मुलाकात का....लाल्ल्ल्ल ला ला लाला लाल्ल्ल्ल्ल....आ आआ आआआ."
" ओ संतोस इधर क्या करती रे ? चल तिल्ली बझार. उधर बडा गिर्‍काईक मिलेगा. थोडा मस्का लगानेका... बझार बडी तेजी मे है हा आजकल."
सलमाच्या आवाजाने संतोष फुटपाथवरुन उठली , आणि काहितरी अचानक आठवल्यासारख झपझप पावले टाकत, रेल्वे पुलाच्या बोळाकडे निघाली.
" कितनी बार बोला पर तू नही सुनेगी. मै तो चली." म्हणत सलमाही चुपचाप चालू पडली.
ती निघुन गेल्याची शहानिशा करुन संतोस ने पुन्हा चालायला सुरुवात केली. चार पडक्या-झडक्या अर्धवट बांधकामाच्या ईमारती मागे सोडुन तिने एक निसरडी जागा गाठली, आणि आजुबाजूचा कानोसा घेऊन एक कचरा कुंडीच्या इथे येऊन टेहळनी सुरु केली. अगदी भयान रात्र त्यात हे निर्जन ठिकाण, कोणी चिटपाखरु आसण्याची शक्यता कमीच... हे पाहुन तिने दोन ढेगांवर असणार्या एका खोपटाकडे धाव घेतली.
ररर्र असा पत्र्याचा कर्कश आवाज. खोपटं कसलं, चारी बाजुला लहान मोठ्या आकाराचे आणि काळे-कुट्ट पडलेले पत्रे फक्त नावापुरतेच आधाराला उभे होते. आत दोन अ‍ॅल्युमीनीअमच्या काळपट ताटल्या आणि एक पितळी तांब्या. ठिकठिकाणी ठिगळ पडलेली एका मळक चटई. केसाचा गंगावन, हातातल्या भाराभर बांगड्या, गळ्या-कानातले भडक नकली दागीने तिने ओरबाडून काढले. तोंडावर सपासप पाण्याचा मारा करुन ती त्या पत्राच्या शेडला टेकली. बसल्याक्षणी तिने कापडे काढुन एक लुंगी आणि लाल बनीयान अंगात चढवली. आता 'ती' चा 'तो' झाला होता.
त्या हालचालीची चाहुल बाजुला झोपलेल्या दोन जिवांना लागली होती. उपाशी पोटाने झोपलेली ती दोन लहान लेकर आत्तापर्यंत उठली आणि संतोस ला बिलगली.... " बा आला...बा आला... बा मना भुक लागले रं... खायाला काय आनल ? दी ना !" संतोस ने येताना बरोबर आणलेलेल्या खाण्याच्या पुड्या त्यांच्या पुढे ठेवल्या. भुकेली मुले त्यावर तुटून पडली होती. पाच एक मिनिटांत सगळ्याचा फडश्या पडला, हे पाहुन संतोसच्या मनात एक विचार आला, " या अनाथ दोन जिवासाठी तर रोज टाळ्या वाजवत दारोदारी भटकतो मी. नाहितर भिक मागुन दिवसाला मिळणार्या पाच- दहा रुपयात मस्त जगत होतो."
बाजुला असलेल्या प्लॉस्टीकच्या भांडयातले पाणी घटाघटा पिऊन संतोष ने संतोषाने आपले डोळे मिटले.... उद्या परत 'तो' ची 'ती' होण्यासाठी.

रविवार, ८ मार्च, २०२०

माझ्यातली 'ती'



" तिच्या मनाची घालमेल एका अंकामध्ये मांडने खरं तर शक्य नाही.
तिची नानाविध रुपे, हजारो रंगछटा आणि अनेक भाव-भावना,
कधी व्यक्त... कधी अव्यक्त, तर कधी मुक्त आणि कधी बंदिस्त,
त्याच ' माझ्यातल्या ती ' ला तिच्याच जागतिक महिला दिना निमीत्त, एक छोटीशी भेट
म्हणजे आम्हा सगळ्यांचा हा छोटासा प्रयत्न,
हा पहिला-वहिला स्त्रि-विषेश अंक आपणास सादर करत आहोत
माझ्यातली 'ती' "

*****
नुसतीच वणवण आयुष्याची,
अन् नुसताच वैशाख मास.
जखडली जरी पाळेमुळे,
जरी गोठून गेले श्वास.
युगे युगे वंचित ठेवुनीही
तू पूसलास ना तो विश्वास.
गवसली घालून स्वयंसिद्धीस
मी आज निर्मीले माझे अवकाश.

*****
आज पुन्हा पंखात बळ घेऊन, नव्या दिशेने उडण्यासाठी...
आज पुन्हा राखे मधूनी, फिनिक्स प्रमाणे फडफडण्यासाठी...
घेऊन आलो आहोत.... माझ्यातली 'ती'.


*****

स्त्री विशेषांक - माझ्यातली ' ती २०२०

---------------------------------------------------------------------------------
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा 💐💐💐
जागतिक महिला दिना निमित्त आम्ही घेऊन आलो आहोत...
स्त्री विशेषांक - माझ्यातली ' ती ' . 😊😊

आपल्या प्रत्येकामध्ये दडलेल्या 'ती' ला हा अंक समर्पित. 🙏
अंक वाचुन तुमच्या प्रतिक्रिया आणि सुचना नक्की कळवा.

शब्दांश प्रकाशन- 
shabdaunsh@gmail.com 
facebookalwayson@gmail.com

https://drive.google.com/file/d/1EwXCYh8W4JN8jwOj7QfYgxomG6rGHbpu/view?usp=sharing

माझ्यातली ' ती ' स्त्री विशेष अंक आता esahity.com वर ! 
http://www.esahity.com/2312-235023732327233323682344.html

मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०

रखमा...



' साथीच्या रोगान विठोबाचे निधन झाले आणि  सगळ्या जबाबदार्या, सगळ्या कर्तव्यांच ओझ रखमावर पडलं-  वर्षाचा म्हादु आणि - वर्षाची गंगी ही दोन मुले... त्यांच्या शाळेचीपोटा-पाण्याची ही सगळी जबाबदारी पार पाडताना तिची पुरती दमछाक होऊन जायची. त्यात हातात जमीनीचा फक्त एक तुकडा 'मारुतीचा माळ', तो पण रेताड भाग, अगदी डोंगरा लगतचा ...पीक आलच तर अगदी जेमतेम... अन त्यावरही मानसातल्या कोल्ह्या, लांडग्यानची नजर होती. तिच्या तोंडचा घास बळकावण्यासाठी हे लोक आपापल्या परिने प्रयत्न  करत असत. या सगळ्यांना पुरून उरणारी रखमा आता मात्र मनोमन खचत चालली होती. नवरा अकाली गेल्याचे दुःख होतेच, तरीही आपल्या दोन लेकरांकडे बघून त्या मारुतीरायाला साकड घालत, ती एक-एक दिवस ढकलत होती. '


आषाढ मध्यावर आलापेरणीची हिरवीगार पीकही मळीमध्ये दिमाखात डोलू लागली, आणि लावनीची लगबग सुरु झाली होती.

"
आज उजाडल्या पासनं वातावरण पावसाच हाय !  ढग फुटल्यागत कोसळतोय ... आकाडाचा पाऊस लावनीला उमद्या जोमान फुलवतो." रखमा नुकतेच नेसुन आलेले लाल-निळे पातळ चापुन-चोपुन निटनेटके करत, घराच्या दारातून हलकेच डोकावत बडबडत होती.

"
माय  यकटीच काहुन बडबडते गं ?" गंगी तिच्याकडे गमतीने पाहुन विचारु लागली.

"
आज पाऊस मोप हायदोग पन शाळला जाऊ नगा. म्या मारुतीच्या मालावर जाते, आन भात लावुन घेते. आज लावनी केलीच पायजे."
 हातात मातीचा दिवा आणि अगरबत्ती घेऊन ती चुलीकडे वळली . पेटत्या जाळावर अगरबत्ती टेकवून दिवा लावत-लावत पुन्हा देवाकडे वळली.... पुढ्यातल्या बाप्पाच्या फोटोंपुढे ओवाळणी करत तिने हात जोडले.

"
माय मी बी येव काय ? "    छोटा म्हादु तिच्या पदराला धरुन खेचत मागे लागला.

"
सोन्या एकच विला हाय ना... मग तु काय करणार येऊन... पाऊस बी मोप पडतोय. भिजलास शीक पडशील, गंगी शालेत बी जाऊ नग हा... आज घरातच थांबा."
हातातला विळा दाखवर रखमाने त्याची भाबडी समजुत काढली. आणि ते समजुदार लेकरु ते सुद्धा गप्प बसले.
फाटक-तुटक ईरल तेवढच पावसापासून आधाराला होते... ते हातात घेऊन, भाकरीची टोपली सोबत घेऊन तिने दार लोटलेडोक्यावरचा पदर सावरतं , ऊजाड कपाळाने ती पहिल्यांदाच घराबाहेर पडत होतीओल्या झालेल्या डोळयांच्या कडा लपवण्यासाठी तिने पाठमोरीच हात करुन मुलांचा निरोप घेतला.

सदा भाऊ शेत नांगरणी करत होता. भारी रबरबीत कमरेएवढ्या चिखलात शेतीची लावनी रंगली होती.  आणि भरला पाऊस बघुन किसनी माळीन झोकात गाणं गात होती. तिच्या गाण्याबरोबर काम करण्यासाठी हुरूप आला होता.

" हिरव सोनं पिकल या
शेतात नागर रुतल या
चल राजा ररर ,चल सर्जा
लावनीच गान सुचल या
आता लावनीच गान सुचल या !" 

रखमाकडे पाहुन सगळ्यांचेच डोळे मोठे झालेहि एकटी शेत लावणार आणि नांगरणी कोण करायचे ? ' हा प्रश्न सदा भाऊच्या अगदी तोंडावर आला होतापण तिची विचारपुस करण्यास मात्र कोणी ही धजेना. शेवटी पुढे जाता-जाता  राहवून रखमानेच तोंड उघडले.
"भाऊ झाली काय नांगरणी... चांगलाच जोर लावलाय म्हणायचा ! "

एवढ्यात किसनी माळीन तोंड वर करुन बोलली.
"रखुताई ! सरासरा नांगरणी करुन, कमरेपातूर रबरबीत चिखल तयार पायजे, तवा कुठ सोनं पिकतया ! ह्या बाई मानसाच काम न्हाय . तू यकली कस करायची समद ? "

"
वयनी जमत का ते तर बगु. बाकी समदी माझ्या मारुतीरायाची किरपा हाय म्हणा, तो आडत्याला वर काडतुया बगा. " रखमा शेताकडे वळली. कमरेचा विळा बांधावर ठेवुन तिने मारुतीरायाला हात जोडले.

"देवा तु गोरगरीबांच्या हाकला धावतुयाकाटाकुट्यांपासुन समद्याच रक्षण करतुया , गुराढोरावर तुझी आशीच किरपा ठेव. आज पासुन लावनीला सुरुवात करते , कष्ट कराया मी डगमगत नाय पण माझ्या धन्यासार माझ्या बी अंगात बळ दे !"
मंदिराकडे दृष्टी करुन केळीच्या पानावर ठेवलेला दही-भाताचा नैवेद्य दाखवत तिने डोळे मिटले. तोच तिचा थोरला भाऊ सोबत बैलजोडी आणि  नांगर घेऊन आपल्या  बहिणीच्या  मदतीसाठी पोहोचला होता.
"रखुताय  सुरवात करायची का मंग ? "
हाकेसरशी रखमा मागे वळली..." थोरल्या कधी आला  र्र ? म्हंजी कालचा निरोप मिळला व्हय ! आक्षी देवासारा धावलास म्हणायचा. "

"
निरोप मिळाला आन बेगिन धावत आलो बग. पावसाचा जोर बी वाडलाय. बाविच्या वाडीत पानी भरलय, आन मानखोर्यात तर लोक घरातून भाईर पडनात , आग समद्या नद्या-नाल भरुन व्हावत्यात."
"
काय बोलतु थोरल्या यवढा पाऊस भरला म्हनायचा ? "
"
व्हय मी नांगरतु, तोवर तु ढेकळ सारकी कर. कामाला लागु... जादा वेळ दवडुन जमायच न्हाय."  म्हणत थोरला कामाला लागला होता.

‘ सकाळच्या पहिल्या प्रहराला आलेली रखमा आणि थोरला, दुपार भरेपर्यंत शेतात राबत होती. पावसाने जोर अजुनच वाढवला. बरेच पाणी-पाणी झाले होते. त्यातच दोन वेळा बाळा पाटील घिरट्या घालून गेला.... त्याला पाहताच क्षणी रखमाच्या काळजाच पाणी झालं. गावातल्या बाया-पोरींवर याची वाईट नजर होती. आज कित्तेक दिवस या छोट्याश्या जमिनीच्या तुकड्यासाठी देखिल तो रखमाच्या मागे हात धुवून लागला होता. पण रखमा त्याला दाद देत नव्हती.’

 "
का ते म्हाइत न्हाय, पन थोरल्या, आजचा दिवस लय  वंगाळवाना वाटतोय... नुसत कसनुस झालय र्र ! "
ताठ उभी राहुन चौफेर नजर टाकत ती उगाचच बडबडली. पण थोरल्याच तिच्याकडे लक्ष नव्हते. शेतबांधावरच्या आईनाच्या झाडावर चढून त्याने  टेहळणी करायला सुरुवात केली होती. शेवटी वासुन तो झाडवरुन सरसर उतरला...आणि  डोक धरुन मटकन खाली बसला.
"रखु आग आभाळ फाटल बगं ! मागची नदी भरली , नदीवरना पानी व्हावतयवरला पुल बी दिसनासा झालाय. आर्र माज्या देवा ! काय केलस काय र्र हे ? "

थोरल्याची अशी दिनवाणी अवस्था पाहुन रखमाला परिस्थितीचा अंदाज आलाथोरल्याला आता लवकरच निघायला पाहिजे . नाहीतर  त्याच्या गावाला जाणारे सारेच रस्ते बंद होतील, हे ओळखून तिने  थोरल्याला उठवले.
"उठ हिम्मत हारु नगस.  ही नदी भरली पन आपल्या धरनाची नदी मोठी हाय, ती भरायच्या आत गाव गाठ... हितन डावीकडन जा... फोफळीच्या दोन बागा उलाटल्या की आट- धा पावलावर धरणाचा पूल लागतु बग."

"
आग पन हित तू यकटी कशी लावनी करायचीस, अजुन तास- दोन तासाच काम हाय न्हव ? " थोरला शेतावर एकवार नजर टाकत म्हणाला.

"
बेगीन पल आता... डोक्यावर पाऊस बग किती भरलाय. पानी अजुन भरल मग आडकुन बसशील.... तुझी पोर वाट बगत आसतील न्हवहे समद म्या बगती... तू आजाबात कालजी करु नगुस. नीग आता."
रखमाचा थोरला भाऊ तिचा निरोप घेऊन निघाला, आपले बैल-नांगर असे साहीत्य गुंडाळत, डावीकडून धरणाच्या पुलाच्या रस्त्याने झपझप पावले टाकत निघून गेला होतापोटाची  खळगी भरण्यासाठी गेले तास दिड-तास रखमा एकटीच लावणी करत होती. अर्धे-निम्मे शेत देखील अजून लावून झाले नव्हते. एवढ्यात आजुबाजुच्या शेतातील मजुर-माणसाची पळापळ सुरु झाली.
"पूर आला... पूरघरला पला गड्यांनो ! मानस व्हावत्यात ....गाय-बकरी बी व्हावुन गेली. पला र्र पला. घराकड पला! "

हातातील आवे खाली टाकुन गडी-मानसे आणि बाया-बापड्या दिसेल त्या मार्गाने घराकडे पळत सुटले होतेगावामध्ये पाणी भरलं असणार हे एव्हाना रखमाच्या लक्षात यायला पाहीजे होतपण हे शेत अगदी डोंगरालगल असल्याने इथे जास्त पाणी साचुन राहू  शकत न्हवते. ' डोंगरा लगलच्या शेतीसाठी मुसलधार आकाड्याचा पाऊस  पायजे नायतर यक आवा बी रुतायचा नाय ह्या जमीनीत...' ही तिच्या नवर्याने सांगीतलेली गोष्ट लक्षात ठेवुन ती पावसाच्या जोरावरती शेत लावतच राहीलीगावाकडची खबर तिला लागली नाही. आता फार उशीर झाला होता.
"मारुतीराया माझी चिमुकली दोन लेकर घरात एकलीच हायत ! त्याची राकन कर देवा !"
मनोमन मारुतीचा धावा करत रखमाने घराकडे पळ काढला. जिवाच्या आकांताने ती पळत सुटली.

१०-१२ मिनिटाचा रस्ता संपतो संपतो तोच घात झाला होता. रस्त्याच्या बाजुला डोलणार्या पिंपळाच्या झाडामागे आडुन बसलेला बाळा पाटील अवचीत येवुन रखमाच्या पुढ्यात टपकला होतात्याने अशी वाट अडवलेली पाहुन रखमा घाबरली...  तिने आजूबाजूला नजर फिरवली तर कोणी चिटपाखरूही दिसेनासगळे लोक शेतातून केव्हाचेच पांगले होते
"काय रखुबाई ! फार वाट बगाय लावता ... घरातून भायर बी पडत न्हाय. शेवटी मीच शेतात आलो. "  पाटील तिच्या थेट समोर उभा रहात म्हणाला.

"
पाटील, काय काम हाय ? लवकर बोला, माझी पोर वाट बघत्यात... घराकड यकटीच हायत."  पाटलाची आपल्यावर असलेली वेडीवाकडी नजर पाहुन रखमाच्या अंगाची आग झाली होती. तरीही तिने शांतपणे विचारले.

"
यका शेताच्या तुकड्यावर यवढी ऊडते व्हय, त्याच्या दुप्पट पैसा देतो बग. गप-गुमान ही जमीन मला मला दे."  पाटीलाने डायरेक्ट विषयला हात घातला होता.

"
पाटील माझ्या हाक्काचा तेवढाच तुकडा हाय. तो देवुन कस जमल? पोरं मोठी झाली की तेवढीच एक शिदोरी हाय तैनला. "  रखमा ताट मानेने उत्तरली.

"
ईचार कर रखमा... तुझी पोरं यकटीच घरात असतात, आणि तू बी हित यकटीच हायस.... कायबी होवू शकत हा."  म्हणत पाटील खीssखीss करून बेशरमीपणाने हसला, आणि तिच्या अजुनच जवळ येण्याचा प्रयत्न करु लागला.

 
त्याचे ते हिडीस शब्द ऐकुन रखमाच्या हाता-पायाची आग आग झाली.
"पाटला गप-गुमान वाट सोड, माझी पोरं वाट बघत्यात. उगा वाकड्यात शिरू नग.  "

आपला ' पाटला ' असा एकेरी उल्लेख केलेला पाहुन पाटील सापासारखा फणकारला...
"मला उलट बोलते व्हय. दावतोच तुला."  म्हणत त्याने झटक्यात एका हाताने तिच्या केसाचा बुचडा पकडला. बेसावधपणे ओले झालेले केस जोरात ओढल्याने रखमाच्या डोक्यातुन एक सणसणीत कळ उसळली. बिचारी कळवळली ...तिने हात-पाय मारुन पाहीले, पण काही केल्या तिला त्याचा हात सोडवता येईनाअगदी हताश होऊन तिच्या डोळ्यात पाणी तरळलेती आता काही करु शकत नाही, हे पाहुन बाळा पाटलाला अजुनच चेव एढलात्याने चक्क तिच्या पदराला हात लावला होताकेसावरची त्याची पकड सैल झाली, हे पाहुन संधीचा फायदा घेत रखमाने  कमरेला लावलेला विळा सरकन वरती ऊपसून काढुन उजव्या हातात पकडला होताक्षणाचाच अवकाश... एक गगनभेदी किंकाळी आणि पिचकारी सारखी उडणारी रक्ताची धार एकाच वेळी बाहेर पडली.

"
पाटला ! खर बोललास .... काय बी होवु शकत." 
रखमा मोठ्याने ओरडली. आणि त्या सरशी  तिने त्याला रक्तबंबाळ  अवस्थेत किसनी माळीनीच्या बाजुलाच असणार्या शेतात ढकलुन दिले. तिच्या नवऱ्याच्या एकुलत्या एक शस्त्राने पाटलाच्या हाताचा अचुक नेम घेतला होताहाताच्या तुटलेल्या नसीने पाटलाला उभ्या-उभ्या चिखलात आडवे केले.  सदा भाऊने सकाळीच शेत लावणीसाठी तयार करून ठेवलेल्या कमरेपर्यंतच्या रबरबीत चिखलात पाटील सपशेल आडवा पडलाबाळा पाटील कायमचाच चिखलात रुतला, पुन्हा केव्हा ही वरती रुजुन  येण्यासाठी. उभ्या शेतातील लाल चिखलावर एक वेगळीच लाल करा अलिप्तपणे पसरली होती. अशा पापी मानसाचे रक्त सामावून घ्यायला ती जमीन ही आज तयार नव्हतीपाठमोरी रखमा उजव्या हातात तोच रक्ताळलेला विळा घेऊन, तशीच भिजलेल्या अवस्थेत बेभान होऊन पुन्हा घराकडे धावत सुटली
 ------------------------------------------------------------------------------

काही ग्रामीण शब्द -
आकाडा -आषाढ .
मोप - खुप.
ईरल - बांबूचे वेत,पालापाचोळा तसेच थोड्या प्रमानात प्लॅस्टीक वापरुन तयार केलेले ,पावसापासुन सौरक्षण करण्यासाठी शेतात वापरले जाणारे साधन.
यकली - एकटी.
वंगाळवाना - विचित्र असा.
आभाळ फाटणे - मुसळधार पाऊस येणे.
व्हावत्यात - वाहुन जातात.
आवे- लावनीस तयार झालेल्या हिरव्या भात शेताच्या छोट्या-छोट्या काड्या.
हिडीस - घाणेरडे / वाईट.
केसाचा बुचडा - केसाचा अंबाडा.
सपशेलसंपूर्ण / पूर्णपणे.



वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय." पण ते शक्य न...